प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १३ वें.
स्पर्धाक्षेत्राकडे पुन्हां एकदां.

पूर्वगत माहितीचें विंहगवृत्तीनें अवलोकन करून ज्या गोष्टी आपण प्रदेशानुरुप मांडल्या त्या आतां विषयानुरूप मांडल्या पाहिजेत. विषयास प्रारंभ जगाच्या स्पर्धेच्या अवगमनानें झाला, आणि ज्या स्पर्धा करणार्‍या संस्था जगांत आहेत त्या सर्वांत संस्कृतिसंस्था ही अत्यंत महत्त्वाची आणि आपल्या इतिहासांत अनेक राष्ट्रांचा इतिहास समाविष्ट करणारी असल्यामुळें संस्कृतिस्पर्धेचा विषय अगोदर हातीं घेऊन आपला ज्या संस्कृतीशीं अवयवावयवी संबंध आहे त्या हिंदु संस्कृतीचें आणि तिच्या प्रसाराचें व्यापक ज्ञान व्हावें म्हणून हिंदूंच्या जगभर झालेल्या खटपटी व चळवळी यांची जागेचा मर्यादितपणा लक्षांत घेऊन जितकी विस्तृत माहिती देतां आली तितकी दिली आहे. तिचें अवलोकन केलें असतां ब्राह्मणांच्या, बौद्धांच्या आणि संस्कृत वाङ्मयाच्या प्रवर्तकांच्या चळवळीचें खोल जरी नाहीं तरी व्यापक ज्ञान होईल. आतां हिंदु संस्कृतीच्या नांवें खालील खात्यांवर काय पडलें आहे याचा हिशोब देतों.

(१) हिंदु संस्कृतीनें म्हणजे संस्कृत ग्रंथांनीं व भाषेनें संस्कार केलेल्या भाषा.
(२) तिनें संस्कारिलेल्या जाती.
(३) हिंदूंच्याच वंशजांकडून व्याप्त झालेले किंवा त्यांचा जेथें बराचसा जमाव आहे असे प्रदेश.
(४) हिंदु संस्कृतीचें कालदेशदृष्ट्या महत्त्वमापन.
(१) भारतीय संस्कृतीचा संस्कृतभाषा व संस्कृतवाङ्मय यांच्याद्वारा इतर देशांवर झालेला परिणाम येणेंप्रमाणेः-
संस्कृत भाषेशीं निकट नात्याच्या भाषा भरतखंडाबाहेर ज्या देशांत आढळतात असे देश सिंहलद्वीप आणि मालदीव बेटें हे होत. या भाषा प्रचारावरून भारतीय जनतेचें मोठ्या प्रमाणावर प्रयाण सिद्ध होतें. ज्या आर्य भाषाकुलाबाहेरील भाषांवर संस्कृत भाषेंतील शब्दांचें त्यांत मिश्रण होऊन परिणाम झालेला आहे अशा भाषा अनेक असून त्या अनेक भाषाकुलांतील आहेत. ब्रह्मदेशांत चालणार्‍या ब्रह्मी, कुकिचिन, लोलो, सिनिटिक (करेण), थइ इत्यादि संघांतील सुमारें ७३ पोटभाषा या मूळ तिबेटो-चिनीकुलांतील असून त्यांत अनेक संस्कृत शब्द शिरले आहेत. मलायो-पॉलिनेशियन कुलांतील मलयु भाषा, ऑस्ट्रो-एशियाटिक कुलांतील मोन-ख्मेर व पलौंगवा संघांतील सुमारें १० भाषा व इंडो-चिनी संघांतील बिम, बत्ता, तागाल, लाव इत्यादि भाषा व द्राविड कुलांतील तुलुव, कोदगु, गोंडी व कोरकु या भाषा, जावाबेटांतील कविभाषा आणि फिलिपाइन व सुमात्राबेटांतील भाषा या सर्व भाषांमध्यें संस्कृत शब्दांचें मिश्रण झालें आहे. म्हणजे संस्कृतभाषेचा पगडा तिबेटो-चिनी, ऑस्ट्रो-एशियाटिक, द्राविड, इंडो-चिनी इत्यादि कुलांतील जवळ जवळ १०० परकीय भाषांवर बसला आहे.

संस्कृत भाषेचा यापेक्षां महत्त्वाचा परिणाम म्हणजे संस्कृत ग्रंथांचा प्रवेश ज्या भाषांत झाला आहे अशा भाषा मलयु आणि जावा या होत.

ज्या भाषांवर संस्कृत भाषेचा परिणाम झाल्याचें स्पष्ट दिसत नाहीं पण तसा संशय घेण्यास सबळ कारणें आहेत अशा भाषांमध्यें सेलिबिसमधील बूगी भाषा मोडते.

चिनी भाषेंत संस्कृत वाङ्मयाचा प्रवेश झाला पण त्या भाषेवरील परिणाम अद्यापि मोजला गेला नाहीं. तिबेटी व जपानी भाषांवर परिणाम झाल्याचीं चिन्हें दिसत आहेत.

ज्या भाषा मूळ आर्यकुलांतील असून ज्यांचें स्वरूप इतर भाषांचा त्यांवर परिणाम झाल्यानें पालटलें आहे अशा भाषा म्हणजे मालदिवी व काफरिस्तानांतील पैशाची या होत. हा भारतीय विजयाचा भाग नसून अपसृष्टीचा भाग होय. लखदिवी भाषा द्राविड कुळांतील असून अपसृष्ट झाली आहे.

(२) आतां भारतीय संस्कृतीनें संस्कारलेल्या जातींचा हिशोब घ्यावयाचा. येथें आपणांस प्रथम ब्राह्मणांचें अगर तत्सम जातींचें हिंदुस्थानाबाहेर अस्तित्व किती ठिकाणीं आढळतें हें पाहिलें पाहिजे. हें अस्तित्व अनेक ठिकाणीं आहे. ब्रह्मदेशांत पावन, सयामांत ब्राह्मण, कांबोजांत बकु अथवा प्राम ब्राह्मण व आचार जात, मलायांत इदान जात, बलि व जावामध्यें पादण्ड, इत्यादि लौकिक नांवांनीं ओळखल्या जाणार्‍या जाती ब्राह्मणच आहेत. जेथें ब्राह्मणगौरव आहे तेथें हिंदुत्व पक्कें आहे असें समजावें. ज्या बाह्य देशांतील जातींवर भारतीय संस्कृतीचा परिणाम झाल्याचें अवशेषरूपानें दिसत आहे अशा जाती शोधूं लागल्यास पेगूंतील तलैंग लोक, काचिन लोक, आराकानांतील माघ, ब्रह्मी, काफरिस्तानांतील लोक, बलुचिस्तानांतील गिचकी जात, इराणांतली लुरी व गुदाद, आफ्रिकेंतील जुबालँडमधील कांहीं जाती, सेलिबिसमधील बूगी, बोर्निओमधील लोक, सुमात्रांतील अनेक जाती, कांबोजमधील चाम, इत्यादि आढळतात. बौद्धांचा तर सिंहली, ब्रह्मी, चिनी, जपानी, या लोकांवर व पूर्वेकडील द्वीपकल्पांतील व बेटांतील, लोकांवर अनेक बाबतींत महत्त्वाचा परिणाम झालेला आहे.

(३) भारतीयांच्या वंशजांकडून व्याप्त झालेले किंवा त्यांचा जेथें बराचसा जमाव आहे असे प्रदेश म्हटले म्हणजे, सिंहलद्वीप, लखदीव, मालदीव, अंदमाननिकोबार, ब्रह्मदेश, मलाया, सयाम, कांबोज, कोचिनचीन, टाँकिन, जावा, बलि, सुमात्रा, लाँबक, सेलिबिस, फिजीबेटें, मादागास्कर, पूर्व आफ्रिका, दक्षिण आफ्रिका, ब्रिटिश गियाना, त्रिनिदाद, व डच गियाना हे होत.

(४) भारतीय संस्कृतीचें कालदेशदृष्ट्या महत्त्वमापन करावयाचें तर सिलोनचा अगोदर उल्लेख केला पाहिजे. सिलोन देशांत भारतीय संस्कृतीचा प्रसार अत्यन्त प्राचीन काळीं झाला व सिलोन हें हळूहळू भरतखंडाचा एक भाग बनलें. त्यानंतर ब्रह्मदेश, मलाया, सयाम, कांबोज इत्यादि पूर्वेकडील देशांत भारतीय संस्कृतीचा प्रसार झाला व तेथें सिलोनइतका नसला तरी बराच महत्त्वाचा परिणाम झाला. पश्चिमेकडे फार प्राचीन कालापासून भारतीयांच्या वसाहती व राज्यें हीं अफगाणिस्तान, इराणचा कांहीं भाग, बलुचिस्तान इत्यादि प्रदेशांत होतीं; पण मुसुलमानी संस्कृतीनें तीं नष्ट झालीं व आतां फक्त कांहीं गोष्टी अवशेषरूपानें राहिल्या आहेत. मुसुलमानी आवेगापुढें भारतीय संस्कृतीच्या पराभवाचा काळ म्हटला म्हणजे ख्रिस्तोत्तर १००० पासून १५०० पर्यंतचा होय. त्यानंतर यूरोपीय सत्तेचा काल होय. ज्या लोकांनां मुसुलमानांबरोबर फारसे झुंजावें लागलें नाहीं अगर निदान त्यापुढें नमावें लागलें नाहीं असा प्रदेश म्हटला म्हणजे सिंहलद्वीप व इंडोचायनांतील कांहीं भाग होय. हिंदूंची उचल मुसुलमानांच्या सत्तेच्या प्रकर्षानंतर झाली असे प्रदेश म्हटले म्हणजे हिंदुस्थानांत विजयानगर, महाराष्ट्र व पंजाब हे होत व बाहेर बलिद्वीप हें होय. आफ्रिकेच्या पूर्व किनार्‍यावर भारतीयांच्या वसाहती बरेच दिवसांपासून आहेत; व तो प्रदेश वसतियोग्य करण्यास त्याच कारण झाल्या आहेत. आतां मात्र तेथें यूरोपीयांचा प्रवेश होऊन ते सर्वसत्ताधीश बनले आहेत. यानंतर अलीकडे जे भारतीय कूली म्हणून बाहेर गेले ते फिजीबेटें, ब्रिटिश गियाना, डच गियाना, त्रिनिदाद, दक्षिण आफ्रिका इत्यादि प्रदेशातं आढळतात. त्यांचें जरी तेथें संख्येनें महत्त्व असलें तरी त्यांची स्थिति अत्यंत निकृष्ट आहे.

आतां आपण विविध संस्कृतींचे स्पर्धासंबंध लक्षांत घेऊं.

पुढे वाचा:स्पर्धाक्षेत्राकडे पुन्हां एकदां.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .