प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १५ वें.
ब्राह्मणोक्त व सूत्रोक्त यज्ञसंस्थेचें वर्णन.

अग्नीषोमीय पशु.

अग्निप्रणयन. - नंतर अग्निप्रणयन करण्यांत येतें आणि त्यापुढें सवनीय हविसंबंधीं शाखाहरण विधि करण्यांत येतो. पुढें हविर्धानसंज्ञक दोन गाडे केलेले असतात ते दोन गाडे महावेदीमध्येंच असणाऱ्या हविर्धान नामक मंडपांत नेऊन स्थापित करण्यांत येतात. एक गाडा दक्षिण बाजूस असतो त्यास दक्षिणहविर्धान व एक गाडा उत्तरबाजूस असतो त्यास उत्तरहविर्धान म्हणतात.

हविर्धान मंडप. - नंतर 'हविर्धान' नामक मंडप तयार करण्याचा समंत्रकविधि करण्यांत येतो. दक्षिण हविर्धानाच्यापुढें ‘उपरव’ संज्ञक चार खळगे खणून तयार करतात. प्रत्येक खळग्याचा व्यास टीचभर असतो. चार कोपऱ्यांत चार खळगे असून प्रत्येक खळग्यामध्यें एका टिचेचें अंतर असतें. या चारहि उपरवांचे संस्कार यथाविधि करण्यांत येतात. उपरव खणतांनां जी माती निघते ती उपरवांच्या पुढच्या बाजूस पसरून सोमरसाचीं पात्रें मांडून ठेवण्यासाठीं एक चौकोनी ओटा तयार कतात. त्या ओटयास 'खर' अशी संज्ञा आहे. उपरवावर अधिषवणफलक संज्ञक दोन फळ्या बसवितात व त्यावर कृष्णाजिन पसरून सोम कुटावयाचे चार दगडी बत्ते जुळून मांडून ठेवतात.

आग्नीध्रीय मंडप. - महावेदीच्या अर्धभागीं उत्तरबाजूस 'आग्नीध्रीय' नामक एक मंडप तयार करण्यांत येतो. मार्जालीय मंडप.-त्याचप्रमाणें दक्षिण बाजूस 'मार्जालीय' म्हणून एक मंडप तयार करण्यांत येतो. सदनामक मंडप-हविर्धान मंडपाच्या पश्चिमेस 'सद' नांवाचा एक मंडप तयार करण्यांत येतो. हा मंडप दक्षिणोत्तर १८ अरत्नी लांब व पूर्वपश्चिम ५ अरत्नी रुन्द असा असतो. 'सद' नामक मंडपाच्या मध्यभागीं 'औदुंबरी' संज्ञक उंबराची मेढ विधिपूर्वक पुरण्यांत येते. 'सद' न 'हविर्धान' या दोन्ही मंडपांना पूर्वेस एक व पश्चिमेस एक अशीं दोन दोन दारें केलेलीं असतात.

चात्वालांतून माती उकरून घेऊन त्या मातीनें सदोमंडपांत टीचभर व्यासाचे हमचौरस अगर वर्तुळ असे सहा ओटे एक एक हाताच्या अंतरानें घालतात. त्याचप्रमाणें 'आग्नीध्रीय' मंडपांत एक व 'मार्जालीय' मंडपांत एक असे दोन ओटे घालतात. या सर्व ओटयांनां 'धिष्णय' अशी संज्ञा आहे. नंतर अग्नीचें अन्वाधान करण्यांत येऊन 'अग्नीषोमीय' पशूच्या मुख्य अनुष्ठानास सुरूवात होते.

इध्माबर्हींचें आहरण करून पात्रासादन केलें जातें. आज्यग्रहणानंतर ब्रह्मा सोमराजाला उचलून घेतो.

वैसर्जन होम.-नंतर 'वैसर्जन होम' नामक कर्म होतें.
अग्नीषोमप्रणयन.-त्यानंतर अग्नीषोमप्रणयन करण्यांत येतें. यजमानपत्नी व त्यांच्या कुटुंबांतील सर्व माणसांसह अध्वर्यु वगैरे ऋत्विज अग्नि व सोमराजा यांनां घेऊन जातात. अग्नि उत्तर वेदीवरील अग्नींत मिश्र करण्यांत येतो व सोमराजा हविर्धानमंडपांत उक्त स्थलीं नेऊन ठेवण्यांत येतो. आज्यासादनापर्यंत कर्म आल्यावर अग्नीषोमीय पशू बांधण्यासाठीं 'यूप' नामक स्तंभ उभारण्याचा विधि (यूपोच्छ्रयण) केला जातो. नंतर पशूचें उपाकरण म्हणजे अग्नीषोम देवतेला पशूचें समर्पण करण्याचा विधि होतो. पशु म्हणजे या ठिकाणीं बोकड घ्यावयाचा असतो. नंतर प्रवृत्ताहुती वगैरे कर्मास सुरवात होऊन पशूला मारण्यांत येतें. वपायाग-मेलेल्या पशूचें पोट फाडून 'वपा' नांवाचा एक कागदासारखा पदार्थ पशूच्या कोठ्यास चिकटून असलेला सोडवून बाहेर काढण्यांत येतो आणि त्याचें हवन करण्यांत येतें. नंतर 'सुब्रह्मण्य' नामक एक ऋत्विज इन्द्राला निमंत्रणादाखल एक साम गातो व अमक्याचा अमुक नातु, पणतु, अमुक नांवाचा हा यजमान तुला यज्ञाला बोलावीत आहे अशी त्याची प्रार्थना करितो. पुढें पशुपुरोडाशाचें निर्वपण करण्यांत येतें. पुरोडाश तयार होऊन वेदींत आणून ठेवल्यावर नदीमधून किंवा इतर वाहत्या जलप्रवाहामधून एक पाण्याची घागर अध्वर्यु भरून आणतो व शालामुखीय नामक अग्नीच्या पश्चिमेस ती ठेवून देतो. ह्या घागरींतील उदकास 'बसतीवरी' अशी संज्ञा आहे. या पाण्याचा उपयोग दुसऱ्या दिवशीं सोमवल्ली कुटावयाचे वेळीं वगैरे करण्यांत येतो.

पशुपुरोडाशयाग व अंगयाग. - पशुपुरोडाशाचा याग झाल्यानंतर हवनशिष्ट अशा पुरोडाशाचें यजमान व कांहीं प्रमुख ऋत्विज भक्षण करतात. नंतर मारलेल्या पशूच्या शरीरापासून काढून घेतलेल्या निरनिराळ्या अंगांचें अग्नीमध्यें हवन होतें. हवन होऊन राहिलेल्या अंगांच्या अवशेषाचें यजमान व कांहीं ऋत्विज भक्षण करतात. नंतर राहिलेलें सर्व कर्म आटपल्यावर अग्नीषोमीय पशूचें अनुष्ठान समाप्त होतें.

वसतीवरीपरिहरण. - रात्रीं 'वसतीवरी' नामक पाण्यानें भरलेली घागर अध्वर्यु आपल्या खांद्यावर घेऊन यज्ञभूमीसभोंवती कांहीं विवक्षित रीतीनें प्रदक्षिणा घालतो व शेवटीं ती पाण्यानें भरलेली घागर आग्नीध्रीयमंडपांत नेऊन ठेवतो. सुब्रह्मण्याह्वान-नंतर पूर्वीं सांगितल्याप्रमाणें इन्द्राला यज्ञाला येण्याविषयीं यजमानातर्फे विनंति करण्यादाखल 'सुब्रह्मण्य' हा ऋत्विज सामगायन करतो. नंतर दुसऱ्या म्हणजे मुख्य दिवशी दहीं, आमिक्षा इत्यादि ज्या पदार्थांचे हवन करावयाचें आहे त्यांसंबंधीं 'दोह' म्हणजे गाईची दुधें काढून तीं विरजून ठेवण्यांत येतात. नंतर सर्व ऋत्विज अलंकार वर्गरे धारण करून आग्नीध्रीयमंडपांत रात्रीची वस्ती करतात. पत्नी प्राग्वंशांत जागत राहते आणि यजमान हविर्धानमंडपांत सोम (वल्ली) राजाचें संरक्षण करीत बसतो.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .