प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १० वें.
वैदिक वाङ्मय, ब्राह्मण जाति आणि यज्ञसंस्था.

वेदाभ्यास आणि यज्ञसंस्था.- या दोहोंचा संबंध लक्षांत घेऊन वेदकालीन स्थितीचें आकलन केलें पाहिजे. वेदांचा ऐतिहासिक अर्थ कसा लावावयाचा यासंबंधीं जो प्रयत्न झाला त्याचा इतिहास प्रसंगानुसार मागें दिलाच आहे. आम्हांस येथें एवढेंच सांगावयाचें आहे कीं, संशोधकांच्या चालू पद्धतींत आम्हांस फारसें नवें घालावयाचें नाहीं. प्रचलित ऐतिहासिक पद्धतीच अधिक सविस्तर वापरावयाची आहे. सायणाचार्यांचे व निरुक्तकारांचे जे अर्थ व्यक्त झाले आहेत त्यांचा प्रधानहेतु आमच्या हेतूहून भिन्न आहे. वरील दोन आचार्यांचा हेतु यज्ञसंस्थांचें रक्षण करण्याचा होता व त्यामुळें वेदांचा यज्ञपर अर्थ कसा लावावा ही जबाबदारी त्यांच्यावर पडली होती. अर्वाचीन पंडितांवर ही जबाबदारी नाहीं. ज्या काळीं जें वाक्या बोललें गेलें असेल त्या काळीं त्या वाक्याचा अर्थ काय असेल हें अर्वाचीन पंडित पाहूं पाहतात. त्यांच्या इच्छेविषयीं आमची सहानुभूति आहे. परंतु आमचें येवढेंच मत आहे कीं, त्या अर्थापत्तीसाठीं धडपड करण्यापूर्वीं जितक्या तयारीनें जाणें पडितांचें कर्तव्य होतें तितक्या तयारीनें पंडित गेले नाहींत व ऐतिहासिक अर्थ लावण्याची त्यांनीं फार घाई केली. अर्वाचीन पंडित जी गोष्ट विसरतात ती ही कीं, वेदवाक्यांचा अर्थ पूर्णपणें हातीं येण्यासाठीं तीं वेदवाक्यें यज्ञसंस्थेच्या भट्टींतून संस्कारिलीं गेलीं असल्यामुळें त्या संस्कारित स्थितींतील अर्थाचें व ते संस्कार करणा-या भट्टीचें, म्हणजे यज्ञसंस्थेचें, सहकारित्वानें व साकल्यानें ज्ञान झाल्याशिवाय मूळ अर्थाकडे पोहोंचतांच येणार नाहीं. यज्ञसंस्थेमुळें वाक्यें निवडलीं गेलीं, गोळा केलीं गेलीं, आणि तदनंतर त्यांचे अर्थ ठरविले गेले आणि त्यांचा अनुक्रम, व त्यांचे ऋषी हेहि निर्णित झाले. वेदवाक्यांचा अर्थ यज्ञसंस्थेच्या संदर्भानेंच समजून घेतला पाहिजे आणि तो अर्थ पूर्णपणें आपल्या हस्तगत करुन घेण्यासाठीं संहितेंतील यज्ञमूलक क्षेपांचें दूरीकरण करुन मूळ अर्थ काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सूत्रकारांपासून सायणाचार्यापर्यन्तचे ग्रंथकार वेदांचा यज्ञविषयकच अर्थ पहात होते व आम्हीहि ब-याच अंशीं तोच पहात आहों; तथापि त्यांच्या व आमच्या दृष्टींत फेर आहे. यज्ञांचें मूलस्वरुप व विकास हीं न पाहतां चालत आलेली यज्ञपद्धति कायम राखण्यासाठीं अर्थ लावण्याच्या प्रयोजनानें त्यांचे विचार व अर्थनिष्पत्तीची पद्धति हीं बद्ध झालीं होतीं. आम्हांस ऐतिहासिक पद्धतीनें यज्ञसंस्थेसाठीं माल गोळा झाला हें लक्षांत घेऊन तो माल तपासावयाचा आहे. ऋचांच्या मूळ अर्थांचें संशोधन होण्यापूर्वी ज्या यंत्रानें ऋचांवर परिणाम घडविला तें यंत्र संपूर्णपणें तपासल्याशिवाय मूळ अर्थाकडे जाऊं पाहणें म्हणजे मधली अत्यंत महत्त्वाची पायरी वगळणें होय. अर्वाचीन संशोधकांची ही अत्यंत महत्त्वाची पायरी चुकली असल्यामुळें त्यांचें झालेलें संशोधन योग्य आहे किंवा दुष्ट आहे हें देखील सांगणें कठिण आहे, व त्यांच्या सर्व संशोधनसमुच्चयाची आज किंमतहि सांगतां येणार नाहीं. ही पायरी ज्या संशोधनभागांत चुकली आहे तें संशोधन आम्हांस पुष्कळसें वगळणें भाग आहे. जी दृष्टि आम्ही पुढें मांडीत आहों त्या दृष्टीचा अवलंब करुन झालेल्या संशोधनाचा पुन्हां विचार करावा लागेल;  आणि त्यांत संशोधकांची एक पिढी खर्चीं पडेल. अर्वाचीन संशोधकांच्या पद्धतींतील महत्त्वाचीच पायरी गळाली असल्यामुळें ते बरोबर आहेत कीं चुकले हें सांगण्यापेक्षां पुन्हां स्वतंत्रपणेंच संशोधन केलेलें बरें. थोडयाबहुत सूचना प्राप्त होण्यासाठीं पूर्वगत संशोधकांचें अर्थनिर्णायक वाङ्मय वाचण्यास हरकत नाहीं अशी आमची भावी अभ्यासकांस शिफारस आहे.

चारहि वेदांचा व त्यांच्या ब्राह्मणांचा व आरण्यकांचा प्रतिपाद्य विषय यज्ञ होय असें अट्टहासानें वारंवार मीमांसाकार व सूत्रकार सांगत असतांहि वेदांचा ऐतिहासिक उपयोग करावयाचा तो यज्ञांगें समजण्यासाठीं करुन घ्यावयाचा अजीबात वगळून त्या साहित्याचा स्वतंत्र तर्‍हेनें अर्थ लावण्याची पाश्चात्त्यांची जी प्रवृत्ति झाली त्या प्रवृत्तीस दोन कारणें झालीं. एक तर यज्ञाचें प्राथमिक किंवा उत्तान स्वरुप वेदांवर परिश्रम करणा-या पाश्चात्त्यांपैकीं एकाहि ग्रंथकारास दूरस्थितीमुळें समजलें नाहीं; आणि दुसरी गोष्ट अशी कीं, वेदांचा प्रतिपाद्य विषय यज्ञ आहे असें सांगण्यांत भिक्षुकांची स्वार्थमूलक लटपट होती अशी पाश्चात्त्य ग्रंथकारांची प्रामाणिक समजूत झाली. संहितांतील मंत्रांचा सामाजिक स्थितीच्या ज्ञानासाठीं, भाषेच्या अगर भाषांच्या इतिहासाच्या ज्ञानासाठीं यूरोपीय पंडितांनीं उपयोग केला, भारतीय व यूरोपीय यांची एकत्र वसती असतां असलेलीं दैवतें, शब्द, आचार, विचार, भाषा, गीतें इत्यादि शोधण्यासाठीं तौलनिक पद्धतीनें अभ्यास करण्याकडे प्रवृत्ति ठेविली. या प्रकारच्या अभ्यासास अगोदर भारतीय संस्कृतीचा अभ्यास यज्ञांगानें केल्याशिवाय पूर्णता व निर्दोषता येणार नसली तरी तो अभ्यास या तयारीशिवाय मुळींच करतां येत नाहीं असें नसल्यामुळें, यज्ञसंस्था समजून घेतल्याशिवाय अत्यंत प्राचीन कालच्या स्थितीचें ज्ञान मिळविण्याची खटपट सुरु झाली.

यज्ञसंस्थेच्या अभ्यासाचा उपयोग युरोपीयांच्या पैतृक स्थितीच्या ज्ञानासाठीं अल्प, व भारतीय सामाजिक व सांस्कृतिक इतिहास समजून घेण्यासाठीं विशेष आहे. यामुळें यज्ञसंस्थेचा अभ्यास पाश्चात्त्य पंडितांस फारसा मनोरंजक नाहीं. यज्ञासाठीं ज्या ऋचा वापरण्यांत आल्या त्यांचा क्रियेशीं अनुरुप अर्थहि नसे. क्रियेशीं बाह्य स्वरुप जुळवितां आल्यास बरें अशा वृत्तीनें मंत्रांचा विनियोग झालेला दिसतो. असो.

यज्ञसंस्थेचा इतिहास निरनिराळीं संहितीकरणें कोणत्या यज्ञविषयक म्हणजे भिक्षुकी कारणामुळें झालीं या प्रश्नावर प्रकाश पाडतो. प्रथम संध्यांच्या संहिता ज्या स्वरुपांत आहेत त्या स्वरुपावर म्हणजे संहितीकरणावर विचार करुं.

संहितीकरणाची चळवळ कोणच्या कालांत झाली असावी यांचें दुसरी एक प्रसिद्ध रायकीय घडामोड घेऊन तिच्याशीं सापेक्षतेनें स्पष्टीकरण पुढें केलें आहे. येथें यज्ञसंस्थेच्या इतिहासाच्या दृष्टीनें कोणत्या कालांत संहितीकरण घालतां येईल हा एक महत्त्वाचा प्रश्न संक्षेपतः पाहूं.

१. संहिता ज्या वेळेस झाल्या त्या वेळेस सोमयाग हा पशु आणि इष्टी यांनीं मिश्रित झाला होता आणि ऋचांच्या संहितीकरणाचा पहिला प्रयत्न सोमयामूलक असावा.

२. संहितीकरणाच्या काळीं घरोघरचें अग्निहोत्र नष्ट झालें होतें, सोम दुर्मिळ होत होता.

३. सत्रें बंद झालीं होतीं; कां कीं, त्यांचें स्वरुप कांहीं यजूंच्या संहितांत नाहीं, आणि तैत्तिरीय संहितेंत देखील माहिती अत्यंत त्रोटक आहे.

४. यज्ञ करणा-या ऋत्विजांमध्यें तट पडले असून ते तट अध्वर्युप्रमुख होते.

५. अथर्ववेदी लोकांविषयीं विरुद्धभाव नाहींसा झाला होता व त्यांसहि त्रैविद्यांच्या यज्ञसंस्थेंत स्थान मिळालें होतें.

याविषयीं अधिक विवेचन पुढें येईल.

यज्ञसंस्थेचा इतिहास आणि संहितीकरण याचा निकट संबंध आहे हें स्पष्ट केलेंच आहे.

यज्ञसंस्था समजावून घ्यावयाची आणि तिच्या अनुषंगानें संहिता व ब्राह्मणें समजावून घ्यावयाचीं. वेदांचा प्रतिपाद्य विषय यज्ञ हा असल्यामुळें वेदांची घटना समजण्यासाठीं यज्ञसंस्थेची वृद्धि व तिचा संपूर्ण इतिहास जेव्हां चांगला लक्षांत येईल तेव्हांच वेदांची घडणहि समजेल. कोणता यज्ञ कसा आणि केव्हां उत्पन्न झाला, निरनिराळ्या शाखांचे लोक कोणते यज्ञ करीत व कोणत्या यज्ञाची माहिती कोणत्या ग्रंथांत आहे, याचें सूक्ष्म ज्ञान तर अवश्य आहेच, पण अग्निष्टोमासारखे यज्ञच तयार कसे झाले, उत्तरक्रतु कसे बनले, सत्रें कशीं तयार झालीं यांची जेव्हां माहिती अवगत करुन घ्यावी, तेव्हांच प्रत्येक कार्यप्रयोजनामुळें ग्रंथावर कसे कसे परिणाम झाले हेंहि समजावयास लागेल, आणि यज्ञयोजकांचे सहायक जे मंत्रांचीं व ब्राह्मणवाक्यांचीं स्वतंत्र गांठोडीं बांधणारे संहिताकार ते कोणत्या हेतूनें प्रेरित झाले याचा पत्ता लागेल. कोणत्याहि कल्पनांच्या म्हणजे रचनांच्या इतिहासांत असें आढळून येतें कीं, सामान्य गोष्टीस अनेक आनुषंगिक गोष्टी चिकटून मोठी कल्पना बनते. त्याचप्रमाणें एखादी मोठी प्रचंड कल्पना तयार करतांना तिचीं अंगें म्हणून अनेक कल्पना तयार होतात. पुढें, मोठया कल्पनेच्या अंगानें ज्या जन्मास आल्या तथापि ज्यांचें अस्तित्व पृथक्पणें शक्य आहे अशा कल्पना स्वतंत्रपणें अस्तित्वांत येतात. यज्ञसंस्थांची जी वाढ झाली ती या दोन्ही प्रकारांनीं होत गेली काय ? तसें असल्यास ती कशी होत गेली याचें प्रथम आकलन करुन नंतर या दोनहि प्रकारांचा ऋचांच्या आणि वाक्यांच्या संचयावर आणि त्यांच्या मांडणीवर परिणाम कसकसा होत गेला हें पाहिल्याशिवाय वेदांची घटना कशी होत गेली हें सांगणें साहसाचें आणि इतिहासशास्त्रदृष्ट्या सर्व प्रकारें गर्ह्य आहे असें आम्हीं समजतों; एवढेंच नव्हे तर आतांपर्यंत झालेल्या संशोधनाच्या शुद्धतेविषयीं संशय व्यक्त करितों.

यज्ञसंस्थेचा इतिहास जितका क्लिष्ट व कोरड्या नियमांनीं आणि बेचव विधींनीं भरला आहे तितकाच तो एकदां क्लिष्टतेची हद्द ओलांडून गेलें असतां उपयुक्त व मनोरंजक आहे. यज्ञेतिहासज्ञानानंतरच वेदांच्या घटनेचा इतिहास ज्ञेय होईल ही गोष्ट जरी बाजूला ठेवली तरी दुस-या एका दृष्टीनेंहि यज्ञसंस्थेचा अभ्यास करणें अवश्य आहे. ज्याप्रमाणें एखादी प्रचंड आणि गोंधळांत पाडण्यास समर्थ इतक्या अवयवांनीं युक्त अशी इमारत पाहून ती इमारत कशी काय घडविली याचें ज्ञान कल्पकास हितावह होईल, त्याचप्रमाणें यज्ञसंस्थेचें ज्ञानहि प्रचंड कल्पनांचा अवगम करुन घेणा-यासहि हितावह होईल. क्रिया करणा-या अनेक अवयवांनीं युक्त असें साम्राज्य असो किंवा एखादी युद्धासारखी क्रिया करण्याकरितां बनवलेली घटना असो अथवा दुसरा कोणताहि एखादा मोठा कारभार असो, या सर्वांची घटना करण्यामध्यें सामान्यतः एकाच प्रकारचीं कार्यतत्वें दृग्गोचर होतात. अगडबंब विधी स्वर्गास नेवोत अथवा न नेवोत, यज्ञांत मारलेले पशू स्वर्गांत जावोत अथवा न जावोत, एखाद्या मोठ्या प्रदर्शनानें त्याचें सांगितलेलें इष्टफल जें औद्योगिक अभिवृद्धि तें प्राप्त होवो अगर न होवा तथापि कर्तृत्वाची, हुषारीची व दक्षतेची ओळख पटविण्यास हे सर्व कृतिसमुच्चय उपयोगीं पडतात.

मनुष्याचें अगर समाजाचें हित साधावयाचा बाणा अगर बहाणा करणारे जे जे विधी सर्व जगांत उत्पन्न झाले आहेत त्यांमध्यें विस्ताराच्या अगर वैविध्याच्या दृष्टीनें भारतांतील यज्ञसंस्थेच्या सदृश दुसरे कोणतेच नाहींत. ज्याप्रमाणें तेल विकणा-या स्टॅन्डर्ड आईल कंपनीची घटना व्यापारी विद्येचा कळस होय, ज्याप्रमाणें ब्रिटिश साम्राज्य ही मोठी शासनसंस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नाचा कळस होय, त्याचप्रमाणें पारमार्थिक कार्याकरितां जे नैमित्तिक विधी आजपर्यंत जगांत करण्यांत आले त्यांमध्यें यज्ञसंस्थेंतील अग्निष्टोम, महाव्रत किंवा सत्रें हीं अत्युच्च होत, आणि या बाबतींत जगास आम्हीं कांहीं तरी अपूर्व करुन दाखविलें म्हणून यज्ञसंस्थेबद्दल जरी नसला तरी तिच्या कर्त्याबद्दल आदर प्रत्येक नास्तिक भारतीयासहि वाटलाच पाहिजे. हें विधान यज्ञसंस्थेची अधिक माहिती झाल्यानंतर स्पष्ट होईल.

वेदकालीन स्थिति समजावयास यज्ञसंस्थेचें ज्ञान अवश्य आहे ही गोष्ट संस्कृत ग्रंथकारांनीं वारवार पुढें मांडली आहे, तथापि यज्ञाभ्यासपूर्वक वेदाभ्यासाकडे लोकांचें लक्ष जावें तितकें अजून गेलें नाहीं. पाश्चात्त्य पंडितांस यज्ञविषयक वाङ्मय वाचून एक तर्‍हेची जुगुप्सा उत्पन्न झाली आहे, आणि ब्राह्मणग्रंथ वाचले आणि त्यांतील वडाची साल पिंपळास लावणारी विचारपद्धति दिसूं लागली म्हणजे पुष्कळ लोकांस असें वाटूं लागतें की, हे ग्रंथ लिहिणारे लेखक लिहितांना शुद्धीवर तरी होते किंवा नव्हते. एका पंडितानें तर असे उद्गार काढले आहेत कीं, मनुष्यप्राण्यानें या ग्रंथांत जेवढा बाष्कळपणा केला आहे तितका बाष्कळपणा केल्याचें उदाहरण जगांत कोठेंहि नसेल. जगदुत्पत्तीविषयीं किंवा दुस-या कोणत्याहि विषयासंबंधानें परस्परसंगति ठेवण्याचा किंतु मनांत यत्किंचितहि न बाळगतां लिहिलेली माहिती, यज्ञांतील कोणचा विधि कसा केल्यामुळें जय आला, पराजय कोणता विधि कसा चुकीनें केला म्हणून उत्पन्न झाला, याविषयीं बुद्धीस न पटणा-या जागोजाग आलेल्या गोष्टी, हें सर्व पाहून पाश्चात्त्य पंडित तर अगदीं चिडून गेले. लोकांच्या बुद्धीस पटेल अशा विचाराचा पूर्ण अभाव यज्ञाचें समर्थन करणा-या या वाङ्मयांत जितका दिसतो तितका दुसरीकडें कोठेंच दिसत नाही. ब्राह्मण वाङ्मय सोडून आरण्यकांकडे किंवा उपनिषदांकडे वळलें म्हणजे बाष्कळ विचारांच्या तडाक्यांतून सुटून आतां म्हत्त्वाच्या वाङ्मयाकडे आपण जाऊं लागतों असें वाटून पंडितांस आह्लाद वाटूं लागतो आणि उपनिषदांत मन अधिक रमतें. ज्यलियस एगेलिंग यानें आपल्या शतपथ ब्राह्मणाच्या प्रस्तावनेमध्यें दाखविलें आहे कीं, यज्ञसंस्थेचा उपयोग ब्राह्मणांचा धंदा कठिण बनविण्यास आणि त्या वर्गात स्थान मिळविणें कठिण करण्यास तेवढा झाला. यज्ञकर्म शिकणें फार कठिण झालें. ऋकसंहितेंतील सूक्तें कवींनीं बनविलीं पण कविता करणा-यांचें कालांतरानें महत्त्व कमी झालें. समाजांतील महत्त्व पुढें ईश्वरास आळवण्यासाठीं कविता करणा-या कवींकडून उठून जुन्या कवितेचा उपयोग यज्ञाकडे करणा-या यज्ञकर्त्याकडे गेलें. यज्ञ करणें ही गोष्ट कठिण झाली होती, ते करण्यासाठीं पुष्कळ दिवसांची उमेदवारी लागत असे. कां कीं, महिना महिना वर्ष वर्ष करावीं लागणारीं सत्रें करण्यासाठीं पूर्वतयारी बरीच करावी लागावयाची. यज्ञसंस्थेंतील अत्यंत साधा विधि जो दर्शपूर्णमास त्याचा प्रयोग म्हणजे विशेषतः आध्वर्यव शिकण्यास सहा एक महिने लागतात आणि या प्रकारच्या पद्धतीनें परमार्थासाठीं स्वतः उद्यम करणें हें व्यक्तीस अशक्य होऊं लागलें आणि परमार्थसाधनासाठीं म्हणजे स्वर्गासाठीं प्रयत्न जर कोणास करावयाचा झाला तर त्यास तो ब्राह्मणांच्या साहाय्यावांचून अशक्य झाला. यामुळें यज्ञसंस्थेचा जर कांहीं उपयोग झाला असेल तर तो भिक्षुकांचें महत्त्व वाढविण्यापुरताच झाला, त्याचा दुसरा कांहीं एक उपयोग झाला नाहीं, अशा प्रकारची विचारमालिका तयार होत गेली. पाश्चात्त्य पंडितांनीं या प्रकारची आपली समजूत करुन घेतल्यामुळें त्यांस यज्ञसंस्थेचें खरें सामाजिक स्वरुप लक्षांत आलें नाहीं. यज्ञांचा उपयोग ब्राह्मणांचें महत्त्व वाढविण्याकडे झाला नाहीं असें नाहीं. तथापि या उपबृंहित झालेल्या यज्ञसंस्थेचा परिणाम समाजाच्या विकासाकडे झाला एवढेंच नव्हे, तर त्यापासून अनेक तर्‍हेचे ज्ञानविषयक आणि समाजघटनाविषयक फायदे झाले. त्यांच्याकडे संशोधकांचें लक्ष गेलें नाहीं. आपल्याकडच्या पंडितांचें पांडित्य बरेंचसें पाश्चात्त्य विचारसंप्रदायाच्या धोरणानेंच चालत असल्यामुळें आणि यज्ञसंस्थेच्या अभ्यासकाठिन्यामुळें आपल्या लोकांनीं देखील याचा चांगला विचार केला नाहीं. महाराष्ट्रांतील पंडितांपैकीं यज्ञांकडे सहानुभूतिपूर्वक दृष्टीनें पाहून त्यांतील मर्म समजावून घेण्यासाठीं जर कोणी प्रयत्न केला असेल तर तो कै. महादेव मोरेश्वर कुंटे यांनीं केला. त्यांच्या भारतीय संस्कृतीच्या इतिहासांत (व्हिसिसिटयूडस् ऑफ इंडियन सिविलिझेशन) त्यांनीं यज्ञांचें सामाजिक स्वरुप दाखविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला आहे. असो.

यज्ञसंस्थांचें मर्म समजावून घेण्यासाठीं एक गोष्ट लक्षांत घेतली पाहिजे ती ही कीं, ब्राह्मणांनीं यज्ञसंस्था वाढविली ही केवळ आपल्या महत्त्वासाठीं वाढवावयची म्हणून वाढविली असें नाहीं. जे धर्म सर्वसामान्य असतील त्यांत ब्राह्मणांनीं स्वेच्छेनें हवेतसे फेरफार करणें शक्य नव्हतें. यज्ञसंस्था त्रैवर्णिकांची होती. सर्व वर्ण अत्यंत प्राचीन कालापासून यज्ञ करीत होतेच. उपासनेंत ब्राह्मणांनीं केवळ लोभमूलक फेरफार केले असतें तर इतर वर्णांनीं तसे फेरफार चालूं दिले नसते. सुशिक्षितांची लौकिक भाषा आणि यज्ञासाठीं वापरली जाणारी भाषा यांत फारसें अंतर पडलें नव्हतें, आणि जुन्या उपासनेंत ब्राह्मणांनीं केवळ पदरच्या गोष्टी केवळ स्वार्थासाठीं घातल्या असत्या तर त्यांस जनतेची फारसी सहानुभूति नसती. ब्राह्मणांनीं ही यज्ञसंस्था इतर लोकांस बनविण्यासाठींच वाढविली असती तर ते स्वतः बनले गेले नसते. प्रकार पहावा तर उलट आहे. यज्ञ करणारी मंडळी म्हणजे यज्ञांतले यजमान ब्राह्मणच पुष्कळ असत. ते आपल्या गळ्याभोंवतीं पुरोहितवर्गानें तयार केलेलें लिगाड कशासाठीं अडकावून घेते ? क्षत्रियांनीं यज्ञांस विरोध करावयाच्या ऐवजीं यज्ञ करण्यामध्यें चुरस दाखविली आहे. या प्रकारच्या परिस्थितीमुळें आपणांस यज्ञसंस्था जर समजावून घ्यावयाची असेल तर ब्राह्मणांनीं केवळ स्वार्थासाठीं ही संस्था वाढविली या प्रकारच्या मतानें बुद्धीस विकार होऊं न देतां तिचा अभ्यास केला पाहिजे.

पुढे वाचा:वेदाभ्यास आणि यज्ञसंस्था

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .