प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ७ वें.
वेदप्रवेश-आरण्यकें व उपनिषदें.

“अथर्ववेदीय उपनिषदें.”– उपनिषदांचा आणखीहि एक चवथा वर्ग आहे. परंतु वर सांगितलेल्या तीन वर्गांतील उपनिषदांचाच वैदिक शाखांशीं किती संबंध आहे हीच गोष्ट कित्येक संशोधकांस संशयित वाटत आहे. ह्या नवीन वर्गांत जीं पुष्कळशीं उपनिषदें आहेत त्यांचा वैदिक पंथाशीं कांहीं संबंध नसेलसें वाटतें. वेदांचा आणि नंतरचीं उपनिषदें ह्यांचा कांहींच संबंध नसावा. भारतीयांच्या परंपरेप्रमाणें हीं सर्व उपनिषदें अथर्ववेदाचीं आहेत. वास्तविक पाहतां अथर्ववेदाचीं उपनिषदें ह्या नांवाखालीं मोडणा-या ह्या उपनिषदांत वेदाच्या बाहेरील व पुष्कळ पुढील काळच्या निरनिराळ्या तत्त्वज्ञांचीं व निरनिराळ्या पंथांचीं मतें व विचार दृष्टोत्पत्तीस येतात. हीं अथर्ववेदांतील आहेत अशी समजूत होण्याचें कारण इतकेंच कीं, अथर्ववेद श्रौतधर्माबाहेरील विषयांचा संग्रह असल्यामुळें जें जें रूढशास्त्रसंमत विशिष्ट गोष्टींनां धरून नव्हतें तें तें सर्व अथर्ववेदांतील आहे असें म्हणण्याचा परिपाठ पडला. शिवाय वर सांगितल्याप्रमाणें अथर्ववेद हा मंत्रतंत्र आणि अभिचार ह्यांचा वेद होय. उपनिषदाचा खरा अर्थ गुप्ततत्त्वें असा असून हा अर्थ अबाधित आहे. अथर्ववेद म्हणजेच गूढ तत्त्वांचा संग्रह असें असल्यामुळें उपनिषदें किंवा गूढ तत्त्वें ह्या नांवाचे जे जे अनेक ग्रंथ निर्माण झाले ते ते सर्व अथर्ववेदाला जोडले गेले हें अगदीं साहजिक दिसतें. *

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .