प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ११ वें
विषयांतर-वेदोक्त इतिहास व आख्यायिका

ऐतेयब्राह्मणांतील ऐतिहासिक व इतर परिस्थितिदर्शक उल्लेख.- अग्नि व विष्णु.-ऐतरेयब्राह्मणाच्या सुरवातीलाच ''अग्निर्वै देवानामवमो विष्णुः परमस्तदन्तरेण सर्वा अन्या देवताः'' ह्या मंत्रांनें, त्या कालीं अग्नि व विष्णु हेच दोन मुख्य देव असल्याबद्दल सांगितलें आहे सर्व देवता अग्नि व विष्णु या दोन देवतांमध्यें अंतर्भूत होत असत. प्रसंगानुरोधानें इतर देवतांनांहि मधूनमधून प्रामुख्य दिलेलें आढळतें. द्वितीय पञ्चिका, खंड ३६ यांत ''इंद्राग्नी वै देवानामोजिष्ठौ वलिष्ठौ सहिष्ठौ सत्तमौ पारयिष्णुतमौ'', इंद्र व अग्नि हे सर्वांत सामर्थ्यवान् शक्तिवान् वगैरे असल्याबद्दल वर्णन आहे. चतुर्थ पञ्चिका, खंड १८ यांत सूर्यदेवतेबद्दल ''स वा एष उत्तरोऽस्मात्सर्वास्माद्भूताद्भविष्यतः सर्वमेवेदमतिरोचते यदिदं किंचोत्तरो भवति'', हाच सर्वात श्रेष्ठ असल्याचें वर्णन आहे. तरी देखिल एकंदर सर्व देवता हीं अग्नीचींच रूपे असल्याबद्दल तृतीय पञ्चिका खंड ४ यांत वर्णन आहे. त्यांत अग्नि हा इंद्रवायू, मित्रावरूण, अश्विनीकुमार, इंद्र, विश्वेदेव, सरस्वती इत्यादींचीं रूपें कशीं घेतो हें वर्णन केलें आहे.

देवासुर युद्ध.- यांत आठदां देवासुरयुद्धाचे उल्लेख आले आहेत. ह्या सर्व उल्लेखांवरून असें दिसतें कीं, देव हे निरनिराळे यज्ञ करीत असतां असुरांनीं त्यांत विघ्न करण्याचें योजून हल्ले केले व युद्ध आरंभिलें, परंतु देवांनां यज्ञामुळें अपार सामर्थ्य प्राप्त होऊन त्यांनीं असुरांचा विध्वंस केला. कांहीं कांहीं ठिकाणीं, देवांचीं यज्ञकर्में पाहून असुरांनीं त्याप्रमाणें केलें, परंतु कित्येक गूढ मंत्र व क्रिया त्यांनां न समजल्यामुळें त्यांचा पराभव झाल्याचें वर्णन आहे. ह्यावरून 'देव' संज्ञा धारण करणा-या आर्यांच्या कांहीं टोळयांत यज्ञसंबंधीं क्रिया चालत असत, व त्याच क्रिया 'असुर' संज्ञक लोकांस माहीत नव्हत्या असें दिसतें. वरील उल्लेखांत, असुरांनां धान्याचा कोंडा किंवा रक्तमांस इत्यादि वाईट पदार्थ यज्ञांत हविर्भाग म्हणून द्यावेत असें म्हटलें आहे. असुरांपेक्षां देवांनां जास्त सामर्थ्य प्राप्त होण्याचें कारण अग्निदेवाची योग्य स्तुति होय असेंहि सांगितलें आहे. (१.१४; १.२३; २.७; २.११; २.३१; ३.३९; ४.५; ६.४)

सामोत्पत्तीचे उल्लेख.- यज्ञकाण्ड हें आर्यांच्या कांहीं विशिष्ट जातींत प्रचलित होतें. यज्ञकर्मास अत्यावश्यक असा जो सोम त्याच्या उत्पत्तीबद्दल ऐतरेय ब्राह्मणांत बरीच मनोरंजक माहिती आहे. ''सोमो वै राजा गन्धर्वेष्वासीत्तं देवाश्च ॠषयश्चाभ्यध्यायन्कथमयमस्मान्सोमो राजाऽऽगच्छेदिति.......'' ह्यांत सर्व देव, ॠषी वगैरेनीं सोमराजा आपल्या यज्ञकर्मांत कसा येईल असा विचार केला, त्या वेळीं सोम हा गंधर्वांत रहात असे तेव्हां वाक् (वाणीची देवता) हिनें स्त्रीचें रूप धारण करून सोमास देवलोकांत आणल्याचें वर्णन आहे. सर्व देव व ॠषीं यांनीं गायत्री वगैरे छदांनां सोमास परलोकाहून आणण्यास सांगितल्यावरून सर्व छंद पक्ष्यांचीं रूपें धारण करून परलोकीं गेले. म्हणून सोमाहरणप्रतिपादक स्तोत्रांस 'सौपर्ण' म्हणतात असें वर्णन आहे. एकदां यज्ञांत सोमरस पिण्याबद्दल देवसमुदायांत तेढ पडली तेव्हां त्यांनीं ठरविलें ''यो न उज्जेष्यति स प्रथमः सोमस्य पास्यति-'' जो कोणी ही पळण्याची शर्यत जिंकील तोच प्रथम सोमरसपान करील. सरतेशेवटीं वायू व इन्द्र प्रथम आले नंतर मित्रावरूण आले, इत्यादि वर्णन आलें आहे. सोमापहरणास ईशान्य दिशा चांगली, कारण त्याच दिशेला देवांस असुरांवर जय मिळवतां आला, इत्यादि वर्णन यांत आहे. (ऐ.ब्रा. १.२७; ३.२५; २.२५; १.१२)

यामध्यें सोमाला अनुलक्षून एक मजेदार आख्यायिका दिली आहे. तिचा सारांशः प्रजापतीनें सूर्यासावित्रीनामक दुहिता 'सोम' राजास देण्याचें ठरविलें, व ''हजार ॠचांचा समुदाय'' ज्यास आश्विनशस्त्र म्हणून म्हणतात त्याचा पण लावला. सर्व देवांमध्यें ह्यामुळें अहमहमिका सुरू झाली व सरतेशेवटीं त्यांनीं गार्हपत्य अग्नीपासून सूर्यापर्यंत पळण्याची शर्यत लाविली, त्या सर्वांत अग्नि प्रथम पळाला तेव्हां आश्विनांनीं त्यास दूर सारून शर्यत जिंकली व ॠक्सहस्त्र संपादंन केलें. पळण्याचे शर्यतींत अग्नीनें आपल्या रथास खेंचरें जुंपलीं होतीं. उषा देवतेनें अरूण वर्णाचे बैल जुंपले होते, आश्विनांनीं आपल्या रथास गर्दभ जुंपले होते अशा    त-हेचें वर्णन आहे. सध्यां गर्दभ सर्व प्राण्यांत अतिशय मठ्ठ, सावकाश चालणार कां झाला याचें कारण त्यावेळीं गर्दभाला आश्विनांनीं रथास जुंपले व शर्यत जिंकली परंतु गर्दभाचा वेग मात्र गेला व दूध नाहींसे झालें. फक्त आश्विनांनीं त्याच्या ठिकाणीं गर्दभाश्वतर जातिद्वयोत्पादक शक्ति ठेविली आहे, अशा त-हेचें वर्णन आहे. (ऐ.ब्रा.४.७)

यज्ञदेवता.- ऐतरेय ब्राह्मणांत, यज्ञदेवता देवांपासून दूर निघून गेल्याचे पुष्कळ ठिकाणीं उल्लेख आहेत. यज्ञदेवता गेल्यामुळें देवांनीं 'अदिती'ची प्रार्थना करून ती पुनः संपादन केल्याचें सांगितलें आहे. यज्ञदेवता देवांपासून दूर गेल्यामुळें देवांनां पुरतें अन्न मिळेना तेव्हां ''आश्विनौ'' देवतांनीं यज्ञदेवतेस पुष्ट केली, कारण ''अश्विनौ वै देवानां भिषजावश्विनावध्वर्यू'' अश्विन् हे देवांचे अध्वर्यू, वैद्य होत, असें वर्णन आहे. ''यज्ञेन वै देवा ऊर्ध्वाः स्वर्गं लोकमायंस्तेऽबिभयुरिभं नो द्दष्ट्वा मनुष्याश्च ॠषयश्चानु प्रज्ञास्यन्ति'' यज्ञानेंच देव स्वर्गास गेले व त्यांनां भीति वाटलीं कीं, कदाचित् मानव, ॠषी वगैरे आपले यज्ञ पाहून स्वर्गास येतील म्हणून त्यांनीं 'यूप' हा खालीं तोंड करून पुरला. परंतु मानव, ॠषी इत्यादिकांनीं ही देवांची लबाडी ओळखली व देवांप्रमाणें यज्ञ करून स्वर्ग मिळविला. (ऐ.ब्रा.१.७, १८; २.१)

ह्यावरून एकंदर यज्ञाची उत्क्रांति कसकशी होत गेली असावी याचें उत्तम दिग्दर्शन होतें. प्रथम ‘देव’ नामक आर्य हे 'नरमेध' करीत असावेत, व त्यावरून पुढें ''अश्वमेध' करण्याचें त्यांनीं ठरविलें असावें असें दिसतें. ''अश्वमेधां'' तून 'गवालंभ,' गवालंभापासूनच पुढें 'अजालंभ' यज्ञ, ज्यांत 'अजापुत्र' बळी देत असत, त्याची प्रघात पडला व हा प्रघात बराच काळपर्यंत प्रचलित होता असें ''सोऽजे ज्योक्तमामिवारमत तस्मादेष एतेषां पशूंना प्रयुक्ततमो यद्जः'' या वाक्यावरून दिसतें. परंतु ऐतरेय ब्राह्मणकालींच ह्या सर्व यज्ञांची व्रीहियज्ञांत उत्क्रांति झाली होती असें या ठिकाणींच दिसून येतें. (ऐ.ब्रा.२.८)

ह्यांत ''त्रयस्त्रिंशद्वै देवाः सोमपास्त्रयस्त्रिंशदसोमपाः'', तेहतीस देव सोम पिणारे आहेत, व तेहतीस न पिणारे आहेत, असें सांगून, आठ वसू, अकरा रूद्र, बारा आदित्य, प्रजापति व वषट्कार हे तेहतीस सोम पिणारे व अकरा प्रयाज, अकरा अनुयाज व अकरा उपयाज मिळून तेहतीस सोम न पिणारे देव होत असें वर्णन आहे. (ऐ.ब्रा.२.१८)

शूद्रॠषीचा स्वीकार.- ह्यांत एक शूद्र ॠषीची कथा आहे. भृगु, अंगिरा वगैरे ॠषी सरस्वती नदीचे तीरावर सत्र करीत असतां इलूषाचा पुत्र कवष ॠषिहि त्यांमध्यें बसला होता. भृगु, अंगिरा वगैरेंनीं हा कवष शुद्रापुत्र, जुगारी असल्यामुळें सत्रदीक्षेस योग्य नाहीं असा विचार करून त्यास दूर हांकलून दिलें व त्यास पाणीदेखील प्यावयास न मिळतां तो मरो, असा त्यांनीं विचार केला. परंतु कवषानें तसल्या निर्जन प्रदेशांत ''अपोनप्त्नीय'' सूक्त म्हणून सरस्वती नदीचा धांवा केल्यामुळें सरस्वती आपण होऊनच त्याकडे वळली. अजून ती जागा परिसारक या नांवाचें पवित्रक्षेत्र होऊन राहिली आहे. नंतर ॠषींनींहि त्यास परत बोलावलें या कथेचा पूर्वीं उल्लेख केलाच आहे. (ऐ.ब्रा.२.१९)

एका दीर्घजिह्वी नामक असुर स्त्रीनें प्रातःकालीं देवांकरतां तयार केलेले चरू चाटून अपवित्र केले परंतु आश्विनांनीं पुनः त्यांस शुद्ध करून यथासांग यज्ञकर्म होऊं दिलें असें वर्णन आहे. (ऐ.ब्रा.२.२२)

एका स्थळीं ''देवरथो वा एष यज्ञः'' यज्ञ हा देवांचा स्वर्गास नेणारा रथ आहे असें म्हटलें आहे. (ऐ.ब्रा.२.३७)

बेदाचा मुलगा हिरण्यदन् याचें 'वषट्कार' या शब्दांतील सहा (षट्) वस्तू कोणत्या याबद्दल मत दिलें आहे. त्या सहा वस्तूंविषयीं विधान असेः- ''द्यौरन्तरिक्षे प्रतिष्ठिताऽन्तरिक्षं पृथिव्यां पृथिव्यप्स्वापः सत्ये सत्यं ब्रह्मणि ब्रह्म तपसि-'' आकाश हें वायुवर, वायू पृथिवीवर, पृथिवी पाण्यावर, पाणी सत्यावर, सत्य ब्रह्मावर, व ब्रह्म तपावर अधिष्ठित आहे. (ऐ.ब्रा.३.६)

अग्नि हा देवांचा होता असतांना त्याला मारण्यास टपून बसलेला मृत्यु त्यानें कसा टाळला याचें वर्णन आहे. (ऐ.ब्रा.३.१४)

देवत्वप्राप्ति.- ह्यांत ॠभू नामक मानवांनीं तप, यज्ञ वगैरे करून देवांच्या बरोबरच सोमपान करण्याचा मान मिळवला. परंतु कोणी देव त्यास आपल्याबरोबर घेईनात. सरतेशेवटीं प्रजापतीच्या सांगण्यावरून ॠभूंनीं सूर्याबरोबर सोमपान करण्याचा मान मिळाला, तरी देखील ''तेभ्यो वै देवा अपैवाबीभत्सन्त मनुष्यगन्धात्'' सर्व देव, त्यांच्या ठिकाणीं मनुष्यत्वाचा किंचित् वास येतो, म्हणून ॠभूंचा फार तिरस्कार करूं लागले. (ऐ.ब्रा.३.३०)

यांत अशी आख्यायिका आहे कीं, देवांनीं अग्निष्टोमांत प्रवेश केला व असुरांनीं उक्थ्यांत प्रवेश केला, परंतु कृश, उंच, व फिकट रंगाच्या भरद्वाज ॠषीनें तें पाहून अग्नीस सांगितलें व अग्नीनें शुभ्र घोडयाचें रूप घेऊन असुरांस हांकललें, त्याचप्रमाणें, इंद्रानें वरूणाच्या मदतीनें असुरांस पळवून लावलें (ऐ.ब्रा.३.४९-५०)

गाईंनीं देखील सत्र करून दहा मिहिन्यांचे अवधींतच खूर, व शिंगें प्राप्त करून घेतल्याचें वर्णन आहे. त्याचप्रमाणें स्वर्गांत आधीं कोणी प्रवेश करावा ह्याबद्दल आदित्य व अंगिरा यांजमध्यें तंटा असल्याचा उल्लेख आहे. ह्यांत दैत्यांच्या त्रासानें देवांनीं घोडयाचीं रूपें घेऊन दैत्यांचा नाश केल्याचें वर्णन आहे. (ऐ.ब्रा.४.१७;५.१)

विश्वोत्पत्ति.- ह्यांत विश्वोत्पत्तीसंबंधीं वर्णन आहे. एकदां प्रजापतीला आपली मुलगी ''द्यौ'' किंवा किंवा ''उषस्'' हिला पाहून कामवासना उत्पन्न झाली. प्रजापतीनें ॠष्यनामक मृगाचें रूप धारण करून ''रोहित'' मृगीचें रूप धारण कारणा-या आपल्या दुहितेशीं तो संग करण्यास प्रवृत्त झाला. तेव्हां प्रजापतीचें दुहितृगमनरूपी निषिद्धाचरण पाहून सर्व देवांनीं त्याच्या ठिकाणचा पापपुरूष मारण्याकरितां आपलीं भयंकर स्वरूपें एकत्र करून ''भूतवान्'' नांवाचा भयकारक पुरूष निर्माण केला. त्यानें प्रजापतीचा पापयुक्त मृगदेह मारला. ''तमभ्यायत्याविध्यत्स विद्ध ऊर्ध्व उदप्रयतत्तमेतं मृग इत्याचक्षते य उ एव मृगव्याधः स उ एव स या रोहित्सा रोहिणी यो एवेषुस्त्रिकाण्डा सो एवेषुस्त्रिकाण्डा''- म्हणजे अशा रीतीनें भूतवानानें विगतासु केलेला प्रजापतीचा मृगदेह तोच सध्यां आपणांस मृगनक्षत्ररूपानें दिसतो. रोहिणीची तारा हीच प्रजापतीची कन्या होय व व्याध हाच रूद्र असून त्याचा बाणाचें टोंक, मध्य, फाळ हे देखील आपणांस सध्यां आकाशांत दिसतात. त्या वेळीं प्रजापतीचें जें रेत पडलें त्याच्या निरनिराळ्या भागापासून निरनिराळ्या प्राण्यांची उत्पत्ति झाली. प्रजापतीला विश्वोत्पति करण्याची इच्छा झाल्यावरून त्यानें प्रखर तप केलें व तीन लोक उत्पन्न केले, व त्यापासून आपल्या तपाच्या तेजानें अग्नि, वायु, आदित्य तीन वेद, त्यापासून भूःर्भुवःस्वः, त्यापासून अ, उ, म् हीं तीन अक्षरें उत्पन्न केलीं व अशा रीतीनें सर्व स्थावर जंगम प्राणी उत्पन्न झाले. (ऐ.ब्रा.३.३३;५.३२)

इंद्र व मरूत.- ह्यामध्यें इंद्रदेवतेबद्दल ब-याच आख्यायिका आहेत. इंद्रानें एकदां वृत्रासुरास मारण्याचा बेत ठरवून सर्व इतर देवांस आपल्या मदतीस येण्यास सांगितलें. इतर सर्व देवांनीं वृत्रावर हल्ला केला. वृत्तानें आपल्यावर सर्व देव हल्ला करीत असलेले पाहून त्यांस भिवविण्याकरीतां जोरानें श्वास सोडला, त्याबरोबर सर्व देव भिऊन पळाले. मरूतांनीं मात्र इंद्राची पाठ न सोडतां त्यास वृत्रास मारण्याबद्दल धीर दिला. ह्याबद्दल इंद्रानें फक्त मरूतांनां आपले मित्र समजून यज्ञांत आपल्याबरोबर त्यांस हविर्भाग देवविला.

हजारों युद्धांत दैत्यांचा पराभव केल्यावर व बलाढय वृत्रासुरांचे हनन केल्यावर, इंद्रास आपण मुख्य देवता होऊन प्रजापतीचा मान आपणांस मिळावा अशी महत्त्वाकांक्षा उत्पन्न झाली. तेव्हां प्रजापति वगैरे सर्व देवांनीं त्यास 'महेंद्र' नाव दिलें.

इंद्राची 'प्रासहा' नामक वावाता जाया होती. सर्व देव तिच्याकडे गेले व त्यांनीं इंद्राच्या कृतसंकल्पाबद्दल तिजजवळ विचारलें, तेव्हां तिनें, ''स्त्र्यनुरात्रं पत्याविच्छते'', स्त्री आपल्या पतीस रात्रीचे वेळीं हकीकत विचारते, त्याप्रमाणें मी विचारीन; नंतर सकाळी मी तुम्हांस कळवीन असें सांगितलें, व त्याप्रमाणें तिनें देवांस इंद्राच्या बेतांची माहिती दिली. ''सेना'' हीच इंद्राची प्रासहा नामक जाया होय, व प्रजापति हा तिचा श्वशुर होय. (ऐ.ब्रा.३.२०;२२)

साम्राज्याभिषेक.- यांत इन्द्राच्या महाभिषेकाचें गंभीर उदात्त वर्णन आहे. प्रजापतिप्रमुख सर्व देवांनीं अतिशय बलवान् ओजस्वी, शूर अशा इन्द्रदेवास आपला राजा करण्याचें ठरविलें तेव्हां प्रथम त्यांनीं राज्याभिषेक समारंभ करण्याचें ठरवून ''ॠच'' नांवांच्या निरनिराळ्या वेदमंत्रांनीं विणलेलें व कित्येक देवतांनीं धरलेलें असें सिंहासन तयार केलें. प्रथम इंद्रानें सिंहासनास प्रणाम करून व सर्व देवतांचें त्याच्या ठिकाणीं अधिष्ठातृत्व कल्पून देवांच्या साम्राज्यपदाचा स्वीकार केला. तदनंतर इतर देवांनीं त्यास अभिषेक करून आपापल्या विशिष्ट शक्ती  अर्पण केल्या. त्या अभिषेकोत्सवानें अभीष्ट वस्तू प्राप्त करून घेण्याची इंद्राचे अंगीं शक्ती आली व सरतेशेवटीं त्यानें मृत्युवर देखील जय मिळवला. (ऐ.ब्रा.८.१२;१४)

ह्यांत कोणत्या ॠषींनीं कोणत्या राजांस महाभिषेक केले त्यांची ऐतिहासिक माहिती आली आहे.

परीक्षितीचा मुलगा जनमेजय, ह्यास कवषाचा मुलगा 'तुर' नामक महर्षि ह्यानें अशा प्रकारानें राज्याभिषेक केला व जनमेजयानें त्यायोगानें संपूर्ण पृथिवी हस्तगत करून घेतली.

मनूचा मुलगा शार्यात राजा, ह्यास भृगुॠषीचा पुत्र च्यवन महर्षि यानें अभिषेक केल्यामुळें, त्यानें साम्राज्यदर्शक अश्वमेध करून देवांच्या यज्ञांत देखील गृहपति होण्याचा मान मिळवला.

सत्राजिताचा मुलगा शतानीक नांवाचा राजा ह्यास वाजरत्नाचा मुलगा सोमशुष्मा यानें अशाच रीतीनें अभिषेक केला व साम्राज्य मिळवण्यास समर्थ केलें. अशाच रीतीनें नारदपर्वतांनीं आंबष्ठय राजास साम्राज्याभिषेक केला, त्याचप्रमाणें उग्रसेनाचा पुत्र युधांश्रौष्टि ह्यास अभिषेक केला.

ह्याच रीतीनें भुवनाचा मुलगा विश्वकर्मा यास कश्यप महर्षीनें महाभिषेक केला.

वसिष्ठ महार्षीनीं देखील पैजवन सुदास नांवाच्या राजास ह्याच प्रकारें अभिषेक केला.

पुढे वाचा:ऐतेयब्राह्मणांतील ऐतिहासिक व इतर परिस्थितिदर्शक उल्लेख

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .