प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ३ रें.
वेदप्रवेश – अथर्ववेद.

भैषज्यसूक्तें.– अथर्ववेदांतील एक प्रमुख भाग म्हणजे रोग बरे करण्याच्या प्रयोगांतील मंत्र होत. यांस भैषज्यसूक्तें म्हणतात. कांहीं मंत्र, रोग हे राक्षसांरख्या व्यक्ती आहेत असें कल्पून त्यांनां संबोधून म्हटले जातात; तर कांहीं, अमुक राक्षसवर्ग अमुक रोग उत्पन्न करितो असें समजून त्यांनां उद्देशून म्हटले जातात. इतर लोकांप्रमाणें हिंदू लोकांत सुद्धां अशी समजूत आहे कीं, हे राक्षस रोग्यांनां बाहेरून छळतात व बोकांडीं बसतात किंवा त्याच्या अंगांत संचार करतात. कांहीं मंत्रांत रोगनिवारक औषधीचें आवाहन व स्तुति असते, कांहींत रोगनिवारण करण्याची विशिष्ट शक्ति असलेल्या पाण्याची प्रार्थना असते तर कांहींत लोकांच्या समजुतीप्रमाणें राक्षसांनां पळवून लावण्यांत अग्रणी जो अग्नि त्याची प्रार्थना असते. हे मंत्र व तत्संबंधीं प्रयोग (तंत्र) हाच आयुर्वेदाचा मूळ आरंभ होय. या वैद्यकाचें वर्णन पुढें कौशिकसूत्रांत आलेलें आहे. ह्या मंत्रातून निरनिराळ्या रोगांचीं लक्षणें फार विशद रीतीनें दिलीं आहेत. व म्हणून वैद्याकाच्या इतिहासाच्या कमीं ह्यांचा फार उपयोग आहे. वरील विधान तापाच्या मंत्रांस विशेष लागू पडतें. ताप हा वारंवार येणारा व तीव्र पीडा देणारा रोग असल्यामुळें वेदांमागून पुष्कळ काळानंतर झालेल्या ग्रंथांतहि त्याला ‘रोगांचा राजा’ अशी संज्ञा आहे. अथर्ववेदांत तक्मन् नांवाच्या ज्वराला राक्षस असें कल्पून त्याला संबोधून पुष्कळ मंत्र लिहिले आहेत. ह्याला उदाहरण म्हणजे अथर्ववेदांतील ५ व्या कांडांतील २२ वें सूक्त होय. त्यांतील कांहीं ऋचा खालीं दिल्या आहेत.

अयं यो विश्वान् हरितान् कृणोष्युच्छोचयन्नग्निरिवाभिदुन्वन्।
अधा हि तक्मन्नरसो हि भूया अधान्य ङ्ङिधराङूवापरेहि।।२।।

यः परूषः पारूषेयो वध्वंस इवारूणः।
तक्मानं विश्वधावीर्याधराञ्जं परा सुव।।३।।

तक्मन् मूजवतो गच्छ बल्हिकान् वा परस्तराम्।
शूद्रामिच्छ प्रफर्व्य१तांतक्मन् वी व धूनुहि।।७।।

यत् त्वं शीतोथो रूरः सह कासावेपथः।
भीमास्ते तक्मन् हेतयस्ताभिः स्प परि वृङ्घि नः।।१०।।

तक्मन् भ्रात्रा बलासेन स्वस्त्रा कासिक्या सह ।
पाष्मा भ्रातृब्येण सह गच्छामुमरणं जनम्।।१२।। अथर्व.५.२२.

अग्नीप्रमाणें रखरखीत तापानें जाळून तूं विश्वलोकांला पिंवळे करून सोडतोस; तेव्हां हे तक्मन्  * । तूं दुर्बल व निस्तेज हो; अधराला जा किंवा येथून नाहींसा हो.२.

जो परुष जळजळींत व परूषापासून उत्पन्न झालेला (सांसर्गिंक?) अरूणवर्णाच्या धूलीप्रमाणें * आहे अशा तक्म्याला, आपल्या अंगीं विश्ववीर्य धारण करून रसातळाला पोंचवा.३.

हे तक्मन् ! मूजवन्तांकडे जा, किंवा त्यापलीकडे बल्हिकांकडे जा. एखाद्या कामुक शूद्र युवतीला गांठ व तिला मनसोक्त हालीव.७.

तूं एकदां थंड तर एकदां तप्त असतोस (व) कासा (खोकल्या) च्या योगानें आम्हांला हालवून सोडतोस; हे तक्मन्। हीं तुझीं उपकरणें फार भयंकर आहेत; ह्यांनीं आम्हांला इजा करण्याचें सोडून दे.१०.

हे तक्मन् ! तुझा भाऊ बलास, बहिण कासिका(कास) व पुतण्या पुरळ (पाप्मन्) यांसह त्या विदेशी लोकांकडे जा.१२.

रोगांनीं इतर लोकांनां पछाडावें, दुसर्‍या देशांवर त्यांनीं हल्ला करावा ही इच्छा अथर्ववेदांत वारंवार दर्शविली आहे.

खोकल्याला रोग्यापासून ज्या मंत्राच्या प्रयोगानें दूर हांकलून दिलें जातें तो मंत्र असाः-

यथा मनो मनस्केतैः परामतत्याशुमत्।
एवा त्वं कासे प्र पत मनसोनु प्रवाय्य म्।।१।।
यथा बाणः सुसंशितः परापतत्याशुमत्।
एवा त्वं कासे प्र पत पृथिव्या अनु संवतम्।।२।।
यथा सूर्यस्य रश्मयः परापतन्स्याशुमत्।
एवा स्वं कासे प्र पत समुद्रस्यानु विक्षरम्।।३।। अथर्व. ६.१०५.

ज्याप्रमाणें मन बुद्धिगम्य अशा दूरस्थविषयांबरोबर (म्ह. ध्रुवमंडलापर्यंत) वेगानें जातें, त्याप्रमाणें, हे कासे ! तूं मनोवेगानें जा.१.

ज्याप्रमाणें सज्ज केलेला तीक्ष्ण बाण वेगानें (भूमी भेदून) जातो, त्याप्रमाणें हे कासे ! तूं (बाणानें भेद केलेल्या) भूमीला अनुलक्षून (पातालापर्यंत) जा.२.

ज्याप्रमाणें सूर्यांचे किरण वेगानें जातात त्याप्रमाणें हे कासे ! तूं समुद्राच्या प्रवाहाबरोबर जा.३.

कांहीं मंत्र, त्यांच्या उदात्त व सौंदर्यपूर्ण भाषेमुळें, भावपूर्ण काव्याचे उत्कृष्ट मासले आहेत असें म्हणण्यास हरकत नाहीं. आतां या काव्यांत फारसा रस सांपडेल अशी अपेक्षा अर्थातच करतां कामा नये; मात्र मधून मधून कांहीं सुंदर कल्पनाचित्रें दृष्टीस पडून चित्ताला आश्चर्य व आह्लाद किंवा मौज यांपैकीं कांहीं तरी वाटेल; कां कीं, या वैदिक कवींनीं आपली उपमा देण्याची इच्छा रक्तवाहिन्या, जंत यांपर्यंत नेऊन भिडविलेली दिसेल. एक सुंदर कल्पना अथर्व. १.१७ यामध्यें आहे. हा मंत्र रक्तस्त्रावस्तंभक असुन त्यांत शिरांनां रक्तांबरधारी कुमारिका असें म्हटलें आहे.

अमूर्या यन्ति योषितो हिरा लोहितवाससः।
अभ्रातर इव जामयस्तिष्ठन्तु हतवर्चसः।।१।।
तिष्टावरे तिष्ठ पर उत त्वं तिष्ठ मध्यमे।
कनिष्टिका च तिष्ठति तिष्ठादिद्धमानिर्मही।।२।।
शतस्य धमनीनां सहस्त्रस्य हिराणाम्।
अस्थुरिन्मध्यमा इमा साकमन्ता अरंसत्।।३।।
परि वः सिंकतावती धनूर्बृहत्य क्रमीत्।
तिष्ठतेलयता सु कम्।।४।। अथर्व.१.१७.

या रक्तवस्त्र नेसून जाणार्‍या योषिता, रक्तवाहिन्या (नाड्या), भाऊ नसलेल्या बहिणींप्रमाणें हतबल होऊन, जागच्या जागीं स्तब्ध उभ्या राहोत.१.

खालची (खालच्या भागांतून वाहणारी) धमनी ! तूं थांब; अगे वरची ! तूंहि थांब; (त्याचप्रमाणें) मधली ! तूं पण थांब सर्वांत लहान धमनी तर थांबलीच व मोठीहि थांबूं दे.२.

शंभर धमन्या व हजार शिरा यांमधील नाड्यासुद्धां थांबल्या व बाकी राहिलेल्या या निवृत्तरूधिरस्त्रावा धमन्यां बरोबर खेळूं लागल्या (त्यांच्याप्रमाणें यांनींहि आपलें काम सोडलें) ३.

सिकतावती व धनूसारख्या विशिष्ट नाडीनें तुम्हांस आक्रमिलें आहे; तेव्हां तुम्ही थांबा व याला (रोग्याला) सुख द्या.४.

नेहमींच्या ह्या ऋचा काव्यरसभरित असतात असें नाहीं; तर पुष्कळ वेळां अगदीं एकतानी असतात; आणि पुष्कळशा ऋचांमध्यें हा एकसुरीपणा, म्हणजे प्रत्येक ऋचेंत त्याच त्याच शब्दांचें आणि वाक्याचें पुनरूच्चारण, एवढेंच काय तें काव्याचें रूप असतें. या बाबतींत प्राथमिक स्थितींतील लोकांच्या कवितांशीं या वरील प्रकारच्या अथर्ववेदांतील ऋचा अगदीं समान आहेत. इतर सर्व लोकांच्या मंत्रांशीं या अथर्ववेदांतील मंत्रांचें दुसरेंहि एक प्रकारचें साम्य आहे, तें म्हणजे यांचा अर्थ पुष्कळ वेळां बुद्धिपुरस्सर गूढ व दुर्गम ठेवलेला असतो. अशा एकसुरी आणि गूढार्थी ऋचांचें एक उदाहरण अथर्व ६.२५ मध्यें आहे. हा गंडमाळेचा मंत्र आहे.

पञ्च च याः पञ्चाशच्य संयन्ति मन्या अभि।
इतस्ताः सर्वा नश्यन्तु वाका अपचितामिव।।१।।
सप्त च याः सप्ततिश्च संयन्ति ग्रैव्या अभि।
इतस्ताः सर्वा नश्यन्तु वाका अपचितामिव।।२।।
नव च या नवतिश्च संयन्ति स्कन्ध्या अभि।
इतस्ताः सर्वा नाश्यन्तु वाका अपचितामिव।।३।। अथर्व.६.२५.

पांच आणि पन्नास ज्या गळ्याच्या वरच्या भागावर (मन्या धमनीवर) जमल्या आहेत, त्या सर्व कटकट करणार्‍या अपचित् किड्याप्रमाणें नाश पावोत.१.

ज्या सात आणि सत्तर (गंडमाळ) ग्रैव्यानाडीवर एकत्र जमल्या आहेत, त्या सर्व कटकट लावणार्‍या अपचित् किड्याप्रमाणें नाश पावोत. २.

ज्या नऊ आणि नव्वद, स्कंधभोंवतीं जमल्या आहेत, त्या सर्व कटकट लावणार्‍या किड्याप्रमाणें नाश पावोत. ३.

बरेचसे रोग जंतूंपासून उत्पन्न होतात अशी कल्पना बरीच प्राचीन आहे; व म्हणून अथर्ववेदांत सर्व जातींच्या जंतूंचें अपसारण करण्यासाठीं एक मंत्रमालिकाच तयार केलेली आहे.

 अन्वान्त्र्यं शीर्षण्य१मथो पाष्टेयं क्रिमीन्।
अवस्कवं व्यध्वरं क्रिमीन् वचसा जम्भयासमि।।४।।

ये क्रिमयः पर्वतेषु वनेष्वोषधीषु पशुष्वप्स१न्तः।
ये अस्माकं तन्व माविविशु सर्वं तद्धन्मि जानिम क्रिमीणाम्।।५।। अथर्व.२.३१.

आंतड्यांत, डोक्यांत व पार्ष्णींत असणारे कृमी, आंत शिरणारे कृमी (अवस्कव) व अनेक मार्ग करून आंत शिरणारे कृमी (व्यंध्वर) या सर्वांना मी मंत्राच्या योगानें मारून टाकतों.४.

जे कृमी पर्वतांत, वनांत वनस्पतींत, पशूंत व पाण्यांत असतात, जे आमच्या शरिरांत शिरले आहेत, त्या सर्व कृमींचें कूळच नाहींसें करतों.५.

हे जंतू असुर आहेत, त्यांच्यांत राजा प्रधान वगैरे अधिकारी आहेत, त्यांच्यांत सुद्धां लिंगभेद- स्त्रीपुरूष जात – आहे, त्यांचे रंग विविध आहेत, ते निरनिराळीं रूपें धारण करितात वगैरे ह्या रोगजंतूंविषयीं लोकांच्या भावना असत. ह्याचें उदाहरण अथर्ववेदाच्या ५ व्या कांडांत २३ व्या सूक्तांत आढळतें; त्यांत मुळांत लहान असलेल्या रोगजंतूंविरूद्ध खालील ऋचा आहेतः

अस्येन्द्र कुमारस्य क्रिमीन् धनपते जहि।
हता विश्चा अरातय उग्रेण वचसा मम।।२।।

यो अक्ष्यौ परिसर्पति यो नासे परिसर्पति।
दतां यो मध्यं गच्छति तं क्रिमिं जम्भयामसि।।.३।।

सरूपौ द्वौ विरूपौ द्वौ कृष्णौ द्वौ रोहितौ द्वौ ।
बभ्रुश्च बभ्रुकर्णश्च गृध्रः कोकश्च ते हताः।।४।।

ये क्रिमयः शितिकक्षा ये कृष्णाः शितिबाहवः।
ये के च विश्वरूपास्तान् क्रिमीन् जम्भयामसि ।।५।।

हतो राजा क्रिमीणामुतैषां स्थपतिर्हतः।
हतो हतमाता किमिर्हतभ्राता हतस्वसा।।११।।

हतासो अस्य वेशसो हतासः परिवेशसः।
अथो ये क्षुल्लका इव सर्वे ते क्रिमयो हताः।।१२।।

सर्वेषां च क्रिमीणां सर्वासां च क्रिमीणाम्।
भिनद्म्यश्मना शिरो दहाम्यग्निना मुखम्।।१३।। अथर्व. ५.२३.

पुढे वाचा:भैषज्यसूक्तें

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .