प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ११ वें
विषयांतर-वेदोक्त इतिहास व आख्यायिका

शतपथब्रह्मणांतील आख्यायिका.- 'अग्निदेवता-' वेदांचे अंगभूत जे ब्राह्मणग्रंथ त्यांमध्यें तत्कालीं प्रचलित अशा सर्व यज्ञविधींचे सांगोपांग विवेचन आहे, व त्यामुळें सर्व ब्राह्मणग्रंथांतून 'अग्नि' ह्या यज्ञिय देवतेलाच प्रामुख्य दिलेलें दिसून येतें. (श.ब्रा.काण्ड, अध्याय, ब्राह्मण, कंडिका. १.१.१, २; १.५.१, ६; १.५.१, १०; १.५.१, ११)

शतपथब्राह्मणाच्या सुरवातीलाच (प्रथम काण्ड १.१,२ ह्यामध्यें) ''अग्निर्वै देवानां व्रतपतिः'' अग्नि हाच सर्व यज्ञव्रतें वगैरेंचा शास्ता आहे, असें वर्णन आलें आहे. त्याचप्रमाणें (प्रथम काण्डांतील ५.१, ६; ५.१, ८; ५.१, १०; ५.१, ११) ह्या उल्लेखांतून  ''अग्निर्वै देवनामद्धातमाम्'', ''अग्निर्वै देवानां मृदुहृदयतमः'', ''अग्निर्वै योनिर्यज्ञस्य'' म्हणजे सर्व देवतांमध्ये अग्नि हाच मृदु अंतःकरणाचा असून, यज्ञाची जन्मदात्री देवता असल्याबद्दल वर्णन आहे. इतकेंच नव्हे तर ''अग्निर्वै सर्वा देवताः'' म्हणजे सर्व देवता अग्निमय असल्याबद्दल सांगितले आहे. भुवपति, भुवनपति, भूतानांपति, अशींहि अग्नीस नावें दिलेलीं आहेत. ''अग्निर्वै देवानामनीकं सेनाया वै सेनानीः'' म्हणजे  आग्नि हा देवांचा सेनानायक असून, पूर्वीं देवांचा होता व दूत होता असें वर्णन आहे. वरूण, यम, रूद्र हीं देखील अग्नीचींच स्वरूपें आहेत असेहि शतपथब्राह्मणांतून उल्लेख आहेत.

अग्नीच्या कथा.- खालील पहिल्या उल्लेखांत अग्नीनें आपलीं चार शरीरें विभागलीं व त्यांपैकीं तीन शरीरें नाहींशीं होऊन एका शरीरानें नंतर तो पाण्यांत दडून बसला असतां त्यास देवांनी हुडकून काढलें तेव्हां अग्नीनें पाण्यास शाप दिला असें वर्णन आहे. दुस-या दोन उल्लेखांत देवांनीं अग्नीची होतृपदावर स्थापना केली परंतु अग्नीचीं तीन्ही शरीरें मृत झाल्यामुळें अग्नि भ्याला; परंतु पुढें त्यानें आपणांस प्रथम हविर्भाग मिळेल या अटीवरच देवांचें होतृत्व मान्य केलें. चौथ्या उल्लेखांत, अग्नीच्या साह्यानेंच देवांनीं यज्ञाची कायम स्थापना केल्याबद्दल वर्णन आहे. पांचव्या उल्लेखांत, मनुष्यास अग्नि हा यज्ञ करून पोसण्याबद्दल प्रार्थना करीत असल्याचें वर्णन आहे. शेवटच्या उल्लेखांत अग्नीनें केलेल्या कायमच्या यज्ञस्थापनेचा उल्लेख आहे. (१.२.३, १; १.३.३, १३; १.४.२, १; १.५.३, २१; २.३.३, १; ४.१.१, ६;)

प्रजापति व सृष्टयुत्पत्तीच्या कथा.- ''प्रजापतिर्वै यज्ञः'' या ब्राह्मणवाक्यांत यज्ञासच प्रजापति हें नांव लाविलें आहे. परंतु कांहीं ठिकाणीं ''द्वादश वै मासाः संवत्सरस्तस्य पञ्चर्तवः एष एव प्रजापतिः सप्तदशः'' ह्यासारख्या वाक्यावरून बारा महिने; म्हणजे वर्षभर काल ह्यासच ''प्रजापति'' म्हणतात. कांहीं स्थळीं ''संवत्सरो वै पिता वैश्वानरः प्रजापतिः'' असें म्हटलें आहे. प्रजापतिदेवतेबद्दल पुष्कळ कथा सांपडतात. खालील पहिल्या दोन उल्लेखांत प्रजापतीचे सांधे खिळखिळे झाल्यामुळें देवांनीं यज्ञाच्या योगानें त्यास बरें केल्याचें वर्णन आहे. तिस-या उल्लेखांत प्रजापतीनें आपल्या दुहितेबरोबर मैथुन करून प्रजोत्पत्ति केली व खालीं पडलेल्या रेतापासुन उक्थांची उत्पत्ति झाल्याचें वर्णन आहे. चौथ्या उल्लेखांत मृत्यु हा प्रजापतीस मारण्याकरितां टपून बसला असतां प्रजापतीनें युक्तीनें त्याच्या वाटा बंद करून अमृतत्व मिळवलें असें वर्णन आहे. (२.४.२, १) ह्यांत प्रजापतीनें देव, पितर, मानव, असुर वगैरे निरनिराळीं अन्नें, देवांस यज्ञ, पितरांस स्वधा, मानवांस सकाळ संध्याकाळीं अशा रीतीनें अन्नें व ज्योति वांटून दिल्या.

पांचव्या उल्लेखांत प्रजापतीनें मुखापासून अग्नि प्रथम उत्पन्न केला व नंतर इतर देव, औषधी, मनुष्य उत्पन्न केले असें वर्णन आहे. सहाव्यांत प्रजापतीनें 'दाक्षायणयज्ञ' किंवा ज्यास 'वसिष्ठयज्ञ' असेंहि म्हणतात तो करून प्रजोत्पत्ति केल्याचें वर्णन आहे. सातव्यांत प्रजापतीनें मानव, पक्षी, सर्प उत्पन्न केले परंतु अन्न नसल्यामुळें सर्वांचा नाश झाला तेव्हां त्यानें दूध उत्पन्न केलें त्यामुळें त्याच्या प्रजा जगूं लागल्या असें वर्णन आहे. आठव्या उल्लेखांत असें वर्णन आहे कीं, प्रजोत्पादन करून आलेला शीण घालवण्याकरितां प्रजापतीनें ११ बली देण्यास योग्य प्राणी निवडून त्यांच्या आहुती दिल्या. नंतर षष्ठ काण्डांतील चारी उल्लेखांतून सृष्टयुत्पत्तीचें सांगोपांग वर्णन आहे. सृष्टीचे पूर्वीं फक्त नामविकृतिरहित असें  'सत्' होतें, नंतर त्यापासून विराट् पुरूषाची उत्पत्ति झाली व त्यापासून प्रजापति उत्पन्न होऊन त्यानें पंचमहाभूतांची उत्पत्ति केली व इतर मानव, पशु, पक्षी इत्यादिकांची उत्पत्ति झाली. पुढील दोन उल्लेखांत देखील अशाच प्रकारची सृष्टयुत्पत्ति वर्णन केली आहे. (१.६.३, ३५; ७.१.२, १; १.७.४, १; १०.४.४, १; २.२.४, १;  २.४.४, १; २.५.१, १; ३.९.१, १; ६.१.१, १; ६.१.३, १; ६.२.१, १; ६.२.३, १; १०.१.३, १; १०.५.३, १;)

जलप्रलयाची कथा व मत्स्यावताराची मूळ कल्पना.- सृष्ट्युत्पत्तीबद्दल अत्यंत महत्त्वाची आख्यायिका ह्यांत आली आहे. सूर्यवंशांतील मनुप्रजापति एका प्रातःकाळीं संध्यावंदन करीत असतां अर्ध्यांत एक मत्स्य आला व तो अर्घ्य टाकणार इतक्यांत मत्स्यानें मनूला भावी जलप्रलयाची साग्र हकीकत सांगून, त्यास उत्तर गिरी पर्वतावर पोहंचविण्याचें आश्वासन देऊन आपणांस मोठा होईतोंपर्यंत संभाळण्याची प्रार्थना केली. मनूनें तो मत्स्य मोठा झाल्यावर महासागरांत सोडला. पुढें जेव्हां जल प्रलय झाला तेव्हां सर्व पृथ्वीवरील प्राणी वहून गेले . परंतु मनूनें एका नावेंत बसून पूर्वींच्या मत्स्याचें साह्यानें उत्तरगिरीचे बाजूस प्रयाण केलें व पाणी उतरल्यावर त्या ठिकाणीं वसाहत करून आपण स्वतःच यज्ञापासून उत्पन्न केलेल्या मानवी इडादेवीबरोबर विवाह करून, यज्ञदेवतेस संतुष्ट करून प्रजोत्पादन केलें व म्हणूनच सांप्रत मनुष्यांस ‘मानव’ अशी संज्ञा प्राप्त झाली. पूराणांतील मत्स्यावताराची कल्पना सदरहु आख्यायिकेवरच बसविली असावी असें दिसतें ( १.८.१,१.)

यज्ञांची उत्क्रांति.– वरील मनुप्रजापतिसंबंधानें आणखीहि पुष्कळ उल्लेख आहेत. त्यांपैकीं खालील पहिल्या उल्लेखांत मनूची यज्ञसंबंधीं आख्यायिका आली आहे. मनूचा एक बैल होता, त्याच्या डरकावणीस भिऊन दैत्यांनीं आपल्या ‘खिलत’ व ‘आकुलि’ या नांवाच्या दोन परोहितांकडून त्या बैलास मारविलें. तेव्हा वृषभांतील असुरभयोत्पादक यज्ञवाक् मानवीच्या शरीरांत शिरून दैत्यांनां मानवीच्या शब्दापासून फार भीति वाटूं लागली. तेव्हां त्या दोन दैत्यपुरोहितांनीं तिचा वध केला. हयावर ती यज्ञवाक् यज्ञसंभारांत प्रविष्ट झाली, तेव्हां मात्र दैत्यांचें कांहीं चालेना. दुस-या उल्लेखांत यज्ञार्हत्व हें नरांतून अश्वांत, नंतर बैलांत, नंतर मेंढ्यांत व नंतर बक-यांत अशा रीतीनें उत्पन्न झालें असल्याबद्दल वर्णन आहे.

पुढील तीन उल्लेखांत यज्ञ देवांपासून पळून गेल्यामुळें दैत्य देवांस कसा त्रास देऊं लागले व जेव्हां यज्ञदेवता देवांनीं वश केली तेव्हां त्यांस असुरांवर जय कसा मिळवितां आला इत्यांदि वर्णन आहे. सहाव्या उल्लेखांत यज्ञ अद्दश्य झाल्यामुळें देवांनीं आपआपसांत पळण्याची शर्यत लावून हविर्भागाची वांटणी केल्याचें वर्णन आहे. त्याचप्रमाणें सातव्या उल्लेखांत सर्व देवांनीं अग्नि वरूण व इंद्र यांस अनुक्रमें राजा करून यज्ञविद्या संपादन केली असें लिहिलें आहे. आठव्यांत, देवांचे सांगण्यावरून अग्नींनें वाणीस तीनदां आह्वान केलें परंतु सरतेशेवटीं ती वणी अग्नीकडे आली असतां देवांनीं तिचें ग्रहण केल्यामुळें सर्व असुर “हेऽरयो हेऽरयः” ह्या ऐवजीं “हेलवो हेलवः” असें विकृत उच्चार करूं लागले असें वर्णन आहे. नवव्या उल्लेखांत देवांनीं प्रथम यजु मंत्रानेंच यज्ञकर्में केल्याबद्दल वर्णन आहे. दहाव्या उल्लेखांत, सत्यासत्यापैकीं देवांनीं सत्याचा आश्रय केल्यामुळें त्यांस यज्ञाची प्राप्ति झाली व असुरांनीं असत्य ग्रहण केल्यामुळें त्यांचा पराभव झाला असें वर्णन आहे. (१.१.४,१४;१.२.३.६;१.२.१,७;१.५.४.६;१.७.२,२२;२.४.३,२;२.६.४,१;३.२.१,१९;४.६.७,१३;९.५,१,१३;१.२.५,१.)

वामनावताराचें मूळ. – प्रथमकाण्डांत वामनावतारास आधारभूत अशी एक कथा आढळतें. देवासुरयुद्धांत देवांचा पराभव झाल्यामुळें ते पळून गेले असतां असुरांनीं आपआपसांत पृथ्वीची वांटणी करण्याचें ठरविलें. हें ऐकून आपणांसहि पृथ्वीची वाटंणी मिळावी या इच्छेंनें यज्ञस्वरूपी विष्णुदेवतेस अग्रेसर करून देवांनीं असुरांकडे पृथ्वीची मागणी केली. परंतु असुरांनां मत्सर उत्पन्न झाल्यामुळें वामनस्वरूपी विष्णूनें आक्रमिलेल्या प्रमाणाइतकीच भूमि देवांस देण्याचे त्यांनीं ठरविलें, परंतु विष्णूनें आपलें विराट् स्वरूप धारण करून सर्व पृथ्वी व्यापिली, व अशा रीतीनें देवांनां त्रैलोक्याची मालकी मिळाली (१.२.५,१)

सोमोत्पत्ति व इंद्रसंबंधी आख्यायिका.– यज्ञकर्मास आवश्यक अशा सोमरसाची उत्पत्ति पहिल्या उल्लेखांत दिली आहे. सोमराजा हा गंधर्वलोकांमध्यें रहात असे. सोमरसाच्या प्राप्तीबद्दल देवांनां इच्छा झाल्यामुळें त्यांनीं लबाडीनें गंधर्वांस स्त्रियांची फार आवड आहे हें जाणून वाणीस गंधर्वांकडे जाण्यास सांगून सोमास इकडे आणविलें. परंतु त्यांची खात्री होती कीं, वाणी पुनः देवांकडेच परतेल; व त्याप्रमाणें ती देवांकडे आली. दुस-या उल्लेखांत गायत्री सोमाहरणाकरितां गेल्याचा उल्लेख आहे. कारण तिस-या उल्लेखांत सांगितल्याप्रमाणें यज्ञकर्मांत सोमरसाची इंद्रदेवास फारच आवश्यकता होती. चौथ्या उल्लेखांत सोमाहरणाकरितां जात असलेल्या गायत्रीचा पंख तुटून पडल्यामुळें तोच पर्णवृक्ष झाला असें वर्णन आहे. (३.२.४,१;३.६.२,२;१.६.४,१;१.७.१,१.)

इन्द्र व वृत्र.– पहिल्या उल्लेखांत इंद्र व वृत्रासुर ह्यांच्या युद्धाचें वर्णन आहे, पुढील उल्लेखांत हें युद्ध त्रिककुद पर्वतावर झाल्याबद्दल सांगितलें आहे. तिस-या उल्लेखांत वृत्राच्या मरणाची बातमी द्रुतगति वायु ह्यानें देवांस सांगितल्यामुळें त्यास यज्ञांत हविर्भाग मिळाला असें वर्णन आहे. चौथ्या उल्लेखांत इंद्राचें नमुचि दैत्याबरोबर युद्ध झाल्याबद्दल वर्णन आहे. शेवटच्या दोन उल्लेखांत अशी कथा आहे कीं, हे सर्व वेद व यज्ञविद्या प्रथम असुरांनीं आपल्या हस्तगत करून घेतली, परंतु पुढें देवांनां असुरांपासून अत्यंत त्रास होऊं लागल्यामुळें इंद्रानें विश्वकर्म्याचा मुलगा वृत्र नांवाचा ब्राह्मण याजपासुन ॠक्, यजुः व साम हे तिन्ही प्रकारचे मंत्र हिरावून घेतले व त्यांच्या जोरावरच देवांनीं असुरांवर जय मिळवला. (१.१.३, ४; ३.१.३, १२; ४.१.३, १; ५.४.१, ९; ५.५.४, १; ५.५.५,१. )

रूद्रोत्पत्ति.- प्रजापतीचें अंग खिळखिळें झालें. तेव्हां मन्युखेरीज सर्व देव दूर पळाले व प्रजापतीला रडें आलें, त्यावेळीं पडलेल्या अश्रूंमुळें मन्यु हा हजार मस्तकांचा, अनंत नेत्रांचा असा झाला. जे अश्रुबिंदू खालीं पडले त्यांपासून हजारों रूद्रांची उत्पत्ति झाली. देवांनां फार भय वाटलें परंतु ''शतरूद्रीय'' स्तोत्रानें त्यांनीं रूद्रांची शांतता केली हें या प्रथम उल्लेखांत सांगितले आहे; व नंतर त्यांस यज्ञांत हविर्भाग देऊ लागले असा दुसरा उल्लेख आहे. (९.१.१, ६; १.७.३; १.)

माधव विदेघाची कथा.- माधव विदेघनामक राजा आपल्या मुखांत सर्व विश्वास हितकर असा अग्नि धारण करीत असे. रहूगणाचा पुत्र गौतम ॠषि हा त्याचा पुरोहित होता. गौतमानें राजास कांहीं विचारलें असतां, अग्नि आपल्या मुखांतून बाहेर निघून जाईल या भीतीनें विदेघ हा कांहींच प्रत्युत्तर देत नसे. गौतमानें अग्नीची पुष्कळ स्तुति केली, परंतु व्यर्थ. मात्र एकदां स्तुति करतांना गोतमाच्या मुखानें ''घृत'' शब्द म्हटला गेल्यावरून तो अग्नि विदेघाच्या मुखांतून बाहेर पडून चोहोंकडे प्रसार पावूं लागला. विदेघ व गौतम ह्यांनां देखील अग्नि दहन करूं लागला, तेव्हां माधवानें अग्नीच्या तापाचें शमन होण्याकरीतां सदानीरा नदींत बुडी मारली. राजा व पुरोहित असे दोघेहि अग्नीमागें जाऊं लागले. त्या अग्नीनें पृथ्वीवरील सर्व नद्या कोरडया पाडल्या, परंतु उत्तर दिशेकडून वाहणा-या सदानीरा नामक नदीपुढें त्याचें कांहीं एक चाललें नाहीं व म्हणूनच तीस हें नांव प्राप्त झालें. ह्या नदीच्या पूर्वेकडील प्रदेशांत पवित्र ब्राह्मणसमुदाय रहात असतो व त्यामुळें आतां देखील सरदहु स्थान अति पवित्र मानलें जातें. (१.४.१,१०.)

नक्षत्रांच्या आख्यायिका.- एका स्थलीं अग्न्याधानास प्रश्स्त अशीं नक्षत्रें सांगून त्याजसंबंधीं आख्यायिका सांगितल्या आहेत. पैकीं प्रथम कृत्तिका नक्षत्राबद्दल माहिती आहे. (२.१.२,१.)

कृत्तिका ह्या षट्संख्येवर अधिष्ठित असून शिवाय अग्निनक्षत्र असल्यामुळें अग्न्याधानास हेंच नक्षत्र योग्य होय. पूर्वीं कृत्तिका ह्या सप्तर्षीच्या पत्न्या होत्या. परंतु पुढें सप्तर्षि उत्तर दिशेस उगवूं लागले व ह्या पूर्व दिशेस उगवतात, तरी पुरूषसंयोगाशिवाय ह्यांची वृद्धि होते म्हणून ह्या नक्षत्रीं अग्न्याधान करूं नये.

रोहिणी नक्षत्रावर अग्न्याधान केलें असतां मनुष्यांस आपल्या भोग्यवस्तूंची प्राप्ति करतां येते. प्रजापतीनें प्रजावृद्धीची इच्छा मनांत धरून प्रथम अग्न्याधान रोहिणी नक्षत्रावरच केलें.

मृगशीर्ष हें प्रजापतींचे अयज्ञिय, निर्वीर्य असें शरीर आहे, तेव्हां मृगशीर्षावर आधान करूं नये.

फल्गुनी नक्षत्रावर अग्न्याधान अवश्य करावें. कारण ह्या नक्षत्राची देवता इंद्र असून फाल्गुन हें इंद्राचें गुप्त नांव आहे व त्यावरून तत्संबंधीं नक्षत्रास ''फल्गुनी'' असें नांव मिळालें.

पुनः ज्यांस अग्नीचें आधान करावयाचें आहे त्यांस पुनर्वसु नक्षत्र प्रशस्त होय.

क्षत्रियांनां अग्न्याधान करण्यास ''चित्रा'' नक्षत्र योग्य आहे. कारण एकदां देव व असुर हें स्पर्धेनें स्वर्गारोहणाची इच्छा करीत होते. असुरांनीं 'रोहिणी अग्नि'' प्रसन्न करण्याचा उद्योग आरंभला. तेव्हां असुर हे आतां देवांनां जिंकतील म्हणून इंद्रास काळजी पडली. तेव्हां त्यानें एक युक्ति असुरांचा अधःपात होण्याकरितां योजली. असुर यज्ञ करीत असतां ब्राह्मणरूपानें इंद्र तेथें जाऊन मी आपलीहि इष्टिका ह्या तुमच्या अग्नीसच देतों असें म्हटलें तेव्हां देवांनीं 'बरें' म्हटलें परंतु यज्ञसमाप्तीनंतर इंद्रानें आपली इष्टिका अग्नींतून उपसली व त्या योगानें असुरांचा यज्ञिय अग्नि ढांसळला व त्यामुळें असुरहि पराभव पावलें. तेव्हां ही चित्रहेतुयुक्त इष्टिका पुढें चित्रानक्षत्र झाली.

हीं सर्व नक्षत्रें पूर्वीं वीर्यशाली क्षत्रिय होते. परंतु सूर्यानें त्यांचें वीर्य काढून घेतलें तेव्हां हीं सर्व 'नक्षत्र' संज्ञेस पात्र झालीं. तेव्हां सर्व नक्षत्रांपेक्षां सूर्योदयसमयींच आधान करणें हें प्रशस्यतर होय. ह्या नक्षत्रावर एखाद्या पुण्यकर्मेच्छूनें अग्न्याधान केलें असतां, सर्व नक्षत्रांचें त्यास फळ मिळतें.

भार्गवच्यवान व सुकन्या यांची कथा.- चतुर्थ काण्डांत भार्गवच्यवानाचें संपूर्ण आख्यान आलें आहे. भार्गवच्यवान नामक ॠषि अरण्यांत तपश्चर्या करीत बसला असतां समाधिस्थितींत होता. त्याच अरण्यांत शर्याताचे पुत्र शिकार करण्याकरितां आले असतां त्यांनीं ॠषीच्या अंगावर पुष्कळ मातीचीं ढेंकळें मारलीं. त्यामुळें शर्याताचे राज्यांत अतिशय भयंकर दुष्काळ पडून लोक हवालदिल झाले. पुढें शोध करितां त्यास च्यवान ॠषीसंबंधीं हकीकत कळली. तेव्हां त्यानें आपली सुकन्या नांवाची सुस्वरूप कन्या च्यवानास दिली. सुकन्या आपल्या वृद्ध पतीची उत्तम प्रकारें सेवा करीत असतां एकदां देवांचे वैद्य अश्विनीकुमार ह्यांनीं तीस पाहिलें व तिला वृद्ध पतीस टाकून आपल्याबरोबर चालण्यास सांगितलें, व ''तुझा पति वृद्ध आहे व तू अतिशय सुंदर आहेस'' असें म्हणाले. सुकन्येनें ती हकीकत च्यवानास सांगितली. तेव्हां त्यानें पुनः जेव्हां अश्विनी भेटतील तेव्हां ''तुम्ही तरी कोठें अजून पूर्ण आहांत''? असें म्हणण्यास सांगितलें. पुन्हा जेव्हां अश्विनी भेटले तेव्हां त्यांनीं सुकन्येचें भाषण ऐकलें व यज्ञांत हविर्भाग मिळण्याकरितां च्यवानास तारूण्य दिलें व नंतर च्यवान व सुकन्या यांनीं उत्तम प्रकारें भोग भोगून परलोक संपादन केला व अश्विनींनां तेव्हांपासूनच यज्ञांत हविर्भाग मिळूं लागला. कारण ह्यापूर्वी हे अश्विनी मनुष्यप्राण्याशीं फार संबंध ठेवतात म्हणून सर्व देवांनीं त्यांस यज्ञांतून हविर्भाग बंद केला होता. (४.१.५, १.)

शांडिल्यायन व दायांपति यांचा 'अग्निहोतृवाद.- यांत शांडिल्यायन यानें दायांपतीनें विचारल्यावरून अग्नीची स्थापना कशी करावी हें सांगितलें आहे. (९.५.१, ६४.)

देवांनीं विचारल्यावरून तुर कावषेय यानें वेदीची उपपत्ति सांगितली. (९.५.२, १५.)

शांडिल्य व साप्तरथवाहनी यांचा ''प्रजापतीचा आकार'' ह्यावर संवाद आहे. (१०.१.४, १४.)

महाशाल जाबालाकडे धीर सातपर्णेय जाऊन 'वाक्' अग्नीची माहिती घेतो. (१०.३.३, १.)

श्वेतकेतु आरूणेय याचा बापाशीं संवाद आहे. (१०.३.४, १.)

औपवेश अरूण ह्याचे घरीं, सत्ययज्ञ पोलुशी, महाशाल जाबाल, बुद्धिल अश्वतरस्वी, इंद्रद्युम्न भाल्लवेय व गर्णसर्कराक्ष्य यांची सभा वर्णन केली असून विषय ''अग्नि'' होता. (१०.६.१, १.)

शतपथ ब्राम्हणाची ज्ञानपरंपरा
ब्रह्मन्,
प्रजापति,
तुरकावषेय,
यज्ञवचस् राजस्तंबायन,
कुश्रि,
शांडिल्य,
वात्स्य,
माहित्थी वामकक्षायण,
कौत्स,
माण्डव्य,
माण्डूकायनि,
संजीविपुत्र,


ब्राह्मणांतील कथा मंत्रभागांतील कथांचें पर्यवसान होत. कांहीं अंशीं यजुर्वेद व अथर्ववेद यांतील कथा याहि ॠग्वेदमंत्रांतील कथांचें उत्तरकालीन पर्यवसान होत. कथासूत्रांचा प्रारंभ पाहावयाचा झाल्यास तो ॠग्वेदांतच पाहिला पाहिजे. आख्यायिका व इतिहास यांचीं मुळें ॠग्वेदांत शोधावयाचीं तीं शोधणें म्हणजे दैवतेतिहासशास्त्रांत प्रवेश करणें होय. ॠग्वेदाकडे आणि तदंतर्गत दैवतेतिहासाकडे वळण्यापूर्वीं उत्तरकालीन स्वरूप म्हणजे ब्राह्मणांतील स्वरूप येथें दिलें आहे. त्या स्वरूपास अथर्ववेदांतील कथांचें थोडेंसे परिशिष्ट जोडलें म्हणजे ॠग्वेदांतील गूढें उकलावयास आपणांस उन्मुखता प्राप्त होईल. अथर्ववेदांतील पोराणिक कथांचीं पूर्वस्वरूपें दाखविणारे उल्लेख येथें देतों.-

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .