प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ७ वें.
वेदप्रवेश-आरण्यकें व उपनिषदें.

उपनिषद् शब्दाची व्युत्पत्ति.- उपनिषद् हा शब्द उप+नि+सद् म्हणजे कोणाच्याजवळ बसणें ह्या धातूपासून निघाला आहे. * ह्याचा मूळ अर्थ गूढज्ञानाची शिक्षा घेण्यासाठीं छात्रानें अध्यापकाच्या अगदीं निकट बसणें हा होय. म्हणून एकांत बैठक किंवा गुप्तबैठक असा अर्थ झाला. ह्या गुप्तबैठकीच्या कल्पनेवरूनच अशा गुप्त ठिकाणीं शिकविलेलीं गुप्ततत्त्वें अशी कल्पना वृद्धिंगत झाली. भारतीयांच्या परंपरेप्रमाणें उपनिषद् हा शब्द (रहस्यम्) ह्या शब्दाशीं समानार्थक आहे व ह्याचा अर्थ गुप्तगोष्ट असा आहे. उपनिषदांच्या ग्रंथांतूनहि “इति रहस्यम्” व “इति उपनिषद्” हे शब्द ठिकठिकाणीं उपयोगांत आल्याचें आढळतें. पुष्कळ वेळां उपनिषदांतून हीं तत्त्वें अयोग्य मनुष्याला शिकवूं नयेत इत्यादि अर्थाची सूचनाहि दिलेली आहे. असें म्हटलें आहे कीं, “हीं ब्रह्मतत्त्वें बापानें आपल्या वडील मुलास किंवा विश्वासू विद्यार्थ्यांस शिकवावीं, दुस-या कोणी नानारत्ना  व जलपरिवेष्टिता वसुंधरा जरी अर्पण केली तरी त्यास शिकवूं नयेत” * उपनिषदांत पुष्कळ वेळां असेंहि सांगितलेलें आहे कीं, आचार्यास कोणतीहि विद्या शिकविण्याची विनंति केली असतां विद्यार्थ्यानें पुष्कळ आर्जव केल्यावरच आचार्यानें त्यास आपलीं तत्त्वें शिकविलीं आहेत.

* “उपनिषद्” शब्दाच्या ह्या जुन्या अर्थाला अनुसरून जुन्या उपनिषदांत पुष्कळ भिन्नजातीय गोष्टी आढळतात. शिवाय उपनिषदें म्हणजे गहन ज्ञान असल्यामुळें जीं तत्त्वें सर्वसाधारण लोकांस शिकविण्यासारखीं नसत तीं कांहीं विशिष्ट अधिकाराच्या लोकांस शिकविलीं जात असून त्यांसहि उपनिषदें असें म्हणत; मग हीं तत्त्वें म्हणजे एखादा गहन सिद्धान्त असो, किंवा एखादा निरुपयोगी मंत्र असो, किंवा एखादें अभिचारविषयक गूढ रहस्य असो, अथवा एखादा अभिचारमंत्र असो या सर्वांस उपनिषद् असें म्हणत.

हें सर्व आपणांस जुन्या उपनिषदांतून एकाच ठिकाणीं संमिश्रित झालेलें आढळून येतें व ही गोष्ट अथर्ववेदीय उपनिषदांत तर विशेषतः प्रत्ययास येते. शृंगारावरील ग्रंथांत संभोगरंगरागादि संबंधी सर्वप्रकारच्या वनस्पतींची माहितीहि उपनिषद् म्हणून दिली आहे.

 कौषीतकी उपनिषदांत मानसशास्त्र, आध्यात्मिक शास्त्र किंवा परलोकविषयक शास्त्र ह्यांचे   सिद्धान्त असून शिवाय ज्या विधींनीं चांगली गति मिळते किंवा एखादा प्रेममंत्र टाकतां येतो त्या विधींचीं वर्णनें, बालपणीं येणारा मृत्यु टाळण्याकरितां विधी वगैरे असून शिवाय एक उपनिषद् किंवा “गूढविद्या” आहे. त्यांत शत्रूचा नाश करण्याचें मंत्रतंत्रादि दिलेले आहेत. त्याचप्रमाणें छांदोग्य उपनिषदांतहि अशाच गोष्टी दिलेल्या आहेत, त्यांत जगदुत्पत्तीसंबंधीं गहन तत्त्वज्ञान, विश्व व आत्मा, “ओम्” ह्या अक्षरांतील गूढ ज्ञान व रोगहारक गुप्त विधी वगैरे येतात. अथर्ववेदीय उपनिषदांत गारुड उपनिषद् * नांवाचें एक उपनिषद् आहे, ह्यांत सर्पासंबंधीं मंत्र वगैरे असून ह्याला अथर्ववेदसंहितेंत घातलें तरी चालेल.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .