प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ७ वें.
वेदप्रवेश-आरण्यकें व उपनिषदें.

आत्मा व जगत् – या ठिकाणींहि ज्ञाता व विवेकी असा जीवात्मा म्हणजेच परमात्मा असेंच सांगितलें आहे; परंतु हा आत्मा व जगत् हीं एकच आहेत व ज्या प्रमाणांत एखादी वस्तु ज्ञात्याच्या ज्ञानाचा विषय असते त्या प्रमाणांत त्या वस्तूला अस्तित्व असतें, असें याज्ञवल्क्य व मैत्रेयी यांच्या सुंदर भाषणांत सांगितलें आहे. तपस्वी होऊन आपलें आयुष्य अरण्यांत घालविण्यासाठीं याज्ञवल्क्य आपलें घर सोडण्याच्या बेतांत असल्यामुळें आपल्या दोन्ही बायकांनां नेमणूक करुन देण्याची त्याला इच्छा झाली, व हा आपला विचार त्यानें मैत्रेयी नांवाच्या आपल्या पत्नीस सांगितला.

मैत्रेयी म्हणाली, “महाराज, जर ही पृथ्वी व तिच्यांतील सर्व धन मला प्राप्त झालें, तर त्यामुळें मी अमर होईन का ?” याज्ञवल्क्य म्हणाला, “मुळींच नाहीं; परंतु तुला सुखवस्तु मनुष्याप्रमाणें राहतां येईल; धनाच्या योगानें अमर होण्याची बिलकुल आशा नको.” नंतर मैत्रेयी म्हणाली, “ज्याच्या योगानें अमरत्व प्राप्त होत नाहीं, तें घेऊन मला काय करावयाचें आहे ?” याच्या ऐवजीं, तुम्हाला जें ज्ञान प्राप्त झालेलें आहे, तें मला द्या.” याज्ञवल्क्य म्हणाला, “खरोखर तूं मला प्रिय असून, तूं जें म्हणतेस तेंहि मला प्रिय आहे; येथें बैस; व मीं जें सांगतों तें तूं सावधान चित्तानें श्रवण कर. केवळ पतीसाठीं पतीवर प्रेम केलें जात नसून, आपल्या स्वतःच्या हितासाठीं पत्नीं आपल्या पतीवर प्रेम करीत असते; पति आपल्या पत्नीवर जें प्रेम करितो तें तिच्यासाठीं नसून, आपल्या स्वतःसाठीं असतें; पुत्रांवर आईबाप जें प्रेम करितात तें पुत्रांसाठीं नसून, आपल्या स्वतःसाठीं असतें, देवांवर जें प्रेम करण्यांत येतें तें देवांसाठीं नसून, आपलें स्वतःचें कल्याण व्हावें म्हणून असतें; भूतांवर दया जी दाखविण्यांत येते तीहि त्यांच्यासाठीं नसून आपल्या स्वतःसाठींच असते; व तसेंच अखिल जगतावरील प्रेमहि जगतासाठीं नसून आपल्या स्वतःसाठीं (आत्म्यासाठीं) असतें, हे मैत्रेयी, हा जो आत्मा त्याचें दर्शन घेतलें पाहिजे, त्याचें श्रवण केलें पाहिजे, त्याची ओळख करुन घेतली पाहिजे, व त्याच्यासंबंधीं विचार केला पाहिजे; इतकें झालें असतां, सर्व जगाची पूर्णपणें माहिती * होते.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .