प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.


प्रकरण ८ वें.
वेदप्रवेश-वेदांगें.

मुण्डकोपनिषदांत दोन प्रकारच्या विद्या कथन केल्या आहेत. एक परा व दुसरी अपरा. परा विद्येनें अक्षर ब्रह्माच्या ज्ञानाची प्राप्ति होते. अपरा विद्येंत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छन्द आणि ज्योतिष यांचा समावेश होतो. * यांस वेदांचीं षडंगें किंवा उपग्रंथ असें म्हणतात. पूर्वीं या ग्रंथांस कोणत्याहि तर्‍हेचे विशिष्ट ग्रंथ किंवा शाखा ग्रंथ समजत नव्हते. वेदग्रंथांचें बिनचूक व यथार्थ ज्ञान व्हावें म्हणून वेदशाळेंतून या ग्रंथांचा अभ्यास करण्याचा पाठ असे. वेदांगांचा प्रारंभ ब्राह्मणांत व आरण्यकांत झालेला दिसतो. या ग्रंथांत यज्ञयागादि प्रकरणें असून मधून मधून शिक्षा, व्याकरण, निरुक्त, छन्द आणि ज्योतिष इत्यादि विषयांचे उल्लेख आलेले आहेत. कालांतरानें प्रत्येक वैदिक उपग्रंथाची निरनिराळी स्वतंत्र शाखा बनली व वेदशाळेंतून प्रत्येक शाखेचा स्वतंत्र रीतीनें पद्धतशीर अभ्यास होऊं लागला.

शिक्षण देण्यास व ध्यानांत ठेवण्यास सुलभ जावें म्हणून गद्यात्मक सूत्रें रचण्यांत आलीं. सूत्र शब्दाचा धात्वर्थ दोरा असा आहे व नंतर थोडक्या शब्दांत कथन केलेला लघु नियम असा त्याचा अर्थ बनला. लहान लहान धागे एकत्र विणल्यानें जसें वस्त्र तयार होतें, तशीं लहान लहान सूत्रें एकत्र केलीं असतां एक पद्धतशीर ग्रंथ बनतो. अशा तर्‍हेचीं अनेक सूत्रें असलेल्या ग्रंथास ‘सूत्रग्रंथ’ अशी संज्ञा दिलेली असते. हे ग्रंथ केवळ व्यावहारिक दृष्टीनें लिहिले आहेत. विद्यार्थांनां पाठ करण्यास सुलभ जावें म्हणून सूत्रग्रंथांत कोणतें तरी शास्त्र पद्धतशीर रीतीनें थोडक्यांत सूत्ररूपानें निवेदन केलेलें असतें. भारतीय लोकांच्या सूत्रांसारखी कल्पना जगांतील कोणत्याहि वाङ्मयांत आढळत नाहीं. सूत्रग्रंथकर्त्याचें मुख्य काम म्हणजे कोणत्याहि गोष्टींचा उल्लेख शक्य तितक्या थोडया अक्षरांत करणें हें होय. यामुळें कित्येक वेळां हीं सूत्रें अर्थावगमास फारच कठिण होतात. अक्षरांच्या काटकसरीसंबंधानें व्याकरणकर्ता पतञ्जली म्हणतो कीं, सूत्रकारास एखादी अर्धमात्रा कमी करुन जर सूत्र रचतां आलें तर त्यास पुत्रजन्माइतका आनंद होतो.

विद्यार्थी संक्षिप्त सूत्रेंच फक्त म्हणतात. सूत्राचें आवश्यक स्पष्टीकरण आचार्यद्वारा शिकावें लागतें. कालांतरानें आचार्यांनीं सूत्रांच्या स्पष्टीकरणार्थ टीका लिहिल्या. या टीका वाचल्यानें सूत्रग्रंथ समजण्यास सुलभ जातो. या सूत्रग्रंथावरील टीका वंशपरंपरेनें राखून ठेवलेल्या आहेत. या टीका जर उपलब्ध नसत्या तर सूत्रग्रंथ दुर्बोध झाले असते. ब्राह्मणांतील गद्यानुसार लिहिलेली ही विशिष्ट तर्‍हेची सूत्रपद्धति दिसते. ब्राह्मणांतील गद्यामध्यें लहान लहान वाक्येंच प्रामुख्यानें सांपडतात. कांहीं सूत्रें संवादरूपानें घातलेलीं आहेत. प्रधानवाक्यांची संगति क्वचित् ठिकाणीं संबंधी संकेतार्थी वाक्यानें मोडलेली दिसतें. वाक्यांचा एकसूत्रीपणा कांहीं ठिकाणीं भंग पावलेला दिसतो. पुनरुक्तीनें आलेला गौणपणा सोडून दिला तरी अशीं पुष्कळ संवादरूपानें दिलेलीं बोधप्रद वाक्यें आहेत कीं, त्यांचा अर्थ सांगतेवेळीं स्पष्टीकरणार्थ पदरचे बरेचसे शब्द घालावे लागतात. सूत्रामध्यें ज्याप्रमाणें धातुसाधित संबंधी शब्दांनी तुटक तुटक वाक्यें जोडलेलीं सांपडतात त्याप्रमाणेंच ब्राह्मणांतील गद्य भागांतील वाक्यें धातुसाधित शब्दांनीं जोडलीं असतां जास्तजास्त सुलभ होत जातात.

शब्द कमी लागावे म्हणून नवीन तर्‍हेची संक्षिप्त वाक्यरचनेची योजना केलेली आहे. सूत्रामध्येंच प्रथम लांबलचक समास दृष्टीस पडतात; व ही समासपद्धति लौकिक संस्कृतांत जास्त जास्तच वाढत चाललेली दिसते व उत्तरोत्तर ही एक लिहिण्याची उत्तम तर्‍हेची मोडणी समजली गेली. ब्राह्मणांतील गद्याला अनुसरुनच सूत्रपद्धति निघाली आहे हें सूत्रांत घेतलेल्या ब्राह्मणांतील अवतरणांवरुन व ब्राह्मणांतील गद्यानुसार लिहिलेल्या सूत्रभागांवरुन स्पष्ट होतें. *

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .