प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ७ वें.
वेदप्रवेश-आरण्यकें व उपनिषदें.

उपनिषदीय तत्त्वज्ञानः- ‘उपनिषदांतील तत्त्वज्ञान’ किंवा उपनिषत्संग्रह असें म्हटलें म्हणजे एका विशिष्ट संप्रदायाचीं मतें अशी कल्पना होणें शक्य आहे, पण तशी गोष्ट नाहीं. उपनिषदीय तत्त्वज्ञानपद्धति ह्याचा फार कोता व परिमित अर्थ आहे. कारण उपनिषदांत उपलब्ध असलेलीं मतें किंवा विचार हीं एकाच तत्त्वज्ञाचीं किंवा एकाच आचार्यापासून निघालेल्या तत्त्वज्ञांच्या पंथाचीं नसून उपनिषदाच्या कांहीं भागांतील तत्त्वज्ञान म्हणजे निरनिराळ्या लोकांचें निरनिराळ्या काळचें पण आज एक   दिसणा-या संग्रहांतलें व कांहीं अंशीं सदृश असें ज्ञान होय.

उपनिषदांतील ठळक तत्त्वांत एकसूत्रीपणा दिसण्याला कारणीभूत झालेलीं कांहीं मूलतत्त्वें आहेत व डॉयसेनच्या मताप्रमाणें केवळ ह्यांनां उद्देशूनच व तेंहि मितप्रमाणानें, आपणांस “उपनिषदीय तत्त्वज्ञानपद्धति” असें म्हणतां येईल. म्हणून उपनिषदांतील प्रत्येक भागांत आपल्याला गहन ज्ञान मिळेल, किंवा प्रत्येक उपनिषदांत प्लेटोच्या संप्रदायाप्रमाणें विचारपरिपूर्ण संभाषणें आपणांस आढळतील असें मुळींच नाहीं. उपनिषदांतील कांहीं जुन्या व सुंदर भागांतून मोठमोठ्या ग्रीक तत्त्ववेत्त्यांच्या ग्रंथांतील संवादासारखे संवादहि आढळून येतात. ज्याप्रमाणें प्लेटोच्या संवादावरून आपणांस प्राचीन ग्रीक लोकांच्या जीवनक्रमाची बरोबर कल्पना होते त्याप्रमाणें जुन्या उपनिषदांवरून प्राचीन काळांतील हिंदुस्थानच्या राजे लोकांच्या दरबारांतील कार्यक्रमाचें आपणांस फारच उत्तम ज्ञान होतें. ह्या दरबारांत ब्राह्मण, सदा फिरत राहणारे अध्यापक, व विदुषी स्त्रिया पुष्कळ येत. ह्यांनीं राजाचे समोर वादविवाद करण्यासाठीं यावें व राजानें ह्यांच्याशीं तत्त्वज्ञानात्मक व धर्मशास्त्रविषयक संभाषण करुन आपल्या ज्ञानानें विद्वान् ब्राह्मणांसहि गोंधळून टाकावें असे प्रकार वर्णिले आहेत. एखाद्या प्रसिद्ध आचार्याचीं प्रवचनें ऐकण्याकरितां नाना देशांतून लांब लांब प्रवास करणारे छात्रगण येत. उपनिषदांत येणेंप्रमाणें ह्या वेळची अध्ययनपद्धति अंशेंकरून व्यक्त होते * . परंतु ह्या गहन तत्त्वज्ञानाचे कांहीं भाग व प्लेटोच्या संभाषणाशीं समान असे कांहीं भाग वगळले तर उपनिषदांत असा पुष्कळ भाग आढळून येईल कीं तत्त्वज्ञान किंवा वाङ्मय ह्या नात्यानें तो बराच कमी दर्जाचा आहे.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .