प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ४ थें.
वेदप्रवेश – यजुर्वेद.

यजुर्वेदसंहिता.– ज्याप्रमाणें सामवेदसंहिता म्हणजे उद्गात्याचें गानपुस्तक, तसेंच यजुर्वेदसंहिता म्हणजे अध्वर्युऋत्विजाचें कर्मदर्शक पुस्तक होय. ‘अध्वर्यूच्या वेदाच्या एकशेंएक शाखा आहेत, असें व्याकरणकार पडञ्जलि म्हणतो. * यजुर्वेदाच्याच इतक्या शाखा कां असव्या याची कल्पना करतां येते कारण निरनिराळ्या प्रकारचीं यजनकर्में करीत असतां अध्वर्यूंनां स्वतः प्रार्थना म्हणाव्या लागत असत; या प्रार्थनांसंबंधानें निरनिराळीं मतें व पंथ पडत गेले असावे, आणि त्यामुळें प्रार्थानांच्या निरनिराळ्या पोथ्या निघाल्या असाव्या. विधी किंवा उपासना यांत अगदीं थोडा फरक पडला तरी तेवढ्यानें एक नवीन वैदिकपंथ उत्पन्न होई. हें पंथमेदोत्पत्तीचें सामान्य स्वरूपवर्णन झालें. शुक्ल  कृष्णांच्या भेदाचा इतिहास बराच भानगडीनें भरला आहे. त्याचें सविस्तर विवेचन पुढें येईलच.

चरणव्यूहामध्यें यजुर्वेदाचे ८६ भेद दिले आहेत परंतु त्या सर्व शाखांचीं नांवें दिलीं नाहींत. चरणव्यूहांत पुढील नांवें दिलीं आहेत. * चरकांचे बारा भेद आहेत ते- चरक आव्हरक, कठ, प्राच्यकठ कपिष्टल कठ, चारायणीय वारायणीय, १वार्तान्तवीय. २श्वेताश्वतर, औपमन्यव, ३पाताण्डनीय व मैत्रायणीय हे होत. मैत्रायणीयांमध्यें पुन्हां सहा शाखा उत्पन्न झाल्या त्या-मानव, बाराह, दुंदुभ, छगलेय, हरिद्रवीय व ५श्यामायनीय या होत. तैत्तिरीयांच्या मुख्य दोन शाखा आहेत ६औखेय आणि ७खाण्डिकेय. त्यांपैकीं खाण्डिकेयांच्या पांच शाखा आहेत त्याकालेत, शाठ्यायनी, हिरण्यकेशी, भारद्वाजी आणि आपस्तम्बी या होत. वाजसनेय शाखेचे पुढीलप्रमाणें भेद आहेत- ९जाबाल, १०बौद्धायन, काण्व, ११माध्यंदिनेय, १२शाफेय, १३तापनीय, १४कपोल, १५पौण्डरवत्स, १६आवटिक, १७परमावटिक, १८पाराशर, वैणेय, वैधेय, १९अद्ध आणि श्बौधेय..

आतांपर्यंत यजुर्वेदाच्या सहा संहिता उपलब्ध झाल्या आहेत त्या येणेंप्रमाणेः-

१ली काठक-संहिता.- कठशाखेच्या या संहितेची माहिती बराच कालपर्यंत बर्लिन-लायब्ररीमधील एका हस्तलिखितावरून मिळत असें, पण आतां ती L Von Sohroeder नें प्रसिद्ध केली आहे. *

२री कपिष्ठल-कठ-संहिता.– ही देखील प्रसिद्ध झालीं आहे.

३री मैत्रायणी संहिता.- मैत्रायणीशाखेची संहिता. L Von Schroeder नें ही प्रसिद्ध केली आहे. *

४ थी तैत्तिरीय-संहिता.- तैत्तिरीय शाखेची संहिता. यजुर्वेदांत तैत्तिरीय हा एक मुख्य पंथ होता व त्यांत ही संहिता शिकवीत असत. ए. वेबरनें ही प्रसिद्ध केली *. ही आनंदाश्रमानें सायणभाष्यासह प्रकाशिली आहे.

या चार संहितांचा परस्पर निकट संबंध आहे, आणि या सर्व ‘कृष्ण-यजुर्वेदां’तील आहेत. यांहून अगदीं निराळी अशीः-

५वी वाजसनेयि-संहिता.- हिलाच शुक्ल-यजुर्वेद म्हणतात. या वेदाचा मुख्य गुरू याज्ञवल्क्य वाजसनेय(यि) यावरून हें नांव पडलें. ह्या वाजसनेयि संहितेंत काण्य व माध्यंदिन अशा दोन शाखा आहेत; पण दोहोंत फरक फार थोडा आहे.* 

उवट आणि महीधर यांच्या भाष्यांसह निर्णयसागर छापखान्यानें माध्यंदिनसंहितेची एक सूंदर आवृत्ति छापली आहे. काण्वसंहिता ही आतां सायणभाष्यासह अजमीर येथें छापून प्रसिद्ध झाली आहे.

शास्त्रीय वर्गीकरण करतांना ऋग्वेद, यजुर्वेद इत्यादि वेदनामें आणि मंत्र ब्राह्मण इत्यादि ग्रंथनामें यांचा उपयोग समजुन घेतला पाहिजे. ऋचा, यजू यांस विशिष्ट अर्थ आहे होत्यानें म्हणावयाचें मंत्र त्या ऋचा (ऋग्वेद) होत, अध्वर्युन म्हणावयाचे मंत्र ते यजू (यजुर्वेद) होता, उद्गात्यानें म्हणावयाचीं गाणीं तीं सामें (सामवेद) होत. याजकावरून जसा वेदविभाग करतां येतो तसा उपयोगावरून अमुक एखादें वाक्य मंत्र कीं ब्राह्मण हें ठरवितां येतें ग्रंथाचें नांव यजुर्वेद असलें म्हणजे आतील सर्व मजकूर शास्त्रीय दृष्टीनें यजुर्वेद नव्हे. यजुर्वेदांत हौत्र देखील पुष्कळच आहे. दर्शपूर्णमास आणि पशू यांचें हौत्र यजुर्वेदांत आहे. यज्ञप्रसंगीं यजुर्वेदांतील हौत्र म्हणावें अगर म्हणूं नये याविषयीं क्षुल्लक भांडणें पुण्यांत उपस्थित झालीं होतीं. या याजुषहौत्रासंबंधाच्या भाननगडी पुण्यांतील पत्रांतून वारंवार दृष्टीस पडत होत्या. असो.

कृष्णयजुर्वेदांतील ज्या भागास संहिता म्हणतात त्या भागांत ब्राह्मणहि पुष्कळ आलें आहे, आणि ज्या भागास ब्राह्मण म्हणतात त्यांत संहिता म्हणजे मंत्रभागाहि पुष्कळ आला आहे. अगोदर संहिता वर्णावयाच्या आणि मग ब्राह्मणें वर्णावयाचीं ही पद्धति थोडावेळ तरी त्यागिली पाहिजे. कृष्णयजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेचें संपूर्ण पृथक्करण द्यावयाचें म्हणजे वेद व ब्राह्मणें या दोहोंचीहि माहिती द्यावयाची. एकाशिवाय दुसरें लिहिणें व्यर्थ होय.

कृष्णयजुर्वेद वर्णन करावयाचा म्हणजे तत्कालीन कर्मांचें ज्ञान करून द्यावयाचें आणि तें ग्रंथांत कसें काय मांडलें आहे हें समजावून द्यावयाचें. यासाठीं प्रथम या वेदाचें विषयवार पृथक्करण दिलें पाहिजे. सोईसाठीं व ऐतिहासिक महत्त्वामुळें तैत्तिरीय शाखा स्पष्टीकरणार्थ घेतली आहे. तींतील विषयांचे पृथक्करण येणें प्रमाणें:-

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .