प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ३ रें.
वेदप्रवेश – अथर्ववेद.

प्रणयमंत्र.– कुटुंबामध्यें ऐक्यभाव उत्पन्न करून देणारे हे मंत्र नवराबायकोमध्यें ऐक्य घडवून आणण्याच्या कामीं उपयोगी पडण्यासारखे आहेत हें उघड आहे. तथापि अथर्ववेदांत विवाह व प्रेमविषयक मंत्रांचीं स्वतंत्रच सूक्तें आहेत. हा सूक्तवर्ग फार मोठा आहे. अथर्ववेदाच्या कौशिकसूत्रांत स्त्रीकर्म या नांवाचे मंत्रप्रयोग व नानाप्रकारचे काममंत्र आहेत. या मंत्रांचे दोन प्रकार आहेत. एका प्राकारांत विवाह व प्रजोत्पादन ह्यासंबंधीं चांगले सात्त्विक व अनुपद्रवी मंत्र आहेत; हे मंत्र कुमारिकांनां पति प्राप्त करून देतात व तरूणांनां गृहिणांचा लाभ करून देतात. वधूवरांच्या व नूतन विवाहितांच्या कल्याणार्थ हे मंत्र योजिलेले आहेत. ह्यांच्या योगानें लवकर गर्भधारण होते, पुत्ररत्‍नाची प्राप्ती होते, गर्भवती स्त्रीस स्वास्थ्य मिळतें, गर्भांत असलेल्या बालकाचें नीट संरक्षण होतें, व ह्यासारखें अनेक प्रकारचें वैवाहिक सुख लाभतें. चवदाव्या कांडांत सर्वत्र हाच विषय आहे. ऋग्वेदांतील विवाहसंबंधीं मंत्रांची ही वाढवून केलेली आवृत्तीच असावी असें वाटतें. आतां दुसर्‍या प्रकारांत येणार्‍या मंत्राविषयीं पाहतां, ह्यांची संख्या फार मोठी असून, वैवाहिक सुखांत बिघाड झाला असतां किंवा प्रेमाचीं कारस्थानें करतांना लागणारे अमिशाप व अपसरणमंत्र ह्यांत येतात. तथापि पतीचा मत्सरग्रस्त स्वभाव नाहींसा करण्याची इच्छा धरणार्‍या स्त्रीनें म्हणावयाचें मंत्र, दुराचारी स्त्रीस पतीशीं एकनिष्टपणें वागण्यास लावणारे मंत्र किंवा आपल्या प्राणयिनीला चोरून भेटावयास आलेल्या तिच्या प्रियकरानें तिचे आईबाप वगैरे सर्व घरांतल्या मंडळीवर, एवढेंच नव्हे तर, तिच्या घरांतील कुत्र्यावरसुद्धां प्रयोग करावयाचें झोंपीं जावयाला लावणारे मंत्र, विशेषसे उपद्रवी नाहींत ह्यांत शंका नाहीं. (अथर्व. ४.५ यांत वरील शेवटला मंत्र आहे) ह्यापेक्षां थोडे अधिक उपद्रवी व काहींसे रानटी मंत्रप्रयोग म्हणजे एखाद्याच्या मर्जीविरूद्ध त्याला किंवा तिला आपणावर प्रेम करावयास लावण्याबद्दलचे मंत्र होत. जगांतील इतर भागांतल्याप्रमाणें प्राचीन हिंदुस्थानांत सुद्धां, एखाद्याची प्रतीमा आपणाजवळ असली म्हणजे तिच्यावर प्रयोग करून त्या प्रतिमागत व्यक्तीला आपल्या ताब्यांत ठेवतां येतें किंवा तिला आपणास वाटेल ती इजा करतां येते, अशी समजूत असें. एखाद्या मनूष्याला कोणा एका स्त्रीची प्रीति संपादन करावी असें वाटलें तर तो तिची मातीची प्रतीमा तयार करीत  असे; व धनुष्याला अंबाडीची दोरी लावून, व काळ्या लांकडाच्या बाणाला कांट्याचें टोंक व घुबडाचें पीस जोडून, त्यानें त्या प्रतिमेच्या हृदयाचा आरपार भेद करीत असें हें कशाकरितां तर कामदेवाच्या बाणानें आपल्या प्रणयिनीचें हृदय असेंच विद्ध करून सोडावें म्हणून. अशा तर्‍हेनें हृदयविदारण चाललें असतां तो खालील मंत्र तोंडानें म्हणेः-

उत्तुदस्त्वोत् तुदतु मा धृथाः शयने स्वे।
इषुःकामस्य या भीमा तया विध्यामि त्वा हृदि।।१।।
आधीपर्णां कामशल्यामिषुं संकल्पकुल्मलाम्।
ता सुसंनतां कुत्वा कामो विध्यतु त्वा हृदि।।२।।
या प्लीहानं शोषयति कामस्येषुः सुसंनता।
प्राचीनपक्षा व्योषा तया विध्यामि त्वा हृदि।।३।।
शुचा विद्धा व्योषया शुष्कास्याभि सर्प मा।
मृदुर्निमन्युः केवली प्रियवादिन्यनुव्रता।।४।।
आजामि त्वाजन्या परि मातुरथो पितुः।
यथा मम क्रतावसो मम चित्तमुपायसि।।५।।
व्यस्यै मित्रावरूणौ हृदश्चित्तान्यस्यतम्।
अथैनामक्रतुं कृत्वा ममैव कृणुतं वशे।।६।। अथर्व.३.२५.

उत्तुद (कामदेव) तुला व्यथित करो. तुला अंथरूणावर स्वस्थ पडवणार नाहीं. कामाचा बाण भयंकर आहे, त्या बाणानें मी तुझें हृदय विद्ध करतों.१.

ज्याला आधींचे (मानसिक पीडेचे) पंख लाविले आहेत, काम हें ज्याचें शल्य आहे, संकल्प हेंच ज्याचें कुल्मल * आहे असा बाण सुसज्ज करून, (हे कामिनि।) काम (देव) तुझें हृदय विदारण करो.२.

जो सुसज्ज केलेला कामाचा बाण प्लीहेचें शोषण करतो व ज्याचे पंख सरळ जाळीत जातात, अशा बाणानें मी तुझें हृदय विद्ध करितों.३.

दाहक व दुःखदायक (बाणानें) विद्ध होत्साती, व्याकुळ होऊन माझ्याकडे ये; व मृदुभाषिणी, मदेकशरणा, प्रियवादिनी, अनुव्रता, कोधरहित(शांता) अशी हो.४.

तुला तुझ्या मातेच्या व पित्त्याच्या सुद्धां समोरून चाबकाच्या योगेंकरून येथें यायला लावतों, जेणेंकरून तूं माझ्या संकल्पाप्रमाणें वागून, मला वाटेल तें करूं द्यावयास सिद्ध होशील.५.

मित्रावरूण हो। हिचा चित्तविक्षेप करा. हिला कार्यांकार्यविभागाचें ज्ञान राहणार नाहीं असें करून, माझ्या स्वाधीन करा.६.

एखाद्या स्त्रीला जर कोणा पुरूषाचें प्रेम संपादन करावयाचें असलें तर ती ह्याचप्रमाणें वागते. ती त्या पुरूषाची प्रतिमा तयार करून आपल्या पुढें ठेवते व त्यावर तप्त शरफलाचा मारा करतें व तोंडानें अथर्ववेदांतील ६ व्या कांडांतील १३० व १३१ व्या सूक्तांतील ऋचा म्हणते; त्यांपैकीं कांहीं खालीं दिल्या आहेत.

उन्मादयत मरूत उदन्तरिक्ष मादय।
अग्न उन्मादया त्वमसौ मामनु शोचतु।।४।। अथर्व.६.१३०

नि शीर्षतो नि पत्तत आध्यो३नि तिरामि ते।
देवाः प्रहिणुत स्मरमसौ मामनु शोचतु।।१।।

यद् धावसि त्रियोजनं पञ्चयोजनमाश्चिनम् ।
ततस्त्वं पुनरायसि पुत्राणां नो असः पिता।।३।।अथर्व.६.१३१.

हे मरूत्। याला उन्माद होईल असें करा; हे अंतरिक्ष। याला उन्माद दे; हे अग्नी। तूं याला इतका उन्मत्त बनव कीं त्याला माझें स्मरण होऊन तो शोकार्त होईल.४.

डोक्यापासून पायापर्यंत तुझ्या शरीरांत मी (काम) पीडा घालतें. हे देवांनों। ह्याच्याकडे असा काम पाठवून द्या कीं, त्याला माझें स्मरण होऊन तो शोकार्त होईन.१.

तूं जो तीन योजनें पांच योजनें घोड्यासारखा धांवत गेला आहेस, तो परत येशील, व आपणांला होणार्‍या पुत्रांचा तूं पिता होशील.३.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .