प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ११ वें
विषयांतर-वेदोक्त इतिहास व आख्यायिका

अज्ञात विषयामध्यें वाचकांस नेऊन सोडण्याचे प्रकार दोन आहेत. एक, काय सिद्ध झालें असेल तें अधिकारी वाणीनें सांगून त्यास पुढें अवश्य पडेल तेथें प्रमाणे द्यावयाचीं, व दुसरा प्रकार म्हणजे वाचकांस ज्ञातापासून अज्ञाताकडे हळूहळू न्यावयाचें. दोन्ही प्रकार कधीं कधीं लेखकास अवलंबावे लागतात. वेदांचा इतिहास समजावून देण्यासाठीं यज्ञसंस्थेचा स्थूल इतिहास देणें अवश्य झालें. यज्ञसंस्थेचा इतिहास सांगतांना प्रत्येक विधानास प्रमाणें दिलीं नाहींत. तथापि मुख्य मुख्य विधानें मुबलक पुरावा पुढें मांडून सिद्ध करणें अवश्य आहे. यज्ञांच्या इतिहासाची स्थूल रूपरेषा दिली तरी यज्ञेतिहासविषयक आख्यायिकांचा परामर्श घेतां आला नाहीं. आतां त्या आख्यायिकांकडे वळलें पाहिजे. यज्ञविषयक आख्यायिका ह्या ब्राह्मण ग्रंथांतील एकंदर कथांचा एक महत्त्वाचा भाग आहेत, यासाठीं केवळ यज्ञसंस्थेची चौकशी थांबवून ब्राह्मणांतील ''इतिहासपुराणें'' व आख्यायिका यांजकडे आतां वळतों. आपणांस सर्व इतहिास ज्ञेय आहे त्या अर्थीं प्रथम ज्या आख्यायिकांस प्राचीन इतिहास म्हणून समजत असत तो येथें मांडण्यास हरकत नाहीं.