प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ३ रें.
वेदप्रवेश – अथर्ववेद.

प्रायश्चित्तमंत्र.– संकट निवारण करण्याबद्दलच्या प्रार्थनामंत्रांत “मृगारसूक्त” नांवाचें शांतिपाठ आहेत. अथर्व ४.२३-२९ ही सात ऋचांचीं सात सूक्तें असून तीं अनुक्रमें, (१) अग्नि, (२) इंद्र, (३) वायु आणि सवितर्,(४) अंतरिक्ष व धरित्री, (५) मरूद्गण, (६) भव व शर्व, आणि (७) मित्र व वरूण ह्या देवतांनां संबोधिलीं आहेत व प्रत्येक ऋचेच्या शेवटीं, अंहसा (संकटा) पासून मुक्त करण्याविषयींचें पालुपद आहे.

अंहस शब्दाचा “संकट” ह्या अर्थाखेरीज दुसरा अर्थ “पाप” असा आहे; म्हणून वरील शांतिपाठ अथर्ववेदाच्या प्रायश्चित्तसूक्तवर्गांत घालण्यास हरकत नाहीं. हे पापक्षालनाचे प्रायश्चित्तसूक्तवर्गांत घालण्यास हरकत नाहीं. हे पापक्षलनाचे प्रायश्चित्तविधिमंत्र रोगनिवारक मंत्रांहून आपणाला वाटतात तितके भिन्न नाहींत. कारण, प्राचीनांच्या मतें, धर्मबाह्य किंवा नीतिबाह्य आचरण झाल्यास मात्र प्रायश्चित्ताची आवश्यकता असते असें नसून, यज्ञयाग वगैरे संस्कारांची अपूर्णता, जाणूनबुजून किंवा नकळत घडलेला अपराध, मनांतले पापी विचार, ऋण परत न करणें व विशेषतः द्यूतऋण परत न करणें, अशास्त्र विवाह-वडील भावापूर्वीं धाकट्याचा-वगैरे पापांच्या शांतीसाठीं देखील प्रायश्चित्त विहित आहे. त्याप्रमाणेंच सामान्यतः अपराध व पातकें यांचें क्षालन होण्यासाठीं व शरीरिक आणि मानसिक दुर्बलता, वाईट ग्रहांवर मूल जन्मास येणें, जुळीं मुलें होणें वगैरे अवलक्षणें, दुष्ट स्वप्नें, अपघात इत्यादि गोष्टीचें निराकरण होण्यासाठीं सुद्धां प्रायश्चितमंत्र आहेत. अपराध, पाप, अरिष्ट, दुर्दैव ह्या सर्व कल्पनाची या वेदांत जिकडे तिकडे भेसळ झालेली दिसते. व्याधी, आपत्ती, त्याप्रमाणेंच गुन्हे व पातकें वगैरे जितक्या वाईट गोष्टी तितक्या सर्व पिशाच्चेंच घडवून आणतात अशी समजूत आहे. जसा रोगी व वेडा मनुष्य त्याप्रमाणें पातकी मनुष्यहि पिशाच्चानें झपाटला आहे असें मानतात. हीं रोग उत्पन्न करणारीं मनुष्यद्वेषी पिशाच्चें अपशकुन  व अपघात यांनांहि कारण होतात. उदाहरणार्थ, अथर्ववेदांतील १० व्या कांडांतील ३ रें सूक्त यांत एक ताइताची २५ ऋचांत अतिशय प्रशंसा केली आहे व सर्व प्रकारचीं अरिष्टें, दुष्ट मंत्रप्रयोग, दुःखप्नें, दुश्चिन्हें, आपले आई, बाप, भाऊ, बहीण यांनीं व आपण स्वतः आचरिलेलीं पापें, या सर्वांचें पूर्ण निरसन करण्याचें सामर्थ्य यांत आहे व सर्व रोगांवर हें रामबाण औषध आहे वगैरे प्रकारें त्याची स्तुति केलेली आहे.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .