प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ३ रें.
वेदप्रवेश – अथर्ववेद.

सपत्नीमंत्र.- अतिशय दुष्ट व द्वेषभाव भरलेले जाज्वल्य मंत्र म्हणजे, बायकांनीं आपल्या सवती होऊं पाहणार्‍या इतर बायकांनां आपल्या मार्गांतून दूर करण्याच्या कामीं उपयोगांत आणावयाचें होत. ह्या मंत्रांचें एक उदाहरण म्हणजे खालील ऋचा होयः-

भगमस्या वर्च आदिष्यर्धि वृक्षादिव स्त्रजम्।
महाबुध्न इव पर्वतो ज्योक् पितृष्वास्ताम्।।१।।
एषा ते राजन् कन्या विधूर्नि धूयतां यम।
सा मातुर्बध्यतां गृहेथो भ्रातुरथो पितुः।।२।।
एषा ते कुलपा राजन् तामु ते परि दद्मसि।
ज्योक् पितृष्वासाता आ शीर्ष्णः समोप्यात्।।३।।
असितस्य ते ब्रह्मणा कश्यपस्य गयस्य च।
अन्तः कोशमिव जामयोपि नह्यामि ते भगम।।४।। अथर्व. १.१४.

(फुललेल्या) झाडाचीं जशीं फुलें तोडून घेतात, त्याप्रमाणें मी हिचें भाग्य व तेज (हरण करून) स्वतः धारण केलें आहे. ज्याचा पाया जमिनींत खोल गेलेला आहे, अशा पर्वताप्रमाणें ती चिरकाल आपल्या आईबापांच्या घरीं राहो.१.

हे यमराज। ही तुझी बायको म्हणून तुझ्या अंकित होवो. ही आपल्या आईच्या, भावाच्या व बापाच्या घरीं बद्ध होऊन (चिरकाल) राहो.२.

हे राजा। ही तुझी कुलपालयित्री स्त्री आहे ती तुला देऊन टाकतें तिचे केंस गळून पडेतोंपर्यंत (म्हातारपणाप्रर्यंत) ती चिरकाल बापाच्या घरीं राहो. ३.

असित, कश्यप व गय यांच्या मंत्रांच्या योगानें, बहिणी ज्याप्रमाणें अंतःकोश बांधून ठेवितात, त्याप्रमाणें मी तुझें भाग्य बांधून ठेवितें (तुला भाग्यहीन करतें). ४.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .