यज्ञसंस्थेच्या इतिहासाकडे दुर्लक्ष केल्यामुळें जे दोन इतिहास पाश्चात्त्यांस मुळींच समजले नाहींत त्यांपैकीं एक इतिहास म्हटला म्हणजे सामाजिक होय, दुसरा न समजलेला इतिहास संहितीकरणाचा होय. वाङ्मयाच्या घटनेचा इतिहास लावतांना वापरावयाची पद्धति म्हटली म्हणजे शेवटीं झालेल्या क्रिया अगोदर शोधीत मागें मागें जात जात जावयाचें, ही होय. आजच्या सामाजिक स्थितीपैकीं ज्या गोष्टींचीं मुळें या मंत्ररचनाकालापासून संहितीकरणापर्यंतच्या कालांत शोधावयाचीं त्या सामाजिक गोष्टींचा निर्देश प्रथम केला पाहिजे. भारतीय समाजघटनेंच्या इतिहासाच्या प्राचीन भागांसंबंधानें ज्या मुख्य गोष्टी आपणांस स्पष्ट झाल्या पाहिजेत त्या येणेंप्रमाणें.

१. चातुर्वर्ण्याची कल्पना.
२. ब्राह्मण जातीची स्थापना व तींत झालेले भेद.
३. गोत्रें, प्रवर इत्यादि संस्थांची स्थापना.
४. प्रजापतिसंस्था अथवा पितृपुत्रपरंपरा.
५. मातृकन्यापरंपरा.
६. यूथावस्था.
७. गृहस्थधर्माची स्थापना.

या अनेक गोष्टींपैकीं पहिल्या तीन गोष्टींचें विवेचन मुख्यत्त्वेंकरुन वैदिक वाङ्मयाच्या साहित्यानें होईल आणि इतर विषयांच्या अभ्यासास महाभारतादि ग्रंथ उपयोगीं पडतील. यासाठीं या तीन सामाजिक संस्थांचा अभ्यास वेदाभ्यासाशीं जोडून देतां येईल.

वरील तीन सामाजिक संस्थांचा परिणाम वैदिक वाङ्मयावर झाला आहे तसा इतर चार संस्थांचा झाला नाहीं.

ब्राह्मणजातीच्या इतिहासाशीं वैदिक इतिहासाचा कसा संबंध येतो हें ब्राह्मणजातीच्या आजच्या आणि कालच्या स्थितीकडे पाहिलें असतां सहज समजून येणार आहे.

सर्वांत अतिशय परिचित वेदशाखा म्हटल्या म्हणजे ऋग्वेदाची शाकलशाखा, कृष्णयजुर्वेदाची (आपस्तंब आणि सत्याषाढ सूत्रांची) तैत्तिरीयशाखा आणि शुक्लयजुर्वेदाच्या माध्यंदिन व काण्वशाखा, होत. या शाखांचें लोक सर्वत्र आहेत, तथापि काण्वशाखेचे लोक महाराष्ट्राच्या पश्चिम भागांत कमी आहेत.

वरील शाखांशिवाय इतर शाखांचेहि लोक महाराष्ट्रांत आढळतात. मैत्रायणीय शाखेचे लोक भडगांव येथें दिसतात. मैत्रायणीय हे कृष्णयजुर्वेदी आहेत. भंडारा येथील एका मैत्रायणीय शाखेच्या ब्राह्मणानें (रा. रा. विष्णुतपंत जकातदार यांनीं) आपली मुलगी क-हाडयास दिली असून    क-हाड्याची मुलगी आपल्या मुलास केली आहे. चरक शाखेची वस्ती मध्यप्रांतांत विशेष आढळून येते. पुष्कळ अज्ञानी लोकांस चरक ही शाखाच ठाऊक नसल्यामुळें त्यांच्या ब्राह्मण्याविषयीं देखील कधीं कधीं संशय प्रदर्शित केला गेला आहे. चरक हे कृष्णयजुर्वेदी ब्राह्मण आहेत. चरकांतील भेद जो कठ त्या कठांची संहिताहि प्रसिद्ध आहे. चरकांमधील एक प्रसिद्ध घराणें म्हणजें बुटींचें होय. या घराण्याशीं एका कृष्णयजुर्वेदी कोंकणस्थ घराण्यानें देखील संबंध केला आहे.

याशिवाय एक महाराष्ट्रांतील अल्पसंख्याक शाखा म्हणजे जाबालांची होय. या शाखेस लौकिक व्यवहारांत नार्मद म्हणजे नर्मदाकांठचे ब्राह्मण म्हणतात. कांहीं नार्मद हिंदी बोलणारे देखील आहेत. या जाबाल शाखेचा संबंध उपनिषदांतील सत्यकाम जाबाल याच्याशीं जोडण्यांत आलेला आहे आणि कोणी जबलपूर या शहराशीं देखील संबंध जोडतात. कठाळे, पांचखेडे, वगैरे आडनांवें या जातींत आढळतात.

सर्व क-हाडे ब्राह्मण ऋग्वेदी आहेत. तसेंच कुडाळदेशकर आणि सारस्वत हे दाक्षिणात्य गौड देखील ऋग्वेदीच आहेत. देशस्थ ब्राह्मणांत ऋग्वेदी, कृष्णयजुर्वेदी आणि शुक्लयजुर्वेदी या तीनहि प्रकारचे ब्राह्मण आढळतात. आणि कोंकणस्थांमध्यें ऋग्वेदी आणि हिरण्यकेशी (कृष्णयजुर्वेदी) हे दोन्ही प्रकार आढळून येतात. पळशे आपणांस माध्यंदिन ब्राह्मण म्हणवितात. माध्यंदिन ब्राह्मणांपैकीं कांहींनीं यांच्याशीं लग्नव्यवहारहि केला आहे.

महाराष्ट्रांत कांहीं कांहीं ठिकाणीं अथर्ववेदी लोकांची वस्ती असल्याचें सध्यांहि आढळून येतें. मात्र इतर वेदानुयायांच्या तुलनेनें अथर्ववेदीयांचें प्रमाण फारच अल्प आहे. मराठी ग्रंथकार ज्योतिपंत दादा महाभागवत हे अथर्ववेदी होते. सातारा शहरापासून ४ मैलांवर कृष्णा व वेण्णा यांच्या संगमाजवळ ‘माहुली’ या क्षेत्राच्या ठिकाणीं १५।२० वर्षापूर्वीं नागेशभट्ट या नांवाचा एक आथर्वण वैदिक ब्राह्मण राहत होता व तो स्वशाखीय लोकांचें पौरोहित्य करीत असे. सातारा व वांई यांच्या दरम्यान कृष्णाकाठीं ‘चिंधोली’ या खेड्यांत असणारे जोशी कुलकर्णी अथर्ववेदी आहेत व त्यांचें गोत्र ‘भालंदन’ आहे. यांच्या घरचीं धर्मकृत्यें त्यांच्या शाखेप्रमाणें पूर्वोक्त नागेशभट्ट हे करीत. हल्लीं त्यांची सर्व कृत्यें ऋग्वेदी लोकांकडूनच करवून घेतलीं जातात. यांच्यापैकीं हल्लीं हयात असलेल्या एका गृहस्थास आपल्या शाखेची संध्या वगैरे येत आहे असें म्हणतात परंतु बाकीचे आथर्वण ऋग्वेदी लोकांचीच संध्या पाठ करुन आपला नित्यविधि पार पाडतात. श्राद्धामध्यें श्राद्धकर्त्यानें आपल्या पितृत्रयीचा उच्चार करावा लागतो हा साधारण नियम आहे, परंतु अथर्ववेदीय लोक बाप आजा, व पणजा, अशा क्रमानें त्रयीचा उच्चार न करतां पणजा, आजा, व बाप अशा क्रमानें करीत असल्याची माहिती मिळते. पुणें प्रांतात शिरवळ गांवच्या आसपास कांहीं गांवीं अथर्ववेध्यांची वस्ती असल्याचें समजतें. त्याचप्रमाणें सातारा जिल्ह्यापैकीं खटाव तालुक्यांतहि अथर्ववेदीयांची वस्ती असल्याचें कळतें. खटावकडील अथर्ववेदीयांनां ‘आम्ही अथर्ववेदी आहों’ या पलीकडे हल्लीं कांहींच माहिती नाहीं. हे लोक आतां जवळजवळ ऋग्वेदी लोकांतच सामील झाले आहेत म्हटलें तरी चालेल. सुमारें २५ वर्षांपूर्वीं ऋग्वेदी (देवस्थ) व अथर्ववेदीयांच्यामध्यें परस्पर फक्त रोटीव्यवहार होई परंतु बेटीव्यवहार बहुधा होत नसे. देशस्थ ऋग्वेदी अडचणीच्या प्रसंगीं गौणपक्ष म्हणून अथर्ववेदीयांची मुलगी करीत, परंतु आपली मुलगी अथर्ववेदीयांच्या घरीं देण्यास मुळींच तयार नसत. परंतु हल्लीं हाहि प्रतिबंध फारसा राहिला नाहीं. ऋग्वेदी देशस्थांनीं आथर्वणांच्या घरीं आपली मुलगी दिल्याचींहि उदाहरणें हल्लीं थोडींतरी दृष्टीस पडतात. अशा प्रकारें ऋग्वेदीयांनीं आथर्वणांच्या घरीं आपली मुलगी दिल्याचें एक उदाहरण चिंधोली गांवांतच आढळतें. अथर्ववेदीयांचा आथर्वणपणा कमी कमी होत जाऊन ते लोक देशस्थ ऋग्वेदीय पुरोहिताकडून आपलीं गृहकृत्यें सररहा करुन घेऊं लागले यामुळें ऋग्वेदी व आथर्वण यांच्या मधील परस्पर वैषम्य कमी होऊन आतां बरोबरीनें रोटीबेटीव्यवहार करावयास त्यांनां हरकत वाटेनाशी झाली असावी असें दिसतें. आज जातिदृष्ट्या अथर्ववेदी ही निराळी जात राहिलीच नाहीं. देशस्थ जातींतील कांहीं कुलें अथर्ववेदी आहेत असें म्हणण्यास हरकत नाहीं. ठाणें जिल्ह्यांत थोडेसे सामवेदी जातिरूपानें आहेत.

ब्राह्मणांच्या निरनिराळ्या शाखांचा आणि कुलांचा हिशोब घेण्यास पंढरपूर नाशिक येथील भिक्षुकांच्या वह्या धुंडाळल्या पाहिजेत. तें कार्य झालें म्हणजे निरनिराळ्या शाखांच्या अस्तित्वासंबंधानें आणि पैतृक शाखा सोडून निराळ्या शाखेचा परिग्रह करणें या प्रवृत्तीमुळें किती शाखा नष्ट झाल्या यासंबंधानें बराच शोध लागणें शक्य आहे.

शाखा म्हणजे अभ्यासाचा विशेष प्रकार. त्यामुळें जात निराळी पडते असें मुळींच नाहीं. ऋग्वेदी म्हणजे ज्यांचे पूर्वज हौत्रकर्माचें शिक्षण घेऊन यज्ञामध्यें होत्याचें काम करावयास योग्य होते ते. शाखांचा अर्थ जरी एवढाच तरी शाखांमुळें जाती पडल्या हें खरें. काण्व, माध्यंदिन, मैत्रायणीय. जाबाल, चरक इत्यादि सूत्रांच्या मंडळींनीं आपल्या निराळ्या जाती बनविल्या आहेत आणि ते स्वशाखीयांखेरीज इतरांशीं लग्नव्यवहार करीत नाहींत. आपस्तंब आणि हिरण्यकेशी हे मात्र ऋग्वेदीयांशीं लग्नव्यवहार करतात.