प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.


प्रकरण ८ वें.
वेदप्रवेश-वेदांगें.

शिक्षा आणि प्रातिशाख्यें.- शिक्षा ह्याचा अर्थ “शिकणें”, विशेषतः पठण करणें (संथा घेणें) म्हणजे स्पष्ट उच्चार करुन आघात वगैरे देऊन संहिता म्हणणें हा होय. या वेदांगाचा प्रथमतः तैत्तिरीय उपनिषदांत नामनिर्देश आला आहे. (तैत्ति. १, २) ह्या ठिकाणीं शिक्षेचे सहा भाग सांगितलेले आहेत ते असें. शब्द व त्यावरील आघात, पदप्रमाण किंवा शब्दावयव व त्यावरील आघात आणि म्हणण्यांतील स्वरमाधुर्य व शब्दसंधि. धर्मकर्म किंवा धार्मिक विधी शिकविण्याप्रमाणें धर्माच्या दृष्टीनें शिक्षेचीहि आवश्यकता वाटली. कारण एखादें यज्ञकृत्य बरोबर करावयाचें म्हटलें म्हणजें त्यांतील कर्म माहीत असणें अवश्य असून शिवाय संहितांतून परंपरेनें आलेलीं पवित्र सूक्तें जशींचीं तशींच बिनचूक बरोबर उच्चार करुन म्हणावीं लागत. परंतु ह्यावरुन असें गृहीत धरल्यासारखें होईल कीं, ज्या वेळीं शिक्षेवरील ग्रंथ अस्तित्वांत आले त्या वेळेच्या पूर्वींपासूनच वेदांतील संहिता ह्या पवित्र मानल्या जात असून शिक्षाध्यापक आचार्यांनीं त्यांनां (संहितांनां) विशिष्ट स्वरुप आणिलें होतें. परंतु वास्तविक पहातां असें दिसतें कीं ऋग्वेद संहितेंतील सूक्तें पूर्वीच्या कवींनीं जशीं तयार केलीं तशीं आज सांपडत नाहींत. जरी परंपरागत अध्यापकांनीं त्यांतील शब्द बदलले नाहींत तरी उच्चार, शब्दाचे अंत्य व आरभींचे स्वर, अर्धवट व्यक्त भाग गाळून टाकणें वगैरे बाबतींत त्यांनीं पूर्वीच्या पठनपद्धतींत विकार व भेद होऊं दिला. उदाहरणार्थ, एका संहितेंत “त्वंह्यग्ने” असें लिहिलेलं आढळतें, परंतु वृत्ताच्या आधारावरुन असें स्पष्ट सिद्ध होतें कीं जुने पाठक “त्वंहि अग्ने” असें म्हणत असत. ह्यावरुन वेदांतील संहिता ह्याच अगोदर झाल्या असल्या पाहिजेत. परंतु संहितापाठाशिवाय, शिक्षेंत सांगितल्याप्रमाणें म्हणावें लागत असल्यामुळें पदपाठ म्हणून एक निराळा आहे. ह्यांत संहितापाठांत दिसून येणारें स्वर एकमेकांस जोडून न देतां प्रत्येक शब्द निरनिराळा लिहिला आहे. संहितापाठ व पदपाठ ह्यांतील भेद दाखविण्यासाठीं एक उदाहरण पुरें आहे. ऋग्वेद संहितेंतील एक मंत्र खालीं लिहिल्याप्रमाणें आहे.

अग्निः पूर्वेभिर्ऋषिभिरीडयोनूतनैरुत । स
देवाँएह वक्षति ।।२।।

पदपाठाप्रमाणें हाच श्लोक खालीं लिहिल्याप्रमाणें आहे.

अग्निः । पूर्वेभिः । ऋषिऽभिः । ईडयः ।
नूतनैः । उत। सः । देवान् । आ । इह । वक्षति ।।२।।

पदपाठ हें अर्थात् शिक्षासंपन्न धर्मकारांचें, पक्षीं वैयाकरणी लोकांचें काम आहे. कारण त्यांत संहितामंत्र व्याकरणदृष्टया परिच्छेद करुन दिलेले आहेत. तरीहि पण हे फार जुने आहेत. ऐतरेय आरण्यकांत ज्याचें नांव आलेलें आहे त्या शाकल्य नांवाच्या आचार्यांनीं ऋग्वेदाचा पदपाठ लिहिला असें म्हणतात.

ह्यावरुन शिक्षापंथाचें जुन्यांत जुनें काम म्हणजे संहितापाठ व पदपाठ हें होय. ह्या वेदांगाचे जुन्यांत जुने आज आपणांस उपलब्ध असणारे ग्रंथ म्हणजे प्रातिशाख्यें होत. ह्यांत पदपाठावरुन संहितापाठ कसे तयार करावयाचें ह्या संबंधीं नियम आहेत. अर्थात् ह्यामध्यें उच्चार, आघात शब्दसंधींतील व वाक्यांतील आरंभींच्या किंवा अंत्य शब्दांचे स्वरांतील उच्चारभेद ह्यांची माहिती दिली आहे, किंवा थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे संहिता म्हणण्याच्या पद्धतीचें पूर्ण विवेचन केलेलें आहे. संहितेच्या प्रत्येक शाखेला अशा त-हेचें एक पाठपुस्तक होतें; ह्यावरुनच त्यास प्रातिशाख्य असें नांव आलें. ऋग्वेदप्रातिशाख्य * म्हणून एक आहे; हें आश्वलायनाचा गुरु शौनक ह्यानें लिहिलें असावें. हा ग्रंथ पद्यमय असून पूर्वींच्या एखाद्या सूत्रपाठाची ही सुधारुन वाढविलेली आवृत्ति असावी. हस्तलिखित ग्रंथांतून व उता-यांमधून त्यांस “सूत्र” अशीच संज्ञा आहे. तैत्तिरीय प्रातिशाख्यसूत्र * हें तैत्तिरीय संहितेचें सूत्र आहे.

वाजसनेयी संहितेला कात्यायन ह्यानें केलेलें वाजसनेयी प्रातिशाख्यासूत्र * व अथर्ववेद संहितेला शौनकपंथांपैकीं कोणी तरी केलेलें अथर्ववेद प्रातिशाख्यसूत्र * हीं जोडलेलीं आहेत.

ह्या ग्रंथांचें दोन दृष्टींनीं महत्त्व आहे. प्रथमतः ह्या प्रातिशाख्यांपासून हिंदुस्थानांतील व्याकरणशास्त्राच्या अध्ययनास आरंभ झाला म्हणून हीं महत्त्वाचीं आहेत. जरी हे प्रत्यक्ष व्याकरणावरील ग्रंथ नाहींत तरी व्याकरणासंबंधीं विषयांचें ह्यांत विवेचन केलेलें आहे. ह्यांत पुष्कळ वैयाकरणाचें उतारे आढळत असल्यामुळें त्या वेळींहि व्याकरणाचें अध्ययन जोरांत होतें असें ह्यांवरुन सिद्ध होतें. दुस-या बाजूनेंहि ह्यांचें महत्त्व आहे तें असें कीं, त्यांच्यामुळें आज उपलब्ध असलेला संहितापाठ प्रातिशाख्यांच्या रचनाकालापासून तों आजपर्यंत कित्येक शतकें जशाचा तसाच राहिला आहे असें सिद्ध होतें. ऋग्वेदप्रातिशाख्यांतील नियमांत असेंच गृहीत धरिलें आहे कीं, ऋग्वेदसंहितेंतील दहा मंडलें आज आहेत तशींच असलीं पाहिजेत, एवढेंच नव्हे तर त्यांतील सूक्तांचा अनुक्रम आज जसा आहे तसाच असला पाहिजे. शौनकाच्या अत्यंत बारीक नियमांवरुन आज उपलब्ध असलेल्या छापील आवृत्तीमध्यें ऋग्वेदसंहिता पदशः व शब्दशः जशी आहे तशीच ती त्या काळीं होती ह्याविषयीं शंका रहात नाहीं.

हीं प्रातिशाख्यें म्हणजे वेदांगशिक्षेचीं फार जुनी उदाहरणें होत. ह्यांशिवाय शिक्षेवर अलीकडील पुष्कळ लहान लहान ग्रंथ आहेत. ह्यांनांहि शिक्षा असेंच नांव दिलेलें असून भारद्वाज, व्यास, वसिष्ठ, याज्ञवल्क्य वगैरे ह्यांचे कर्ते म्हणून दिलेले आहेत. ज्याप्रमाणें वैदिक धर्मसूत्रांच्या मागून मोठमोठ्या प्रसिद्ध ग्रंथकारांचीं लेखक म्हणून नांवें देऊन धर्मशास्त्रांवरील पद्यमय ग्रंथ निघाले, तद्वतच प्रातिशाख्यांमागून हीं पुस्तकें निघालीं. त्यांतल्यात्यांत ह्यांतील कांहीं शिक्षा ब-याच जुन्या असून कोणत्याना कोणत्यातरी प्रातिशाख्यावरील अगदी संलग्न आहेत; उदाहरणार्थ तैत्तिरीय प्रातिशाख्यावरील व्याससूत्र * . परंतु दुसरे काहीं ग्रंथ फार पुढील काळीं तयार झाले असून व्याकरण किंवा वैदिकग्रंथेतिहास ह्या दृष्टीनें कांहींच महत्त्वाचे नाहींत.

प्रातिशाख्यकारांत शौनक व कात्यायन ह्यांचींहि नांवे आहेत; त्यांनीं दुसरे कांहीं ग्रंथ लिहिले आहेत असा समज आहे. ह्या ग्रंथांचा वेदाङ्गवाङ्मयाशीं निकट संबंध आहे, कारण ह्या ऋषींनींहि वैदिक संहितांच्या अभ्यासाचें कांहीं काम केलेलें आहे. तरी पण ह्या ग्रंथांनां वेदांगें म्हणून म्हणत नाहींत. ह्यांना अनुक्रमणी अशी संज्ञा असून वैदिक संहितांच्या निरनिराळ्या भागांत कोणत्या विषयांचें विवेचन केलें आहे तें ह्यांत दिलें आहे. शौनकानें वैदिकसूक्तांतील ऋषिवर्गाची एक अनुक्रमणी, त्याचप्रमाणें छंदांची, देवतांची व सूत्रांची अशा याद्या तयार केल्या आहेत. ऋग्वेदांतील सर्व गोष्टींची “सर्वानुक्रमणी * ” नांवाची कात्यायन ह्यानें केलेली एक याद उपलब्ध आहे. ह्या ग्रंथांत सूत्रपद्धतीनें, प्रत्येक सूत्राचा आदिशब्द, ऋचांची संख्या, ज्या ऋषीनें त्या ऋचा लिहिल्या असतील त्याचें नांव व गोत्र, ज्या देवतांप्रीत्यर्थ त्या ऋचा तयार केल्या गेल्या असतील त्यांचीं नावें किंवा ज्या छंदांत अथवा वृत्तांत ऋचा लिहिली असेल तें वृत्त ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. बृहद्देवता व ऋगविधान हे दोन्ही वृत्तग्रंथहि शौनकानेंच लिहिले आहेत. बृहद्देवता * म्हणजे ऋग्वेदांतील सूत्रांतून ज्या देवतांस आह्वान केलें आहे त्यांची एक सविस्तर याद होय. ह्याबरोबरच त्या ग्रंथांत त्या त्या देवतांसंबंधींच्या पौराणिक दंतकथा असल्यामुळें भारतीय कथावाङ्मयाच्या दृष्टीनें हा ग्रंथ फार महत्वाचा आहे. ऋग्विधानांत * ऋग्वेदसंहितेंतील प्रत्येक मंत्र म्हटल्यावर त्यापासून होणारा परिणाम किंवा निरनिराळ्या ऋचांचा परिणाम ह्या गोष्टी व्यवस्थित रीतीनें दिल्या आहेत. वर निर्दिष्ट केलेल्या सामविधान ब्राह्मणाशीं ह्याचें पुष्कळ साम्य आहे.

अनुक्रमणी व तत्संबंधींचे दुसरे ग्रंथ ह्यांचें एवढें महत्त्व असण्याचें कारण इतकेंच कीं, त्यांवरुन वैदिक संहितापाठ, श्लोकसंख्या, रचना व स्वरुप ह्या बाबतींत आज जसा आहे तसाच फार प्राचीन काळीं होता हें सिद्ध होतें.

यास्क यांच्या * निरुक्ताविषयींहि हीच गोष्ट आहे. वेदांगनिरूक्तांपैकीं आज आपणांस उपलब्ध असलेला एवढाच ग्रंथ आहे व ह्यांतहि ऋग्वेदसंहिता आज आपणांस जशी सांपडते तशीच ती होती असें गृहीत धरलें आहे, “निघण्टु” हा कोशहि यास्कानेंच तयार केला असावा अशी समजूत आहे, पण ती चुकीची आहे असें कोणी म्हणतात.

वास्तविक यास्काचा ग्रंथ म्हणजे ह्या शब्दकोशावर केलेली टीका होय. यास्कानें स्वतः असें म्हटलें आहे कीं, हा ग्रंथ प्राचीन ऋषींच्या वंशजांनीं तयार केला आहे. व ही टीका बदललेला पाठ लवकर समजावा म्हणून केलेली आहे. निघण्टूचे पांच निरनिराळे कोश असून त्याचे तीन विभाग आहेत. नैघण्टुककांड ह्या नांवाच्या पहिल्या भागांत तीन शब्दसंग्रह असून ह्यांत वेदांतील शब्द त्यांच्या मुख्य अर्थांनां अनुसरुन एकत्र ग्रथित केले आहेत. उदाहरणार्थ ह्यांत “पृथ्वी” ह्या शब्दास एकवीस समानार्थक शब्द, “सुवर्ण” शब्दास पंधरा, “हवा” शब्दास सोळा, “पाणी” शब्दास एकशेंएक व “जाणें” ह्या शब्दास एकशेंबावीस समानार्थंक शब्द दिलेले आहेत; तसेच “जलद” ह्या शब्दाशीं सव्वीस समानार्थक विशेषणें व क्रियाविशेषणें असून “पुष्कळ” ह्यास बारा समानार्थक शब्द दिलेले आहेत. नैगमकांड किंवा ऐकपदिक नांवाच्या दुस-या भागांत वेदांतील विशेष कठिण व व्द्यर्थी शब्दांचा निराळा संग्रह दिलेला असून दैवतकांड नांवाच्या तिस-या भागांत भूलोक अंतरिक्ष व स्वर्ग ह्या तिन्ही लोकांतील देवतांचें निरनिराळें वर्गीकरण केलेलें आहे. अशा तर्‍हेचे शब्दसंग्रह लिहिल्यामुळेंच वेदविवरणाला सुरुवात झाली; व पुढें कठिण कठिण वेदसूक्तांचें स्पष्टीकरण मधूनमधून देणा-या निरुक्तासारख्या शब्दसंग्रहावरील टीका वगैरे केल्या गेल्या. यास्काचे पूर्वींहि पुष्कळ टीकाकार झाले ही गोष्ट खरी आहे. तथापि जरी ह्याचा ग्रंथ वेदविवरणात्मक ग्रंथांत जुन्यांत जुना आहे तरी वेदांगनिरुक्तविषयक वाङ्मयांत हा शेवटचाच व अप्रतिम ग्रंथ आहे असें म्हणावयास हरकत नाहीं.

छंदःशास्त्र व ज्योतिःशास्त्र ह्या वेदांगांसंबंधीं जुन्या शास्त्रीय वाङ्मयाच्या कांहीं कांहीं भागाचा एकेक ग्रंथ उपलब्ध आहे. पिंगल ह्यानें लिहिलेला छंदःशास्त्रावरील ग्रंथ ज्याला ऋग्वेदाचें-किंवा पाहिजे तर यजुर्वेदाचें म्हणा-वेदांग म्हणतात, त्याचें दोन निरनिराळे पाठ असून हें अगदीं अलींकडचें पुस्तक आहे; कारण अगदीं अलीकडील वृत्तांविषयींहि ह्यांत माहिती दिलेली आहे.

वेदांगज्योतिष हा ज्योतिःशास्त्रावरील एक लहान पद्यमय ग्रंथ आहे; ह्यांतील यजुर्वेद पाठांत त्रेचाळीस श्लोक असून ऋग्वेदपाठांत छत्तीस श्लोक आहेत. ह्यांत संक्रमणाच्या वेळीं सूर्य आणि चंद्र ह्यांचीं स्थानें व सत्तावीस नक्षत्रांच्या स्थानांतील अमावास्या व पौर्णिमा देऊन तद्विषयक गणिताचे नियम दिलेले आहेत. हा ग्रंथ श्लोकबद्ध लिहिला असल्यामुळें व त्याचें स्पष्टीकरण बरोबर होत नसल्यामुळें तो अलीकडे लिहिला गेला असें दिसतें.

व्याकरणावरील जुनीं वेदांगाचीं पुस्तकें उपलब्ध नाहींत. वेदविवरणाशीं निकट संबंध असल्यामुळेंच हें शास्त्र निघालें व वैदिक पंथांनीं याचा पुरस्कार केला. आरण्यकांतून आपणांस क्वचित् ठिकाणीं व्याकरणांतील पारिभाषिक शब्द आढळतात. परंतु पाणिनीचें अतिप्राचीन व सर्वोत्कृष्ट असें व्याकरणशास्त्रावरील जें पुस्तक आज उपलब्ध आहे, त्यांत वेदभाषेचा प्रामुख्यानें विचार केला नसून केवळ एक उपाङ्ग ह्या दृष्टीनें विचार केलेला आहे. कोणत्याहि वेदपंथाशीं ह्याचा निकट संबंध नसून धर्मशास्त्र खेरीज करुन व्याकरण विषयाचें ज्या काळीं स्वतंत्र रीतीनें अध्ययन होत असे अशा काळीं तो ग्रंथ लिहिला गेलेला आहे. हिंदुस्थानांत देखील प्रथमतः धर्मशास्त्रांत गुरफटून गेलेल्या शास्त्रीय विषयांचें पुढें हळू हळू स्वतंत्र रीतीनें अध्ययन होऊं लागलें.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .