प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ७ वें.
वेदप्रवेश-आरण्यकें व उपनिषदें.

नैराश्यवादः- प्राचीन वैदिक उपनिषदांत जग असत् व मिथ्या आहे असें तत्त्व प्रथम प्रतिपादलेलें आहे. नैराश्यवादाचा प्रारंभ प्रथम उपनिषदांत झाला आहे. ब्रह्मच फक्त सत् आहे. यासच आत्मा किंवा परमात्मा असें म्हणतात. हा आत्मा क्षुतपिपासा, आधिव्याधी, जरामृत्यु, यांपासून अलिप्त आहे. परमात्म्याशिवाय दुसरें सर्व दुःखमूलक आहे. (अतोअन्यदार्तम्). * ब्रह्माशिवाय दुसरें कांहींहि सत् नाहीं म्हणून संसारव्याधी सुद्धा सत् नाहींत. ज्यास परमात्मा एकच आहे असें ज्ञान प्राप्त झालें आहे त्यास भय नाहीं व दुःख नाहीं. ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालें आहे त्याला भीति नाहीं. एकत्वाचा साक्षात्कार झालेल्यास मोह व शोक कोठून राहणार ? ब्रह्मासच “आनंद” म्हणतात. परमात्मा आनंदमय आहे. उपनिषदांतील वाक्यें प्रवृत्तिमार्गाच्या विजयवाक्यांप्रमाणें गर्जत आहेत. ब्रह्म आनंद आहे. कारण आनंदापासून प्राणिमात्र उत्पन्न झाले व उत्पन्न झाल्यानंतर ते “आनंदांतच” राहतात व नाश पावल्यानंतर आनंदमयच होऊन जातात. *

उपनिषदांतील हीं तत्त्वें नैराश्यवादात्मक नाहींत. पण जग मिथ्या आहे ह्या कल्पनेची पहिली पायरी उपनिषदांत आहे. या तत्त्वापासूनच पुढें हलके हलके जगाचा तिरस्कार उत्पन्न झाला. जों. जों ब्रह्मानंदाचें महत्त्व जास्त जास्त वर्णिलें गेलें तों तों संसारजीवित असार आहे, व्यर्थ आहे, अशी कल्पना वाढत गेली. * याप्रमाणें अर्वाचीन भारतीय तत्त्वशास्त्रांतील नैराश्यात्मक विचारांचा मूळारंभ उपनिषदांत झालेला आहे.

वास्तविक सर्वच अर्वाचीन भारतीय तत्त्वशास्त्रांचा उगम उपनिषदांपासून झालेला आहे. बादरायणाचीं वेदांतसूत्रें * उपनिषदांवरूनच लिहिलीं गेलीं. या ग्रंथाविषयीं एका अर्वाचीन ग्रंथकाराचें मत असें आहे कीं, सर्व वेदांतग्रंथांत बादरायण सूत्रग्रंथ प्रमुख आहे. इतर सर्व ग्रंथ त्याच्या परिपूरणार्थ लिहिले आहेत. मोक्षाची इच्छा करणा-यानें याचा गौरव करावा. या सूत्रांवरून रामानुज व शंकराचार्य यांनीं ब्रह्मतत्त्वें प्रतिपादिलीं. या आचार्यांचे अजून लक्षावधि अनुयायी आहेत. पुढील सर्व शतकांतील आध्यात्मिक तत्त्वज्ञान उपनिषदांवरुन लिहिलें गेलें. पुष्कळ पाखंडांनीं उपनिषदांतील विचार घेतले आहेत. बौद्धांचा धम्महि पुष्कळसा उपनिषद्ग्रंथांत व्यक्त झालेल्या कल्पनांवरुन तयार झाला. उपनिषदें ईश्वरनिर्मित आहेत या कल्पनेनें कांहीं त्यांजकडे लोकांचें मन इतकें आकर्षित झालें नाहीं तर त्यांतील भाषेची ह्रदयंगम व प्रबुद्ध मोडणी फारच सुंदर आहे व तिच्यामुळेंच लोकांचीं मनें फार आकर्षित झालीं. या विधानास इतकें प्रमाण पुरे आहे कीं, ईश्वरनिर्मित ही समजूत उपनिषदांप्रमाणें साधीं वेदसूक्तें व गचाळ ब्राह्मणभाग यांजसंबंधानेंहि होती. परंतु त्यांजकडे उपनिषदांइतकें लोकांचें चित्त वेधलें गेलें नाहीं. असो.

शोपनहावर म्हणतो, उपनिषदांत मानवी ज्ञानाचें व बुद्धीचें उच्चतम फल व मनुष्याच्या शक्तीच्या बाहेरच्या दैविक कल्पना आल्या असल्यामुळें या ग्रंथकारांची गणना मानवजातींत क्वचितच करतां येईल. * उपनिषदांनां हजारों वर्षे झालीं व अजूनहि आपणांस शास्त्रज्ञांच्या कल्पनांशीं उपनिषदांतील कल्पना अविरुद्ध वाटतात. डॉयसेनच्या मताप्रमाणें उपनिषद्ग्रंथकारांस शास्त्रदृष्टया पद्धतशीर रीतीनें जरी ‘जीवनरहस्य’ कळलें नाहीं तरी त्यांचें त्या विषयाशीं तादात्म्य झाल्यामुळें त्यांनीं त्या विषयावर लख्ख प्रकाश पाडला. वेदग्रंथ ईश्वरनिर्मित आहेत ही प्राचीन भारतीय कल्पना सयुक्तिक आहे असें वेदांतील ज्ञानकांडानें दाखविलें. उपनिषदांत जगांत कोठेंहि न सांपडणारें असें तत्त्वज्ञान आहे. * या वरील गोष्टींमुळेंच उपनिषद्ग्रंथांचें महत्त्व आहे असें नाहीं, तर सत्यज्ञान मिळविण्याचा केलेला भगीरथ प्रयत्न व तत्त्वज्ञान संपादन करतांना निघालेले हृदयंगम ओजस्वी विचार या योगानें त्या ग्रंथांनां फार महत्त्व प्राप्त झालें. उपनिषदांत ईश्वरविषयक थोतांडी आणि ईश्वराच्याच नांवावर लादलेल्या कल्पना नाहींत, तर सत्याजवळजवळ जाण्याकरितां केलेला केवळ निकराचा मानवी प्रयत्न आहे. म्हणूनच यांचें महत्त्व आपणांस जास्त आहे.

एकंदर मानवी विचारांच्या इतिहासकारास उपनिषद्ग्रंथ फार महत्त्वाचें आहेत. उपनिषदांतील गुह्य तत्त्वांचा एक प्रवाह इराण देशांतील सुफीसंप्रदायामध्यें तसाच ग्रीसमधील निओप्लेटोनिक तत्त्ववेत्त्यांच्या स्फूर्तितत्त्वांत, अलेक्झांडरच्या वेळच्या ख्रिस्ती लोकांपासून तों इकर्त व टौलर यांच्या गुह्यतत्त्वांत व तसाच १९ व्या शतकांतील शोपनहावर नांवाच्या जर्मनतत्त्ववेत्त्यानें प्रतिपादिलेल्या तत्त्वांत गेलेला दिसतो. भारतीय लोकांचें जर्मन लोक किती ऋणी आहेत हें वारंवार शोपनहावरनें सांगितलें आहे. प्लेटो, कँट व वेद (शोपनहावर उपनिषदांस कधीं कधीं वेद म्हणत असे.) माझे गुरु आहेत असें शोपनहावर म्हणत असे. विश्वविद्यालयांत व्याख्यान देण्याकरितां लिहिलेल्या एका लेखांत शोपनहावरनें म्हटलें आहे कीं, “वेदामध्यें सांगितलेली जीवनरहस्याची अतिप्राचीन कल्पना व आज तुमचेपुढें मांडण्यास तयार केलेली माझी कल्पना या जवळ जवळ सारख्याच आहेत.”  “या शतकांतील सर्वांत मोठी देणगी म्हणजे संस्कृत वाङ्मयांचें पुनरज्जीवन होय” असें शोपनहावरचें म्हणणें असे. पाश्चात्त्य देशांत भारतीय एकेश्वरवादाचें तत्त्व चोहोंकडे लोकप्रिय होईल असें शोपनहावरचें भविष्य आहे. शोपनहावरास उपनिषदग्रंथांतील तत्त्वें व त्यानें शोधून काढलेलीं तत्त्वें हीं एकच आहेत याचें राहून राहून आश्चर्य वाटे. निश्चित मत उपनिषदांत कांहीं नसलें तरी निरनिराळीं उपनिषदांतील वाक्यें एकेका विषयावरील ठाम बनवलेलीं मतें आहेत असें त्यासं वाटे. तो नेहमीं आपल्या मेजावर ठेवलेल्या उपनिषद्ग्रंथांचें वाचन करी व निजतेवेळीं त्यांतील वाक्यें म्हणे. तो म्हणतो “सर्व जगामध्यें वाचनीय ग्रंथ म्हटले तर तीं उपनिषदें होत. माझ्या जीवाची शांति व मरतेसमयींची शांति या ग्रंथांत आहे.” * अज्ञानदोषदर्शन व एकत्त्वत्त्वाचा अपरंपार विचार हें शोपनहावरच्या मतें उपनिषद्ग्रंथांचें प्रमुख कार्य आहे.

परमेश्वरविषयक एकत्ववाद म्हणजे सर्व दृश्य विविधता असत् आहे व परमात्म्याचे नाना तर्‍हेचे कितीहि असंख्य दृश्य विभाग झाले तरी सर्व भूतलांत एकच परमेश्वर भरलेला आहे हें तत्त्व होय. * आधुनिक ईश्वरवाद्यांच्या तत्त्वज्ञानांत एकत्व म्हणजे ईश्वर एकच आहे असें मानिलें आहे. विश्वांतील सर्व गोष्टींचें एकत्वहि आधुनिक तत्त्वज्ञानानें मानलें आहे.’  प्राची * न भारतीय लोकांच्या तत्त्वज्ञानानें तीन हजार वर्षांपूर्वीच हा आधुनिक पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा पल्ला गांठला होता.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .