प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ४ थें.
वेदप्रवेश – यजुर्वेद.

या वेदाच्या संहितांची गोष्ट ऋग्वेद व अथर्ववेद यांहून निराळी आहे. या संहितांतील ऋचा व्यावहारिक उपयोगाच्या दृष्टीनें म्हणजे यज्ञकर्मांमध्यें उपयोगी पडतील अशा क्रमानें एकत्र केल्या आहेत. या संहिता म्हणजे खरोखर यज्ञांतील विशिष्ट पुरोहीतांच्या उपयोगाचीं ऋचांचीं पुस्तकें होत, दुसरें कांहीं नाहीं. अर्थात् त्या काळीं हीं लिहिलेलीं पुस्तकें नव्हतीं; तर संहिता पुरोहित व गुरू यांच्या डोक्यांमध्यें (पाठ केलेल्या) असत; आणि पुरोहितांच्या पाठशाळांत त्या तोंडीं शिकवून व शिकून कायम ठेवीत असत.

यजुर्वेदाच्या संहितांचा मूळ उगम समजण्याकरितां प्राचीनांच्या कर्मकलापाबद्दल येथें चार शब्द लिहिणें जरूर आहे. प्राचीन वैदिक यज्ञसंप्रदायाचें थोडेंफार मर्म समजल्याशिवाय एकंदर वैदिक वाङ्मय पूर्णपणें समजणें बहुतेक अशक्य आहे. प्राचीन वैदिक धर्मांची आपणांस जी माहिती आहे तिजवरून त्यांतील कर्में नेहमीं दोन प्रकारचीं असत असें दिसतें. ऋग्वेदांतील कांहीं सूक्तांचा व अथर्ववेदांतील पुष्कळ मंत्रांचा संसारातील जन्म, विवाह आणि इतर समारंभांच्या वेळीं प्रार्थना करण्याकडे आणि आशीर्वाद देण्याकडे, तसेंच मृताची उत्तरक्रिया करतांना आणि पितरांची श्रद्धकर्में करतांना उपयोग करीत असत हें आपण पाहिलेंच आहे. त्याप्रमाणेंच पशुपाल आपल्याजवळ गुरांढोरांची समृद्धि होण्याकरितां, आणि शेतकरी आपल्या पिकांची चांगली वाढ होण्याकरितां करावयाच्या समारंभांमध्यें त्यांचा उपयोग करीत हेंहि आपण पाहिलें आहे. या समारंभांनां व त्या प्रसंगीं करावयाच्या होमहवनांनां उत्तरकालीं ‘गृह्यकर्माणि’ असें म्हणत. * या गृह्यकर्मांविषयीं गृह्यसूत्रांमध्यें- यांविषयीं पुढें माहिती येईंल- आपणांस सविस्तर माहिती मिळते. या गृह्यकर्मांच्या वेळीं करावयाच्या यज्ञांमध्यें घरांतील यजमानच यज्ञपुरोहिताचें स्थान घेत असे; * आणि त्याच्या मदतीला फार तर एकच आचार्य ‘ब्राह्मण’ असें.

या यज्ञांतील आहुती घरांतील यज्ञकुंडांतच देत असावेत. पुरातन पद्धतीप्रमाणें, गरीबश्रीमंत, लहानथोर प्रत्येक आर्याला आवश्यक अशा या यज्ञांशिवाय, दुसरे महायज्ञहि करीत असावेत. विशेषतः योध्द्यांची देवता जी इंद्र, तिच्या प्रीत्यर्थ सोमयज्ञ करीत असत. असा यज्ञ श्रेष्ठ, श्रीमंतलोक, मुख्यत्वेंकरून राजेलोकच करीत असावेत. ठरलेल्या नियमांप्रमाणें एक मोठी यज्ञभूमि तयार करून तीवर अशा यज्ञांत आवश्यक असलेल्या तीन पवित्र अग्नींकरितां कुंडें रचीत असत. अशा यज्ञांत मुख्य ऋत्विज चार असून त्यांच्या हाताखालीं इतर ऋत्विजांचा मोठा समुदाय असे, हे ऋत्विज यज्ञांतील असंख्य भानगडीचीं कृत्यें व विधी करीत असत. यज्ञांतील यजमान म्हणजे यज्ञकर्ता राजा किंवा थोर गृहस्थ जो असतो, त्याचें काम आगदीं थोडें असतें; त्याचें मुख्यें काम असें कीं, यज्ञांमधील ब्राह्मणांनां सढळ हातानें दक्षिणा द्यावयाची; ही देखील गाईंच्या हिशोबानें ठरलेली असे. तेव्हां ज्या यज्ञाकर्मांमध्यें ब्राह्मणांनां अत्यन्त प्राप्ति होत असे, त्या  यज्ञाकर्मांतील विधिसंकल्पांचा अभ्यास ते बर्‍याच आस्थेनें करीत व यज्ञकर्मांविषयींचें त्यांनीं एक स्वतंत्र शास्त्रच तयार केलें, यांत आश्चर्य नाहीं. या यज्ञकर्मांची माहिती देणारें ग्रंथ जीं ‘ब्राह्मणें’ व ‘श्रोतसूत्रें’ त्यांचा परिचय आपणांस पुढें होईल. ज्यांनां कालान्तरानें ‘अपौरूषेय’ असें मानूं लागले त्या ‘श्रुति’ ग्रंथांतील ब्राह्मणें हा महत्त्वाचा भाग असल्यानें यज्ञांनां ‘श्रौतकर्म’ असें म्हणूं लागले. श्रुतीच्या आधारानें हे यज्ञ करीत असत. त्यांच्या उलट जीं ‘गृह्यकर्में’ तीं ‘स्मृतीं’ च्या आधारानें करीत. ‘स्मृति’ म्हणजे स्मरण, म्हणजे परंपरा. स्मृतींनां ‘अपौरूषेय मानीत नाहींत. श्रौतकर्में त्रेताग्नीवर व गृह्यकर्में एकाग्नीवर होत असत. आतां, श्रौत यज्ञकर्में करणारे जे मुख्य चार पुरोहित ते असेः -१ होता म्हणजे ‘बोलाविणारा; हा देवांची प्रार्थना करून त्यांनां यज्ञकर्मांत येण्याविषयीं आमंत्रण करण्याकरितां सूक्तांतील ऋचा म्हणतो; २ उद्गाता अथवा ‘गाणारा’, सोमाच्या आहुती देण्याच्या वेळीं सामें म्हणणारा; ३ अध्वर्यु अथवा ‘यज्ञकरणारा, म्हणजे स्वतःच तोंडानें गद्यमंत्र म्हणून हातानें यज्ञांतील सर्व विधी करणारा आणि ४ ब्रह्मा अथवा महापुरोहित यानें यज्ञाला पीडा होऊं नये म्हणून बंदोबस्त ठेवावयाचा असे. या बंदोबस्ताचें कारण प्रत्येक पवित्र कृत्याला तसेंच प्रत्येक यज्ञाला, प्राचीनांच्या मतें कांहींना कांहीं विघ्न यावयाचेंच; आणि जर विधिनियमाप्रमाणें अगदीं बरोबर कर्म झालें नाहीं, जर एखादा मंत्र किंवा एखादी प्रार्थना बरोबर म्हटलीं गेली नाहीं, तर-एखादा स्वर चुकला तरी तेंच पवित्र कर्म यज्ञकर्त्या यजमानाच्या नाशाला कारण व्हावयाचें. असें न व्हावें म्हणून यज्ञस्थलाच्या दक्षिणभागीं ब्रह्मा यज्ञाचें रक्षण करण्याकरितें बसलेला असतो. दक्षिणदिशा ही मृत्युदेवता यम याची दिशा असून  यज्ञाविध्वंसक जे असुर ते याच दिशेंनें येऊन लोकांनां भय घालतात असें मानीत. ब्रह्मा चाललेल्या यज्ञकर्माकडे सारखें लक्ष ठेवितो आणि कोठें थोडीशी चूक झालेली त्याच्या नजरेस आली तर कांहीं मंत्र म्हणून त्या चुकीचें क्षालन करतो. ब्रह्म्याला एका जुन्या ग्रंथांत ‘यज्ञपुरोहितांतील उत्तम वैद्य’ (भिषग्वर्य) असें म्हटलें आहे. * हें काम करतां येण्यास ब्रह्मा स्वतः वेदसंपन्न असला पाहिजे. हें यज्ञपुरोहिताचें काम तो ‘त्रयीविद्या’ म्हणजे तीन वेदांच्या अध्ययनाच्या साहाय्यनें करतो. तीन वेदांचें ज्ञान असल्यामुळें प्रत्येक चूक त्याच्या ताबडतोब ध्यानांत येऊं शकते. *

बाकीच्या तीन पुरोहितांनां प्रत्येकी एकेक वेदच येत असावा लागतो. होता ज्या पुरोनुवाक्या म्हणजे ‘निमंत्रण-ऋचा’ म्हणून देवांनां यज्ञाकरितां आह्वान करतो आणि ज्या याज्या म्हणजे ‘यज्ञ-ऋचा’ आहुती देवांना म्हणत असतो त्या ऋचा ऋग्वेदामधील असतात. होत्याला ऋग्वेदसंहिता येत असावी लागते, म्हणजे ती त्यानें पाठ केलेली असली पाहिजे. कारण सोमयज्ञ करतांना जे ‘स्तुतिमंत्र’ अथवा स्तोत्रें म्हणावी लागतात तीं त्या संहितेमधून घेतलेलीं आहेत. येणेंप्रमाणें ऋग्वेदसंहिता आणि होता यांचा असा विशिष्ट संबंध असतो. (तथापि या होत्याकरतां ऋग्वेदसंहिता रचून तयार केली असें मात्र नाहीं.) शिवाय होता जेवढे ‘स्तुति मंत्र’ म्हणतो, तेवढेच सोमयज्ञामध्यें लागतात असें मात्र नाहीं; तर आणखी उद्गाता व त्याचे साहाय्यक जीं स्तुतिस्तोत्रें म्हणतात, * तींहि लागतात. हीं स्तोत्रें म्हणजे पद्यमय ऋचा असतात आणि त्या, ठराविक चालींत म्हणजे सामांत बसविलेल्या असतात. हे राग व ज्या पद्यामय ऋचांशीं त्यांचा संबंध असतो त्या, उद्गातृपुरोहित सामवेदी पाठशाळांमध्यें जाऊन शिकतात; आणि सामवेदसंहिता म्हणजे उद्गात्यांच्या उपयोगाकरतां संग्रह केलेल्या ऋचांचा ग्रंथ; या संहितेंत ऋचांपेक्षां ज्या सुरांत त्या असतात त्या रागांचें महत्त्व अधिक असतें.

शेवटचा व मुख्य पुरोहित अध्वर्यु. याला यज्ञामध्यें असंख्य विधी करीत असतांना तोडानें हळू हळू कांहीं लहान लहान गद्यमय व कांहीं जरा मोठालीं गद्यपद्यमय अशीं स्तोत्रें म्हणावीं लागतात; त्यांपैकीं गद्यमय असतात त्यांनां ‘यजुः’ (अनेकवचन ‘यजूंषि’) म्हणतात आणि पद्यांनां ‘ऋक्’ (अनेकवचन ‘ऋचः’) असें म्हणतात. * यजुर्वेद-संहितांमध्यें ह्या सर्व गद्यमय प्रार्थना व विधी, आणि त्या प्रार्थना म्हणून जीं यज्ञांतील कर्में करावयाचीं, त्यांबद्दलचे नियम आणि विवेचन, यांचा अध्वर्युपुरोहितांचे उपयोगाकरतां संग्रह केलेला आहे; आणि यज्ञांतील उपयोगाला अनुसरून त्यांचा क्रम लाविला आहे.

ऋग्वेदासंहिता आणि अथर्ववेदसंहिता यांच्याहून अगदीं निराळ्या प्राकारच्या अशा ज्या सामवेद आणि यजुर्वेद संहिता यांनां त्यांच्या विशिष्ट रचनेवरून उपासनामयसंहिता असें नांव देणें योग्य होईल.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .