प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ७ वें.
वेदप्रवेश-आरण्यकें व उपनिषदें.

आर्. गार्ब ह्यानें ब्राह्मणांनां “अप्रबुद्ध काळांतील तत्त्वज्ञानोत्पादक विद्वत्ताप्रचुर ग्रंथ” अशी संज्ञा दिली आहे. परंतु विंटर्निट्झचें मत याहून थोडेंसें भिन्न आहे. त्याचें म्हणणें असें आहे कीं, ऋग्वेद संहितेंतील अनेक गोष्टींवरून प्राचीनकालचें भारतीय अप्रबुद्ध दिसत नसून बुद्धिमान् व सर्वगुणसंपन्न दिसतात. तेव्हां त्या वेळच्या कांहीं वर्गानें यज्ञयागादिकांवर इतकें शब्दसामर्थ्य खर्च केलें असतां त्या वेळचे क्षत्रिय व इतर बाकीच्या वर्गाचे लोक यांनीं कांहींच म्हटलें किंवा लिहिलें नसेल अशी कल्पना करणें फार कठीण आहे. सायणानें जें स्पष्ट रीतीनें म्हटलें आहे त्यावरुन आणि इतर ग्रंथांतर्गत पुराव्यावरुन पहातां खुद्द ब्राह्मणांतहि कल्प (धर्मकृत्यादि संबंधींच्या आज्ञा) आणि त्या वरील स्पष्टीकरणार्थ टीकांखेरीज पुराणें, इतिहास, गाथा व नाराशंसी हीं सांपडतात. हेंच पर्यायानें सांगावयाचें म्हटलें म्हणजे आर्षकाव्यांचा आरंभ ब्राह्मणकालापासून आहे असें दिसतें. त्या वेळचे लोक बुद्धिमान् असून दीर्घोद्योगी होते म्हणूनच ब्राह्मणांत सांगितलेले मोठमोठ खर्चाचे महायज्ञ त्या वेळीं होणें शक्य होतें हें उघडच आहे. त्या वेळच्या योध्द्यांनीं, वैश्यांनीं, कृषीवलादि गोपाल ह्यांनीं किंवा शिल्पज्ञांनीं किंवा मजूर वर्गानीं कांहींच काव्यें गाईलीं नसतील किंवा कांहींच कथा सांगितल्या नसतील असें आपणांस मानून चालावयाचें नाहीं. परंतु एवढें खरें कीं त्या वेळीं हिंदुस्थानांत जीं काव्यें झालीं किंवा ज्या कथा सांगितल्या गेल्या त्यांतील, खुद्द वेदवाक्यांत, फारच थोडा भाग आढळतो (उदाहरणार्थ, शुनः शेपाची कथा) व पुष्कळासा भाग पुढें लिहिल्या गेलेल्या पुराणांत व काव्यांत दृष्टीस पडतो. ब्राह्मणांप्रमाणें, व्याकरण, शिक्षा, ज्योतिषादि ज्या शास्त्रांचें पुढें वेदांग म्हणून स्वतंत्र रीतीनें अध्ययन होऊं लागलें त्या शास्त्रांची उत्पत्तीहि फार पूर्वीच्या कालीं झाली असावी असें दिसतें. *

तत्त्वज्ञानाची उत्पत्तीहि ब्राह्मणकालाच्या नंतरची नसून त्या पूर्वीची आहे. ऋग्वेदांतील कांहीं सूक्तांवरुन देवब्राह्मणादींवरील लोकांच्या श्रद्धामय भावनेंत संशयकार्पण्यादि विकार कसे उत्पन्न झाले हें आपण वर दाखविलेंच आहे. प्राचीन हिंदुस्थानांतील हे पहिले तत्त्ववेत्ते व संशयस्थलीं विचार करणारें ‘ब्रह्मवादी’ एकाकी न राहतां त्यांनीं एक संघ तयार करुन आपल्या मतांचा प्रसार केला असावा हें अथर्ववेदांतील कांहीं तत्त्वज्ञानात्मक सूक्तांवरुन व यजुर्वेद संहितांतील कांहीं तुटक तुटक भागांवरुन सिद्ध होतें असें विंटरनिट्झला वाटतें. आरण्यकांत तत्त्वज्ञानी लोकांच्या मतांचें ठोकळ स्वरुप तेवढें दृष्टोत्पत्तीस येतें. * तथापि ह्या ठोकळ स्वरुपावरुन सुद्धां एवढें सिद्ध होतें कीं यज्ञशास्त्रीची प्रगति होत असतां देखील त्याच काळीं तात्त्विक विचारहि प्रगल्भ होत जात होते.

प्राचीन हिंदुस्थानांतले हे पुरातन तत्त्वज्ञानी केवळ ब्राह्मणवर्गांतलेच होते हें बहुधा शक्य दिसत नाहीं. कारण देव अनंत आहेत इत्यादि मतांच्या विरुद्ध प्रतिपादन करणारें त्याचें विचार हे ब्राह्मणवर्गाच्या जीवनहेतूला अगदीं विरोधक होते. जे ब्राह्मण यज्ञयागादींवर आपला निर्वाह करीत असत त्यांच्यांतच, इंद्र आहे किंवा नाहीं किंवा देवांनां हवि वगैरे देण्यांत कांहीं अर्थ आहे किंवा नाहीं * असें प्रश्न उपस्थित करणारें कोणी असतील ही कल्पना संभवनीयच नाहीं. ब्राह्मणांच्या विरुद्ध असणा-या लोकांतच ज्यांचा कशावरहि विश्वास नव्हता असे कृपण, यज्ञयागादि न करणारें व ब्राह्मणांस दानें न देणारे असे संशयी व मनन करणारें लोक होते हें जास्त शक्य आहे. उपनिषदांतील पुष्कळ उता-यांवरुन व त्या पूर्वीच्या ब्राह्मणांवरुन प्राचीन काळच्या क्षत्रिय वर्गाचाहि विद्याभिरुचि व ज्ञानार्जनादींत कालक्रमणा करण्याकडे कांहींसा कल होता असें दिसतें. कौषीतकी ब्राह्मणांत प्रतर्दन राजाचा यज्ञशास्त्रासंबंधीं ब्राह्मणाशीं झालेला संवाद दिलेला आहे. शतपथ ब्राह्मणाच्या अकराव्या काण्डांत विदेह देशचा राजा जनक ह्यानें आपल्या ज्ञानानें सर्व ब्राह्मणांची गाळण उडविल्याचें वारंवार सांगितलेलें आहे. अग्निहोत्र कसें पाळतात ह्याविषयीं श्वेतकेतु, सोमशुष्म, व याज्ञवल्क्य ह्या ऋषींस जनकानें विचारलेल्या प्रश्नावरुन पुष्कळ बोध होण्यासारखा आहे. कोणासहि ह्या प्रश्नाचें समाधानकारक उत्तर देतां आलें नाहीं. तथापि याज्ञवल्क्य ह्यासहि जरी अग्निहोत्राचा अर्थ पूर्णपणें कळला नव्हता तरी त्यानें त्यासंबंधीं पुष्कळ गहन विचार केला असल्यामुळें त्याला शतगोदान देण्यांत आलें. राजा निघून गेल्यावर “ह्या क्षत्रियानें आपल्या वाणीनें आपणांस गोंधळून टाकिलें, असो, आपण पुन्हां त्याच्याशीं ब्रह्मोद्य प्रतिपक्ष करूं” असा त्या ऋषींनीं आपसांत विचार केला. तथापि “आपण ब्राह्मण आहों तो केवळ एक क्षत्रिय आहे. आपण त्याला जिंकलें तर त्या जयाचें श्रेय आपणांस काय ? परंतु जर त्यानें आपणांस हरविलें तर क्षत्रियानें ब्राह्मणांवर ताण केली असें लोक आपणांस म्हणतील. तेव्हां हा विचार सोडून द्या” असें सांगून याज्ञवल्क्यानें त्यांनां ह्या नादापासून परावृत्त केलें व दुस-या दोन्ही ऋषींनीं तें मान्य केलें. याज्ञवल्क्यानें स्वतः जनकाकडून तत्त्वज्ञान श्रवण केलें. * यज्ञाची रचना करणारा व शौल्वायन * ह्यास शिकविणारा अयस्थूण ह्यास सायणानें “ऋषि” म्हटलें आहे तथापि तो ब्राह्मण होता किंवा नाहीं ह्याची शंकाच आहे. परंपरेप्रमाणें ज्या ऋषींनीं ऋग्वेदाचीं सूक्तें रचिलीं ते सुद्धां सर्वच ब्राह्मण वर्गांतील होते असें नाहीं. कवष मुनीविषयीं असें सांगतात कीं तो अब्राह्मण असून दासीपुत्र होता. एका महायज्ञाचे वेळीं हा त्यांत आला तेव्हां ऋत्विजमंडळींनीं, अरण्यांत जाऊन क्षुत्पिपासाकुल होऊन मरण यावें म्हणून त्याला हांकून लाविलें. परंतु “जल” (देवता) व सरस्वती ह्यांस त्याची कींव आली, व त्यास एक सूक्त दृष्ट झालें नंतर ऋषीमंडळींनीं त्यास ऋषि समजून परत आपणांस येऊं दिलें. *

उपनिषदांत राजांनींच काय पण स्त्रिया व हीन वर्णांतील लोकांनीं सुद्धां तत्त्वज्ञानादि विद्वत्तापूर्ण विषयांत गति करुन घेतल्याचें आढळत असून त्यांनां उच्चप्रतीचें ज्ञान असल्याचें दिसून येतें. बृहादारण्यक उपनिषदांत वचक्रूची मुलगी गार्गी हिनें याज्ञवल्क्यास दृश्य जगाच्या उत्पत्तीविषयीं इतके प्रश्न केले आहेत कीं, शेवटीं याज्ञवल्क्यानें “गार्गी इतकें विचारूं नकोस, नाहीं तर हें ज्ञान तुझ्या डोक्यांत न संपादल्यामुळें तें फुटेल, देवत्वाविषयीं कोणीहि फार खोल प्रश्न करूं नयेत, फार फार विचारतेस तेव्हां इतकें विचारण्याचें सोडून दे” असें म्हटलें. एका ठिकाणीं हीच गार्गी वादविवाद करणा-या महापंडितांच्या संभेंत प्रसिद्ध अध्यापक याज्ञवल्क्यासमोर उभी राहून असें म्हणाली कीं “जसा एखादा काशीचा किंवा विदेहाचा वीरपुत्र आपल्या धनुष्याची दोरी ओढून हातांत दोन अरिविघातक तीक्ष्ण बाण घेऊन सज्ज होतो त्याप्रमाणें मी तुझ्याविरुद्ध हे दोन प्रश्न विचारून प्रतिपक्ष करावयास सिद्ध आहे तेव्हां ह्या प्रश्नांचीं उत्तरें दे.” त्याच उपनिषदांत याज्ञवल्क्यानें आपली पत्नी मैत्रेयी हिला आत्म्याविषयींचें गहन ज्ञान करुन दिल्याचें सांगितलें आहें. * अशा प्रकारचें उत्कृष्ट प्रतीचें ज्ञान म्हणजे केवळ ब्राह्मणांनांच होतें असें नसल्याबद्दलचें दुसरें ठळक उदाहरण सयुग्वा रैक्व याचें होय. हा आपल्या शकटाखालीं बसून त्याची घाण खरडून काढीत होता तरी त्याला आपल्या श्रेष्ठ प्रतीच्या ज्ञानाबद्दल राजासारखा अभिमान होता. दानशूर संपत्तिमान् जनश्रुति हा नम्रपणें त्याचें जवळ येऊन त्याला आपणांस ज्ञान देण्याबद्दल विनंति करूं लागला. रैक्वानें त्याला शूद्र म्हणून त्याच्या मौल्यवान् पारितोषकांचा तिरस्कार केला. जेव्हां त्यानें (जनश्रुतीनें) त्याला आपली सुंदर मुलगी अर्पण केली तेव्हां तो त्याला शिकविण्यास तयार झाला. खालीं दिलेली गोष्टहि तितकीच मनोरंजक व बोधप्रद आहे.

सत्यकाम जाबाल आपली आई जबाला हिला म्हणाला “हे महाभागे, मला ब्राह्मण छात्राची दीक्षा घेण्याची इच्छा आहे. माझा जन्म कोणत्या कुळांत झाला तें सांग” ह्यावर ती म्हणाली “मुला, तुझा जन्म कोणत्या कुळांत झाला हें मला ठाऊक नाहीं. मी तरुण असतां मोलकरीण (दासी) म्हणून सर्वत्र फिरत असें, आणि अशा रीतीनें तूं मला झाला आहेस. मला जबाला असें म्हणतात आणि तुझें सत्यकाम असें नांव आहे. म्हणून तुझ्या वडिलांच्या नांवाचा संबंध न आणतां मी तुला जबालेचा मुलगा सत्यकाम असें म्हणतें.” नंतर तो गौतमानुयायी हारिद्रुमत याचेकडे गेला व म्हणाला “हे महातपोनिधे मला आपल्या बरोबर ब्रह्मचर्याची दीक्षा द्यावयास आपण कबूल अहांत काय ? यावर त्यानें त्यास विचारलें “तूं कोणत्या कुलांत जन्मला आहेस ?” जाबालानें उत्तर दिलें “हे गुरो माझा जन्म कोणत्या कुळांत झाला हें मला ठाऊक नाहीं. मी माझ्या आईला विचारिलें व ती म्हणाली “मी माझ्या लहानपणीं दासी होत्यें; अशा रीतीनें तूं मला झाला आहेस, तुझा जन्म कोणत्या कुळांत झाला हें मला सुद्धां माहीत नाहीं; मला जबाला म्हणतात व तुला सत्यकाम असें म्हणतात” म्हणूनच, हे गुरो, मी आपल्याला जबालापुत्र सत्यकाम असें म्हणतों” ह्यावर तो त्यास म्हणाला “ब्राह्मणाशिवाय इतकें स्पष्ट कोणाला बोलतां येणार ? जा, बेटया, थोडेसें इन्धन आण (हें त्या विधीला लागतें) तूं खरें बोललास त्या अर्थी मी तुला आश्रय देतों. *

ह्या एका उदाहरणावरुन पूर्वींच्या काळीं ब्राह्मणकुलांतील उत्पत्ति वगैरे गोष्टी किती क्षुल्लक समजत असत हें स्पष्ट होतें तथापि पुढील काळांतील न्यायशास्त्रादि ग्रंथांत ब्राह्मणांनींच वेद शिकवावा व वरच्या तीन वर्णांनींच फक्त वेदाध्ययन करावें ह्या गेष्टींचें पुन्हां पुन्हां समर्थन केलें आहे. उपनिषदांत मात्र असें पुष्कळ वेळां सांगितलें आहे कीं राजे व क्षत्रिय यांनां उत्तम प्रतीचें ज्ञान असून ब्राह्मण त्यांच्याकडें शिकण्याकरितां जात. ह्याला अनुसरूनच श्वेतकेतूचा बाप जो ब्राह्मण गौतम तो पारलौकिक ज्ञान संपादण्याकरितां प्रवाहण राजाकडे गेला. राजाला गौतमाच्या ह्या इच्छेबद्दल मोठें विचित्र वाटलें. कारण जें तत्त्व त्याला प्रतिपादन करुन सांगावयाचें होतें तें ब्राह्मणांनां मुळींच अवगत झालेलें नव्हतें; आणि म्हणूनच सर्व जगांत क्षत्रिय वर्णाचें वर्चस्व प्रस्थापित झालें होतें. शेवटीं तें तत्त्व राजानें त्याला सांगितलें. ज्या तत्त्वाचें स्पष्टीकरण ह्या ठिकाणींच प्रथमतः नीटपणें झालेलें दिसतें व ज्याचे आद्यप्रवर्तक क्षत्रिय असून जें पूर्वीं याज्ञिकांच्या ब्रह्मज्ञानांत नव्हतें * तेंच “आत्म्याचा पुनर्जन्म किंवा देहांतर” इत्यादि संबंधीचें तत्त्व होय. सर्वत्र एकस्वरूप अस्तित्त्वांत असणा-या आत्म्यासंबंधींचें उपनिषदांतील जें दुसरें प्रमुख तत्त्व, तेंहि अयाज्ञिक वर्गांतच उत्पन्न झालें हें दुस-या एका भागावरुन सिद्ध होतें. ह्या ठिकाणीं पांच महाविद्वान् ब्राह्मण महाप्रबुद्ध उद्दालक आरुणी ह्याचेकडे आत्म्यासंबंधींचें तत्त्व शिकण्याकरितां गेले होते. तथापि त्या महात्म्याला असें वाटलें कीं “हे महाविद्वान् पंडित लोक मला प्रश्न करतील आणि कदाचित् मला त्यांच्या सर्व प्रश्नांचीं उत्तरें देतां येणार नाहींत. ठीक आहे मी त्यांनां दुस-या कोणाकडे तरी लाऊन देतों” मग त्यानें त्यांस अश्वपति कैकेय राजाकडे जाण्यास सांगितलें व ते शिकण्यासाठीं त्याच्याकडे गेले. *

काहीं वर्ग आपल्या नीरस यज्ञशास्त्रांत प्रगति करीत असतां दुसरे वर्ग इतर उच्च प्रश्नांचा विचार करीत होते व हेच प्रश्न पुढें उपनिषदांत इतक्या सुंदर रीतीनें गोंवले गेले. ब्राह्मणवर्गापासून दूर अशा ह्या दुस-या वर्गांतूनच मोठे मोठे अरण्यावासी तपोनिधी असे ऋषी निघाले. ह्यांनीं जगाचा व त्यांतील सुखांचा त्याग केला एवढेंच नसून ब्राह्मणांच्या यज्ञयागादि विधींपासून हे अगदीं अलिप्त राहत असत. ह्याच वर्गांतून पुढें ब्राह्मणांच्या विरुद्ध असे दुसरे वर्ण (जाति) निघाले व ह्यापैकीं बौद्ध लोकांचा वर्ग पुढें एवढ्या प्रसिद्धीस आला. ह्या नवीन मतांचा व विशेषतः बौद्धसंप्रदायाचा एवढा प्रसार झाला ह्यावरूनच त्यावेळच्या तत्त्वज्ञान्यांनीं ह्या धर्माचें बीज अशा जागीं पेरलें कीं त्याला लागलीच अंकुर फुटले व यज्ञयागादींच्या विरुद्ध अशीं जी धर्मतत्त्वें होतीं त्यांस लोकांचाहि जबरदस्त आश्रय मिळाला. पुरातन कालापासून ब्राह्मण वर्गहि इतका चाणाक्ष होता कीं त्यांनीं ही नवीन लोकप्रवृत्ति आपणांस अनुकूल करुन घेण्याच्या कामीं मुळींच दुर्लक्ष केलें नाहीं. त्यांनीं चार आश्रमाच्या तत्त्वाचा पुरस्कार करून संन्यासवृत्ति वगैरे हीं ब्राह्मणाच्या धर्माचरणाचें एक अवश्य अंग करुन टाकिलीं. ह्या मताचें तत्त्व म्हटलें म्हणजे प्रत्येक आर्य मनुष्यानें किंवा वरच्या तीन वर्णांतील प्रत्येक मनुष्यानें आपल्या आयुष्यांत चार आश्रमांतून गेलेंच पाहिजे. पहिल्यानें ब्रह्मचारी म्हणून आपल्या गुरुजवळ राहून वेदाध्ययन करावें. अशा तर्‍हेनें विद्यार्जनाचा काल घालविल्यावर पुढें घर करुन गृहस्थ म्हणून प्रजोत्पादन करावें व देवतांच्या नांवानें यज्ञ वगैरे करुन हवि अर्पण करावे. बृद्धापकाल समीप आल्यानंतर त्यानें गृहादींचा त्याग करावा व वानप्रस्थ आश्रम स्वीकारून अरण्यांत यज्ञयागादि मित प्रमाणांत करुन त्यांतील गूढ तत्त्वें व विशिष्ट गुण ह्यांचें मनन करण्यांत काल घालवावा. अंतकाल समीप आला आहे असें पाहून यज्ञयाग, ध्यान वगैरे सोडून सर्व चांगल्या गोष्टींचा त्याग करावा व संन्यस्तवृत्तीनें जगाला मागें टाकून विश्वाचें आदितत्त्व ब्रह्म ह्याचेकडे वृत्ति लावावी व ब्रह्मप्राप्तीचा प्रयत्न करावा.

ब्राह्मणांमध्यें उच्च प्रतीच्या आयुष्यक्रमाचा द्योतक जो भाव आहे त्याच्या जोडीलाच ब्राह्मणांमध्यें “आरण्यकें” म्हणून कांहीं भाग आहेत. आरण्यकें म्हणजे वानप्रस्थाश्रमांत अरण्यवासी असतांना अध्ययन करण्याचे ग्रंथ. * ब्राह्मणवर्गाच्या शिक्षणांतील इतर विषयांशिवाय हेहि भाग त्यांस जोडलेले होते. ह्या आरण्यकांमधील मुख्य विषय म्हणजे यज्ञयागादि कृत्यें किंवा त्यांचें विधिवत् आचरण ह्यांचे नियम वगैरे नसून यज्ञाचीं मूलतत्त्वें, त्यांतील गूढार्थ व ब्राह्मणवर्गीय तत्त्वज्ञान हे होत.

अंशतः ‘यज्ञ’ याच नावानें व अंशतः यज्ञापासून अविभक्त असें पवित्र “ब्रह्म” यानावानें सर्व चराचराचें आद्य उत्पत्तिस्थान म्हणून गणलें जाणारें, आणि ब्राह्मणें आणि आरण्यकें ह्यांत सांपडणारें जें ‘आदितत्त्व’ त्याविषयींच्या तत्त्वज्ञानाला आणखी एका तत्त्वाची जोड मिळाली, हें तत्त्व म्हणजे सर्वांच्या ठायीं एकस्वरूपानें वास्तव्य करणारा अंतःस्थायी आत्मा ह्या संबंधींचें होय ह्याची उत्पत्ति यज्ञांचें तत्त्व ओळखणा-या यज्ञांस कंटाळलेल्या किंवा यज्ञाविरुद्ध वर्गांत झाली असावी व खरें पाहिलें तर हें यज्ञधर्माला प्रतिकूल दिसतें. हें जें अस्वाभाविक विचित्र संमिश्रण झालें त्याच्या पासूनच उपनिषदें निघालीं. परंतु चार आश्रमासंबंधीचें जें तत्त्व त्याच्या योगानें या उपनिषदांना वेदाचें अंग म्हणून समजण्यांत येऊं लागलें.

संन्याशांनीं शेवटच्या आश्रमांत अध्ययन करण्याचीं जीं कांहीं धर्मवाक्यें आहेत त्यांनांच अशंतः जोडलेलीं व आरण्यकांत अंशतः अंतर्भूत असलेलीं कांहीं प्राचीन उपनिषदें आपणांस आढळतात. पुष्कळ अंशीं ह्यांनांच वेदांत * अशी संज्ञा आहे. ह्यांतील पुष्कळ धर्मवाक्यें ब-याच नंतरच्या काळीं अस्तित्वांत आलीं व कालनुक्रमावरून तीं वेदकाळाच्या शेवटीं शेवटीं लिहिलीं गेलीं असावीं असें दिसतें. शिवाय आपण हें विसरतां कामा नये कीं, हें वेदकालीन वाङ्मय हस्त लिखित पुस्तकांतून ग्रथित केलेलें नसून केवळ ऋत्विजांच्या संप्रदायांत मुखद्वारें परंपरागत होतें. म्हणूनच प्राचीनांच्या पुस्तकांत किंवा ज्याला आपण ग्रंथ असें म्हणतों त्यांत आपणांस जें कांहीं आढळतें तें म्हणजे निरनिराळ्या अध्यापकवर्गाचे अध्यापनाचे विषय होत. हा एक विषय कांहीं ठराविक काळांत विद्यार्थ्यांनां शिकविला जात असे – अर्थात् गुरुगृहीं राहून विद्यार्जन करण्यास जो काळ लागे तो कित्येक वर्षांचा असे. – म्हणूनच समजण्यास कठीण असे जे विषय असत ते अर्थातच ह्या काळाच्या अगदीं शेवटीं शेवटीं शिकविले जात. हे विषय म्हटलें म्हणजे उपनिषदांतील व आरण्यकांतील गहन व दुर्गम अशीं तत्त्वज्ञानाचीं तत्त्वें होत. शिवाय वेदपठणांत पवित्र कृत्य व धार्मिक कर्तव्य ह्या दृष्टीनें हीं धर्मवाक्यें शेवटीं येत. नंतरच्या काळच्या तत्त्वज्ञांच्या मताप्रमाणें हीं उपनिषदांतील तत्त्वें म्हणजे वेदांचा “शेवटचा भाग” नसून वेदांचें “अंतिम ध्येय” होत. * आरण्यकें किंवा जुनीं उपनिषदें हीं वेदांत ह्या नात्यानें पुष्कळ वेदांच्या शाखांतून आढळतात. वास्तविक पाहिलें तर हीं ब्राह्मणांची अंशभूत अंगें होत.

पुढे वाचा:वेदप्रवेश-आरण्यकें व उपनिषदें

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .