प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ३ रें.
वेदप्रवेश – अथर्ववेद.

शांतिसूक्तें.- दुष्ट दैत्य किंवा मत्सरी मांत्रिक यांच्यामुळें गृहकलह उत्पन्न होतात अशी त्यावेळीं समजूत असल्यामूळें, घरांत शांति नांदावी याबद्दलचे मंत्र अथर्ववेदांत आढळून येतात. ह्या मंत्रवर्गाला, प्राथश्चित्तमंत्रवर्ग व पौष्टिकमंत्रवर्ग ह्यांच्या मधलें स्थान दिलें पाहिजे; कारण ह्या मंत्रवर्गांत नुसते घरांत एकी व शांति राखण्याबद्दलचेच मंत्र येत नसून ह्यांत असेहि मंत्र आहेत कीं ज्या योगानें आपल्याला अधिकार्‍याचा राग शांत करतां येईल, वाटल्यास समाजांत आपलें वजन पाडतां येईल, न्यायकचेरींत आपली बाजू उत्तम रीतीनें मांडून न्यायाचा कांटा आपल्या बाजूला झुकवितां येईल किंवा अनेक दुसरीं महत्त्वाचीं कामें पार पाडतां येतील. ह्या बाबतींत अतिशय गोड सूक्त असेल तर तें अथर्वसंहितेंतील ३ र्‍या कांडांतील ३० वें सूक्त होय.

सहृदयं सामनस्यमविद्वेषं कृणोमि वः।
अन्यो अन्यमभि हर्यत वत्सं जातमिवाघ्न्या।।१।।
अनुव्रतः पितुः पुत्रो मात्रा भवतु संमनाः।
जाया पत्ये मधुमतीं वाच वदतु शन्तिवाम्।।२।।
मा भ्राता भ्रातरं द्विक्षन्मा स्वसारमुत स्वसा।
सम्यञ्चः सव्रता भूत्वा वाचं वदत भद्रया।।३।। अथर्व. ३.३०.

मी तुम्हांला अविद्वेषी, समानचित्तवृति व प्रीतियुक्त असें करतों. गाय जशी आपल्या वत्सावर प्रीति करते, त्याप्रमाणें तुम्हीं एकमेकांवर प्रीति करीत जा.१.

पित्याला अनुव्रत (अनुकुल) व मातेशी समानमनस्क असा पुत्र असूं दे. भार्या पतीशीं मधुर व सुखदायक अशा वाणीनें बोलूं दें.२.

भावानें भावाचा द्वेष करूं नये, त्याचप्रमाणें बहिणीनें बहिणीशीं दावा मांडूं नये. त्या सर्वांनीं एकमेकांशीं संमत व सव्रत होऊन चांगलें गोड (भद्र) बोलावें.३.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .