प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ७ वें.
वेदप्रवेश-आरण्यकें व उपनिषदें.

आत्मा व प्राणः- उपनिषदांमध्यें आत्म्याला ‘प्राण’ अशी संज्ञा वारंवार दिलेली आढळते; उपनिषदांतील बराच भाग या “प्राणा’संबंधाचा आहे; व प्राण याचा अर्थ येथें आत्मा किंवा इंद्रियशक्ति असा आहे. (या अर्थीं प्राण हा शब्द बहुवचनीं असतो). वाक्, श्वसन, चक्षु, श्रोत्र व मन या पांच इंद्रियांचें अग्नि, वायु, सूर्य, दिशा व चंद्र या पंचमहाभूतांशीं साम्य आहे. यांचा एकमेकांवर कसा परिणाम होतो, याचा उपनिषदांत वारंवार उल्लेख आलेला आहे. येथेंच आपणांस उपनिषदांतील मानसशास्त्र आढळतें (मानसशास्त्र व अध्यात्मविद्या हीं निराळीं करतां येत नाहींत).

मुख्य इंद्रियांच्या वर्चस्वाबद्दलच्या तंट्याची नेहमीं सांगण्यांत येणारी मानसशास्त्रासंबंधाची गोष्ट सर्वांच्या परिचयाची आहे. प्राण किंवा जीवनाधार इंद्रियें यांमध्यें वर्चस्वाबद्दल कसा तंटा लागला होता हें त्या गोष्टींत सांगितलें आहे; आपल्या तंट्याचा निकाल लावून घेण्यासाठीं तीं इंद्रियें प्रजापतीकडे गेलीं. “तुम्हांपैकीं ज्याच्या विरहानें शरीर फार निकृष्टावस्थेस जाईल, तें इंद्रिय सर्वांत श्रेष्ठ होय” असें प्रजापतीनें सांगितलें. नंतर ‘वाक्’ इंद्रिय एक वर्षपर्यंत दूर जाऊन राहिलें; नंतर परत येऊन तें म्हणालें, “माझ्याशिवाय तुम्हीं कसे जिवंत राहूं शकलां ?” प्राणी म्हणाले, “ज्याप्रमाणें मुकीं माणसें नासिकेच्या योगानें श्वासोच्छ्वास करितात, चक्षूंच्या योगानें पहातात, कर्णेंद्रियाच्या योगानें श्रवण करितात, मनाच्या योगानें विचार करितात व अशा प्रकारें त्यांनां बोलतां येत नसतांहि तीं जिवंत राहतात, त्याचप्रमाणें आम्हांला जिवंत राहतां आलें.” नंतर वाक् इंद्रियानें पुन्हां शरीरांत प्रवेश केला. नंतर चक्षु निघून गेले व एक वर्षानंतर परत येऊन त्यांनीं विचारलें, “माझ्याशिवाय तुम्हाला कसें जिवंत राहतां आलें ?” “एखादा अंध मनुष्य जरी त्याला दिसत नसतें तरी तो श्वासोच्छ्वास करूं शकतो, बोलूं शकतो, त्याला ऐकूं येतें व विचारहि करितां येतो, त्याचप्रमाणें दृष्टीविरहित आम्हांला राहतां आलें” असें त्यांनां उत्तर मिळालें; इतकें ऐकिल्यावर चक्षूंनीं शरीरांत पुनः प्रवेश केला. नंतर कर्णेंद्रिय एक वर्षपर्यंत दूर जाऊन राहिल्यानंतर, परत येऊन, “माझ्याशिवाय तुम्हांला कसें राहतां आलें” असा त्यानें प्रश्न केला. “एखाद्या बहि-याला जरी ऐकूं येत नाहीं, तरी इतर इंद्रियांच्या योगानें त्याला श्वासोच्छ्वास करितां येतो, बोलतां येतें, पाहतां येतें, व मननहि करितां येतें, त्याचप्रमाणें आम्हीं केलें” असें त्यास उत्तर मिळालें. इतकें झाल्यावर कर्णेंद्रियानें पुन्हां देहप्रवेश केला. नंतर मन एक वर्षपर्यंत दूर राहिलें व नंतर परत येऊन, “माझ्याशिवाय तुमचें कसें चाललें” असा त्यानें प्रश्न केला. “ज्याला विचारशक्ति नसते असा एखादा भोळसर मनुष्य श्वासोच्छ्वास करूं शकतो, बोलूं शकतो, अवलोकन करूं शकतो, व श्रवण करूं शकतो, त्याचप्रमाणें आम्हींहि केलें” असें उत्तर त्यास मिळालें. नंतर मनानेंहि शरीरप्रवेश केला. परंतु एखादा उमदा घोडा आपलीं बंधनें ज्याप्रमाणें तोडून टाकितो, त्याप्रमाणें, श्वसनेंद्रिय प्राणानें निघून जातेवेळीं, इतर इंद्रियें तोडून टाकिलीं, तेव्हां तीं सर्व इंद्रियें प्राणाकडे येऊन म्हणाली, “हे पूजार्हा, ये, आम्हां सर्वांमध्यें तूंच श्रेष्ठ आहेस. तूं जाऊं नकोस.... म्हणूनच इंद्रियांनां, वाक्, चक्षु, कर्ण किंवा मन असें न म्हणतां ‘प्राण’ असें म्हणण्यांत येतें; कारण, प्राण हेंच * त्यांचें सर्वस्व आहे.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .