प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ३ रें.
वेदप्रवेश – अथर्ववेद.

अध्यात्म.- या कांडांतील विषय गहन व कांहींसे तत्त्वज्ञानात्मक असल्यानें, हें कांड अथर्ववेदसूक्तांच्या शेवटल्या वर्गांत घालण्यास हरकत नाहीं. हा शेवटला वर्ग म्हणजे तत्त्वज्ञान व जगदुत्पत्ति एतद्विषयक सूक्तांचा असून, हा अथर्ववेदाचा सर्वांत अलीकडील भाग होय. मंत्रविद्या व तत्त्वविद्या हीं एकमेकापासून फार दूर आहेत; पण आश्चर्य हें कीं, अथर्ववेदसंहितेंत अमिचार, भैषज्य व पुष्टि एवढेच विषय नसून, कांहीं तत्त्वज्ञानविषयक सूक्तेंहि आहेत. तथापि, हीं तत्त्वविद्याविषयक सूक्तें जरा बारकाईनें पाहिल्यास, असें दिसून येईल कीं, अभिचारमंत्रांप्रमाणें हीं व्यवहारोपयोगी अशीं आहेत. ह्यांमध्यें, सत्याविषयींची उत्कंठा किंवा त्याचें अन्वेषण किंवा विश्वांतील गहन कोडीं सोडविण्याचें औत्सुक्य वगैरे कांहीं एक दिसून येत नाहीं. यांत जो तत्त्वज्ञानाचा भाग आहे तो केवळ तत्त्वज्ञानविषयक सुप्रसिद्ध अशीं कांहीं वचनें असून त्यांचा उपयोग मांत्रिकांनीं आपल्या मंत्रांनां एक प्रकारचें रहस्यात्मक स्वरूप यावें म्हणून एक विचित्र व कौशल्यपूर्ण परंतु बाष्कळ कल्पनांनीं भरलेलें जाळें बनविण्याकडे केला आहे. प्रथमदर्शनीं जो भाग गूढार्थानें भरलेला असा दिसतो तो वास्तविक तसा नसून त्यांत पोकळ शब्दजाल व तथ्यापेक्षां बाष्कळपणाच अधिक असतो. अशा रीतीनें आपल्या खर्‍या साध्या कृतीवर रहस्याचें पांघरूण घालून तिला गूढ कृतीचें स्वरूप देणें हा मांत्रिकाच्या धंद्याचाच एक भाग आहे. कसेंहि असलें तरी, ह्या तत्त्वज्ञानविषयक सूक्तांवरून असें कळून येतें कीं, त्या वेळीं अध्यात्मज्ञानाची चांगलीच वाढ झालेली असावी. उपनिषद्भंथातील सृष्टीचा उत्पादक व रक्षक देवधिदेव प्रजापति आहे ही कल्पना व त्यानंतरची सृष्टीचें आदिकारण असें एक अव्यक्त तत्त्व आहे ही कल्पना या दोन्हीहि कल्पना व त्याचप्रमाणें ब्राह्म, तप, प्राण मन, हे तत्त्वज्ञानांतील पारिभाषिक शब्द वरील सूक्तें तयार करण्याच्या वेळीं, अस्तित्वांत असून त्यांचा बराच प्रासार झालेला असला पाहिजें. परंतु एवढ्यावरून अथर्ववेदांतील हीं जगदुत्पत्तिविषयक व तत्त्वज्ञानविषयक सूक्तें, भारतीय तत्त्वज्ञानाच्या वाढींतील एखादी अवस्था दाखवितात, असें म्हणतां यावयाचें नाहीं, ऋग्वेदांत जीं खरीं तत्त्वज्ञानविषयक सूक्तें आहेत त्यांतील बीजरूपानें असणारे विचार पुढें फक्त उपनिषदांतच वाढीस लागले. पण अथर्ववेदांतील तत्त्वज्ञानविषयक सूक्तांत, ऋग्वेद व उपनिषदें यांमधील अशा विचारांची एक विकासावस्था आढळतें असें अगदीं म्हणतां येत नाहीं. * डॉयसेन(Deussen)म्हणतो त्याप्रमाणें, हीं अथर्ववेदांतील सूक्तें त्या विचारांच्या विकासमार्गांत येत नसून मार्गांच्या कडेला आहेत.

ह्या सूक्तांतून पुष्कळशीं गहन तत्त्वें मधून मधून झळकतात, पण पुष्कळ वेळां असें म्हणण्याची पाळी येते कीं, ही चमकणारीं तत्त्वें अथर्वन् कवीच्या मेदूंतून निघालीं नसून त्यानें फक्त दुस-यांच्या बुद्धीचा आपल्या कामीं उपयोग करून घेतला आहे. उदाहरणार्थ, काल हा एकंदर सर्व सृष्टीच्या अस्तित्वाचें मूलतत्त्व आहे, ही कल्पना तत्त्वज्ञान्याला खरोखर साजेशी आहे; पण जेव्हां आपण अथर्ववेदाच्या १९ व्या कांडांतील ५३ वें सूक्त वाचूं लागतों तेव्हां त्याची भाषा एखाद्या तत्त्वज्ञान्याची असावी असें आपणांस न वाटतां ती एखाद्या गूढवाद्याचीं असावी असें वाटूं लागतें त्या सूक्तांतील कांहीं ऋचा येणेंप्रमाणें:-

कालो अश्वो वहति सप्तरश्मि सहस्त्राक्षो अजरो भूरिरेताः।
तमा रोहन्ति कवयो विपश्चितस्तस्य चक्रा भुवनानि विश्वा।।१।।

सप्त चक्रान् वहति काल एष सप्तस्य नाभीरमृतंन्वक्षः।
स इमा विश्वा भुवनान्यञ्जत् कालः इयते प्रथमो नु देवः।।२।।

पूर्णः कुम्भोधि काल आहितस्तं वै पश्यामो बहुधा नु सन्तः।
स इमा विश्वा भुवनानि प्रत्यङ् कालं तमाहुः परमे ब्योमन्।।३।। अथर्व.१९५३

भूरिरेत, अजर, सहस्त्राक्ष असा सप्तरश्मी अश्व जो काल तो (आम्हांला) वाहून नेत आहे. त्यावर निष्णात असे कवी आरोहण करतात. त्याचीं (त्याच्या रथाचीं) चाकें म्हणजे सर्व भुवनें होत.१.

या कालाचीं सात चक्रें आहेत, सात नाभी आहेत, याचा अमृत हा अक्ष * आहे ; तो या सर्व भुवनांनां प्रेरणा करतो व तो सर्व देवांत श्रेष्ठ म्हणून पूजिला जातो. २.

काल हा पूर्णकुंभाप्रमाणें (अविच्छन्न) आहे. त्याला आम्ही पुष्कळ ठिकाणीं (पुष्कळ प्रकारांनीं) पाहातों. तो सर्व भुवनांनां व्यापून राहिला आहे. त्याला श्रेष्ठ अशा व्योमांत (देखील) “काल” म्हणून हांक मारतात (किंवा हे “परमे व्योमनि।“ असें कालाला संबोधून म्हणतात.)३.

याच सूक्ताच्या ५ व्या आणि ६ व्या ऋचांत कालापासून सर्वांची उत्पत्ति आहे, हें फार चांगल्या तर्‍हेनें, सांगितलें आहे ; त्या ऋचा अशाः-

कालोमूं दिवमजनयत् काल इमाः पृथिवीरूत।
काले ह भूतं भव्यं चेषितं ह वि तिष्टते।।५।।

कालो भूतिमसृजत काले तपति सूर्यः।
काले ह विश्वा भूतानि काले चक्षुर्वि पश्यति ।।६।। अथर्व.१९.५३.

कालानें हें आकाश व ही पृथिवी निर्माण केली;  कालाच्या ठिकाणीं भूत, भविष्य व इष्ट (वर्तमान) यांचा वास आहे.५.

कालानें भूति (जग) उत्पन्न केली. कालाच्या ठिकाणीं सूर्य तळपत आहे ; कालाच्या ठायीं सर्व भूतांचा वास आहे ; व कालांत चक्षूचें निरीक्षण आहे. ६.

परंतु लगेच ह्यांच्या पुढील ऋचांतून व ५४ व्या सूक्तांत, नाना प्रकारच्या वस्तूंचा विशेषतः त्य कालीं ठाऊक असलेल्या देवतांचा नामनिर्देश करून या सर्व वस्तु व देवता कालापासून उत्पन्न झाल्या आहेत असें यंत्रासारखें पुनःपुनः सांगितलें आहे.

अथर्ववेदाच्या १३ व्या कांडांतील रोहितसूक्तांत सुद्धां खरें तत्त्वज्ञान फार थोडें असून गूढाचें अवडंबर फार आहे. या सूक्तांत सर्व प्रकारचे एकमेकांशीं संबंध नसलेले विषय, अव्यवस्थित रीतीनें मांडले आहेत. उदाहरणार्थ, ह्यांतील पहिल्या सूक्तांत, रोहिताची म्हणजे सूर्याची, (भौतिक तेजोगोलाची किंवा तदधिष्टत देवतेची) उत्पादक तत्त्व या नात्यानें, त्यानें द्यावापृथिवी निर्माण केली, आपल्या बलानें त्यांचें संरक्षण केलें, अशी प्रशंसा केली आहे ; व त्याच ठिकाणीं पृथ्वीवरील राजाचा व्यवहार व स्वर्गांतील राजा रोहित याचा व्यवहार यांची बुद्धिपुरस्सर संदिग्ध अशा भाषेंत तुलना केली आहे. मध्यंतरीं, प्रतिस्पर्ध्यांनां व शत्रूंनां, आणि जे गाईला लत्ताप्रहार करतात किंवा सूर्यभिमुख होऊन जलो(मुत्रो) त्सर्ग करतात त्यांनां शाप दिलेले आढळून येतात. पुन्हां, १३ व्या कांडाच्या ३ र्‍या सूक्तांत, कांहीं ऋंचांतून रोहिताची सर्वांत श्रेष्ठ देव, म्हणून प्रशंसा केलेली आहे ; ह्यांतील करूणरस वरूणसूक्ताची आठवण करून देतो. परंतु सूक्तांतील ऋचांस जें पालुपद जोडलें आहे त्यांत ब्राह्मणाला जो पीडा करील त्याचें निर्मूलन करण्याविषयीं रोहिताची प्रार्थना केली आहे. त्या ऋचा अशाः-

य इमे द्यावापृथिवी जजान यो द्रापि कृत्वा भुवनानि वंस्ते।
यस्मिन् क्षियन्ति प्रदिशः षडुर्वीर्याः पतङ्गो अनुविचाकशीति तस्य देवस्य।
 कुद्धस्तैतदागो य एवं विद्वांसं ब्राह्मणं जिनाति।
उद् वेपय रोहित प्रक्षिणीहि ब्रह्मज्यस्य प्रति मुञ्ज पाशान्।।१।।

यस्माद् वाता ऋतुथा पवन्ते यस्मात् समुद्रा अधि विक्षरन्ति तस्य देवस्य ।०।० ।।२।।

यो मारयति प्राणयति यस्मात् प्राणन्ति भुवनानि विश्वा तस्य०।०।० ।।३।।

यः प्राणेन द्यावपृथिवी तर्पंयत्यपानेन समुद्रस्य जठरं यः पिपर्ति तस्य ०।०।० ।।४।। अथर्व. १३.३

ज्यानें हीं द्यावापृथिवी निर्माण केली, ज्यानें भुवनाचें स्वतःला पांघरूण केलें, ज्याच्या ठिकाणीं विस्तीर्ण अशा सहा ऊर्वी नांदात आहेत व ज्या (ऊर्वी) मधून पतंगाचें अन्वीक्षण चाललें आहे त्या कुद्ध देवाचा अपराध करणारा म्हणजे जो हें सर्व जाणणार्‍या ब्राह्मणाला छळतो त्याचा हे रोहित ! पिच्छा पुरव, त्याचा नाश कर, ब्राह्मणाच्या शत्रूला आपल्या पाशांत अडकव. १.

ज्यापासून (ठराविक) ऋतूंमध्यें स्वच्छ वारे वाहतात, ज्यापासून समुद्र (सर्व दिशेकडे) वाहत जातात, त्या कुद्ध देवाचा इ.२.

जो जीव घेतो व जीवदान देतो, ज्यामुळें सर्व भुवनें जगतात, त्या कुद्ध देवाचा इ.३.

जो प्राणाच्या योगानें द्यावापृथिवीला उल्हासित करतो, जो अपानाच्या योगानें समुद्राचें जठर भरून टाकतो त्या कुद्ध देवाचा इ. ४.

ह्या उत्कृष्ट रोहितप्रशस्तीच्या शेजारींच मधूनमधून गूढ कल्पना घातलेल्या आहेत. उदाहरणार्थ, एके ठिकाणीं असें म्हटलें आहे कीं, बृहत् व रथंतर ह्या दोन छंदांपासून रोहिताची उत्पत्ति आहे व दुसर्‍या ठिकाणी, गायत्री छंदाला “अमृतगर्भ” असें म्हटलें आहे. अशीं पुष्कळ गूढ कल्पनांचीं उदाहरणें देतां येतील. अशा ऋचांतील गहन अर्थ शोधून काढण्याचा प्रयत्‍न निष्फळ झाल्यावांचून राहवयाचा नाहीं ; व म्हणून विंटरनिट्झ म्हणतो कीं, अथर्ववेदांतील ४ थ्या कांडांतील ११ व्या सूक्तांसारख्या सूक्तंत मोठें तात्त्विक सत्य सांपडेल अशी कधींहि आपण आशा करूं नये ; वरील सूक्तांत वृषाची, विश्वोत्पादक व विश्वरक्षक अशी स्तुति केलेली आहे.

अनङ्वान् दाधार पृथिवीमुत द्यामनड्वान् दाधारोर्व१न्तरिक्षम्।
अनड्वान् दाधार प्रदिशः षडुर्वीरनड्वान् विश्वं भुवनमा विवेश।।१।। अथर्व.४.११.

अनडुहानें (वृषभानें) पृथिवी व स्वर्लोक धारण केला आहे ; अनडुहानें विस्तीर्ण अंतरिक्षाला धारण केलें आहे ; अनडुहानें (प्राच्यादि) महादिशा व सहा उर्वी धारण केल्या आहेत ; व अनडुहानें विश्व भुवन व्याप्त केलें आहे.१.

ह्याशिवाय इंद्र व दुसरें मोठाले देव ह्यांच्या पंक्तीला ह्या वृषभाला आणून बसविलें आहे व “अनड्वान् दुहे”। “वृषभ दूध देतो,” “अस्य यज्ञः पयो दक्षिणा दोहो अस्य”। “यज्ञांतील दक्षिणा म्हणजे त्याचें दोहन त्याचें दूध म्हणजे यज्ञ”, “यो वेदानडुहो दोहान् सप्तानुपदस्वतः। प्रजां च लोकं चाप्नोति”, “हे अनडुहाचे सात दोह जाणणार्‍यास संतति व स्वर्ग यांची प्राप्ती होते” इत्यादि वर्णनांत आपणांला कोणताच गुण दिसत नाहीं. मात्र सात दोह जाणणार्‍यास स्वर्ग मिळतो असें मानावयास आमची हरकत नाहीं ! हें वृषभाचें वर्णन अथर्व.९.४ सूक्तांत केलेल्या वृषभाच्या वर्णनापेक्षां अधिक महत्त्वाचें आहे असें मुळींच नाहीं. वरील सूक्तांत वृषभाच्या ठिकाणीं सर्व देवांचें अस्तित्व आहे, मूळरंभीं तो जलरूप होता वगैरे त्याची प्रशंसा आहे. हा वृषभ दुसरा तिसरा कोणी नसून यज्ञांत बळी देण्याकरतां काढलेला बैल होय. हें मिथ्या तत्त्वज्ञान व हा गूढाचा पडदा कशाकरितां, तर त्याचा व्यवहारांत चांगला उपयोग असें म्हणून ; हें पुढें उतारे दिलेल्या सूक्तावरून सिद्ध होतें. या सूक्तांत गाईचें माहात्म्य वर्णन केलें आहे तें असें:-

यया द्यौर्यया पृथिवी ययापो गुपिता इमाः।।४।।
शतं कंसाः शतं दोग्धारः शतं गोप्तारो अधि पृष्टे अस्याः।
ये देवास्तस्यां प्राणन्ति ते वशां विदुरेकधा ।।५।।
वशा माता राजन्य स्य वशामाता स्वधे तव।
वशाया यज्ञ आयुधं ततश्चित्तमजायत।।१८।।

ही द्यावापृथिवी व जल यांचे संरक्षण करिते, हिच्या पाठीमागें शंभर दुधाचे घडे, शंभर दूध काढणारे, शंभर गुराखी असतात, जे देव इच्या ठिकाणीं वास करतात ते इला जाणतात, ही क्षत्रियांची माता, ही स्वधेची माता, हिचें यज्ञ आयुध आहे, हिच्यापासूनच चित्ताची उत्पत्ति हेते, ह्या प्रशस्तीचा कडेलोट खालील ऋचेंत झाला आहे.

वशामेवामृतमाहुर्वशां मृत्युमुपासते।

वाशा (गाय) हिलाच अमृत म्हणतात, मृत्यु म्हणुन हिचीच पूजा करतात.

वशेदं सर्वमभवद देवा मनुष्या३ असुराः
पितर ऋषयः।।२६।।

मनुष्य, असुर पितर, ऋषी हीं सर्व वशेचींच रूपें आहेत. परंतु आतां ह्यापुढें गाईचा व्यवहारांत उपयोग कसा करावा तें दिलें आहेः-

य एवं विद्यात् स वशां प्रतिगृह्णीयात्।।२७।।
जो असें जाणतो त्यानेंच गाईचा प्रतिग्रह करावा.
  +      +      +       +     +      +  ।।

ब्राह्मणेभ्यो वशां दत्वा सर्वाल्लोकान्त्ससश्रुते ।
ऋतं ह्य स्यामार्पितमपि ब्रह्मथो तपः।।३३।।

ब्राह्मणाला गाय दिली असतां देणाराला सर्व लोकांची प्राप्ति होते, कारण गाईच्या ठिकाणीं ऋत, ब्रह्म आणि तप हीं सर्व वास करतात. व शेवटीं,

वशां देवा उप जीवन्ति वशां मनुष्याउत।
वशेदं सर्वमभवद यावत् सूर्यो विपश्यति।।३४।। अथर्व.१०.१०.

देवांची उपजीविका गायीवर होते, त्याप्रमाणेंच मनुष्यांचीहि उपजीविका गायीवर होते. सूर्याची दृष्टि पोंचते तेथपर्यंत सर्व कांहीं गायीचेंच रूप आहे.

डॉमसेन (Deussen) ह्या विद्वान् जर्मन गृहस्थानें अथर्व वेदांतील “तात्त्विक” सूक्तांचा अर्थ लावण्याची बरीच खटपट केली आहे व त्यांत कांहींशी संबद्धता दाखवून दिली आहे. उदाहरणार्थ, १०व्या कांडाच्या २ र्‍या सूक्तांत ब्रह्मसिद्धीचा विचार जड व मीमांसक दृष्टीनें केला आहे व ११ व्या कांडाच्या ८ व्या सूक्तांत तोच विचार अध्यात्म दृष्टिनें केला आहे, असें डॉयसेननें दाखविलें आहे. पण ह्या सूक्तांत इतकें तत्त्वज्ञान भरलें असेल हें विंटरनिट्झला खरें वाटत नाहीं. त्याची अशी कल्पना आहे कीं, ह्या सूक्तांचें लेखक मिथ्या तत्त्वाज्ञानी असावेत, व त्यांनीं मनुष्यामध्यें विश्वात्मा (ब्रह्म) आहे हें तत्त्व नव्यानें शोधून काढलें नसून त्यांच्या वेळीं परिणत स्थितींत असलेलें हें तत्त्व त्यांनीं गूढ, अव्यक्त व विसंगत अशा तर्‍हेनें नव्यानें मांडण्याचें मात्र काम केलें. ऋग्वेदाच्या १० व्या मंडलांतील १२१ व्या सूक्तांत एक गहन तत्त्ववेत्ता व उत्तम कवि विश्वाच्या वैभवाचें वर्णन फार स्पष्ट भाषेंत करून अशा विश्वाचा उत्पादक कोण ह्याबद्दल साशंक होतो ; पण तेंच अथर्ववेदांत (१० कांड २ सूक्त) एक कवि (सूक्तकार) एकामागून एक मनुष्यावयवांचें वर्णन करीत सुटतो व हीं कोणी उत्पन्न केलीं असावींत, म्हणून प्रश्न करतो:-

केन पार्ष्णी आभृते पूरूषस्य केन मांस संभृतं केन गुल्फौ।
केनांगुली पेशनीः केन खानि...........।।१।।

कस्मान्नु गूल्फावधरावकृण्यन्नष्ठीवन्तावुत्तरो पूरूषस्य।
जङ्घे निर्ऋत्य न्यदधः कस्मिज्जानुनोःसंधी क उ तच्चिकेत।।२।।

आशा आठ ऋचा आहेत व पुढच्या नऊ ऋचांत मनुष्यरचनेंतील व मानवी जीवितांतील सर्व प्रकारच्या गोष्टींची चवकशी केली आहेः-

प्रियाप्रियाणि बहुला स्वप्नं संबाधतन्घ्रः।
आनन्दानुग्रो नन्दांश्च कस्माद् वहति पूरूषः।।९।।

आर्तिरवर्तिनिर्ऋति  कुतो...............।

लगेच ह्याच ठिकाणीं हें विचारले आहे कीं,

को अस्मिन्नापो व्य दधात्..............।।११।।

को अस्मिन् रूपमदधातू को मह्यान च नाम च।
गातुं को अस्मिन् कः केतुं कश्चरित्रणि पूरूषे।।१२।।
 +     +       +      +      +        +
को अस्मिन्सत्यं कोनृतं कुतो मृत्युः कुतोमृतम्।।१४।। इ.

नंतर असें विचारलें आहे कीं, सृष्टीवर मनुष्याची सत्ता कशी बसली? ह्या सर्व प्रश्नांनां उत्तर म्हणून असें सांगितलें आहे कीं, मनुष्य ब्रह्मस्वरूप असल्यामुळें त्याला हें सामर्थ्य प्राप्त झालें. येथपर्यंत हें सूक्त फारसें सुंदर जरी नसलें तरी अगदीं शुद्ध व स्पष्ट आहे. पण ह्यापुढें ऋचा २६-३३ पर्यंत नेहमींच्या लपंडावाला सुरवात होते. ह्याला उदाहरण म्हणून खालील कांहीं ऋचा पाहाव्याः-

मूर्धानमस्य संसीव्याथर्वा हृदयं च यत्।
मस्तिप्कादूर्ध्वः प्रैरयत् पवमानोधि शीर्षतः।।२६।।

तद् वा अथर्वणः शिरो देवकोशः समुज्बितः।
तत् प्राणो अभि रक्षति शिरो अन्नमथो मनः।।२७।। अथर्व.१०.२.

अशा ऋचांतून अगाध ज्ञान शोधूं जाणें म्हणजे त्यांनां गैरवाजवी मोठेपणा देण्यासारखें होतें. अथर्वसंहितेंतील ११व्या कांडाच्या ८ व्या सूक्तांत डॉयसेनच्या म्हणण्याप्रमाणें ब्रह्मतत्त्वावर सर्वस्वीं अवलंबून राहणार्‍या आध्यात्मिक व जड या घटकांच्या संयोगानें मनुष्याची उत्पत्ति झाली असें प्रतिपादिलें आहे ; परंतु त्या सूक्तांत फारसा खोल अर्थ नाहीं असें विंटरनिट्झचें म्हणणें आहे. ज्याप्रमाणें खोटें बोलणाराला आपल्या बोलण्यावर लोकांनीं विश्वास ठेवावा म्हणून कधीं कधीं खरें बोलवें लागतें, त्याचप्रमाणें गूढवाद्याला आपल्या रचनेंत  कोठें कोठें इकडून तिकडून उसनें आणलेलें तत्त्वज्ञान, आपल्या मूर्खपणाला लोकांनीं उच्च ज्ञान समजावें या हेतूनें, घुसडून द्यावें लागतें. याचें प्रत्यंतर ११ व्या कांडाच्या ८ व्या सूक्तांत दिसून येतें. या सूक्तांत, अग्नि, वनस्पति, ओषधी, इन्द, बृहस्पति, सूर्य, वरूण, मित्र, विष्ण भाग, विवस्वान्, सविता, धाता, पूष्पन्, त्वष्टा इत्यादि देवतांची आम्ही स्तुति करतों, त्यांनीं आम्हांला अंहसापासून म्हणजे पातकापासून मुक्त करावें अशी प्रार्थना केली आहें.

ही अशा दर्जाची पद्यरचना म्हणजे काव्य नव्हें किंवा तत्त्वाज्ञानहि नव्हे. ह्या पद्यापेक्षां पुष्कळच सरस असें एक सूक्त अथर्ववेदांत सांपडतें. ह्या सूक्तांत कांहीं ऋचा पृथ्वीच्या उत्पत्तीसंबंधीं आहेत म्हणून ह्या सूक्तांत कांहीं ऋचा पृथ्वीच्या उत्पतीसंबंधीं आहेत म्हणून ह्या सूक्ताची गणना जगदुत्पत्तिविषयक सूक्तांत बहुतेक करण्यांत येते; परंतु ह्यांत कांहींएक गूढ व तात्त्विक ज्ञान नसल्यामुळें, खरें काव्य बरेंचसें आढळतें. हें सूक्त म्हणजे अथर्ववेदांतील १२ व्या कांडांतील १ लें पृथिवीसूक्त होय. ह्यांतील ६३ ऋचांतून पृथिवीमातेची, सर्व ऐहिक वस्तूंनां धारण करून त्यांचें रक्षण करणारी तूं आहेस, सर्व संकटांपासून आम्हांला मुक्त कर व आमच्यावर कृपादृष्टि ठेव वगैरे प्रकारें प्रार्थना केली आहे. प्राचीन भारतांतील धार्मिक काव्यप्रबंधांतून कांहीं प्रबंध किती सुंदर असतात याची कल्पना आणून देण्याकरितां, ह्या सूक्तांतील कांहीं ऋचा खालीं दिल्या आहेतः-

पुढे वाचा:अध्यात्म

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .