प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण २ रें.
वेदप्रवेश– ऋग्वेद.

वेदकालेतिहास.- इतिहासाची अत्यंत स्थूल कल्पना म्हणजे कालनुक्रमानें वृत्तांत. कालानुक्रमानें वृत्तांत. या विधानांतहि दोन कल्पना येतात. एक कल्पना म्हटली म्हणजे, घडलेल्या गोष्टींपैकीं अगोदर कोणती झाली नंतर कोणती झाली हें म्हणजे वृत्तांचें पौर्वापर्य सांगणें; आणि दुसरी कल्पना म्हटली म्हणजे पौर्वापर्य व कालाची गति यांची संगति दाखविणें. एखादी गोष्ट अमुक गोष्टीनंतर दहा वर्षांनीं, वीस वर्षांनीं अथवा तीस वर्षांनीं झाली असें सांगतां आलें म्हणजे दोन गोष्टींतील दूरपणा अधिक निश्चित तर्‍हेनें मोजला जात आहे असें होतें. हा दूरपणा आपण वर्षांनीं सांगतों म्हणजे आपण फक्त एका कार्यपरंपरेचा दुसर्‍या कार्यपरंपरेशीं संबंध दाखवितों. इतर कार्यपरंपरांशीं तुलना करण्यसाठीं आपण ज्योतिःशास्त्राचा उपयोग करितों याचें कारण आकाशस्थ ता-यांच्या, ग्रहांच्या आणि उपग्रहांच्या गति म्हणजे दैनंदिन परिभ्रमणाच्या स्थानांतील फरक अधिक निश्चित कालानें होतात. शिवाय त्यांच्यामध्यें क्रियांची पुनरावृत्ति होत असल्यानें आणि तीहि नियमित कालानें होत असल्यामुळें कालपरिमाणास त्या अत्यंत उपयोगी पडतात.

ज्योतिःशास्त्रविषयक कालपरिमाणें आपण एकदां ठरविलीं म्हणजे काल मोजावा कोठपासून हें ठरवावें लागतें. काल मोजण्यास उपयुक्त प्रारंभस्थान मिळालें नसेल अशा कालांत ज्योतिःशास्त्रमूलक परिमाणपद्धति उपयोगी पडत नाहीं.

ज्योतिःशास्त्रमूलक कालपरिमाणाच्या म्हणजे वर्षविशिष्ट गणनाज्ञानाच्या अभावीं, वृत्तांचें समकालीनत्व अंकनिर्दिष्ट कालविभागाशीं दाखवावयाचें तें एकमेकांशीं दाखविलें पाहिजे. आपणांस सामाजिक संस्थांच्या प्रगतींची आणि भूपृष्टावरील फेरफारांसारख्या इतर क्रियासमुच्चयांची एकामेकांशीं समकालीनत्व पाहीन परस्परसंगति ठरविली पाहिजे. यासाठीं सोपा उपाय म्हटला म्हणजे ज्या संस्थेच्या इतिहासाची आपणांस अधिक सूक्ष्म माहिती असेल त्या संस्थेच्या इतिहासाशीं इतर वृत्तांत जुळविले पाहिजेत. ज्या संस्थांनां कांहीं इतिहास आहे अशा संस्थांच्या प्रगतीच्या पायर्‍या जाणल्या पाहिजेत.

वेदकाल म्हणजे सर्व वैदिक वाङ्मयामध्यें अगदीं पहिलें सूक्त अगर पहिलीं सूक्तें जेव्हां रचलीं गेलीं तेव्हांपासून वेदांच्या संहिता ज्या काळांत झाल्या त्या काळापर्यंत सर्व कालविस्तार होय. या विस्तृत कालामध्यें सामाजिक संस्थांनां, विशेषतः ब्राह्मण जातीला, अनेक रूपांतरांतून जावें लागलें आहे. याच काळांत यज्ञसंस्था अमंत्रक क्रियेपासून मोठमोठ्या ऋतूंच्या कल्पनेपर्यंत वाढली आणि जवळ जवळ नष्टहि होण्याच्या पंथास लागली. आर्यांचा प्रसार या काळांत सर्व हिंदुस्थानभर आणि कांहीं अंशीं हिंदुस्थानाबाहेर झालेला दिसतो. त्यांची भाषा अनेक फरक पावलेली दिसते. देवतांच्या उच्चनीचतेंत फरक झालेले दृष्टीस पडतात. आर्यांचा जो चोहोंकडे विस्तार झाला त्या विस्ताराबरोबर झालेल्या राजकीय खळबळी देखील दृष्टीस पडतात. कुलें गोत्रें यांच्या देखील अनेक पिढ्या होऊन गेल्या कुलाभिमान व गोत्रभिमान देखील समाजांत दृग्गोचर होत आहे सामाजिक संस्थांमध्यें एक महत्त्वाची संस्था जें गृह त्याचाहि विकास प्राथमिक व अनियंत्रित स्वरूपापासून झालेला दिसतो. आर्यांची विचार करण्याचीं संवय देखील क्रमानें बरीच वृद्धिंगत झालेली दृष्टीस पडते.

या सर्व प्रकारची प्रगती आपणांस वेदकालांत दृष्टीस पडते. या प्रगतीचा इतिहास लिहितांना केवळ या काळांत आढळणारे एकमेकांशीं असंबद्ध देखावे आपणांस दाखवावयाचे नाहींत. प्रत्येक प्रकारच्या प्रगतीचा दुसर्‍या प्रकारच्या प्रगतीशीं संबंध येतो ग्रंथांचें स्वरूप ब्राह्मणजातीच्या इतिहासाशीं व प्रयत्‍नाशीं फारच निकट रीतीनें संबद्ध आहे. शब्दांचा व भाषेचा इतिहास हा लोकांच्या प्रसाराशीं संबद्ध आहे. आणि यज्ञसंस्थेचा इतिहास घेतला तर इतिहासांतील अनेक वृत्तें समाजाच्या दुसर्‍या अंगांशीं संबद्ध आहेत. यामुळें प्रत्येक अंगाचा स्वतंत्रपणें इतिहास द्यावा लागेल आणि त्या इतिहासांतील वृत्तांचा संबंध समाजाच्या इतर अंगांच्या प्रगतीच्या वृत्तांशीं शोधून द्यावा लागेल. या प्रकारानें इतिहास निवेदन करावयास घेतलें म्हणजे प्रत्येक अंगाची प्रगति मोजतां येईल. विवेचनसौलभ्यासाठीं वेदकालेतिहासाचे खालील विभाग पाडतां येतील.

(१) ग्रंथाचा विकास व वाङ्मयेतिहास.
(२) सामाजिक संस्थांचा न विशेषेंकरून ब्राह्मणजातीचा इतिहास.
(३) यज्ञसंस्थेचा इतिहास.
(४)आर्यांच्या प्रसाराचा इतिहास.
(५) शब्दांचा व भाषेचा इतिहास.
(६) देवतांचा इतिहास.
(७) राजकीय खळबळी.
(८) कुलांचा, जातींचा व गोत्रांचा इतिहास.
(९) गृहस्थधर्माचा, व स्त्रीपुरूषसंबंधाचा इतिहास.
(१०) व्यापक व नियमांकित विचाराचा इतिहास.

 या दहा मुद्दयांवरील इतिहास दिला म्हणजे अत्यंत विस्तीर्ण अशा वेदकालावर जो अंधार पसरला आहे तो बराच नाहींसा होईल. या दहा इतिहासांगापैकीं कांहीं अंगांचा एकमेकांशीं फार निकट संबंध आहे. यज्ञसंस्थेच्या इतिहासाशीं व्यापक विचाराचा इतिहास संबद्ध आहे, त्यापेक्षां सामाजिक संस्थांचा व विशेषतः ब्राह्मणजातीचा इतिहास फारच निकट रीतीनें संबद्ध आहे.

वर दिलेल्या बाबींचा इतिहास द्यावयाचा तो विधान रूपानें न देतां विवेचनरूपानें देणें अवश्य आहे. कां कीं, वेदविषयक अनेक गोष्टी लोकांस अपरिचित असल्यामुळें आणि अर्थ लावणा-यांमध्यें अनेक मतें असल्यामुळें वाचकांचा ऐतिहासिक संशोधनात्मक विवेचनांत प्रवेश करून देणें अवश्य आहे.

संशोधनांत प्रवेश करून देण्यपूर्वीं वेदविषयक स्थूल माहिती तरी हवी, तीशिवाय विवेचन देखील समजावयाचें नाहीं; आणि यासाठीं विवेचनांत प्रवेश करण्यापूर्वीं कांहीं माहिती विधानरूपानें दिली पाहिजे. ही अशी माहिती अत्यंत बाह्य गोष्टींविषयीं म्हणजे वेदग्रंथांमध्यें पुस्तकें किती, त्यांचा एकमेकांशीं संबंध काय यापुरतीच यावयाची. तसेंच कांहीं अत्यंत साधें व बहुतेक वेद वाचणा-यांस दृष्टीस पडणारें वेदाचें अंतरंग प्रथम वर्णन करून दाखविलें पाहिजे आणि नंतर वाचकांस अधिक खोलांत नेलें पाहिजे.

वेदग्रंथांतील धर्म वाचकांस समजावून द्यावयाचा म्हणजे एक बरेंच मोठें लचांड उपस्थित हेतें. उपनिषदांतील कल्पना आज समाजांत बर्‍याच प्रचलित आहेत त्यामुळें त्यांचें मूळ सांगण्यास अडचण पडत नाहीं. उत्तरकालीन स्थिति अधिक परिचित असल्यामुळें पूर्वकालीन स्थितीची माहिती देतां येते. वैदिक धर्माची गोष्ट तशी नाहीं. वैदिक धर्म म्हणजे श्रौतधर्म म्हणजे यजुर्वेदधर्म आज सामान्य वाचकांस मुळींच परिचित नाहीं. श्रौतधर्म महाराष्ट्रांतील यज्ञयाग करणार्‍या पांचपन्नास लोकांस मात्र तो थोडासा परिचित असेल. यासाठीं श्रौतधर्माचें उत्तरकालीन अथवा श्रौतसूत्रोक्त म्हणजे आजच्या प्रयोगी लोकांच्या परिचयाचें स्वरूप देऊन वैदिक धर्माचें स्पष्टीकरण केलें पाहिजे. हें स्वरूप सांगणें म्हणजे लिहिणाराला तसेंच वाचणाराला मोठें कंटाळवाणें आहे. तथापि इतिहास द्यावयाचा म्हणजे तें दिलें पाहिजे. तें देणें वाचकांच्या अभिरूचीचें कोड पुरविण्याची अपेक्षा न करतां वाचकांस वेद समजण्यास सोपें जाईल या बुद्धीनें दिलें पाहिजे, आणि कंटाळवाणा मजकूर दिल्याबद्दल वाचकाचा रोष निमूटपणानें सहन केला पाहिजे. असो.

आतां वेदाच्या स्थूल स्वरूपाकडे लक्ष देऊं. सामाजिक स्थिति, नीतिकल्पना, व्यवहारांतील पद्धति, छंदःशास्त्र, भाषा हे सर्व विषय स्वतंत्रपणें विवेचन करण्यजोगे आहेत. आणि त्यांचा इतिहास हा स्वतंत्र विषय होतो. तथापि या सर्व प्रकारच्या विषयांचा थोडासा स्पर्श वेदांचें स्थूलरूप वर्णन करतांना होतो.

वेदकालीन धर्मांच्या अधिक विकसितावस्थेचें उद्वोधन ज्या वेदोत्तर ग्रंथांत केलें आहे त्यांच्या साहाय्यानें वेदकालज्ञान आपणांस मिळवावें लागेल.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .