प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ७ वें.
वेदप्रवेश-आरण्यकें व उपनिषदें.

आत्माः- ‘आत्मन्’ या शब्दाचा इतिहास यापेक्षांहि साधा आहे; याचीहि उत्पत्ति अनिश्चित आहे. ‘अन्’ (श्वासोच्छ्वास करणें) या धातूपासून हा शब्द निघाला असून, “उच्छ्वास, श्वास, आत्मा” वगैरे त्या शब्दाचा अर्थ आहे असें कांहीं लोकांचें मत आहे.

‘आत्मन्’ हा शब्द दोन सर्वनामविषयक धातूंपासून निघाला असून त्याचा मूळ अर्थ ‘हा मीं’ असा आहे असें डॉयसेन * वगैरे लोकांचें मत आहे. लोकांचें मत कांहींहि असो, ‘आत्मन्’ या शब्दावरुन केवळ तत्त्वज्ञानविषयक कल्पनेचा बोध होत नसून, तो शब्द संस्कृतमध्यें नेहमीं येणारा असून त्याचा अर्थहि अगदीं स्पष्ट आहे. त्याचा अर्थ ‘स्वत्व’ असा होतो; अनेक वेळां कर्तृवाचक सर्वनामासारखा याचा उपयोग करण्यांत येतो, जेव्हां नामासारखा याचा उपयोग करण्यांत येतो, तेव्हां देहापासून व्यक्तींचें अस्तित्व पृथक् मानून तें अस्तित्तव व्यक्त करण्यासाठीं हा शब्द वापरण्यांत येतो.

उपनिषदांतील तत्त्वज्ञानांत, ब्रह्मन् व आत्मन् या दोन कल्पनांचा मिलाफ केलेला आहे. “हें सर्व ब्रह्म आहे” असा शांडिल्याच्या प्रसिद्ध उक्तीचा प्रारंभ असून, तिच्या शेवटीं आत्म्याचें वर्णन असून, ब्रह्म व आत्मा हे एक असल्याचें सांगितलें आहे. “माझ्या ह्रदयांतील हा माझा आत्मा तण्डुलकणापेक्षां, यवाच्या दाण्यापेक्षां किंवा मोहरी वगैरेपेक्षांहि सूक्ष्म आहे. * परंतु, हा माझा आत्मा पृथ्वीपेक्षां, वातावरणापेक्षां, आकाशापेक्षां व सर्व ग्रहांपेक्षांहि मोठा आहे. सर्व कृत्यें, इच्छा, सुगंध व अभिरुचि त्याच्या ठिकाणीं वास करितात; या सर्वांनां त्यानें आपल्या ठिकाणीं कोंडून ठेविलें आहे. तो बोलत नाहीं व त्याला कशाचीहि अपेक्षा नाहीं. माझ्या हृदयांतील आत्मा म्हणजेच ब्रह्म होय. या जीवितापासून आत्म्याची जेव्हां ताटातूट होईल तेव्हां मीं त्याच्याशीं मिसळून जाईन. त्याला अशा प्रकारचें ज्ञान प्राप्त झालें आहे, यांत संशयं नाहीं.” अशा प्राकरची शांडिल्याची उक्ति होती. *

उपनिषदांतील ही मुख्य कल्पना, थोडक्यांत चमत्कारिकपणानें डॉयसेन खालील शब्दांत व्यक्त करितोः- “जो सर्व प्राण्यांच्या देहांत वास करितो, जो सर्व प्राण्यांनां उत्पन्न करुन त्यांचें पालनपोषण करुन आपल्यामध्यें जो विलीन होण्यास लावितो तो अनाद्यनन्त, व दैविक ब्रह्मदेव, व बाह्य वस्तूंचा त्याग करणारा व जो आमच्या हृदयांतील खरा प्राण * आहे तो आत्मा हे दोन्ही एकच आहेत.” हें तत्त्व उपनिषदामध्यें फार सुज्ञपणें व स्पष्टपणें व्यक्त केलें आहे. ‘तत्त्वमसि’ म्हणजे अखिल विश्व व ब्रह्म हीं दोन्ही तूंच आहेस; किंवा जगाची जोंपर्यंत तुला जाणीव आहे तोंपर्यंत जग अस्तित्वांत राहील या वाक्यानें लाखों भारतीय आपले आध्यात्मिक विचार प्रकट करिंत असत; या वाक्याचा शोपेनहावरनें अनेक वेळां उल्लेख केला आहे. विश्व व ब्रह्म, ब्रह्म व आत्मा * हे एक आहेत ही कल्पना तत्त्वज्ञानी कवींनीं कशी विशद करुन सांगितली आहे तें पाहूं.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .