प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ३ रें.
वेदप्रवेश – अथर्ववेद.

पौष्टिकमंत्र.– ह्या वरील प्रार्थनामंत्रांसारखेच पुष्कळसे पौष्टिकमंत्रहि सांपडतात. शेतकरी, धननगर, व्यापारी हे लोक असें मंत्र म्हणून सुख व आपल्या कामांत चांगलें यश मिळवण्याची इच्छा करितात. घर बांधण्याच्या वेळीं करण्याच्या प्रार्थना, जमीन नांगरणें, बीं पेरणें, धान्य उगवणें, कीड मरून जाणें यांसंबंधीं स्तवनें, अग्निपीडानिवारक मंत्र, पर्जन्यमंत्रातील पर्जन्यप्रार्थना, गोकुलसमृद्धिविषयक आराधना, चोर व हिंस्त्र पशू यांचें निरसन होण्याविषयीं गोपालानें म्हणावयाचे मंत्र, आपल्या धंद्यांत यश व प्रवासांत सुख मिळण्यासाठीं व्यापार्‍यानें करावयाची अभ्यर्थना, द्यूतकारानें फांसा चांगला पडावा म्हणून करावयाची आराधना, सर्पाचें विष उतरणें व त्याला बाहेर काढून देणें याबद्दल मंत्रप्रयोग वगैरे विषय पौष्टिकमंत्रांतून आढळतात. ह्यांपैकीं फारच थोड्या ऋचांनां काव्य असें म्हणतां येईल. मात्र, कधीं कधीं एखाद्या साधारण दर्जाच्या लांबलचक सूक्तांतून तुटक तुटक पण फारच सूंदर अशा ऋचा सांपडतात. अथर्व संहितेंतील४ थ्या कांडाच्या १५ व्या सूक्तांतील पर्जन्यसूक्त फारच सुंदर आहे त्यांतील दोन ऋचा खालीं देतोः-

समुत्पतन्तु प्रदिशो नभस्वतीः
समभ्राणि वातजूतानि यन्तु।
महऋषभस्य नदतो नभस्वतो
वाश्रा आपः पृथिवीं तर्पयन्तु।।१।।

अभि क्रन्द स्तनयार्दयोदधिं
भूमिं पर्जन्य पयसा समङ्घि।
त्वया सृष्टं बहुलमैतु वर्षमा
शारैषी कृशगुरेत्वस्तम्।।६।। अथर्व.४.१५.

सर्व दिशांकडून वार्‍याच्या योगानें पर्जन्यमेघ एकत्र जमोत. माजलेल्या बैलाप्रमाणें गर्जना करणार्‍या मेघांमधून पृथ्वीवर भरपूर पर्जन्यवृष्टि होवो.१.

हे पर्जन्या, मोठ्यानें गर्जना कर, समुद्र खवळून टाक आणि चांगली वृष्टि करून जमीन भिजव. पावसाच्या जोराच्या सरी पाड. सूर्य मेघाच्छादित करून पाऊस पाड. ६.

सुख आणि शांति, व संकटनिवारण ह्याप्रीत्यर्थ सर्व साधारण प्रार्थनेचे जे पौष्टिकमंत्र असतात, त्यांतून काव्याचा भाग फारच थोडा असतो.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .