प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १५ वें.
ब्राह्मणोक्त व सूत्रोक्त यज्ञसंस्थेचें वर्णन.

आतांपर्यंत यज्ञसंस्थेचा जो इतिहास सांगितला त्यांतील बहुतेक भाग यज्ञसंस्था दृढ होण्यापूर्वींच्या कालचा म्हणजे ऋग्वेदाच्या मंत्रकालींच्या स्वरूपाचा होय. यजुर्वेदाचें पृथक्करण करतांना ब्राह्मणोक्त यज्ञसंस्थेचें स्पष्टीकरण बरेंचसें झालें आहे. तथापि तेवढयानें यज्ञ म्हणजे कसा असतो हें स्पष्ट होत नाही, यासाठीं विधींच्या वर्णनाकडे वळलें पाहिजे. हा क्लिष्ट भाग वाचकांस वाचावयास लावावयाचें जितकें दूर ढकलतां आलें तितकें ढकललें. पण जें वैदिक धर्मांची माहिती होण्यासाठीं जाणलेंच पाहिजे ते देण्यांवाचून आम्हांला गत्यंतर नाहीं. यासाठीं सोमयाग व एकरात्रकतूपासून द्वादशाह म्हणजे बारा दिवसांच्या क्रतूपर्यंत यागांचें स्थूल वर्णन देतों. या यागांपेक्षां मोठे याग म्हणजे सत्रें. त्यांचें वर्णन मागें दिलें आहे तेवढें पुरें आहे. सत्रें अलीकडे होत नाहींत. सत्रांचे सामान्य स्वरूप एवढेंच कीं, द्वादशाह क्रतूमध्यें जें अनुष्ठान चालतें तेंच आलटून पालटून अनेक दिवस चालविणें, लो. टिळकांनी आपल्या ''आर्टिक होम इन दि वेदाज'' या पुस्तकामध्यें असें सांगितलें आहे कीं, दैनिक कर्मेंच पांच सात महिने चालून त्यांचा समुच्चय बनला आणि सत्रें तयार झालीं.

सोमयागाची माहिती झाली म्हणजे एकंदर यज्ञसंस्थेच्या बऱ्याच भागाची माहिती झाली. यागाच्या प्रकारामध्यें इष्टि, पशु, सोमयाग आणि चयन हे मुख्यस्वरूपबोधक प्रकार होत. पशुयागांत इष्टि येते, व सोमयागांत इष्टि व पशू हे प्रकार येतात. चयन, इष्टि, पशु, किंवा सोमयाग यांपैकीं कोणत्याहि यागास जोडतां येतो. पण त्याचा तो अवश्य भाग नव्हे. चयनाशिवाय हे तिन्ही विधी करतां येतात, पण चयन स्वतंत्रपणें होत नाहीं. सोमयागाचा मुख्य दिवस एकच असतो म्हणून तो एकरात्र ऋतुच होय. अग्निष्टोमाच्या क्रियेंत थोडेबहुत फरक होऊन अतिरात्र, उक्ध्य इत्यादि प्रकार होतात. त्यांचे सविस्तर वर्णन पुढें येईलच.

आतां सोमयागाच्या वर्णनाकडे वळूं.

सोमयागाची सामान्यपणें कल्पना येण्याकरितां 'अग्निष्टोम' नामक प्रथम किंवा प्रकृतिभूत अशा सोमयागाच्या अनुष्ठानाचा क्रम संक्षेपानें येथे देण्यांत येत आहे.

दीक्षा घेणें. - हा सोमयाग वसंतऋतूंत करावयाचा असतो. पौर्णिमा, अमावास्या किंवा प्रतिपदा यांपैकीं कोणत्यातरी एका तिथीस अग्निष्टोमसंबंधी आरंभक अशी दीक्षणीयेष्टि करावयाची असते किंवा पूर्वोक्त तीन तिथींपैकी एखाद्या तिथीस सोमयागाचा मुख्य म्हणजे सोम कुटून ह्वन करण्याचा दिवस येईल अशा रीतीनें दीक्षणीयेष्टि करण्यांत येते.

अनुष्टानारंभ. - गाईपत्याच्या पश्चिमेस दर्भासनावर बसून यजमानपत्नी अग्निष्टोमासंबंधी प्रधानसंकल्प करतात. नंतर यजमान सोमप्रवाक म्हणून बोलावणेकऱ्यासारख्या एका ऋत्विजाची योजना करतो.

ऋत्विड्निमंत्रण. - यजमानाच्या आज्ञेनें तो सोमप्रवाक सोमयागास लागणाऱ्या ब्रह्मा, होता, अध्वर्यु इत्यादि १६ अगर सदस्यांसह १७ ऋत्विाजांकडे जाऊन त्यांनां यजमानातर्फे सोमयागांत अत्विंज्य करण्यासाठीं निमंत्रणें देतो.

ऋत्विजांचें स्वागत. - ऋत्विग्मंडळी यजमानाच्या घरी आल्यानंतर त्यांचे स्वागतासाठीं यजमान मधुपर्कविधि करतो.
अग्निसमारोप व यज्ञभूमिप्रवेश. - नंतर देवयजनाचें (यज्ञभूमीचें) याचन झाल्यावर अरणींच्या ठिकाणी अग्नीचें समारोपण करून त्या अरणी व यज्ञसामग्री घेऊन यजमान पत्नी व ऋत्विज वगैरे देवयजनस्थलांत प्रवेश करितात.

प्राग्वंश मंडप. - यज्ञभूमीच्या ठिकाणीं प्रथम प्राग्वंशनामक मंडप तयार केला जातो. या मंडपावर आच्छादनासाठी टाकलेलें कळक प्राचीन म्हणजे पूर्वेस शेंडे करून घातलें जातात. यामुळें या मंडपास प्राग्वंश किंवा प्राचीनवंश अशी संज्ञा पडली आहे. प्राग्वंश मंडपाची लांबी पूर्व पश्चिम १६ प्रक्रम किंवा पाउलें असून रूंदी दक्षिणोत्तर १२ पावलें किंवा प्रक्रम असते. मंडपाच्या चारी दिशांनां चार व ईशान्य कोपऱ्यांत एक मिळून पांच दारें केलेलीं असतात. शिवाय चारीं कोपऱ्यांनां चार झरोकीं राखिलेंलीं असतात. दाराखेरीज बाकीचा सर्व मंडप सभोंवतीं कूड घालून बंदिस्त केलेला असतो.

अग्निस्थापना. - या प्राग्वंश्मंडपांत कुंडें व वेदी वगैरे घालून त्या ठिकाणी (कुंडात) समारोपित अशा अरणींचें मंथन करून त्या योगानें उत्पन्न केलेल्या अग्नीची स्थापना केली जाते. नंतर आज्यसंस्कार करून कूष्मांडहोम, द्वादशसंभारयजुर्होम व सत्पहोतृहोम केला जातो.

दीक्षणीयेष्टी. - त्यापुढें अग्निष्टोमसंज्ञक सोमयागाच्या अंगभूत अशा दीक्षणीयेष्टीचा प्रांरभ केला जातो. अग्निष्टोमास सुरूवात झाल्यापासून तो समाप्त होईपर्यंत यजमान व पत्नी यांनीं खाण्यापिण्याच्या व इतर आचारांच्या बाबतींत कांहीं विशिष्ट नियमांचा अंगिकार करावा लागतो व अशा नियमानें राहण्याला 'दीक्षा' अशी संज्ञा आहे. दीक्षेसंबंधी जी इष्टि ती दीक्षणीयेष्टी होय. दीक्षणीयेष्टीमध्यें 'अग्नाविष्णू' या देवतेच्या उद्देशाने पुरोडाशाचे हवन केलें जातें. आज्येडाभक्षणापर्यत दीक्षणीयेष्टीचें अनुष्ठान संपुर्ण झाल्यावर प्राग्वंशमंडपाच्या उत्तर दिशेस कूड घालून बंदिस्त केलेल्या एका जागेंत यजमान आपली हजामत करवितो व नखे काढवितो आणि नंतर स्नान करतो. केशनिकृंतनाखेरीज बाकी सर्व गोष्टी यजमानाबरोबर पत्नीही करीत असते. स्नान झाल्यावर यजमान व पत्नी नवीं वस्त्रें यथाविधि परिधान करतात. नंतर उभयतां दूध, तूप इत्यादि हविष्य पदार्थांनी युक्त असें भोजन करितात. नंतर उभयतां आपल्या अंगास लोणी चोळतात व डोळयांत काजळ अगर सुर्मा घालतात आणि दर्भांच्या अंकुरांनी आपल्या शरीराच्या ठिकाणीं 'पवन' नामक संस्कार करवितात.

प्राग्वंशांत यजमानाचा प्रवेश. - नंतर यजमानाला अध्वर्यु व पत्नीला प्रतिप्रस्थाता असे दोघेजण दोघांनां प्रांग्वंश मंडपात आणून त्यांच्या नियमित जागीं बसवितात. नंतर दिक्षाहुती घातल्यावर यजमान वेदीमध्यें कृष्णाजिन पसरून त्यावर बसतो. पत्नीच्या डोक्याला रेशमी जाळी घालण्यांत येते. यजमान आपल्या कमरेला मोळाची एक तिपेडी दोरी गुंडाळतो व डोक्यास पागोटें गुंडाळतो. नंतर शरीर खाजविण्याकरीतां वगैरे आपल्या हातीं हरणाच्या शिंगाचा एक तुकडा धारण करतो व उंबराचा दंडहि आपल्या हातांत ग्रहन करतो. नंतर संभारयजु:संज्ञक मंत्राचें वाचन होऊन केशिनीसंज्ञक दिक्षेचा जप केला जातो. नंतर यजमान आपल्या मुठी वळतो. अध्वर्यु अमक्याचा पुत्र, अमक्याचा नातु व अमक्याचा पणतु आणि अमकीचा पुत्र, अमकीचा नातु व अमकीचा पणतु अमुक हा यजमान सोमयज्ञ करीत असल्याची खबर सर्वत्र जाहीर करतो. नंतर प्रवर्ग्यसंभरण नामक कर्म केलें जातें. दीक्षणीयेष्टीच्या पूर्वीही प्रवर्ग्यसंभरण करून घेण्याची चाल आहे.

प्रायणीयेष्टि. - दीक्षणीयेष्टीच्या दुसऱ्या दिवशीं 'प्रायणीया' नांवाची इष्टि करण्यांत येते. पथ्यास्वस्ति, अग्नि, सोम, सविता व अदिति या प्रायणीयेष्टीच्या पांच प्रधानदेवता असून अदितीशिवाय इतरांचें आज्यानें व अदितीचें तुपांत शिजविलेल्या भातानें हवन करण्यांत येतें. पथ्यास्वस्ति वगैरे चार देवतांचें अनुक्रमें चारी दिशेस व अदितीचें मध्यभागीं हवन करावयाचें असतें.

सोमक्रय. - प्रायणीयेष्टीचें अनुष्ठान संपल्यावर पुढें दिलेल्या रीतीनें 'सोमक्रय' म्हणजे सोमवल्ली विकत घेण्याचा विधि केला जातो. एक कालवड व इतर कांहीं वस्तु आणि गाडा वगैरे घेऊन यजमान वगैरे मंडळीं सोम विकत घ्यावयाच्या ठिकाणीं जातात. नंतर सोम विकणारा (सोमविक्रयी) जो असेल त्यापासून मोबदल्याचे पदार्थ देऊन सोमवल्ली मोजून विकत घेण्याचा विधि होतो. सोम विकत घेतल्यावर त्या सोम विकणाराला लांकडाच्या ढलपटांनीं किंवा मातीच्या ढेंकळांनीं चोप देऊन घालवून देण्यांत येतें.
नंतर विकत घेतलेल्या सोमराजाला (वल्लीला) गाडयांत घालून त्याला दोन बैल जोडले जातात व तो सोमराजाचा गाढा प्राग्वंशमंडपाचे द्वारीं आणण्यांत येतो. यावेळीं 'सुब्रह्मण्य' नामक एक सामगायक ऋत्विज पळसाची डाहाळी हातीं घेऊन सोमराजाचा गाडा हांकण्याचें काम करीत असतो. सोमराजा प्राग्वंशाच्या द्वारांत येऊन पोंचण्यापूर्वींच यजमान, अध्वर्यु, ब्रह्मा वगैरे प्राग्वंशांत येऊन सोमराजाच्या अतिथ्यासाठीं कराव्या लागणाऱ्या इष्टीची तयारी करूं लागतात. सोमराजा प्राग्वंशाच्या द्वारांत येतांच एक बोकड त्याच्यापुढें भेटीदाखल घेऊन जाण्यांत येतो व राजाला बसविण्यासाठीं खुर्चींप्रमाणें एक घडवंची घेऊन जाण्याचीहि तजवीज झालेली असते.

आतिथ्येष्टि. - सोमराजा आल्यावर व त्याच्या गाड्याचा दक्षिण बाजूचा बैल सोडल्यानंतर अध्वर्यु सोमराजाच्या अतिथ्यासाठीं करावयाच्या अतिथ्येष्टीचा निर्वाप पत्नीच्या हस्तें करवितो. नंतर सोमराजाच्या गाड्याचा उत्तरेकडील बैल सोडून मग सोमराजाला गाडयांतून उतरवून उंबराच्या लांकडाच्या (पूर्वोक्त) एका घडवंचीवर बसविला जातो. प्राग्वंश्मंडपांत आहवनीयाग्नीच्या दक्षिणेस घडवंची मांडून तिच्यावर कृष्णाजिन पसरून नंतर त्यावर राजास बसविलें जातें. नंतर आतिथ्येष्टीचें काम पुढें चालू होतें.

'विष्णू' ही आतिथ्येष्टीची प्रधानदेवता होय. विष्णु देवतेच्या उद्देशानें नऊ कपालांवर तयार केलेल्या एका पुरोडाशाचें हवन केलें जातें. तानूनप्त्र-नंतर इडा भक्षणापर्यंत आतिथ्येष्टीचें अनुष्ठान संपविल्यावर अध्वर्यूनें कांशाच्या वाटीमध्यें विधिपूर्वक ठेवलेल्या तुपाला स्पर्श करून सर्व ऋत्विज एकोप्यानें व प्रमादरहित असें अनुष्ठान करण्याविषयीं शपथ घेतल्यासारखा तानूनप्त्र नामक विधि करितात. मग यजमान व सर्व ऋत्विज यांजकडून सोमरसाच्या ठिकाणीं अप्यायननामक संस्कार करण्यांत येतो आणि त्यापुढें वेदीमध्यें एकावर एक हात ठेऊन निह्नव म्हणजे एका विशिष्ट तऱ्हेचा नमस्कार करावा लागत असतो. प्रवर्ग्य नंतर 'प्रवर्ग्य' नामक अनुष्ठानास सुरूवात होते- एकावर एक अशीं तीन बोळकीं एकास एक चिकटवून बनविलेंलें असें एक पात्र मातीचें तयार केलेलें असतें त्यास महावीर म्हणतात. एका मातीच्या ओटयावर तें 'महावीर' संज्ञक पात्र ठेऊन त्या सभोंवतीं अग्नि प्रज्वलित करण्यांत येतो. महावीरामध्यें तूप ओतून अग्निच्या आंचीनें तें खूप कढविलें जातें. नंतर गाईचें व शेळीचें दुध त्या कडकडीत तापलेल्या दुधांत ओतण्यांत येतें. दुग्धमिश्र अशा त्या महावीरांतील कडकडीत तापलेल्या तुपास 'धर्म' अशी संज्ञा आहे. या धर्मसंज्ञक द्रव्याचें यथाविधि हवन करण्यांत येतें. महावीरसंज्ञक पात्र मातीच्या ओटयावर ठेवल्यापासून तो 'धर्म' नामक द्रव्याचें हवन होईपर्यंतच्या अनुष्ठानांत वरचेवर प्रसंगानुसार होता कांहीं विशिष्ट मंत्रांनीं स्तुति करीत असून 'प्रस्तोता' हा सामगायन करीत असतो. धर्मसंबंधी असणाऱ्या या सर्व अनुष्ठानास प्रवर्ग्य अशी संज्ञा आहे.

उपसदिष्टि. - प्रवर्ग्याचे अनुष्ठान झाल्यानंतर 'उपसत्' नामक एक इष्टि होत असते. अग्नि, सोम व विष्णू या तीन देवता उपसदिष्टीमध्यें प्रधानभूत होत. या तिन्ही देवतांच्या उद्देशानें 'उपसत्' इष्टीमध्यें तुपाचें हवन केलें जातें. प्रवर्ग्य व उपसत् इष्टि हीं दोन कृत्यें क्रमानें सकाळीं एकदां व दुपारीं एकदां मिळून रोज दोन वेळ अशीं तीन दिवस करावयाची असतात. मधल्या (दुसऱ्या) दिवशीं सकाळचा प्रवर्ग्य व उपसत् इष्टि समाप्त झाली म्हणजे सुब्रह्मण्याचें सामगायन होतें व लागलीच वेदीकरणास सुरवात केली जाते. प्राग्वंश मंडपाचे पुढें ३ प्रक्रम जागा टाकून एक शंकू ठोकतात व तेथून पुढें ३६ प्रक्रमांवर एक शंकू ठोकतात. ही महावेदीची पूर्वपश्चिम लांबी होय. पश्चिमेस ठोकलेल्या शंकूच्या दक्षिणोत्तर १५।१५ प्रक्रमांवर एकएक शंकू ठोकतात व पूर्वेस ठोकलेल्या शंकूच्या दक्षिणोत्तर १२।१२ प्रक्रमांवर एकएक शंकू ठोकतात. ही महावेदीची रुंदी होय. महावेदीच्या पूर्वेकडील बाजूची दक्षिणोत्तर टोकें हीं महावेदीचे अंस असून पश्चिमेकडील बाजूचीं दक्षिणोत्तर टोकें या महावेदीच्या श्रोणी होत. महावेदीच्या उत्तरांसाच्या उत्तरेस एक लहानसें प्रक्रम अंतरावर ३६ अंगुलें हम चौरस असा एक खळगा खणतात. यास चात्वाल ही संज्ञा आहे. महावेदीच्या उत्तरांसापासून पश्चिमेस १२ प्रक्रमांवर व तेथून उत्तरेस एका प्रक्रमावर एक वेद्याकार स्थल तयार करतात त्याचें नांव 'उत्कर'. महावेदीच्या ठिकाणीं रूफ्य, परशु इत्यादि साधनांनीं वेदीकरण संस्कार केला जातो. उत्तरवेदी-महावेदीमध्येंच पूर्वबाजूला मधोमध अशी एक ओटेवजा उत्तरवेदी केली जाते. ही उत्तरवेदी दहा पावलें हम चौरस केलेली असते. नंतर प्रवर्ग्य व उपसत् इष्टि झाल्यावर त्या दिवशींचें अनुष्ठान संपतें. तिस-या दिवशीं प्रवर्ग्य व उपसत् इष्टि झाली म्हणजे दुपारच्या वेळी वाट न पाहतां लागलीच पुन्हां प्रवर्ग्य व उपसत् इष्टि करतात. नंतर प्रवर्ग्योद्वासन नामक कर्मास प्रारंभ होतो.
  प्रवर्ग्योद्वासन - प्रवर्ग्योची सर्वसामग्री घडवंचीवर ठेऊन त्या घडवंचीसह यजमान, पत्नी व अध्वर्युप्रभृति ऋत्विज उत्तरवेदीकडे येतात. मध्यें टप्याटप्याचे ठिकाणीं 'प्रस्तोता' सामगायन करीत असतो. उत्तरवेदीनजीक आल्यावर प्रवर्ग्याची सर्व सामग्री उत्तरवेदीवर चक्राकार मांडतात व तीवर दहींमध ओततात. आग्नीध्र नांवाचा ऋत्विज आपल्या खांद्यावर पाण्यानें भरलेला एक कलश घेतो व त्यांतील पाण्याची धार पाडीत पाडीत उत्तरवेदीसभोंवतीं तीन प्रदक्षिणा करतो, कांहीं मंत्र म्हणून ऋत्विजांनीं उपस्थान केल्यावर प्रवर्ग्योद्वासनाचें अनुष्ठान समाप्त होतें.