प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ७ वें.
वेदप्रवेश-आरण्यकें व उपनिषदें.

परमात्मा व जीवात्माः- उपनिषदांतील एका प्रसिद्ध उता-यांत परमात्मा व जीवात्मा यांमधील भेद सांगितला आहेः-

“ज्याला असत् कधीं शिवत नाहीं, कालाची ज्याला बाधा होत नाहीं, जो अमर असून ज्याला कोणत्याहि प्रकारची काळजी नाहीं, जो क्षुधाविरहित व तृष्णाविरहित आहे, ज्याच्या इच्छा ख-या असतात, त्या आत्म्याचा शोध करुन त्याची ओळख करुन घेण्याचा प्रयत्न करावा; त्या आत्म्याचा शोध लावून एखाद्यानें त्याला ओळखिल्यास सर्व लोक त्याला प्राप्त होतात व त्याच्या सर्व इच्छा सफल होतात” असें प्रजापतीचें वचन आहे. हें वचन सुरासुरांनीं श्रवण केल्यावर ते म्हणाले, “ज्याचा शोध लाविल्यानें सर्व लोक प्राप्त होऊन सर्व इच्छा सफल होतात, त्या आत्म्याचा आपण शोध लावूं.” नंतर देवांपैकीं इन्द्र व असुरांपैकीं विरोचन हे दोघे पूर्वी ठरविल्याशिवाय * हातांत इंधन घेऊन प्रजापतीकडे गेले.

“ते त्याच्यापाशीं बत्तीस वर्षें राहिल्यानंतर प्रजापति त्यांस म्हणाला, “कोणत्या इच्छेनें शिष्य होऊन तुम्हीं येथें राहिलां आहांत ?” ते म्हणाले, “असत् ज्याला स्पर्श करूं शकत नाहीं, कलाचा ज्यावर परिणाम होत नाहीं, जो अमर व वीतचिंत आहे, जो क्षुधाविरहित व तृष्णाविरहित आहे, ज्याच्या इच्छा ख-या असून ज्याचा निश्चय डळमळीत नसतो त्या आत्म्याची ओळख करुन घेण्याचा प्रत्येकानें प्रयत्न केला पाहिजे, त्याचा तपास करुन त्याची ओळख करुन घेतल्यास सर्व लोक प्राप्त होऊन, सर्व इच्छा परिपूर्ण होतात, हें आपलें भाषण आम्हीं ऐकिल्यामुळें, या आत्म्याची ओळख करुन घेण्याच्या इच्छेनें आपले शिष्य होऊन आम्हीं येथें राहिलों आहोंत.” नेत्रांमधील किंवा प्रतिबिंबातील ‘पुरुषास' आत्मा असें म्हणतात, असें प्रजापतीनें त्यांस सांगितलें. वरील विधानानें विरोचनाचें समाधान होऊन तो असुरांकडे परत गेला, व देह हाच आत्मा आहे, यास्तव सर्व लोक प्राप्त करुन घेण्यासाठीं काळजीपूर्वक फक्त शरीराचें रक्षण केलें पाहिजे असें त्यानें त्यांस सांगितलें. परंतु प्रजापतीनें आत्म्याची माहिती मनःपूर्वक सांगितली नाहीं, असें इन्द्राला वाटल्यामुळें त्याचें समाधान न होतां तो प्राजपतीपाशीं शिष्य म्हणून पुन्हां बत्तीस वर्षे राहिला. नंतर त्याला प्रजापति म्हणाला, “जो स्वप्नामध्यें * यथेच्छ विहार करितो, तोच आत्मा होय; तो अमर व आपत्तिविरहित असून त्यालाच ब्रह्म असें म्हणतात.” नंतर संतुष्ट होऊन इन्द्र निघून गेला. परंतु देवांजवळ जाऊन पोहोंचण्यापूर्वीच स्वप्नचित्र हाहि खरा आत्मा असूं शकणार नाहीं असें इन्द्रास वाटल्यामुळें तो प्रजापतीकडे पुन्हां येऊन त्याच्याजवळ आणखी बत्तीस वर्षे राहिला. स्वप्नविरहित गाढ निद्रेंतील आत्मा हाच खरा आत्मा होय असें प्रजापतीनें इन्द्रास सांगितलें. परंतु या गोष्टीवरूनहि इन्द्राचें समाधान न झाल्यामुळें तो परत आला; प्रजापतीनें त्यास आणखी पांच वर्षे ठेवून घेतलें; व सरतेशेवटीं ख-या आत्म्याचें स्वरुप त्यानें त्यास सांगितलें. ‘हे इन्द्रा, हा देह विनाशी असून याच्यावर मृत्यूचा ताबा आहे; अमर व विदेही अशा आत्म्याचें तें वसतिस्थान आहे. देहाच्या उपाधीनें बद्ध झालेला हा आत्मा, वासना व द्वेष यांहीं युक्त आहे; जोंपर्यंत देहाशीं हा बद्ध झालेला असतो, तोंपर्यंत वासना व द्वेष यांचा प्रतिकार त्यास करितां येत नाहीं; परंतु हा देहविरहित झाला म्हणजे वासना व द्वेष यांची यत्किंचितहि त्याला बाधा होत नाहीं. आपण आकाशाकडे दृष्टि लाविली असतां तो आत्मा नेत्रांतील तेज (पुरुष) बनतो व नेत्र हे निमित्तमात्र पहाण्याचें यंत्र होतात. “याचा मीं सुवास घेईन” हें जाणणारा आत्मा तो हाच;’ नाक हें निमित्तमात्र आहे. “मीं असें भाषण करीन” असें जाणणारा आत्मा तो हाच; ध्वनि निमित्तमात्र होय. “हें मीं श्रवण करीन” असें जाणणारा तो हाच आत्मा; कान निमित्तमात्र असतात. “याचा मीं विचार करीन” असेंहि जाणणारा आत्मा हाच असून मन हा त्याचा दिव्य चक्षु असतो. जेव्हां मनानें किंवा दिव्य चक्षूनें इच्छित वस्तू दृष्टीस पडतात तेव्हां हाच आत्मा संतुष्ट होतो. ब्रह्मलोकामध्यें याच आत्म्याची देव उपासना करितात; या उपासनेच्या योगानें देवांनां सर्व लोक प्राप्त होऊन त्यांच्या सर्व इच्छा परिपूर्ण होतात. या आत्म्याची चौकशी करुन त्याला जो पूर्णपणें ओळखितो त्याला सर्व लोक प्राप्त होऊन त्याच्या सर्व इच्छा सफल होतात’ असें प्रजापतीनें * इन्द्रास सांगितलें.”

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .