प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.
 
प्रकरण ५ वें.
वेदप्रवेश-सामवेद.

सामवेदाच्या एका काळीं अनेक संहिता होत्या. याच्या एक हजार संहिता होत्या असें पुराणांत सांगितलें आहे. * या संहितांपैकीं फक्त एक आपणांस आज उपलब्ध आहे. या सुरक्षित राहिलेल्या सामवेद संहितेंत * दोन भाग आहेतः एक ‘आर्चिक’ अथवा ‘ऋचा (साम) संग्रह,’ आणि दुसरा ‘उत्तरार्चिक’ अथवा ‘दुसरा ऋचा-संग्रह.’ या दोन्ही भागांत ज्या ऋचा आहेत त्या बहुतेक सर्व ऋग्वेदांत आलेल्याच आहेत. एकंदर १८१० ऋचांपैकीं, किंवा ऋचांच्या पुनरुक्ती सोडल्या तर एकंदर १५४९ ऋचांपैकीं पंचाहत्तर ऋचा खेरीज करुन बाकी सर्व ऋग्वेदसंहितेंत आहेत, आणि त्या बहुतेक ऋग्वेदसंहितेच्या आठव्या व नवव्या मंडळांत आहेत. या ऋचांपैकीं बहुतेक गायत्री छंदांत आहेत, अथवा गायत्रीपंक्ती आणि जगतीपंक्ती मिळून झालेल्या प्रगाथ छंदांत आहेत. या छंदांमध्यें केलेल्या या ऋचा गाण्याच्या सुरावर म्हणण्याचाच निःसंशय प्रथमपासून हेतु होता. * ज्या पंचाहत्तर ऋचा ऋग्वेदांत आलेल्या नाहींत, त्या कांहीं इतर संहितांत सांपडतात, व कांहीं निरनिराळ्या विधिग्रंथांत सांपडतात. कांहींचें मूळ आपणांस माहीत नसलेल्या आवृत्तींत कदाचित् आढळेल. परंतु कांहीं ऋग्वेदांतील निरनिराळ्या ऋचांतून तुकडे घेऊन अर्थाकडे न पाहतां ते एकत्र जुळवून बनविल्या आहेत. सामवेदांत ऋग्वेदांतील ऋचा कांहीं पाठभेदानें आढळतात; या पाठांपैकीं सामवेदांतील पाठ कोठें कोठें अधिक जुना असावा अशी काहीं लोकांची समजूत आहे.

परंतु थिओडोर आफ्रेक्टनें (Theodor Aufrecht) * असें दाखविलें आहे कीं, सामवेदांतील निरनिराळे पाठ कांहीं यदृच्छेनें, कांहीं हेतुपुरःसर व कांहीं चुकीनें झालेले आहेत; आणि गाण्याकरतां शब्दरचना करतांना दुस-या ठिकाणीं सुद्धां असे फरक केलेले आढळतात. सामवेदांतील आर्चिक व उत्तरार्चिक यांमधील शब्द हे केवळ साधनभूत आहेत; मूळ साध्य म्हणजे गाण्याचे राग. हे राग शिकविणें हाच दोन्ही भागांचा हेतु आहे. सामवेदाच्या पाठशाळेंत उद्गाता होण्याकरतां ज्या विद्यार्थ्यास शिक्षण घेणें असेल त्यास प्रथम रागरागिण्या शिकाव्या लागत; या रागरागिण्या आर्चिकावरुन शिकत. आर्चिक तयार झाल्यानंतर मग शिकणाराला यज्ञाच्या वेळीं म्हणावयाचीं स्तोत्रें पाठ करतां येत असत; आणि त्या कामाला उत्तरार्चिकाचा उपयोग होई.

सामवेदाच्या पहिल्या भागांत म्हणजे आर्चिकांत एकेरी अशा ५८५ ऋचा आहेत; त्यांतच यज्ञामध्यें उपयोगांत येणारे निरनिराळे छंद आले आहेत. गायनाकडे उपयोग करण्याकरतां केलेल्या या ग्रंथाला ‘साम’ (वेद) हें जें नांव देतात त्याचा मूळ अर्थ ‘स्वर’ किंवा ‘छंद’ असा आहे.

यूरोपीय म्हणतात कीं,‘अमक्या स्वरांत पद्य म्हटलें;’ त्याच्या उलट भारतीय लोक म्हणतात कीं, ‘अमक्या पद्यांत अमका राग (साम) म्हटला.’ म्हणजे वेदवेत्ते ऋचा म्हणजे पद्य व राग यांचा संबंध जो समजतात तो असा कीं, ऋचेमधून राग निघाला आहे. याकरितांच ऋचेला ‘योनि’ अशी संज्ञा आहे. जरी स्वभावतः एक छंद अनेक ऋचांना लावतां येतो, तरी कांहीं ठराविक ऋचांनां ठराविक छंदांच्या योनी मानण्याचा प्रघात आहे. एवंच आर्चिक म्हणजे ५८५ योनींचा अथवा एकेरी ऋचांचा संग्रह. या ऋचा तितक्या निरनिराळ्या सुरांत म्हणतात. या संग्रहाला प्रत्येक पद्यांची पहिली ऋचा त्या त्या रागाची आठवण होण्याकरितां ज्यांत दिलेली आहे असें एक गाण्याचें पुस्तकच म्हणतां येईल.

सामवेदाचा दुसरा भाग उत्तरार्चिक. यांत तीनतीन ऋचांचें एक अशीं चारशें गानें * आहेत. त्यांमधून मुख्य यज्ञांच्या वेळीं गावयांचीं जी स्तोत्रें तीं तयार केलेलीं असतात. आर्चिकामध्यें वृत्तानुरोधानें ऋचांचा क्रम लावला आहे, तर उत्तरार्चिकांत त्यांचा क्रम ज्या देवांनां उद्देशून त्या ऋचा केल्या आहेत त्या देवांनां अनुसरुन लावला आहे, उदाहरणार्थ, अग्नि, इंद्र, सोम या मुख्य देवांच्या क्रमानुसार उत्तरार्चिकामधील गानांचा क्रम बसविला आहे. * बहुत करुन तीन किंवा अधिक ऋचा मिळून एक स्तोत्र होतें. एका स्तोत्रांतील सर्व ऋचा एकाच सुरांत-आर्चिकांत सांगितलेल्या सुरांपैकीं-म्हणतात.

उत्तरार्चिक म्हणजे संपूर्ण पद्यें दिलीं आहेत असें पद्यांचें पुस्तक. छंद अगोदरच आर्चिकावरुन माहित झालेले आहेत असें मानावयाचें. आर्चिकानंतर उत्तरार्चिक झालें असावें असें साधारणपणें वाटतें. कारण उत्तरार्चिकांतील गानांत आलेल्या नाहींत अशा पुष्कळ योनी आणि छंद आर्चिकामध्यें आहेत, उलट उत्तरार्चिकांत कांहीं पद्यें आहेत त्यांचे छंद आर्चिकामध्यें सांगितलेले नाहींत. तथापि आर्चिक पूर्ण होण्यास उत्तरार्चिकाची आवश्यकता आहे; उद्गात्याच्या शिक्षणांतील आर्चिक हा पहिला भाग, आणि उत्तरार्चिक हा दुसरा भाग होय.

शब्द जसे उच्चारले जातात तसेच संहितेच्या दोन्ही भागांत दिलेले आहेत. छंद अगदीं प्राचीन काळीं तोंडानें व कदाचित् वाद्यावरहि शिकवीत असावेत. गानांचीं अथवा पद्यांचीं पुस्तकें (उत्तरार्चिक) मात्र अलीकडच्या काळांत झालीं आहेत; त्यांत सूर दिलेले असतात; आणि गांताना जसे म्हणतात तसे शब्द म्हणजे अक्षरें लांबवून, पुनरावृत्ति व प्रक्षेप करुन जशीं शब्दांचीं रुपें होतात तशींच रूपें त्यांत लिहिलेलीं असतात; त्यांनां ‘स्तोभ’ म्हणतात; उ., होयी, हुवा, होई, इत्यादि. (हे स्तोभ कांहीं अशीं पाश्चात्त्यांमधील आनंदोद्गार, जे ‘हुजा’ (Huzza)   त्यांहून निराळे नाहींत.) अगदीं प्राचीन सूरलेखनपद्धति त, का, ण इत्यादि अक्षरांच्या साह्यानें केलेली आहे. परंतु पुष्कळ वेळां सप्तस्वरांकरितां सात आंकडे १, २, ३, ४, ५, ६, ७ योजितात, तत्समानार्थी अक्षरें पाश्चात्त्यांच्या पद्धतीमध्यें  F,E,D,C,B,A,G हीं आहेत व आपल्या अर्वाचीन पद्धतींत सा, री, ग, म, प, ध, नि हीं आहेत. सामवेद गातांना ब्राह्मण आपल्या हातांच्या व बोटांच्या चलनानें निरनिराळ्या स्वरांवर जोर देतात. * गांवामध्ये होणा-या सोमयज्ञामध्यें गावयाचे छंद आणि अरण्यांतील ऋषींच्या यज्ञांतील छंद निरनिराळे असत असें दिसतें; कारण आर्चिकामध्यें ‘ग्रामगेयगान’ आणि ‘अरण्यगेयगान’ असे दोन प्रकार आहेत. आर्चिक म्हणजे छंदांची अथवा वृत्तांचीं पुस्तकें असें म्हटलें, तर उत्तरार्चिक म्हणजे संगीताचीं पुस्तकें असें आपणांस म्हणतां येईल; कारण उत्तरार्चिकांत शब्दांतील अक्षरें गातांना जशीं लांबवून व पुनरुक्ती करुन म्हणतात तशीं तीं निरनिराळ्या सुरांसह लिहिलेलीं आहेत.

छंदांची संख्या * बरीच मोठी असली पाहिजे; आणि अगदीं प्राचीन काळीं सुद्धां प्रत्येक छंदाला स्वतंत्र नांव होतें. पुष्कळ वेळां ब्राह्मणांत व सूत्रग्रंथांत त्यांचीं नांवें दिलेलीं असतात; शिवाय त्यांचे निरनिराळे लाक्षणिक अर्थहि देतात. या छंदांमुळे ब्राह्मणें, आरण्यकें आणि उपनिषदें हीं गूढ व रहस्यमय झालेलीं आहेत; विशेषतः ऋग्वेदांत पूर्वींच आलेले ‘बृहत्’ आणि ‘रथंतर’ हे दोन छंद व असे आणखी कांहीं छंद रहस्यमयता उत्पन्न करण्यास कारणीभूत झालेले आहेत. ऋत्विज आणि धर्मगुरु यांनीं स्वतः हे छंद नवीन खात्रीनें बनविले नाहींत. त्यांपैकीं अगदीं जुने छंद बहुतकरुन लोकप्रचारांतील असून ते इतिहासापूर्वकालीन संक्रान्तीचा सण * व इतर राष्ट्रीय उत्सव यांतील धार्मिक् पद्यांचे छंद असावेत. इतर कांहीं छंद प्राचीन संस्कृत लोकांतील जादूगार, वैदू व शामन लोकांसारखे जे ब्राह्मणपूर्वकालीन अभिचारी पुरोहित त्यांचीं गानें व मंत्र ज्या गोंधळी संगीतांत म्हटले जात त्यांतील असावेत. सामरागांचा उगम सामान्य लोकांच्या संगीतांत असल्याविषयींची चिन्हें वर सांगितलेल्या स्तोभांमध्यें किंवा आनंद-आलापांमध्यें दिसून आलीं आहेत; आणि विशेषतः ब्राह्मणकाळीं सामवेदांतील रागांमध्यें कांहीं अद्भुत जादूची * शक्ति आहे असें मानीत असत या गोष्टीवरुनहि तेंच दिसतें. सामविधानब्राह्मण नांवाचें जें एक सामवेदाचें ब्राह्मण आज उपलब्ध आहे, त्यांतील दुसरा भाग म्हणजे एक निव्वळ अभिचारकर्मपर पुस्तक आहे, व त्यांत निरनिराळ्या अभिचारकर्मांत निरनिराळ्या सामांचा कसा उपयोग करावा हेंच सांगितलेलें आहे. शिवाय सामाचा स्वर ऐकतांच ऋग्वेद व यजुर्वेदाचें पठण एकदम बंद करावें असें ब्राह्मण धर्मशास्त्रांत सांगितलें आहे. उदाहरणार्थ, आपस्तंब-धर्मसूत्रांत * कुत्रा, गाढव, लांडगा, कोल्हा, घुबड यांचें ओरडणें, वाद्यांचा आवाज, रडणें आणि सामघोष इत्यादि ऐकतांच वेदपठण बंद करावें असें सांगितलें आहे. या गोष्टीवरूनहि सामवेदांतील राग आणि ब्राह्मणपूर्वकालीन लोकसमज व अभिचारकल्पना यांच्यामधील संबंधाची साक्ष पटते.

येणेंप्रमाणें सामवेदसंहितेचा यज्ञकर्म आणि अभिचार यांचा इतिहास समजण्यास थोडाबहुत उपयोंग आहे. त्यांतील गानें तर भारतीय संगीतशास्त्राचा इतिहास जाणण्यास फारच महत्त्वाचीं आहेत; परंतु आतांपर्यंत या दृष्टीनें त्याचा कांहींहि उपयोग करण्यांत आलेला नाहीं. वाङ्मयाच्या दृष्टीनें मात्र आपणांस या संहितेचा कांहीं उपयोग नाहीं.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .