प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १२ वें
वेदकालीन इतिहास-दैवतेतिहास.

वेदांत अनेक देवता आहेत. त्यांतील अनेक आजच्या प्रचलित देवतांहून भिन्न आहेत. आज ज्या देवतांचें महत्व समाजांत आहे त्यापैकीं कितीचें महत्त्व किंवा त्यांचा निदान उल्लेख वेदांत आहे, जर कांहीं देवता वेदकालास आणि आजच्या कालास सामान्य असतील तर आजच्या देवतांस आज जें स्वरूप आहे तेंच वेदकालीं होतें काय, तसेंच वेदकाल म्हणून जो दिर्घ काल आपणांस दृष्टीस पडतो त्या कालांतल्या कालांतच दैवतांचें स्वरूप कितपत बदललें, तसेंच आर्यन् महावंशाच्या ज्या भारताबाहेर शाखा आहेत त्या शाखांमधील प्राचीन दैवतकल्पना वैदिक कल्पनांशीं कितपत जुळतात, शिवाय प्राचीन बाह्य आर्यन् लोकांच्या दैवतकल्पना आणि वैदिक दैवतकल्पना या दोन्ही त्यांहून अतिशय प्राचीन अशा दैवतकल्पनांचें पर्यवसान आहे काय, अशा प्रकारच्या प्रश्नांस उत्तरें देण्यासाठीं जें संशोधन करावें लागतें तें दैवतेतिहास या शास्त्रासाठीं केलेलें संशोधन होय.

हा अभ्यास थोडाबहुत झाला आहे. वैदिक कालांत ज्या देवता आपणांस दृग्गोचर होतात त्यांची यादी अगोदर करून त्या कालापुरतें अगोदर स्पष्टीकरण करावें आणि त्या स्पष्टीकरणानंतर आजची स्थिति आणि प्राचीन भारतीयेतर आर्यन् वंशांतर्गत राष्ट्रांची स्थिती यांची वेदकालीन दैवतात्मक स्थितीशीं तुलना करावी.

आता वेदकालीन दैवतांचीच यादी पुढें ठेवतों. ही यादी करतांना प्रथमतः दैवत म्हणजे काय याची या विवेचनापुरती व्याख्या दिली पाहिजे.

येथें केवळ प्राचीन व्याख्या घेतली नाहीं. तर देव, देवयोनी आणि राक्षस या सर्वांचा एकत्र समावेश केला आहे. लोक विरूद्ध झाले म्हणजे ज्या दैवतांस एकदां देवपण असतें त्यांसच राक्षसपणा देतात. यासाठीं दोहोंची एकत्र मिसळ करून यादी केली आहे. त्यांत देवता आणि राक्षसपिशाचादि वर्ग हा मागाहून निराळा काढतां येईल. वाईट करणारा तो राक्षस व चांगलें करणारा तो देव अशी सरसकट व्याख्याहि उपयोगीं पडत नाहीं.

येथें दिलेल्या यादींत प्राचीनांनीं मानलेले देव घेतलेच आहेत पण यास्क, सायण इत्यादि वेदबोधक आचार्यानीं ज्यांनां देवता ही पदवी दिली त्यांचाहि अंतर्भाव यांत केला आहे.

'या तेन उच्यते सा देवता' या नियमाप्रमाणें देवतांची केलेली निवड या यादींत समाविष्ट केली आहे. अर्थात् मंत्रांत ज्या देवतांचा उल्लेख आला आहे त्या देवता या यादींत स्वीकारल्या आहेत. यास्क, सर्वानुक्रमणी व सायणभाष्य यांमध्यें कांहीं देवतांविषयीं मतभेद आहे. तो खालीं टिपण करून जोडला आहे. देवतांचे सामान्य प्रकार 'द्युस्थ', 'अन्तरिक्षस्थ', 'भुमिस्थ', ‘गणदेवता’ 'देवपत्न्यः' असे करितां येतात. ते यास्कानें देवताकाण्डांत दिले आहेत. त्यांत जोडदेवताहि पुष्कळ आहेत.

अथर्ववेदांत विशेषतः मणि, वृक्ष, सर्प, रोग, भूतपिशाच, इत्यादिकांचा देवतांतच संग्रह झाला आहे. त्या देवताहि संगृहीत केल्या आहेत.

यास्क व सायण यांचे दैवतविषयक मतभेद अगोदर देतों.

 यास्काचार्य व सायणाचार्य यांच्यांतील ऋग्वेदीय देवताविषयक मतभेद

 ऋग्वेद आणि अथर्ववेद यांतील देवता :

आतां देवतांची यादीच देतो. खालील यादींत ऋग्वेद, व अथर्ववेद यांतील सामान्य देवतांपूर्वी शून्याची (०) खूण घातली आहे आणि फक्त अथर्ववेदांत आढळणा-या देवतांपूर्वी फुली (+) घातली आहे. फक्त ऋग्वेदांत दृष्ट होणा-या देवता चिन्हविरहित आहेत. या यादींत मतभेदास जागा असणे शक्य  आहे.

 ऋग्वेद आणि अथर्ववेद यांतील देवता 
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .