प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १५ वें.
ब्राह्मणोक्त व सूत्रोक्त यज्ञसंस्थेचें वर्णन.

द्वादशाह क्रतूमध्यें कामनापरत्वें ग्रहांच्या अनुष्ठानाचे प्रकार.- ऐंद्रवायव, मैत्रावरून व आश्विन या तिन्ही ग्रहांस म्हणजे सोमरसानें भरलेल्या पेल्यांस द्विदेवत्य अशी संज्ञा आहे. आपले वडील, आजे, पणजे, ज्या आचारानें वागले त्याच आचारानें आपल्या पुत्रपौत्रांनीं वागावें अशी इच्छा असणाऱ्या यजमानानें द्वादशाहक्रतूमध्यें द्विदेवत्य ग्रहांपैकीं ऐंद्रवायव नामक ग्रह प्रथम भरून घेऊन नंतर बाकीचे भरावे. 

वस्तुत: प्रकृतिभूत अग्निष्टोमामध्यें ऐंद्रवायव हाच ग्रह प्रथम भरून घ्यावयाचा विधि आहे, तथापि कामनेच्या दृष्टीनें सांगतांना ऐंद्रवायव ग्रह प्रथम घ्यावा ही गोष्ट पुन्हां सांगावी लागली आहे. ज्याप्रमाणें रोजचा अग्निहोत्रहोम दह्यानें द्यावा असें एकदां सांगून पुन्हां काम्यपरत्वें, म्हणजे इंद्रियसौष्ठव प्राप्त होण्यासाठीं 'दग्धेंद्रियकामस्य' 'इंद्रियकाम असेल तर दह्यानें होम' द्यावा असें पुन्हां एकदां सांगितलें. त्याचप्रमाणें ऐंद्रवायव ग्रहाच्या बाबतींत समजावें.

रोगग्रस्त अशा यजमानानें रोगमुक्तीसाठींहि द्वादशाह क्रतू- मध्यें 'ऐंद्रवायव' हाच ग्रह प्रथम भरून घ्यावा.

सत्ररूप द्वादशाहामध्यें दीक्षित यजमानापैकीं कोणी मृत झाल्यास बाकीच्यांनीं ग्रह भरून घेतांना प्रथमत: 'मैत्रावरूण' नामक द्विदेवत्य ग्रह भरून घ्यावा व नंतर बाकीचे भरावे.  

सर्व देवांमध्यें उभयतां अश्विनीकुमार हे आनुजावर म्हणजे मानानें कमी दर्जाचे आहेत. वस्तुत: देव या नात्यानें इतर देवांच्या बरोबरीनें ते पूज्य असतांना वैद्यकीचा धंदा केल्यामुळें त्यांचा दर्जा कमी झाला. मनुष्यसमुदायामध्यें देखील वैद्यकीचा धंदा करणारे लोक कमी दर्जाचे असल्याचें वर्णन श्रुतींत आहे. वैद्यकीच्या धंद्यामुळें कमी दर्जावर आलेले आश्विनदेव पुढें बहिष्पवमानसंज्ञक सामगायनाच्या श्रवणानें पावन होऊन पुन्हां वरच्या दर्जांत आले, त्याचप्रमाणें वास्तविक योग्यता मोठी असूनहि कनिष्ठ दर्जांत गणल्या जाणाऱ्या यजमानानें द्वादशाह क्रतूमध्यें आश्विनसंज्ञक द्विदेवत्यग्रह प्रथम भरून घेऊन नंतर बाकीचे भरावे. म्हणजे अश्विनौ देवांच्या अनुग्रहानें त्या यजमानाचा दर्जा श्रेष्ठ प्रतीचा होतो.

शरीरकांति किंवा संपत्ति नष्ट झालेल्या यजमानानें द्वादशाह क्रतूंमध्यें 'शुक्र' नामक ग्रह प्रथम घेऊन नंतर बाकीचे घ्यावे. कारण, आदित्य म्हणजेच हा शुक्र ग्रह होय. आदित्याहून जास्त प्रकाशमान असा कोणता ग्रह आहे? यासाठीं आदित्यस्वरूप असा 'शुक्र' ग्रह प्रथम घेतल्यानें दरिद्री किंवा शरीरकांति नष्ट झालेला यजमान संपत्तीच्या व शरीरकांतीच्या बाबतींत पराकाष्ठेला जाऊन पोंचतो.  

शत्रूचा नाश व्हावा अशी इच्छा असणारानें 'मंथि' नामक ग्रहाचें प्रथमत: ग्रहण करून मग इतरांचें करावें म्हणजे शत्रु मृत्यूकडून घेरला जातो.

आपले वडील, आजे वगैरे पूर्वज धन, विद्या इत्यादि बाबतींत श्रेष्ठ होते, आपण मात्र अगदीं हीन आहों व या हीनतेमुळें कोठेंहि समाजामध्यें आपल्याला चार शब्द बोलून वजन पाडतां येत नाहीं असें वाटणाऱ्या यजमानानें 'आग्रयण' नामक ग्रह प्रथम भरून घ्यावा.

दुसऱ्यानें केलेल्या 'मारणा' चा प्रयोग त्याच्यावरच पुन्हां उलटावा व आपला बचाव व्हावा असें वाटत असेल त्यानें 'उक्थ्य' नामक ग्रह प्रथम भरून घ्यावा. मात्र ग्रह भरून घेण्यापूर्वी 'सरस्वत्यभिनोनेषि' ह्या पुरोरुक् संज्ञक ऋचेचें पठण करावें आणि नंतर ग्रह भरून घ्यावा.

रोगपरिहाराची अथवा पर्जन्यवृष्टि होण्याची इच्छा करणारांनें ऐंद्रवायवादि ग्रह भरून घेणें ते अगदीं कांठोकांठ सोमरस भरून येईल अशा रीतीनें भरपूर भरून प्यावें.

ब्रह्मवादी असें म्हणतात कीं, सर्व सोमयाग अग्निष्टोमप्रारंभक आहेत आणि म्हणूनच अग्निष्टोमास 'ज्येष्ठ यज्ञ' असें म्हटलें आहे. असें असतांना द्वादशाहामध्यें प्रथम दिवशीं तुम्ही अतिरात्राचा प्रयोग कां करता? यावर दुसऱ्या पक्षाचें उत्तर असें कीं, द्वादशाह यज्ञ हा जर एक पुरुष मानला तर अतिरात्र यज्ञ हे त्याचे चक्षुर्गोलक होत व अग्निष्टोम हे त्या डोळ्यांतील बाहुल्या होत. यासाठीं यजमान जर अग्निष्टोम प्रथम करील तर डोळ्यांच्या आधारावांचून भलत्याच ठिकाणीं बाहुल्या बसविल्यासारखें होईल. तर तसें न करतां प्रथम अतिरात्ररूप चक्षुर्गोलकाचा आधार तयार करून नंतर अग्निष्टोमरूपी बाहुल्या त्यांत बसवाव्या. म्हणजे प्रथम दिवशीं अतिरात्र व दुसरे दिवशीं अग्निष्टोम करावा. त्याचप्रमाणें शेवटच्या बाराव्या दिवशीं व त्याच्या अलीकडच्या किंवा अकराव्या दिवशीं क्रमानें अतिरात्र व  अग्निष्टोम क्रतु करावा. मध्यें जे आठ दिवस राहतात त्यांमध्यें दररोज उक्थ्यनामक यज्ञ करावा.

सारांश अतिरात्र, अग्निष्टोम व उक्थ्य या तीन क्रतूंच्या आवृत्तिसमूहानें द्वादशाहनामक यज्ञ सिद्ध होतो.

वरील वर्णन विशेषत: तैत्तिरीय संहितेस धरून दिलें आहे आणि जेथें विशेष फोड करावी असें वाटलें तेथें सत्याषाढ सूत्राचा उपयोग केला आहे. अख्यायिका अर्थात् प्रत्येक क्रतूसंबंधानें आहेत. पैकीं त्रिरात्रासंबंधाची मात्र येथें नमुन्यादाखल दिली आहे.

पुढें परिशिष्टांत जीं यज्ञसंस्थेतिहासबोधक कोष्टकें आहेत तीं यजू आणि अथर्वे यांच्या समेटापूर्वीं यज्ञसंस्था कशी काय होती यासंबंधाचा भावी संशोधकांनां विचार करण्यास साहाय्यक होतील. त्यांतील दुसरें कोष्टक निरनिराळ्या ब्राह्मण ग्रंथांप्रमाणें हौत्र कसें बदलत होतें व त्या ब्राह्मणांत व त्याच्याच अनुयायी सूत्रकारांत कसा भेद उत्पन्न होत होता याचा एकंदर इतिहास दाखवितें. असो.

यज्ञसंस्था आज बुडाल्यासारखीच आहे पण ती कार्य करून गेली. प्राचीन वाङ्मय तिनें जिवंत ठेविलें आणि आपणांस देशाचा भौतिक व सांस्कृतिक इतिहास लिहिण्यास साहित्य दिलें. या साहित्याचा आपणांस ऐतिहासिक उपयोग कसा होतो हें पुढच्या भागांत स्पष्ट होईल. वेदकालीन इतिहास लिहिण्यास वेद व इतिहासपुराणेंहि अंशेंकरून उपकारक होतील.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .