प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ११ वें
विषयांतर-वेदोक्त इतिहास व आख्यायिका

तैत्तिरीय संहितेंतील आख्यायिका.- देव आणि अग्नि.- देव व दैत्य एकदां भांडत होते. तेव्हां दैत्याकडून आपला पराभव झाला तरी आपली संपत्ति व ऐश्वर्य सुरक्षित रहावें म्हणून देवांनीं आपलें सर्व ऐश्वर्य अग्नीच्या ठिकाणीं ठेविलें. त्या ऐश्वर्याचा अग्नीस लोभ सुटून अग्नि देवांपासून दूर निघून गेला. परंतु देवांनीं दैत्यांचा पराभव केला व अग्निपासून आपलें ऐश्वर्य परत घेण्याची त्यांस इच्छा झाली, व त्यांनीं अग्नीचा शोध लावून त्याजपासून आपली ठेव परत घेण्याची पराकाष्ठा केली. अग्नि रडूं लागला, व त्या वेळीं त्यास 'रूद्र' संज्ञा प्राप्त जाहली. त्या वेळीं खालीं पडलेल्या अश्रूंपासून रूप्याची उत्पत्ति झाली म्हणून रूपें ही धातु दानकर्मास अप्रशस्त मानतात. अशा रीतीनें देव जेव्हां अग्नीपासून सर्व ऐश्वर्य परत घेऊं लागले, तेव्हां अग्नीनें त्यापैकीं कांहीं वांटा देण्याबद्दल प्रार्थना केलीं देवांनीं 'पुनराधान' हें अग्नीस दिलें व नंतर त्याच्या योगानें पूषन्, त्वष्ट्ट, मनु, धातृ, वगैरेनीं यज्ञकर्मे करून आपली भरभराट करून घेतली. (तै.सं.१.५,१)

दिवस हा देवांनां दिला होता व रात्रीवर असुरांचीं मालकी होती. परंतु देवांच्या सर्व ऐश्वर्यासह दैत्यांनीं रात्रींत प्रवेश केला. तेव्हां रात्र ही अग्निदेवतेची, गुरें हीं अग्नीचींच असल्यामुळे अग्नीची स्तुति करण्याचा देवांनीं विचार केला. देवांनीं अग्नीची स्तुति केल्यावर, अग्नीनें देवांची गुरें, संपत्ति वगैरे त्यांस असुरांपासुन मिळवून दिली. (तै.सं.१.७,१)

सूर्याला भूमीवर उदय पावल्यावर मृत्यूचें फार भय वाटलें, कारण भूमीवरील प्रत्येक वस्तु नाशवंत आहे. तेव्हां त्यानें अग्नीची स्तुति केली व तो अमर्त्य झाला.

इडा.- देवांनीं यज्ञापासून स्वर्ग व अमृतत्व यांचें दोहन केलें. यज्ञानें असुरांपासून सर्व ऐश्वर्य मिळवलें व म्हणूनच ऐश्वर्यविहीन झालेल्या असुरांचा पराभव झाला. यज्ञकर्मांनी देवांनीं मात्र स्वर्ग मिळवला. त्या वेळीं मनु हा यज्ञकृत्यें करीत होता. एकदां इडा मनूकडे गेली, तेव्हां देवांनीं प्रत्यक्षपणें व असुरांनीं अप्रत्यक्षपणें इडेस आह्वान केलें. तेव्हां ती देवांकडे गेली. त्यामुळें एकंदर प्राणीहि देवांकडे गेले व त्यांनी असुरांचा त्याग केला. (तै.सं.१.७,१)

प्राजापत्य याग.- प्रजापति प्रथम एकटाच होता. त्यानें प्रजोत्पत्तीची इच्छा करून आपल्या शरीरांतील मांस काढून त्याची अग्नींत आहुति दिली. तेव्हां अग्नीपासून श्रृंगविहीन असा बोकड उत्पन्न झाला. (तै.सं.१.७,१)

प्राजापतिनें प्रजोत्पत्ति केली. उत्पन्न झालेले सर्व प्राणी वरूणाकडे गेले, तेव्हां प्रजापतीनें त्यांस परत बोलविलें, परंतु वरूण कबूल होईना. नंतर प्रजापतीनें जेव्हां एक पांढरा खूर असलेल्या असा कृष्ण पशु त्यास देण्यांचें ठरविलें तेव्हां वरूणानें सर्व प्राण्यांची मालकी सोडली.

स्वर्भानु नामक असुरानें सूर्यास तमाच्या योगानें भोंसकलें, तेव्हां त्याबद्दल देवांनीं भरपाई मिळावी अशी इच्छा व्यक्त केली. देवांनीं प्रथम ज्या अंधकाराचा नाश केला त्याचा एक काळा मेंढा बनला, दुस-या खेपेस तेजस्वी वर्णाचा व तिस-या खेपेस पांढरा बनला. नंतर जबडयाच्या वरच्या हाडकापासून एक मेंढी उत्पन्न झाली, तेव्हां देवांनीं त्या मेंढीची आदित्याकरितां आहुति दिली. त्यामुळें पूर्वीं जी ही भूमि अतिशय लहान व वृक्षलताविहिन अशी होती तीच पुष्कळ रूंद झाली व तिच्या पृष्ठभागावर मोठेमोठे अजस्त्र वृक्ष, लता इत्यादींची विपुलता उत्पन्न झाली. (तै.सं.१.१,२)

वामनावतार.- देवदैत्यांचे ह्या तिन्हीं लोकांकरितां भांडण झालें, तेव्हां विष्णूनें आपल्या वामन स्वरूपाचीं आपणांस आहुति दिली, व अशा रीतीनें तीनहि लोक जिंकले. (तै.सं.२.१,३)
इन्द्र व वृत्त.- इंद्राने वृत्रास मारलें, तेव्हां वृत्र सोळा रज्जूंनीं जखडलेला असा पडला होता. तेव्हां वृत्राच्या डोक्यापासून विदेह देशांतील गाई उत्पन्न झाल्या त्या गाईंपाठीमागून एक बैल धावूं लागला. तेव्हां इंद्रानें कृष्णवर्णयुक्त मानेचा बैल पाहून अग्नीस समर्पण केला. तेव्हां अग्नीनें वृत्राच्या रज्जूचे १६ भाग जाळून टाकले व अशा रीतीनें त्यानें इंद्राच्या ठिकाणीं तेज व शक्ति उत्पन्न केली. (तै.सं.२.१,४)

सोमासक्षय.- प्रजापतीला तेहतीस मुली होत्या. त्या सर्वांची त्यानें सोमराजाशीं लग्नें लावून दिलीं. परंतु सोम हा सर्वांपेक्षां रोहिणीवर फार प्रेम करून तिच्या समागमांत सुख मानीत असे. त्यामुळें इतर बहिणींनां फार राग आला व त्या सर्व प्रजापतीकडे निघून आल्या, तेव्हां सोम हा त्यांच्यामागें आला व त्यांस परत देण्याबद्दल प्रजाप्रतीची प्रार्थना करूं लागला. तेव्हां प्रजापतीनें सोमास ''मी सर्वांवर सारखी प्रीति करून सर्वांच्या समागमांत राहीन'' अशी शपथ घेण्यास सांगितलें, व सोमानें त्याप्रमाणे केल्यावर सर्व मुलीं पुनःत्याच्या स्वाधीन केल्या. परंतु पुनः तो एकट्या रोहिणीबरोबरच क्रीडा करूं लागला. तेव्हां त्यास एक वाईट प्रकारचा रोग (राजयक्ष्मा) झाला. ह्यामुळेंच राजांस स्त्रियांपासून होणा-या रोगास सदरहू नांव आहे. अशा रीतीनें रोगपीडित सोमराजा सर्व स्त्रियांकडे गेला व त्यानें त्यांची क्षमा मागितली. तेव्हां त्यांनीं आपणा सर्वांवर सारखी प्रीति करण्याचें त्याजकडून कबूल करून घेऊन, आदित्यदेवांनां रोगनाशार्थ आहुती दिल्या. तेव्हां आदित्यांनीं त्यास रोगापासून मुक्त केलें. (तै.सं.२.३,५)

देवासुर युद्ध.- देव, पितर व मानव हे एका बाजूस असून दैत्य, राक्षस व पिशाच्च हे दुस-या बाजूस होते. एखाद्याच्या शरीरांतून असुर जें रक्त काढीत तें सर्व राक्षस रात्रीचेवेळीं विषयुक्त करीत, व त्यामुळें उषःकालाचे पूर्वींच तो मृत्युमुखांत पडत असे. हें सर्व कृत्य राक्षसांचें असावें हें देवांनी जाणलें. तेव्हां देवांनी राक्षसांस आपणांकडे बोलावलें. राक्षसांनीं देवांजळून, असुरांपासून  होणा-या लुटींतून आपणांस भाग देण्याबद्दल कबूल करून घेतलें. पुढें असुरांचा पराभव झाला. नंतर देवांनीं राक्षसांस हांकलून दिलें. राक्षसांनीं देवांच्या कपटाबद्दल आरडाओरड केली. परंतु देवांनीं अग्नीस पुढें करून राक्षसांस पराजित केलें. अशा रीतीनें असुरपक्षामध्यें भेद करून देवांनी आपलें काम करून घेतलें. (तै.सं.२.४,१)

वृत्रकथा रहस्य.- आपला पुत्र मारला गेल्यामुळें त्वष्ट्यानें इन्द्राखेरीज सर्व देवांस सोमरस समर्पण केला. इन्द्रास आपणांसहि सोमरसाचा वांटा मिळेल अशी आशा होती परंतु ती निष्फळ ठरल्यामुळें त्यानें यज्ञाचा विध्वंस करून बळजबरीनें सोमपान केलें. तें अवशिष्ट त्वष्टयानें अग्नींत टाकून त्यापासून वृत्र (सर्व जगास व्यापणारा) याची उत्पत्ति केली. त्याचें तें भंयकर सामर्थ्य व जगड्व्याळ स्वरूप पाहून इन्द्र, त्वष्टा वगैरे देवांस देखील भीति वाटली. तेव्हां वृत्राची जास्त वाढ होऊन आपणास तो त्रास देईल या भीतीनें विष्णूनें आपले तीन भाग करून एक पृथ्वीवर, एक वायुलोकांत व एक स्वर्गांत असे ठेवले व अशा रीतीनें इन्द्रानें ह्या विष्णूच्या तीन स्वरूपांच्या मदतीनें वृत्रासुरास वाढूं दिलें नाही. तेव्हां वृत्रानें इन्द्राचे शरीरांत शिरण्याविषयीं इन्द्रास विचारलें, व सांगितलें कीं, मी तुला संतुष्ट करीन. इन्द्रानें कबूल केलें व वृत्रासुरानें त्याच्या शरीरांत प्रवेश केला व तो इन्द्राचें उदर झाला. भूक हा प्रत्येक प्राण्याचा शत्रु आहे कराण वृत्र हा इन्द्रशत्रु आहे. (तै.सं.२.४,१२)

त्वष्ट्याचा पुत्र विश्वरूप हा देवांचा अग्निहोतृ व असुरांचा भागिनेय होता. यज्ञांत देवांनां तो समक्ष व असुरांनां गुप्तपणें असे हविर्भाग देत असे. तेव्हां हा इन्द्रपद बळकावील ह्या भीतीनें इन्द्रानें त्याचीं तिन्ही शिरें आपल्या वज्रानें कापलीं व त्याचा वध केला. सर्व प्राणी इन्द्रास ''ब्रह्मघ्न'' म्हणूं लागले. आपणावरील दोषाचे तीन भाग करून त्यानें पृथ्वी, वृक्ष व स्त्रिया यांमध्यें खणणें, खुडणें व रजस्स्त्राव होणें या तीन रूपांनीं वांटून दिला. ह्याकरितां रजस्वला स्त्रीबरोबर कधींहि सहवास करूं नये, नाहीं तर त्याची संतती दोषयुक्त होईल. (तै.सं.२.५,१)

उशनाकाव्य.- अग्नि हा देवांचा दूत असून उशना काव्य हा असुरांचा कुलगुरू व अध्वर्यु होय. अग्नि व उशना काव्य हे दोघे प्रजापतीकडे गेले तेव्हां प्रजापतींने उशना काव्य याजकडे पाठ फिरवून अग्नीचीच निवडणूक केली त्यामुळें देवांची सरशी झाली व असुरांचा पराजय झाला. (तै.सं.२.५,८)

अग्नीचें पलायन.- अग्नीचे त्याजपेक्षां वडील असें तीन भाऊ होते. ते तिघेहि देवांकडे यज्ञांतील हविर्भाग पोहोंचविण्याचें काम करीत असतां नाश पावले. त्या सारखीच आपली दशा होईल अशी अग्नीस भीति वाटून तो दूर जाऊन पाण्यांत दडून बसला. त्याला शोधण्याचा देवांनीं पुष्कळ प्रयत्न केला. पाण्यांतील मत्स्य वगैरेंनीं अग्नी हा पाण्यांत दडला असल्याबद्दलची गुप्त बातमी देवांस संगितली. तेव्हां अग्नींनें ''लोक मजेखातर वाटेल तेव्हां तुमचा प्राण घेतील'' असा मत्स्यांस शाप दिला. नंतर देवांनीं अग्नीस बाहेर काढून यज्ञांतील हविर्भाग पोहोंचविण्याची कामगिरी त्यास दिली. तेव्हां त्यानें वर मागितला कीं ''थोडा भाग मला मिळावा''. (तै.सं.२.६,६)

नाभानेदिष्ठाची कथा.- मनूनें आपली सर्व संपत्ति पुत्रांनां वांटून दिली. परंतु ब्रह्मचर्याश्रमांत शिकत असलेल्या नाभानेदिष्ठास मात्र त्याचा हिस्सा दिला गेला नाहीं. तेव्हां तो बापाकडे आला व म्हणाला कीं ''मला माझा हिस्सा कां मिळाला नाहीं''? बापानें सांगितलें, तुझा हिस्सा मी काढून घेतला नाहीं. आंगिरस सत्र करीत आहेत, परंतु त्यांस स्वर्लोकाचें दर्शन होत नाहीं. तेव्हां हें ब्राह्मण त्यांस शिकीव व ते स्वर्गास जातांनां ते आपली संपत्ति तुला देतील. त्याप्रमाणें आगिरसांनां नाभानेदिष्ठानें विद्या सांगितल्यावर ते स्वर्गलोकास जातांनां त्यांनीं आपली संपत्ति नाभानेदिष्ठास दिली. त्यावेळीं रूद्रानें तेथें येऊन यज्ञभूमीवरील द्रव्य तें  आपलें असल्याबद्दल सांगितलें. परंतु नाभानेदिष्ठानें तें आपणांस आंगिरसांकडून मिळालें असल्याबद्दल सांगितलें परंतु रूद्रानें आपणांस यज्ञांत हविर्भाग देण्याचें कबूल करून घेऊन त्या पशूवरील आपला अधिकार सोडून दिला. (तै.सं.३.१,९)

वरूण व जलें.- हीं जलें वरूणाच्या पत्न्या होत. परंतु अग्नीला त्यांजबरोबर समागमाची इच्छा झाली. तेव्हां त्याचें रेतस्खलन झालें, तेव्हां त्यापासून पृथिवी झाली. पुनः दुस-यांदा स्खलन झालें, त्यापासुन आकाशोत्पत्ति झाली. (तै.सं.५.५,४)

वराहावतार व सृष्टयुत्पत्ति.- आरंभीं सर्व जलमय होतें. ह्या जलमय समुद्रांत प्रजापति हा वायुरूपानें फिरूं लागला. तेव्हां पृथ्वी पाहिली व वराहाचें स्वरूप धारण करून पृथ्वी धरली. तो विश्वकर्मा असल्यामुळें त्यास तिनें आपला ओलसरपणा पुसला. नंतर ती पृथु (विस्तृता) झाली, व म्हणून तीस पृथ्वी म्हणूं लागले. प्रजापतीनें तपश्चर्या करून तिच्यापासून, देव, वसु, रूद्र, आदित्य वगैरेंची उत्पत्ति केली. नंतर देवांनां प्रजोत्पादनाची इच्छा उत्पन्न झाली तेव्हां त्यांनीं प्रजापतीच्या सांगण्यावरून तपश्चर्या करून अग्नीच्या आश्रयानें एका गाईची उत्पत्ति केली. त्या गाईकरितां सर्व देवांनीं प्रयत्न करून अग्नीस संतुष्ट केलें व नंतर गाईपासून प्रत्येकास ३३३ देव झाले व अशा रीतीनें असंख्यात प्रजा उत्पन्न झाली. (तै.सं.७.१,५)

चतूरात्रयाग.- अत्रीनें पुत्रप्राप्तीची इच्छा असलेल्या और्वास चतूरात्रयागाच्या योगानें पुत्रोत्पादनाची शक्ति, दिली. त्यामुळे त्यास चार पुत्र झाले. जमदग्नीनें देखील चतूरात्रसंज्ञक यज्ञ करून आपली भरभराट करून घेतली. (तै.सं.७.१,८)

शंड व मर्क यांची हकीकत.- बृहस्पति जसा देवांचा पुरोहित होता तसे शंड व मर्क हे दोघे असुरांचे पुरोहित होते. दोन्ही बाजूंस पुरोहित हुषार असल्यामुळें देव अगर असुर यांपैकीं कोणीहि कोणाचा पराभव करूं शकेना. तेव्हां देवांनीं असुरपुरोहित शंड व मर्क यांनां आपल्या यज्ञांत सोम पिण्यास देण्याची लालूच दाखवून फितुर केले. अर्थात् त्यांच्याकडून असुरांनां सल्ला बरोबर न मिळाल्यामुळें त्यांचा पराभव झाला व देव विजयी झाले. पुढें देवांनी यज्ञ सुरू केल्यावर त्यांनीं कबूल केलेल्या वचनास अनुसरून पूर्वीप्रमाणेंच शुक्र व मंथीनामक पात्रांतील सोमरस आपल्यास प्यावयास मिळेल या आशेनें शंडामर्क त्या यज्ञांत येऊन दाखल झाले. पण देवांनीं विचार केला कीं, आपलें काम होण्यासाठीं आपण एकदां यांनां सोमरस दिला खरा तथापि आतां या दोघां फितुर होणा-या पुरोहितांनां आपल्यांत समाविष्ट होऊं देणें बरें नव्हे. शेवटीं त्या दोघां असुरपुरोहितांनां देवांनीं आपल्या यज्ञांत सोमरसाचा भाग न देतां फजीत करून हांकून लावलें. (तै.सं.६.४,१०) (तै.ब्रा.१.१,१)

कालकंज असुरांची गोष्ट.- 'कालकंज' नामक असुर होते. त्यांनीं स्वर्गप्राप्तीकरितां अग्निचयनाचें अनुष्ठान आरंभिलें. त्या असुरांचा पाडाव व्हावा म्हणून इंद्र वेषांतर करून त्यांच्याजवळ आला व त्यांनां म्हणाला, हे असुर हो, मी ब्राह्मण आहें. मला तुमच्या अनुष्ठानांत घ्या, मलाहि स्वर्गाला यावयाचें आहे. असुर 'बरें' म्हणाले. त्या असुरापैकीं प्रत्येकजण चयनसंबंधीं विटा (इष्टका) मांडीत होता. त्याबरोबरच इंद्रानें आपलीहि एक वीट मांडलीं व मनामध्यें 'हि माझी चित्रानामक वीट' अशी खूण ठेवली. अनुष्ठान संपल्यावर त्या मांडलेल्या चयनावर आरोहण करून ते असुर स्वर्गाला जावयाला निघाले इतक्यांत त्या मांडलेल्या चयनांतून इंद्रानें आपली वीट हलकेच काढून घेतली त्याबरोबर स्वर्गलोकांत उड्डाण करणारा तो चयनरूप श्येनपक्षी ढांसळून खालीं पडला. अर्थात् असुरांचाहि स्वर्गास जाण्याचा मार्ग खुंटला. कांहीं असुरांनीं अर्धवट स्वर्गाचा पल्ला गांठला होता पण ते चयन ढासळण्याच्या दोषामुळें 'कोळी' नामक सहा पायांचे किडे झाले. दोघेजण असुर श्रद्धातिशयतेमुळें स्वर्गातपर्यंत जाऊन भिडले पण शेवटीं चयनभ्रष्टतेच्या पापामुळें ते दोघेहि देवलोकांमध्यें दोन कुत्रे झाले. (तै.ब्रा.१.१,२)

वराहावताराचें मूळ.- या सृष्टीच्या पूर्वीं  पर्वत, समुद्र, नद्या वगैरे कांहीं नव्हतें फक्त सर्वत्र पाणी होतें. तेव्हां प्रजापतीनें जग निर्माण करण्यासाठी विचाररूप तप केलें. तेव्हां त्या अफाट पसरलेल्या जलसमुंहात प्रजापतीला लांब अशा देंठाला चिटकून असलेलें एक कमळाचें पान दृष्टीं पडलें. त्याबरोबर त्यानें तर्क केला कीं, या कमळाच्या देंठाला आश्रयभूत अशी वस्तु पाण्याच्या तळाशीं असावी. मग प्रजापतीनें डुकराचें रूप धारण करून त्या कमळाच्या देंठाच्या रोंखानें पाण्यांत बुडी मारली. पाण्याच्या तळाशीं गेल्यावर त्याच्या हाताला भूमि लागली तेव्हां त्यानें आपल्या तीक्ष्ण दाढेनें त्या भूमीपैकीं कांहीं चिखलासारखा भाग उकरून मोकळा करून घेतला व त्यासह तो उसळी मारून पाण्याच्या वर आला आणि त्यानें खालून आणलेला भूमीचा अंश पूर्वीं दिसलेल्या कमळाच्या पानावर पसरून ठेवून दिला. अशा रीतीनें कमळाच्या पानावर भूमी पसरली गेली (प्रथन पावली) तेव्हांपासून भूमीला पृथ्वी हें नांव पडले. (तै.ब्रा.१.१,३)

मनूची इडा.- मनूची संबंधी व यज्ञतत्त्वाचें प्रकाशन करणारी 'इडा' नामक एक स्त्री होती तिनें असुरांनीं अग्न्याधान केल्याची खबर ऐकली. तेव्हां ती असुरांच्या येथें गेली व त्यांनीं केलेली अग्नीची स्थापना क्रमदृष्ट्या चुकली आहे असें तिला आढळून आलें. देवांनीं अग्न्याधान केलेलें समजलें तेव्हां तेथेंहि ती गेली. त्याठिकाणींहि देवांच्या अग्निस्थापनेचा क्रम चुकला असलेला तिनें पाहिला तेव्हां ती मनूकडे येऊन त्याला म्हणाली कीं, मी तुझा अग्न्याधानसंस्कार करतें व देव आणि दैत्य यांनीं अग्निस्थापनेच्या क्रमांत चूक केल्यामुळें त्यांचा फलादेश फुकट गेला तसा तुझा न जाईल अशा रीतीनें तुझ्या अग्न्याधानांत अग्नीच्या स्थापनेचा क्रम मी अमलांत आणतें. मग मनूनें त्या इडेच्या करवीं अग्न्याधानसंस्कार केला. त्यांत इडेनें प्रथम गार्हपत्य, मग दक्षिणाग्नि व नंतर आहवनीय अशा क्रमानें अग्नीची स्थापना केली. त्यायोगानें मनूचा अग्न्याधानसंस्कार सफल होऊन तो प्रजा, पशू इत्यादिकांनीं संपन्न झाला. शतपथब्राह्मणांत मनूची व इडेची गोष्ट आहे ती अगदीं निराळी आहे. (तै.ब्रा.१.१,४)

देवासुर युद्ध.- देव व असुर यांचें युद्ध जुंपले. विजयाची इच्छा करणा-या देवांनीं आपला पैसा अडका अग्नीच्या स्वाधीन केला व लढाईस गेले. त्यांच्या मनांतील विचार असा कीं आपल्याला असुरांनीं जर जिंकलेच तर आपल्या आपत्कालांत अग्नीजवळ आपण देऊन ठेवलेला आपला पैसा आपल्याला निर्वाहास उपयोगीं पडेल. अग्नीला तो सर्व पैसा सांभाळण्याचें अवघड काम होईना, तेव्हां त्यानें पशु, उदक व सूर्य या तीन देवतांच्या स्वाधीन त्यांतलें थोडथोडें द्रव्य केलें व जपून ठेवण्यास सांगितलें. सुदैवानें देवांचा लढाईंत जय झाला व असुर पराभूत झाले. देव येऊन अग्नीजवळ आपला पैसा परत मागूं लागले पण त्यानें तो पश्वादि तिघांच्या स्वाधीन केला असल्याचें सांगून त्यांजकडून आपला पैसा घेण्याविषयीं सांगितलें. देवांनीं त्या त्रिवर्गाकडे मागणी केली. त्यानीं दाद दिली नाहीं. शेवटीं देवांनीं अग्नीलाच खुष करून त्याच्या खटपटीनें पश्वादि देवतांपासून आपला पैसा परत मिळविला. (तै.ब्रा.१.१,४)

अदितीपासून देवांची उत्पत्ति.- पुत्रप्राप्तीची इच्छा असलेल्या अदितीनें साध्य नामक देव आपल्या पोटीं यावे म्हणून 'ब्रह्मा' देवतेच्या उद्देशानें भात शिजविला. त्या भाताची आहुति दिल्यावर शिल्लक राहिलेला भात अदितीनें भक्षण केला. त्या योगानें ती गरोदर राहिली व त्या पहिल्या खेपेस तिला धाता व अर्यमा हे दोन जुळे मुलगे झाले. अदितीनें पुन्हां भात शिजविला व त्याची आहुति देऊन अवशेष राहिलेला भक्षण केला. पुन्हां ती गरोदर राहिली व त्या दुस-या खेपेस तिला मित्र व वरूण हीं दोन जुळीं मुलें झालीं. तिनें तिस-या खेपेस भात शिजवून हवनपूर्वक भक्षण केला त्या वेळीं ती गरोदर राहून तिला त्या खेपेस अंश व भग हे जाडे मुलगे झाले. अदितीनें शेवटच्या चौथ्या खेपेस पुन्हां भात शिजविला आणि त्याचें हवन झाल्यावर शेष राहिलेला जेव्हां तिनें भात खाल्ला तेव्हां ती चौथ्या खेपेस गरोदर राहिली आणि तिला इंद्र व विवस्वान् हीं दोन जुळीं मुलें झाली. अदितीचे हे बारा मुलगे म्हणजेच द्वादशादित्य किंवा साध्य नामक देव होत. (तै.ब्रा.१.१,९)

देवासुर युद्ध (प्रह्लाद, कयाधू यांचा उल्लेख).- देवांची व असुरांची लढाई सुरू झाली तेव्हां प्रजापतीनें आपला पुत्र जो इंद्र त्याला रणभूमीवरुन काढून एका गुप्तस्थळीं नेऊन ठेवलें. हेतु हा कीं बलवान् अशा असुरांच्या हातून आपला   दुर्बल पुत्र इंद्र मारला जाऊं नये. इकडे 'हिरण्यकशिपु' नामक असुराची स्त्री 'कयाधु' हिचा पुत्र 'प्रल्हाद' यानेंहि आपल्या असुरसेनेचा एक अधिपति असा आपला पुत्र 'विरोचन' ह्यालाहि रणभूमींतून पळवून एका गुप्तस्थळीं नेऊन ठेवलें. त्याचाहि हेतु असा कीं, आपल्या विरोचनाला देवांनीं केव्हांहि मारूं नये. पण या प्रजापतिच्या व प्रह्लादाच्या कृत्यामुळें देवांच्या व असुरांच्या सैन्यांवर सैनापत्य करावयास कोणीच राहिला नाहीं, तेव्हां देव प्रजापतीकडे आले व म्हणाले, कीं सेनापतीखेरज सैन्यानें लढणें हें खरें युद्ध नव्हें आपल्याला धीर देणारा अधिकारी नसल्यामुळें सैन्यांत प्रसंगीं पळापळहि सुरू होण्याचा संभव असतो. यामुळें आम्हाला अधिपतीची-इंद्राची फार जरूर आहे. आम्ही त्याला सारखे शोधीत आहों. प्रजापतीनें सांगितलें कीं, तुमचे तुम्ही त्याला शोधून काढा. मला कांहीं माहित नाहीं. मग देवांनीं इष्टी वगैरे करून इंद्राला शोधला. इंद्र सांपडला. तो सेनापतित्वाचें काम पाहूं लागला. शेवटीं देवांचा त्या लढाईंत विजय होऊन असुरांचा मोड झाला. (तै.ब्रा.१.५,९)

आंगिरसांचें सत्र.- चवथ्या वेदाचा प्रवर्तक अंगिरस याच्या कुळांतील ॠषींनीं 'सत्र' केलें. यज्ञामध्यें धर्मसंबंधीं अनुष्ठानासाठीं दूध काढण्याकरितां त्यांनीं एक पांढ-या रंगाची गाय बाळगिली होती. अवर्षणामुळें त्या गाईला रानांत चारा मिळेनासा झाला. फक्त यज्ञांत कुटलेल्या सोमवल्लीचा चोथा खाऊन त्या गाईनें आपल्या जीवाचा बचाव केला होता. त्या गाईचे असे हाल पोटापाईं होत असलेले पाहून कृपाळू आंगिरसांनीं आपआपसांत बोलणें सुरू केलें कीं, अहो! आमच्या गाईच्या पोटापुरता चारा उत्पन्न करण्याची जर आमच्या अंगात ताकद नाहीं तर आम्ही सत्र  तरी कशाला करतों आहों? समृद्धिसंपादन करणा-या महत्त्वाकांक्षी लोकांनींच सत्रासारखे मोठे यज्ञ करावे. आमच्या अंगांत गाईचा चारा मिळविण्याइतकें सामर्थ्य नाहीं ते आम्ही समृद्धि तरी कसली संपादन करणार? नंतर त्या ॠषींनीं पर्जन्यवृष्टीसाठीं 'कारीरि' नामक इष्टि केली त्याबरोबर खूप पर्जन्य पडला! जिकडेतिकडे हिरवागार चारा होऊन अवर्षणाची छाया पार नाहींशी झाली. परंतु नव्या उत्पन्न झालेल्या चा-यामध्यें पितरांनीं एक प्रकारचा विषार उत्पन्न केला. आंगिरसांच्या गाईनें तो विषारदुष्ट असा चारा खाल्ल्यामुळें ती रोगट दिसूं लागलीं. आंगिरसांनीं तिची अवस्था पाहून हिला काय झालें असावें असा शोध चालविला. त्यांनां पितरांच्या कृतींने विषारी झालेला चारा हिच्या पोटांत गेला आहे हें कळून आले. मग त्यांनीं पितरांनां हविर्भाग देण्याचें कबूल करून संतुष्ट करून घेतलें तेव्हां पितरांनीं चा-यांतला विषार काढून घेतला. मग आंगिरसांच्या गाईला उत्कृष्ट चारा मिळूं लागला व तीहि धर्मासाठीं खूप दूध देऊं लागली. (तै.ब्रा.२.१,१)

प्रजापतीपासून देव, असुर व इंद्र यांची उत्पत्ति.- प्रजापतीनें देव व असुर उत्पन्न केले परंतु देवांचा किंवा असुरांचा राजा (इंद्र) उत्पन्न केला नाहीं. मग देवांच्या विनंतीवरून इंद्र निर्माण केला. इंद्राच्या हातांत त्रिष्टुप् देवतेच्या अनुग्रहानें १५ धारांचे एक वज्र उत्पन्न झालें आणि त्या वज्रानें इंद्रानें असुरांचा पराभव केला. देवांनां स्वर्गाची प्राप्ति झाली पण स्वर्गांत देवांनां खावयास मिळेना. त्यांनीं विचार केला कीं, र्स्वग ही भोगभूमि आहे कर्मभूमि नव्हे. यासाठीं भुलोकामध्यें कर्में करून आपल्याला हविर्भाग देण्यासाठीं 'अयास्य' या अंगिरस गोत्रांतील ॠषीस भूमीवर एका यज्ञाच्या अनुष्ठानाची कल्पना देऊन पाठविला. नंतर त्या अयास्यानें भूलोकावर यज्ञानुष्ठान करून देवांस हविर्भाग देण्याचा प्रचार सुरू केला. (तै.ब्रा.२.२,७)

जगत्सृष्टि.- सध्या जें आपल्याला स्थावरजंगमात्मक जग दिसतें हें पूर्वीं कांहींएक नव्हतें. विधात्याच्या मनांत जग उत्पन्न करावें असें आलें. त्यानें जगदुत्पत्तीसाठीं मोठें तप केलें. तेव्हां त्या जगत्स्त्रष्टया परमेश्वराच्या मनःसंकल्पापासून एक प्रकारचा धूर उत्पन्न जाहला. नंतर पुनः तप केले तेव्हां अग्नि, नंतर ज्योति, ज्वाला, प्रभा इ. इ. उत्पन्न झालें पण हें सर्व धूर वगैरे मिळून एक घट्ट गोळा झाला. हाच प्रजापतीचा बस्ति (मूत्राशय) होय. पुढें तो बस्ती परमेश्वरानें फोडला तेव्हां 'समुद्र' निर्माण झाला. मूत्राशयापासून समुद्राची उत्पत्ति असल्यामुळें त्याचें पाणी खारट असतें व तें कोणी पीत नाहीं. जलमय अशा समुद्रापासूनच प्रजापतीनें पृथ्वी, अंतरिक्ष, द्यौ हीं क्रमानें उत्पन्न केलीं. मग प्रजापतीनें आपल्याच शरीरापासून असुर निर्माण केले. मग दिवसरात्र व अहोरात्रांचा संघिकाल वगैरे निर्मिलीं. दिवसापासुन देव व रात्रीपासून असुर  निर्मिले. अशा रीतींनें सर्व प्रकारची प्रजा प्रजाप्रतींने निर्माण केली. (तै.ब्रा.२.२,९)

प्रजापतीकडून इंद्राला देवांचें आधिपत्य मिळतें.- प्रजापतीनें देव उत्पन्न केले व त्या देवांच्या मागून-सर्व देवांत धाकटा-इंद्र उत्पन्न केला. नंतर प्रजापति त्याला म्हणाला कीं, ''हे इंद्रा, तूं स्वर्गांत जा, तेथें देव आहेत त्यांच्यावर तूं तेथें माझ्या आज्ञेनें आधिपत्य कर.'' इंद्र ''बरें'' म्हणाला व स्वर्गाला गेला तेव्हां देवांनीं त्याला विचारलें कीं, ''तूं कोण? तेव्हां इंद्र म्हणाला कीं, ''मला प्रजापतीनें तुमच्यावर आधिपत्य करण्यासाठीं पाठविले आहे, माझें नाव इंद्र.'' देव म्हणाले ''आम्ही तुझ्यापेक्षां मोठे आहों तर तूं आमचा अधिपति कसा होणार? व तुझ्या योगानें आम्हीं आपलें कल्याण तरी काय करून घेणार?'' देवांचें बोलणें ऐकून इंद्र ओशाळला व स्वर्गांतून परत प्रजापतीजवळ आला व देवांनीं केलेलें सर्व भाषण त्यानें प्रजापतीला निवेदन केलें. प्रजापतीजवळ एक प्रकारचें विलक्षण तेज (सूर्याप्रमाणें) होतें तें लक्षांत घेऊन इंद्र प्रजापतीला म्हणाला कीं, हें तेज तू मला दे म्हणजे मी या तेजानें संपन्न होत्साता देवांचें आधिपत्य करण्यास लायक   होईन. प्रजापति म्हणाला वा! हें तेज तुला जर मी देऊन बसलों तर मग माझी काय थोरवी राहणार? मला कोण विचारणार? मग मी कोण? इंद्र म्हणाला तूं 'कः' (कोण?)=क=या नावानेंच प्रसिद्ध होशील. क म्हणजे प्रजापतिच तूं जरी मला आपल्या जवळचें तेज दिलेंस तथापि तुझें प्रजापतित्व कायम राहील. नंतर प्रजापतींने आपल्या जवळचें तेजाचें एक 'पदक' तयार करून इंद्राच्या मस्तकावर बांधलें तेव्हां प्रजापतीनें पदक बांधलेला तो इंद्र देवांचें आधिपत्य करण्यास समर्थ झाला. (तै.ब्रा.२.२,१०)

प्रजापतिकन्या सीतासा वित्रीचा सोमाशीं विवाह.- प्रजापतीनें सोम उत्पन्न केला व त्याच्या पाठीमागून तीन वेद उत्पन्न केले. सोमानें ते तीन वेद आपल्या मुठींत झांकून ठेवले होते. प्रजापतीची 'सीतासावित्री’ नांवाची एक मुलगी होती. तिच्या मनांत आलें कीं, सोम आपला पति व्हावा. पण सोमाच्या मनांत प्रजापतीची 'श्रद्धा' नामक मुलगी भरली होती व तिच्याशीं आपलें लग्न व्हावें अशी सोमाची इच्छा होती. सीतासावित्री प्रजापतीकडे गेली व तिनें आपल्या मनांत सोमाशीं विवाह व्हावा अशी इच्छा असल्याचें त्याला सांगितलें सोमाची मर्जी सीतेवर नसून श्रद्धेवर आहे हें प्रजापतीस माहीत होतें म्हणून सीतासावित्रीला सोम वश व्हावा यासाठीं प्रजापतींने एक वशीकरणाचा प्रयोग केला तो असा कीं, 'स्थागर' नामक एक सुगंधी वनस्पति उगाळून तिचें गंध तयार केलें व तें मंत्रांनीं भारलें. मग त्या गंधाचा सीतासावित्रीच्या कपाळीं टिळा लावला. मग सीतासावित्री सोमाकडे गेली, सोम तिला पाहतांच मोहित झाला व तिला माझ्याजवळ ये म्हणून लाडीगोडीनें सांगूं लागला. सीतासावित्री त्या सोमाचें प्रेम आपल्यावर कितपत बसलें आहे याचा अंदाज घ्यावयासाठीं त्याला म्हणाली कीं, मी तुझ्याजवळ येईन पण तूं सर्वदा मला एकटीलाच भोगलें पाहिजेस, शिवाय तुझ्या मुठींत तूं काय जपून ठेवलें आहेस ते मला निष्कपटपणानें सांगशिल तर मी तुझ्याजवळ येईन. सोम तिच्या प्रेमानें वेडा होऊन गेल्यामुळें तिच्या म्हणण्यास कबूल झाला व आपल्या हातांतील अमूल्य असे तीन वेद त्यानें त्या सीतासावित्रीला खुषींने देऊन टाकले. सोमाचें व सीतासावित्रीचें लग्न झालें व तीं उभयतां प्रेमानें सुख भोगूं लागलीं. सीतासावित्रीप्रमाणेंच चतुर स्त्रिया आपल्या प्रियपतीकडून इच्छित वस्तूचा लाभ करून घेतात. 'स्थागर’ वनस्पतीच्या गंधाच्या टिळयानें सीतासावित्रीला पति वश करण्यांत जसा गुण आला त्याचप्रमाणें जी स्त्री आपल्या पतीनें आपल्यावर प्रेम करावें असें वाटून ह्या वनस्पतीचा वशीकरण प्रयोग करील ती स्त्रीहि सीतासावित्रीप्रमाणें आपल्या पतीला वश करून घेऊन त्याचें प्रेम संपादन करील. (तै.ब्रा.२.३,११)

स्वर्गप्राप्ती विषयीं स्पर्धा.- पूर्वीं एकदां आदित्यगण व आंगिरस महर्षी यांची स्वर्गलोकाच्या प्राप्तीविषयीं स्पर्धा लागली. आदित्यांनीं प्रथम स्वर्गाचा पल्ला गांठला. तेव्हां आंगिरस थोडेसे वरमले व आपल्यालाहि स्वर्ग मिळावा म्हणून आदित्यांचीं आर्जवें करूं लागले. त्यांनीं आदित्यांनां एक पांढरा घोडा दक्षिणा म्हणून बक्षिस दिला. आपल्याला जगत्प्रकाशक असा जो सूर्य दिसतो तोच आंगिरसांनीं दिलेला घोडा होय. हा घोडा इतर बारा आदित्यांनीं आंगिरसांपासून ग्रहण केला व ते त्यांनां म्हणाले कीं, हे आंगिरसहो, तुम्हीं जो घोडा आम्हाला दक्षिणा म्हणून दिलात तो आतां श्रेष्ठ झाला आहे. (तै.ब्रा.३.९,२१)

इन्द्र भरद्वाज संवाद.- प्राचीनकाळीं भरद्वाज ॠषीनें सर्व वेदांचें अध्ययन करण्याचा प्रयत्न केला पण त्यास यश न आल्यामुळें त्यानें इन्द्राला प्रसन्न करून घेतलें. १००।१०० वर्षांपर्यंत आयुष्य असलेले तीन जन्म त्यानें इन्द्रापासून संपादन केले व त्या तिन्ही जन्मांत तो एकसारखा गुरूकुलामध्यें वेदाध्ययनच करीत राहिला. तिस-या जन्मांत भरद्वाज अगदीं म्हातारा होऊन आंथरूणावर पडून राहिला असतां इन्द्र तेथें आला व त्याला म्हणाला, हे भरद्वाजा, जर तुला मी १०० वर्षें आयुष्याचा ४ था जन्म दिला तर त्या जन्मांत तूं काय करून आपला पुरूषार्थ साधशील? भरद्वाजानें उत्तर दिलें कीं, आपण जर पुन्हां १०० वर्षे जगण्याचा जन्म मला दिलात तर त्या पुढच्या जन्मांतहि मी मरेपर्यंत वेदाध्ययनच करीत राहिन. नंतर सर्व वेदांचें अध्ययन करण्याचा इरादा करणें अविचाराचें आहे असे भरद्वाजाच्या लक्षांत येण्यासाठीं इन्द्रानें आपल्या योगसामर्थ्यांने वेदांचे तीन पर्वताकार ढीग उत्पन्न केले व त्यापैकीं एक एक मूठ वेदमंत्र आपल्याजवळ घेऊन तो त्या भरद्वाजाला म्हणाला, हे भरद्वाज, हे पर्वतप्राय तीन वेद पाहा. यांच्यामधला एकेक कण म्हणजे एक एक वेद आहे असें समज. तात्पर्य, वेद अनंत आहेत, तेव्हां सर्व वेदांचें अध्ययन करण्याचा हट्ट तूं सोडून दे. तुझ्याच्यानें सर्व वेदांचें अध्ययन होंणें अशक्य आहे. तूं आज तीन जन्मांत गुरूगृहीं जें अध्ययन केलें आहेस तें सरासरी मजजवळ असलेल्या या तीन मुठीच्या इतकेंच आहे. बाकीचें हे पर्वतप्राय वेदराशी तुला अजून ठाऊकसुद्धां नाहींत. सर्व वेदाध्ययन एका व्यक्तीच्या हातून होणें अशक्य आहे. आतां तुला सर्व वेदांचें अध्ययन केल्याचें श्रेय मिळेल असा 'सावित्राग्निचयन' मी तूला सांगतो. मग इन्द्रानें त्याला सावित्राग्नीचा उपदेश केला व तदनुसार आचरण केल्यामुळें भरद्वाजहि शेवटीं स्वर्गाचा अधिकारी झाला. ही सावित्राग्निविद्या विदेह देशाचा राजा जनक याला अहोरात्राभिमानी देवतांनीं उपदेशिली. (तै.ब्रा.३.१०, ९-११)

पुढे वाचा:तैत्तिरीय संहितेंतील आख्यायिका

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .