प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण १ लें.
सध्यांचे पारशी.- अठराशें अठरा सालीं महाराष्ट्र देश जिंकला जाऊन तेथें व हिंदुस्थानांत इतर सर्वत्र ठिकाणीं ब्रिटिश सत्ता जशी हळू हळू पसरली तशी या बाह्य जातींच्या मनांत देश्य संस्कृति व चालीरीती यासंबंधानें पूर्वींची जी भावना होती ती बदलली. आज पुष्कळ पार्शी लोकांनां इंग्रजी भाषा गुजराथीपेक्षां जास्त संवईची झाली आहे. ते घरीं इंग्रजी बोलत नाहींत, गुजराथीच बोलतात, परंतु त्यांची बोलण्याची व लिहिण्याची गुजराथी आतां पूर्वींसारखी शुद्ध राहिली नसून ती तशी व्हावी अशी त्यांनां इच्छाहि दिसत नाहीं. त्यांची लिहिण्याची गुजराथी ही एक अपभ्रष्ट भाषा असून तिला पारशी गुजराथी असें नांव ते देतात. ‘संसारिका’ नांवाचें एक गुजराथी काव्य लिहिणारे शेट मलबारी यांसारखे लोक शुद्ध गुजराथी लिहितां येतें याचा अभिमान मानीत. परंतु ते दिवस गेले. मलबारी यांची पिढी आज नाहींशी झालेली आहे. मलबारी यांनीं वरील कविता प्रसिद्ध केली व त्या वेळीं देशी भाषेंत प्रसिद्ध होणार्‍या लेखांचे व ग्रंथांचे रिपोर्टर यांनीं असा एक शेरा मारला होता कीं, “कवितेची भाषा अगदीं शुद्ध गुजराथी आहे, अर्थात् मलबारी हे पारशी असल्यानें त्यांच्या हातून ही कविता लिहिली गेली नसावी”. या रिपोर्टरानें असेंहि आणखी म्हटलें होतें कीं, “कवितेंतील भाषासरणी व भावनांचा ओघ पाहतां कोणीतरी पेट्रियटनें म्हणजे देशभक्तानें ही कविता लिहिली असली पाहिजे”. अर्थात् या रिपोर्टरानें पारशी देशभक्त असणार नाहीं अशी आपली समजूत प्रदर्शित केली आह! असो. पारशी लोक हरएक बाबतींत बहुतेक पाश्चात्त्यांसारखे झाले आहेत ही गोष्ट सामान्य दृष्टीलाहि स्पष्ट दिसते. हिंदुस्थानांत सामाजिक आणि राजकीय विषयांत लक्ष घालणार्‍या समाजांत इंग्रजी भाषेचा जोरानें पुरस्कार करणारे असे हे पारशी लोकच होत.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .