प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ७ वें.
वेदप्रवेश-आरण्यकें व उपनिषदें.

ब्रह्मः- उपनिषदांत ब्रह्म व आत्मा यांविषयींच्या दोन कल्पनांचा सविस्तर विचार केलेला आहे, उपनिषदांतील तत्त्वज्ञान  समजून घेण्यासाठीं या दोन कल्पना पूर्णपणें समजून घेतल्या पाहिजेत. ‘ब्रह्मन्’ या शब्दाची व्युत्पत्ति वादग्रस्त आहे. “जीवात्म्याची पूर्णता दर्शविणारी व ईश्वरसन्निध जाऊं इच्छिणारी जी निष्ठा” त्या निष्टेस पिटर्सबर्गच्या संस्कृत शब्दकोशांत ब्रह्मन् असें म्हटलें आहे. “पवित्र व दैविक अशी उच्चवस्तु मिळविण्यासाठीं धडपड करणारी मानवी इच्छा” असा ‘ब्रह्मन्’ या शब्दाचा अर्थ डॉयसेन * यानें केला आहे. आजच्या सुधारलेल्या जगाच्या देवाविषयींच्या कल्पनांशीं जुळणारीं अशीं हीं उपनिषदांवर रचलेलीं पाश्चात्त्य स्पष्टीकरणें आहेत. परंतु संहिता व ब्राह्मण या ग्रंथांमध्यें देव व मानव यांच्या संबंधाची जी प्राचीन कल्पना दिलेली आहे त्या कल्पनेहून हीं स्पष्टीकरणें भिन्न् आहेत. ‘ब्रह्म’ या शब्दाची व्युत्पत्ति बरोबर माहित नाहीं. ‘प्रार्थना गाणें किंवा मात्रिक नियम’ या अर्थानें ‘ब्रह्मन्’ हा शब्द अगणित वेळां आलेला आहे; देवांपासूनच कांहीं तरी प्राप्त करुन घेण्यासाठीं त्यांच्यावर वर्चस्व मिळविण्याच्या इच्छेनें किंवा कांहीं तरी देण्याचें त्यांनां भाग पाडण्याच्या इच्छेनें उच्चारिलेलीं सूक्तें किंवा ऋचा या अर्थानें ब्रह्मन् हा शब्द नेहमीं वापरलेला आहे. कालांतरानें तीन वेदांमध्यें जेव्हां या मांत्रिक नियमांचा व प्रार्थनांचा समावेश करण्यांत आला, तेव्हां यांना ‘त्रयी विद्या’ किंवा थोडक्यांत ‘ब्रह्मन्’ असेंहि म्हणूं लागले. वेद किंवा ब्रह्मन् हे दोन्ही शब्द अगदीं एकाच अर्थानेंहि वापरलेले आहेत. यांची ईश्वरापासून उत्पत्ति झालेली आहे अशी कल्पना असल्यामुळें, व भारतीयांच्या कल्पनेप्रमाणें, दैविक शक्ति असलेल्या यज्ञाची उत्पत्ति वेदापासून झाल्यामुळें, किंवा वेदामध्यें त्याचा अन्तर्भाव * होत असल्यामुळें, ‘ब्रह्मन्’ या शब्दाचा अर्थ अखेरीस ‘ईश्वराची उक्ति’ किंवा पवित्र ज्ञान असा होऊं लागला. कारण ब्रह्मदेवाची उत्पत्ति सर्वांत अगोदरची (ब्रह्म प्रथमजम्) असून शेवटीं त्याच्याच योगानें सर्वांची उत्पत्ति व्हावयांची होती. ‘ब्रह्मन्’ हें ईश्वरी आदितत्त्व ब्रह्म स्वयंभु आहे ही पुरोहितांच्या तत्त्वज्ञानाची कल्पना असून प्रार्थना व यज्ञविषयक * अशा ज्या ब्राह्मणांच्या कल्पना आहेत त्या कल्पनांशीं ही कल्पना जुळविण्यांत आली आहे.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .