प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ३ रें.
वेदप्रवेश – अथर्ववेद.

अथर्वसंहिताकाल.– आतां कांहीं पुरावे मात्र असे सांपडतात कीं, त्यांवरून अथर्ववेदसंहिता ही ऋग्वेदसंहितेच्या मागाहूनची आहे हें निर्विवादपणें सिद्ध होतें. असा पहिला पुरावा म्हणजे ऋग्वेद व अथर्ववेदांतील भौगोलिक ज्ञान व संस्कृति. यांच्याकडे लक्ष्य दिलें असतां अथर्ववेदसंहितेचा काळ ऋग्वेदकाळाच्या नंतरचा आहे असें दिसून येतें. त्या वेळीं आर्य लोकांनीं आग्नेयीकडे पुढें सरकत सरकत गंगा नदी कांठचा प्रदेश व्यापिला होता. बंगाल्यांत दलदलीच्या अरण्यांतून राहणारा वाघ ऋग्वेदांत दृष्टीस पडत नाहीं, पण अथर्ववेदांत त्याचें वर्णन आढळतें. तो हिंस्त्र पशूंमध्यें सर्वांत बलाढ्य व भीतिप्रद आहे व राज्यभिषेकाच्या वेळीं अतुल राजबलदर्शक चिन्ह म्हणून राजाच्या पायांखालीं व्याघ्रचर्म हांतरतात व राजा त्यावर पदन्यास करितो. अथर्ववेदकालीं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे चार वर्ण होते इतकेंच नव्हें, तर ब्राह्मणांनां उच्च स्थानीं बसविलें आहे व त्यांस भूदेव असें म्हटलें आहे. अथर्ववेदाच्या अभिचारऋचांतील विषयांकडे पहिलें असतां त्या फार प्राचीन असून सामान्य जनांत प्रचलित होत्या असें स्पष्ट दिसतें. परंतु अथर्ववेदसंहितेंतच त्यांनां ब्राह्मणी स्वरूप प्राप्त झालेलें आहे. इतर देशांतील लोकांनां ज्याप्रमाणें आपले अभिचारमंत्र, मोहिनीमंत्र, वगैरेंचा उत्पादक कोण हें माहीत नसतें, परंतु हे मंत्र सामान्यतः सर्व लोकांच्या प्रचारांत असतात, त्याप्रमाणेंच अथर्ववेदांतीलहि होते, परंतु या वेदाच्या संहिताकालांतच ते बरेचसे सामान्य जनांच्या कक्षेबाहेर गेले होते. हा संग्रह ब्राह्मणानीं केला असून पुष्कळशीं सूक्तेंहि ब्राह्मणांनींच रचिलीं आहेत, असें वाचकांस पदोपदीं दिसून येतें. विशेषणें व उपमा देण्याच्या कामीं तर वारंवार अथर्ववेदसूक्तांच्या संग्रहकारांची व थोड्या बहुत प्रमाणानें लेखकांची ही ब्राह्मणी दृष्टि चांगलीच दिसून येते. उदाहरणार्थ, क्षेत्रकृमींविरूद्ध जो मंत्र आहे त्यांत संस्कारानें शुद्ध न केलेल्या अन्नाला ज्या प्रमाणें ब्राह्मण शिवत नाहीं, त्याप्रमाणें क्षेत्रकृमींनीं क्षेत्रांतील धान्यास स्पर्श करूं नये असें म्हटलें आहे. ब्राह्मणांनां जेवूं घालणें, यज्ञांत त्यांनां दक्षणा देणें वगैरे ब्राह्मणांच्या हिताच्या गोष्टी असलेला असा जो एक सूक्तांचा भाग अथर्ववेदांत आहे, तो ब्राह्मणांनींच रचिला असला पाहिजे यांत संशय नाहीं. आतां, जसें जुन्या अभिचारमंत्रांनां ब्रह्मणी स्वरूप प्राप्त होणें हें नंतरच्या कालाचें दर्शंक आहे, तसें अथर्ववेदांत वैदिक देवतांच्या कृतीचें जें वर्णन आहे त्यावरूनहि ही संहिता ऋग्वेदसंहितेनंतर तयार झाली हें स्पष्ट होतें. अग्नि, इंद्र वगैरे ऋग्वेदांतील देवता ह्या वेदांतहि दिसून येतात, पण यांचें वैशिष्ट नष्ट झालें असून त्या सर्व येथें जवळ जवळ सारख्याच दिसतात. निसर्गांतील शक्तीं या नात्यनें मूळ जें त्यांनां महत्त्व होतें, तें पुष्कळ अंशीं नष्ट होऊन ह्या वेदांतील मंत्र राक्षसांचें निरसन व नाश ह्याकरितांच असल्याकारणानें, या कामाकरितां मात्र देवतांनां आव्हान करण्यांत येतें. म्हणजे अथर्ववेदांत देवता या निवळ राक्षससंहारक बनल्या आहेत. सरतेशेवटीं, अथर्ववेदांतील देवविषयक व जगदुत्पत्तिविषयक कल्पनांवरूनहि त्यांतील मंत्र ऋग्वेदानंतरचे आहेत हें सिद्ध होतें. ह्या वेदांत तत्त्वज्ञानपरिभाषेचा चांगलाच विकास झालेला आहे, व ईश्वर सर्वव्यापी आहे या काल्पनेचें जें परिणत स्वरूप उपनिषदांमध्यें आढळतें तेंच जवळ जवळ येथेंहि आढळतें.

तत्त्वज्ञानविषयक सूक्तें सुद्धां अभिचारमंत्र म्हणून उपयोगांत आणलेलीं आहेत. उदाहरणार्थ, तत्त्वविद्येंतील “आसत्” ची मूळ कल्पना, राक्षस, शत्रु आणि अभिचारी ह्यांचा नाश करण्याच्या कामीं योजिलेली दिसून येते. यावरून या वेदांत जे अभिचार, मंत्र तंत्र इत्यादि अंतर्भूत झालेले आहेत, ते जुन्या काळीं सामान्य जनांत प्रचलित असलेल्या साध्या जादूटोण्याची नंतरच्या कल्पना जोडून तयार केलेली कृत्रिम आवृत्ति होत हें स्पष्ट होतें.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .