प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ७ वें.
वेदप्रवेश-आरण्यकें व उपनिषदें.

आत्म्याचें सर्वव्यापित्वः-“श्वेतकेतु हा उद्दालक आरुणीचा पुत्र होता. एखाद्या गुरुजवळ वेदांत शिकण्यासाठीं तूं जा कारण वेद शिकल्याशिवाय ‘ब्राह्मण’ हें नांवहि धारण न करण्याची आपल्या कुलामध्यें चाल आहे.” असें श्वेतकेतूस त्याच्या पित्यानें सांगितलें; अशा प्रकारें शिष्य या नात्यानें तो आपल्या वयाच्या बाराव्या वर्षी एका गुरुजवळ गेला व वयाच्या चाळिसाव्या वर्षीं वेदांतील सर्व गोष्टी शिकून तो परत आला; परंतु तो गर्विष्ठ व हट्टी बनून आपल्याला मोठा विद्वान् समजूं लागला. नंतर त्याचा पिता त्यास म्हणाला, “हे श्वेतकेतु, तूं गर्विष्ठ व हट्टी असून आपल्या विद्वत्तेची तुला घमेंड आहे, तर ज्या तत्त्वाच्या योगानें जें अश्रुत असतें ते श्रुत होतें, ज्याची पूर्वी कल्पना नसते त्याची कल्पना येते व जे आपल्याला अवगत नसते तें अवगत होतें, त्या तत्त्वाची तूं चवकशी केली आहेस किंवा नाहीं तें मला सांग, या तत्त्वाचें स्वरुप कोणत्या प्रकारचें आहे । ज्याप्रमाणें मातीच्या एका गोळ्यावरुन सर्व प्रकारच्या मातीच्या वस्तूंची कल्पना होते, नांवें निराळीं असलीं तरी ती सर्व मातीच असते, व ज्याप्रमाणें एका तांब्याच्या वस्तूवरुन तांब्याचे एकंदर गुणधर्म समजतात, फक्त नांवांमध्यें भिन्नता असते, परंतु तें सर्व तांबेंच असते; व ज्याप्रमाणें कातरीवरुन लोखंडाची सर्व माहिती कळते, फक्त नांवांत भिन्नता असते, परंतु तें सर्व लोखंडच असतें, त्याचप्रमाणें या तत्त्वाची गोष्ट आहे.” पुत्र म्हणाला, “माझ्या परमपूज्य गुरुंनां या तत्त्वाची खास माहिती नसली पाहिजे; कारण त्यांनां माहिती असती तर खात्रीनें त्यांनीं ती माहिती मला दिली असती; तर मग मला ती माहिती आपण द्या” असें त्यानें आपल्या पुज्य पित्यास सांगितलें. “माझ्या लाडक्या, ठीक आहे” असें म्हणून त्याचा पिता सांगूं लागला, ‘एकमेवाद्वितीयम् असें फक्त सत्तत्त्व आरंभीं होतें; परंतु ‘एकमेवाद्वितीयम्’ असें फक्त असत्तत्त्व प्रारंभीं होतें असें अनेक लोकांचें म्हणणें आहे; व या असत्तत्त्वापासून सत्तत्त्वाची उत्पत्ति झाली. “परंतु ही गोष्ट कशी घडावी ? अर्थात् ‘एकमेवाद्वितीयम्’ असें फक्त सत्तत्त्व प्रारंभीं होतें.” या सत्तत्त्वानें उष्णता उत्पन्न करुन त्या उष्णतेच्या योगानें जल उत्पन्न झालें व जलाच्या योगानें अन्नरस उत्पन्न झाला व या तीन आदितत्त्वांमध्यें शिरुन त्या सत्तत्त्वानें स्वतःपासून इंद्रियें उत्पन्न केलीं. तेज, आप व अन्न किंवा तेज, आप व अग्नि या तत्त्वांमध्यें सर्वस्वाचा लय कसा होतो, हेंहि निद्रा, क्षुधा व तृष्णा यांच्यासंबंधानें बोलतांना त्यानें सांगितलें. हीं तीन तत्त्वें सत्तत्त्वांवर अवलंबून आहेत असेंहि त्यानें सांगितलें. परंतु आत्म्याप्रमाणेंच या सत्तत्त्वाला जीवात्मा असून त्याचा सर्व प्राण्यांमध्यें शिरकाव झालेला आहे; व हीच गोष्ट आपल्या जीवात्म्याची आहे; सबब मनुष्य मरण पावल्यावर तो आपल्या मूळच्या स्थितीप्रत जाऊन ज्या सत्तत्त्वापासून त्याची उत्पत्ति झाली होती त्या सत्तत्त्वाशीं त्याचा मिलाफ होतो. सत्तत्त्व, जीवात्मा व विश्व हीं एकच आहेत असें दर्शविणारें वर्णन केलेलें आहे. “ज्याप्रमाणें वेगवेगळा रस जमवून तो मधमाशा अशा रतीनें एकत्र करितात कीं, त्या रसांत भिन्नता न राहिल्यामुळें हा रस या झाडाचा असून तो त्या झाडाचा आहे असें म्हणतां येत नाहीं, त्याचप्रमाणें जेव्हां सर्वप्राणी सत्तत्त्वांशीं एक होतात, तेव्हां अशा रीतीनें आपला मिलाफ झाला आहे हें त्यांस बिलकूल ओळखितां येत नाहीं, व्याघ्र किंवा सिंह, लांडगा किंवा डुकर, कीटक किंवा पक्षी, माशी किंवा मच्छर या प्राण्यांपैकीं ते कोणीहि असले तरी त्या सर्वांचा सत्तत्त्वामध्यें लय होतो. सर्व प्राण्यांमध्यें, सत्यामध्ये, आत्म्यामध्यें व तुझ्यामध्यें हेंच सत्त्व आहे” असें श्वेतकेतूच्या पित्यानें त्यास सांगितलें. “उपदेशाच्या आणखी गोष्टी मला सांगा” असें श्वेतकेतु म्हणाला. “माझ्या लाडक्या, बरें आहे” असें त्यास उत्तर मिळालें. “पलीकडच्या अंजिराच्या झाडाचें एक फल आण, कारण तें सात्त्विक आहे” असें पिता म्हणाला. “बापाच्या आज्ञेवरुन त्यानें तें फोडिल्यावर व आंत काय आहे असें विचारिल्यावर त्यांत फार चिमुकले कण आहेत असें श्वेतकेतूनें सागितलें; व या बारीक कणांमध्यें काय आहे असें विचारिल्यावर “त्यांत कांहीं नाहीं” असें पुत्रानें उत्तर केलें. “जें सत्त्व तुला दिसत नाहीं त्या सत्त्वाच्या योगानेंच हें अंजिराचें मोठें झाड अस्तित्वांत आहे. हे श्वेतकेतु, सर्व प्राण्यांमध्यें, सत्यामध्यें, आत्म्यामध्यें व तुझ्यामध्येंहि हेंच सत्त्व आहे असें समज” असें पिता म्हणाला. “मला आणखी उपदेशामृत पाजा” असें श्वेतकेतूने सांगितल्यावर, “फार चांगलें” असें पिता म्हणाला. “हा मिठाचा खडा पाण्यामध्यें टाकून उद्यां सकाळीं तूं माझ्याकडे ये” असें श्वेतकेतूच्या पित्यानें त्यास सांगितलें.

“पित्याच्या आज्ञेप्रमाणें श्वेतकेतु दुस-या दिवशीं त्याच्याकडे गेल्यावर, पाण्यांत टाकलेलें मीठ आणण्यास त्यानें त्यास सांगितलें; तो तें शोधूं लागला, परंतु त्यास तें सांपडलें नाहीं; तें नाहींसें झालें होतें. एका बाजूचें पाणी चाखून त्याची चव कशी आहे तें सांग असें बापानें विचारिल्यावर, ‘तें खारट आहे’ असें श्वेतकेतूनें उत्तर दिलें. दुस-या बाजूचें व मध्यभागाचें पाणी चाखून त्याची चव कशी आहे असा पित्यानें प्रश्न केल्यावर, ‘तेंहि खारट आहे’ असें श्वेतकेतूनें सांगितलें. त्या पाण्याबरोबर कांहीं तरी खाण्यास त्यास सांगण्यांत आलें. त्यानें तसें केलें, परंतु खारटपणा कायम असल्याचें त्यानें सांगितलें. त्यावर त्याचा पिता म्हणाला “माझ्या लाडक्या, या देहामध्यें सत्तत्त्व असल्याचें जरी तुला दिसत नाहीं, तरी तें तेथें आहे, हे श्वेतकेतू, सर्व प्राणी, सत्य, आत्मा व तूं स्वतः या सर्वांच्या ठिकाणीं हें सत्तत्त्व आहे.”

ईश्वरी तत्त्व किंवा ज्याला जर्मन तत्त्ववेत्ता कँट केवल-वस्तु (Ding-an-sich) असें म्हणतो त्याचा शोध लावण्याचा प्रयत्न प्राचीन भारतीय तत्त्ववेत्त्यांनीं कळकळीनें व उत्साहानें केला मग, ते त्या ईश्वरी तत्त्वाला ‘एकच एक’ किंवा ‘सत्’ असें म्हणोत, किंवा ब्रह्म अथवा आत्मा असें म्हणोत. गार्ग्य बालाकि या नांवाचा एक गर्विष्ठ विद्वान् ब्राह्मण, काशीचा राजा अजातशत्रु याजकडे येऊन, त्यास त्यानें ‘ब्रह्म’ समजावून देण्याचें कबूल केलें, ही गोष्ट दोन निरनिराळ्या स्वरूपांत * दोन उपनिषदांत आलेली आहे. सूर्यातील, चंद्रांतील, विद्युल्लतेमधील, आकाशांतील, वायूंतील, अग्नींतील व जलांतील पुरुषाचें म्हणजे परात्म्याच्या तेजाचें त्यानें विवरण केलें; व नंतर प्रतिध्वनि, ध्वनि, स्वप्न, मानवी देह किंवा नेत्र यांमध्यें जें तेज, प्रतिबिंब किंवा छाया म्हणून दिसतें तें ब्रह्म आहे असें त्यानें सांगितलें. परंतु अजातशत्रूचें वरील स्पष्टीकरणानें समाधान न झाल्यामुळें, त्या विद्वान् ब्राह्मणानें ‘ब्रह्म’ समजावून देण्याविषयीं राजास सांगितलें; ‘पुरुषा’मध्यें म्हणजे आत्म्यामध्येंच खरें ब्रह्म आढळतें असें राजानें त्या ब्राह्मणास सांगितलें. “ज्याप्रमाणें आपल्या अंगापासून कोळी आपलें जाळें तयार करितो, अग्नीपासून लहान लहान ठिणग्या सर्वत्र पसरतात, त्याचप्रमाणें सर्व प्राणवायु, सर्व जगत्, सर्व देव व सर्व भूतें या आत्म्यापासून निघालेलीं आहेत.”

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .