प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

ह्याला अनुसरूनच ऋग्वेदांतील ऐतरेय ब्राह्मणांत ऐतरेय आरण्यक असून त्यांतच ऐतरेय उपनिषद् गोवलेलें आहे. ऋग्वेदांतील कौषीतकी ब्राह्मणाच्या शेवटीं कौषीतकी आरण्यक असून कौषीतकी उपनिषद् हा त्याचा एक भाग आहे. कृष्णयजुर्वेदांत तैत्तिरीय ब्राह्मणाच्यापुढें तैत्तिरीय आरण्यक असून त्याचे शेवटीं तैत्तिरीय उपनिषद् व महानारायण उपनिषद् हीं आहेत. शुक्लयजुर्वेदाचा मोठा भाग जो शतपथ ब्राह्मण त्यांतील चौदाव्या काण्डाचा पहिला एक तृतीयांश भाग आरण्यक असून ह्या काण्डाचा शेवटचा भाग सर्व उपनिषदांत श्रेष्ठ असें बृहदारण्यक उपनिषद् होय. सामवेदाच्या बहुधा ताण्डयमहाब्राह्मणांत छांदोग्य उपनिषद् आहे व ह्याचा पहिला भाग म्हणजें केवळ एक आरण्यकच आहे. जैमिनीय उपनिषद् ब्राह्मण * म्हणून जें आहे तें सामवेदांतील जैमिनीय किंवा तलवकार पंथाचें एक आरण्यकच असून त्याच्याच दुस-या भागाला केन उपनिषद् किंवा तलवकार उपनिषद् असें म्हणतात.

तैत्तिरीय आरण्यकाला मागाहून जोडलेलें महानारायण उपनिषद् खेरीज करुन वर सांगितलेलीं सर्व उपनिषदें हीं ह्या जातीच्या ग्रंथांत जुन्यांत जुनीं आहेत. ज्या ब्राह्मणांशीं ती संलग्न आहेत किंवा ज्यांचीं तीं अगें आहेत त्यांच्या व ह्यांच्या भाषापद्धतींत भेद नाहीं. या ग्रंथांची भाषा जरा ओबडधोबड गद्य असून सौंदर्य़ाचीहि ह्यांत – विशेषतः कथाभागांत-मुळींच उणीव नाहीं. अर्धें केन उपनिषद् फक्त वृत्तबंध असून वर निर्दिष्ट केलेल्या उपनिषदांत हें अगदीं अखेरचें आहे. डॉयसेन * ह्याचे म्हणण्याप्रमाणें ह्या मोठमोठ्या उपनिषदांपैकीं प्रत्येकांत जुनीं व नवीं वाक्यें एकत्र आढळत असल्यामुळें प्रत्येक भाग केव्हां लिहिला गेला हें निरनिराळ्या रीतीनें शोधून काढिलें पाहिजे. परंतु एकंदरींत पहातां कालानुक्रमाप्रमाणें एकामागून एक येणारे चार काळ आपणांस स्पष्ट ओळखतां येण्यासारखे आहेत, व ह्या निरनिराळ्या काळांत लिहिलीं गेलेलीं उपनिषदें प्रत्येकीं अमुक काळांत झालीं असें म्हणण्यास कांहीं बाधा नाहीं. आतांपर्यंत सांगितलेलीं उपनिषदें हीं पहिल्या आणि प्राचीन काळांतलीं होत व डॉयसेनच्या मताप्रमाणें त्यांचा कालमानाप्रमाणें अनुक्रम खालीं लिहिल्याप्रमाणें आहे.

१ बृहदारण्यक उपनिषद्.
२ छांदोग्य उपनिषद्.
३ तैत्तिरीय उपनिषद्.
४ ऐतरेय उपनिषद्.
५ कौषीतकी उपनिषद्.
६ केन उपनिषद्,

ह्या प्राचीन उपनिषदांशीं संलग्न असे दुसरे लेखसंग्रह आहेत. हेहि कांहीं विवक्षित वैदिक पंथाचे आहेत अशी परंपरा आहे. तथापि त्या त्या पथांशीं ह्यांचा फार दूरचा संबंध असल्यामुळें ह्या विधानाबद्दल शंका घेण्याला जागा आहे असें काहींचें मत आहे. हीं उपनिषदें वृत्तबद्ध असून ह्यांत आरण्यकांतील यज्ञादिकांचीं गहन तत्त्वें मुळींच नाहींत. हीं नंतरच्या काळीं लिहिलीं गेलीं आहेत. डॉयसेन ह्यानें मानलेल्या कालानुक्रमाप्रमाणें हीं खालीं लिहिल्याप्रमाणें आहेत.

७ काठक उपनिषद्, हें कृष्णयजुर्वेदांत आहे.

८ ईश उपनिषद्, हें शुक्लयजुर्वेदाचा भाग आहे कारण हें वाजसनेयी संहितेंत आलेलें आहे.

९ श्वेताश्वतर उपनिषद्, हें कृष्णयजुर्वेदाचा भाग आहे असें म्हणतात.

१० मुण्डक उपनिषद् हें अथर्ववेदांतील आहे.

११ महानारायण उपनिषद् हें कृष्णयजुर्वेदांत आहे (तैत्तिरीय आरण्यक).

ह्याच्यापुढें उपनिषदांचा एक तिसरा वर्ग असून ह्यांतील सर्व गद्यांत लिहिलेलीं आहेत. हीं उपनिषदेंहि कांहीं विवक्षित वैदिक शाखांच्या लोकांनीं तयार केलीं असें समजतात तथापि भाषा, रचना व विषय ह्यावरून पहातां हीं नंतरच्या काळीं रचिलीं गेलीं असावीसें दिसतें. हीं खालीं दिल्याप्रमाणें आहेतः-.

१२. प्रश्नोपनिषद् हें अथर्ववेदांत आहे.

१३. मैत्रायणीयोपनिषद् हें कृष्णयजुर्वेदांत आहे.

१४. माण्डूक्योपनिषद् हें अथर्ववेदांत आहे.

हीं चौदा उपनिषदें जरी निरनिराळ्या काळीं झालेलीं आहेत तरी तीं उपनिषदीय वाङ्मयाच्या अभिवृद्धीचा प्रथम उपक्रम होत. हिंदुस्थानच्या प्राचीन तत्त्वज्ञानाचें नांव निघालें म्हणजे प्रथमतः हींच आपल्या डोळ्यांसमोर उभीं राहतात व अबाधित नियम म्हणून ह्यांचीच जास्त ख्याति आहे. खरीं वेदान्ततत्त्वें म्हणून जीं आहेत तीं जशींच्या तशींच ह्या उपनिषदांतून सांपडतात.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .