प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १५ वें.
ब्राह्मणोक्त व सूत्रोक्त यज्ञसंस्थेचें वर्णन.

सुत्याह किंवा सवनीयदिन.

प्रात:सवन. - मोठी पहांट झाली, म्हणजे सोमयागाच्या मुख्य दिवसाच्या अनुष्ठानास सुरवात करण्यांत येते.
प्रथम अध्वर्यु आग्नीध्रीयमंडपांतील धिष्ण्याग्नीवर 'यज्ञतनु' संज्ञक ३३ आज्याहुती देतो. नंतर सवनीय पशूच्या अनुष्ठानास सुरवात होते. आज्यासादनांत कर्म झालें म्हणजे आग्नीध्रीय वगैरे मंडप व स्त्रुचा यांनां अभिमर्शन करण्यांत येतें. नंतर 'खर' नामक ओटयावर सोमरस सांठविण्याचे लांकडी ग्रह (पेले) वगैरे पात्रें मांडून ठेवावयाचीं असतात. उपरवांवर फळ्या घालून त्यावर अधिषवणसंज्ञक चामडें पसरलेलें असतें. त्याच ठिकाणीं सोम कुटावयाचे बत्ते किंवा वरवंटे एकमेकांशीं तोंडें समोरासमोर जुळवून ठेवण्यांत येतात व त्याच्यावर बरीचशी सोमवल्ली काढून ठेवण्यांत येते. प्रातरनुवाक-नंतर अध्वर्यूच्या आज्ञेवरून 'होता' हा ऋत्विज प्रातरनुवाक संज्ञक मंत्रसमूह पठन करतो. नंतर सवनीय पुरोडाशाच्या पात्रांचें आसादन करण्यांत येतें. मग 'इन्द्र' देवतेच्या उद्देशानें पुरोडाशादि हविर्द्रव्याचा निर्वाप केला जातो.

नंतर एकंदर पांच प्रकारचीं हविर्द्रव्यें तयार करण्यांत येतात. १ धाना (कर्पट भाजलेले सातू), २ करंभ (भाजक्या सातूच्या पिठांत दूध मिश्रण केल्यावर बनलेला पदार्थ), ३ परिवाप (भाताच्या लाह्या), ४ पुरोडाश, ५ पयस्या किंवा आमिक्षा (नासक्या दुधाचा घट्ट चोथा) हीं तीं पांच हविर्द्रव्यें होत. नंतर चात्वालाशेजारीं एक मोठें पाण्यानें भरलेलें पात्र ठेवलेलें असतें त्यांतून मैत्रावरूण व होता यांचे चमस (सोमरस प्राशन करावयाचीं पाळीं,) पन्नेजनी नामक एक तपेली आणि एकधना नांवाच्या २।३ लहान लहान घागरी भरून घेण्यांत येतात. पन्नेजनी नामक तपेली आणण्यानेण्याचें काम पत्नीकडून करविण्यांस येतें.

दधिग्रहप्रचार. - नंतर 'दधिग्रह' म्हणजे एक पेलेवजा लांकडी पात्रांत दहीं भरून घेऊन त्या दह्याचें हवन केलें जातें.
अंशुप्रचार. - नंतर थोडासा सोम कुटून त्याच्या रसानें भरलेल्या एका पात्रानें हवन केलें जातें. यास 'अंशुप्रचार' म्हणतात. अदाभ्यप्रचार – याचप्रमाणें 'अदाभ्य' संज्ञक एका पात्रांतून सोमरसाचें हवन करण्यांत येतें. महाऽभिषवनंतर अध्वर्यु, प्रतिप्रस्थाता, नेष्टा व आग्नीध्र असे चौघे ऋत्विज चारी दिशांस बसून अधिषवण चर्मावर सोमवल्ली खूप कुटून तिचा रस काढतात. नंतर एका लांकडी घडवंचीवर 'दशापवित्र' संज्ञक एक लोकरीचें गाळणें पसरण्यांत येतें व त्यावरून घडवंची खालीं ठेवलेल्या द्रोणकलशांत (लांकडी डोणींत) सोमरस गाळून घेण्यांत येतो. ग्रहग्रहण-नंतर निरनिराळ्या देवतांच्या उद्देशानें निरनिराळीं पेलेवजा लांकडी पात्रें गाळण्यांतून खालीं पडत असलेल्या सोमरसाच्या धारेमध्यें भरून घेऊन 'खर' नामक ओटयावर जागच्याजागीं ठेवलीं जातात. शेवटीं द्रोणकलश आधवनीय व पूतभृत या सोमरसपूरित पात्रांनां अभिमर्श केला गेल्यानंतर अध्वर्यु, प्रस्तोता, प्रतिहर्ता, उद्गाता, प्रशास्ता, यजमान व ब्रह्मा हे अनुक्रमें एकमेकाला स्पर्श करून विप्रुढ्ढोम संज्ञक कर्म करितात.

नंतर चात्वालाशेजारीं व वेदीच्या आंत बसून प्रस्तोता उद्गाता व प्रतिहर्ता हे तिघे ऋत्विज 'बहिष्पवमान' संज्ञक सामगायन करतात. नंतर ग्रहोपस्थान व धिष्ण्योपस्थान हीं कर्में झाल्यानंतर पुरोडाशादि हविर्द्रव्यांनां अलंकरण इत्यादि संस्कार केले जातात व 'अश्विनौ' देवतांच्यासाठीं सोमरसाचा एक ग्रह (पेला) भरून ठेवला जातो.

सवनीय पशु.- नंतर यूपस्तंभाला दोरी गुंडाळण्यापासून सवनीय पशूचें अनुष्ठान सुरू होतें. अग्निदेवतेच्या उद्देशानें पशूचें उपाकरण म्हणजे समर्पण केल्यानंतर पशुसंबंधीं वपायागापर्यंत सर्व अनुष्ठान अनुक्रमानें केलें जातें. उपस्थान- नंतर द्रोणकलश वगैरे सर्व ग्रहांचें व धिष्ण्यांचें उपस्थान करून अध्वर्यु प्रभृति सर्व ऋत्विज आपआपल्या नियमित जागीं येऊन बसतात. नंतर शमिता नांवाचा जो (पशु मारणारा) माणूस असतो तो अध्वर्यूच्या आज्ञेवरून पशूचीं निरनिराळीं अंगें शमित्र शाळेंत अग्नीवर शिजत लावतो. प्रतिप्रस्थात्यानें सवनीय हवि आणून दिल्यानंतर अध्वर्यु त्या पांच हविर्द्रव्यांचें वेदीमध्यें आसादन करून ठेवतो. सवनीय पुरोडाशाचें यजन-नंतर सवनीय अशा पुरोडाशादि ५ द्रव्यांचें यजन केलें जातें. द्विदेवत्यप्रचार- प्राशित्रावदानपर्यंत अनुष्ठान करावयाचें झाल्यानंतर अध्वर्यु व प्रतिप्रस्थाता हे इन्द्रवायु, मित्रावरुण व अश्विन या जोडदेवांच्या उद्देशानें द्विदेवत्यसंज्ञक सोमरसानें भरलेल्या दोन पात्रांनीं यजन करितात.

शुक्रामंथिप्रचार.- मग शुक्रामंथिप्रचार नामक कर्म सुरू होतें. अध्वर्यूनें 'शुक्र' नांवाचा एक ग्रह (सोमरसानें भरलेलें पात्र) घेतलेला असतो व प्रतिप्रस्थात्यानें 'मंथि' नामक ग्रह घेतलेला असतो. चमसाध्वर्यू म्हणून जे उपऋत्विज असतात त्यांनीं सोमरसानें भरलेले चमस घेतलेले असतात. नंतर कांहीं विशेष पद्भतीनें अध्वर्यु व प्रतिप्रस्थाता हे उभयतां आपआपल्या हातांतील ग्रहानें सोमरसाचें हवन करतात. त्याचवेळीं चमसाध्वर्यू आपल्या हातांतील चमसांनीं सोमरसाचें हवन करतात. नंतर मैत्रावरुणप्रभृति पांच हौत्रकांच्या चमसांनीं सोमरसाचें हवन केलें जातें. पुढें अध्वर्यु, प्रतिस्थाता व होता हे तिघे 'द्विदेवत्य' संज्ञक ग्रहांतील हवनशिष्ट सोमरसाचें प्राशन करितात.

वाजिनयाग.-नंतर इडा भक्षण केलें जातें व वाजिनाचा (नासलेल्या दुधाचें पातळ पाणी) याग करण्यांत येतो. सवन मुखभक्ष-नंतर हवन होऊन राहिलेल्या सोमरसाचे आपआपल्या चमसानें होतृप्रभृति ऋत्विज प्राशन करितात. या सामुच्चयिक सोमरस भक्षणास 'सवनमुखभक्ष' अशी पारिभाषिक संज्ञा आहे. नंतर अध्वर्यूनें ज्याच्या हातावर पुरोडाशशकल दिलें आहे असा 'अच्छावाक' नांवाचा ऋत्विज कांहीं मंत्रसंघाचें पठण करतो व नंतर त्याच्या सोमरसचमसाचें हवन अध्वर्यु करतो. अच्छावाक आपल्या हुतशिष्ट चमसाचें प्राशन करतो.
ऋतुग्रहप्रचार - नंतर अध्वर्यु व प्रतिप्रस्थाता हे उभयतां 'ऋतुयाग' नांवाचें सोमरसह्वनात्मक कर्म करतात. ऋतुयागामध्यें होता, मैत्रावरुण इत्यादि सात होते व यजमान आणि अध्वर्यु यांनीं याज्यामंत्र म्हणावयाचे असतात. अध्वर्यु व यजमान हे आपआपले याज्यामंत्र म्हणण्याचें काम होत्यावरच सोपवितात. ऋतुयागामध्यें अधिक महिन्यासुद्धां तेरा महिने व सर्व ऋतु यांच्या उद्देशानें सोमरसाचें हवन होत असतें. नंतर हुतशेष अशा सोमरसाचें ऋत्विज प्राशन करतात. नंतर इन्द्राग्नी या जोडदेवतेच्या उद्देशानें एक सोमरसाचा पेला भरून ठेवण्यांत येतो. नंतर होता 'शस्त्र'संज्ञक विशिष्टमंत्रसंघ विशिष्ट पद्धतीनें म्हणतो. नंतर भरून ठेवलेल्या सोमरसाचें हवन व भक्षण होतें. नंतर इन्द्राग्नीप्रमाणेंच 'मित्रावरुण' या देवतेसाठीं सोमरसाचा (ग्रह) पेला भरून ठेवल्यावर उद्गाता वगैरे तिघेजण सामगायक ऋत्विज मित्रावरुणांच्या स्तुतिपर सामगायन करतात. नंतर
‘मैत्रावरुण' नामक ऋत्विज मित्रावरुणांच्या स्तुत्यात्मक 'शस्त्र' पठण करतो. नंतर पूर्वीप्रमाणेंच भरून घेतलेल्या सोमरसाचें हवन व भक्षण होतें. नंतर 'प्रतिप्रस्थाता' 'इन्द्र' देवतेसाठीं सोमरसाचा ग्रह भरून घेतो. नंतर इन्द्राच्या स्तुतिपर असें उद्गातृप्रभृति सामक सामगायन करतात. 'ब्राह्मणाच्छंसी' शस्त्र पठण करतो. नंतर सोमरसाचें हवन झाल्यावर ‘ब्रह्मणाच्छंसी’ प्रमुख ऋत्विज हवनिशष्ट सोमरसाचें प्राशन करतात. याचप्रमाणें प्रतिप्रस्थाता 'इन्द्राग्नी' देवतेसाठीं ग्रह भरून घेतो. 'अच्छावाक' शस्त्र म्हणतो, सामगान केलें जातें व नंतर सोमरसाचें हवन आणि भक्षणविधि केला जातो. सवनप्रायश्चित्तें.- नंतर अध्वर्यू सवनप्रायश्चितें घालतो आणि मैत्रावरुणानें 'सर्पत' 'बाहेर चला' अशी आज्ञा करतांच सर्व ऋत्विज सदाच्या बाहेर पडतात व प्रात:सवनाचें अनुष्ठान समाप्त होतें.  

माध्यंदिनसवन.- नंतर माध्यंदिनसवनाचें अनुष्ठान सुरू होतें. द्विदेवत्ययाग, ऋतुग्रहयाग, वगैरे कांहीं कृत्यें माध्यंदिन सवनांत वर्ज होत असून बाकी अनुष्ठान बरेंचसें प्रात:सवनाप्रमाणें होत असतें. तथापि कांहीं कांहीं विशिष्ट गोष्टींचा येथें संक्षेपानें उल्लेख करणें जरूर आहे. सोमाभिषव-सोम कुटण्याचा विधि अध्वर्युप्रभृति चार ऋत्विज प्रातःसवनाप्रमाणेंच प्राय: करतात. सोम कुटण्याचें काम चालू असतां 'ग्रावस्तुत्' नामक ऋत्विज सोमाच्या स्तुतिपर कांहीं मंत्र समूह पठण करतो; व त्या वेळीं त्याला एक पागोटें देण्यांत येतें. ग्रहग्रहण-नंतर गाळण्यावरून पडत असलेल्या सोमधारेमध्यें निरनिराळ्या देवतांच्यासाठीं ग्रह (पेले) भरून ठेवले जातात. नंतर सोमरसानें भरलेल्या पात्रांचें उपस्थान केलें जातें.

विप्रुढ्ढोम.- नंतर प्रात:सवनांप्रमाणेंच अध्वर्युप्रभृति ऋत्विज 'विप्रुट्'नामक होम करतात. नंतर ऋत्विज सदोमंडपांत यथाविधि प्रवेश करतात व पुढें उद्गातृप्रभृति सामक 'पवमान' संज्ञक 'सामगायन' करतात. नंतर अध्वर्यूच्या आज्ञेनें 'आग्नीध्र' धिष्ण्यांच्या ठिकाणीं अग्नींचें विहरण व सवनीय पुरोडाशांच्या ठिकाणीं अलंकरण वगैरे करतो. दधिधर्मप्रचार-नंतर 'प्रतिप्रस्थाता' 'दधिधर्म' याग करतो.

हवनशिष्ट दधिग्रहाचें भक्षण झाल्यावर आग्नीध्र सवनीयपुरोडाशादि हवींचें वेदीमध्यें आसादन करतो. सवनीय-पुरोडाशयाग.- नंतर अध्वर्यु सवनीय पुरोडाशाचें यजन करतो.

शुक्रामंथिप्रचार- प्राशित्रावदान होईपर्यंत अनुष्ठान झालें म्हणजे अध्वर्यु व प्रतिप्रस्थाता हे उभयतां प्रात:सवनाप्रमाणें 'शुक्रामंथि- प्रचार' करतात. म्हणजे 'शुक्र' व 'मंथि' नामक दोन सोम- ग्रहांचें हवन करतात. चमसाध्वर्यूंनीं याहि वेळेस प्रात:- सवनाप्रमाणें चमसांनीं सोमरसाचें हवन करावयाचें असतें. दाक्षिणात्यहोम.- नंतर अध्वर्यूला यजमान, यजमानाला पत्नी व पत्नीला यजमानाच्या कुटुंबांतील मनुष्यें याप्रमाणें अन्वारब्ध करून सर्वांच्या वरून वस्त्राचें आच्छादन केलें असतांना अध्वर्यु 'दाक्षिणात्य' म्हणजे दक्षिणांगभूत होम करतो. मग दक्षिणा देण्यास सुरवात होते. प्रथम 'आत्रेय' संज्ञक एका विद्वान व शिष्ट ब्राह्मणाला सुवर्ण देण्यांत येतें. दक्षिणादान- मग सदस्यासुद्धां सर्व (१७) ऋत्विजांनां दक्षिणा देण्यांत येते. प्रथम आग्नीध्राला व शेवटीं प्रतिहर्त्याला दक्षिणा देण्यांत येते. सामगायकांनां साथ करणारे 'उपगाते' व यज्ञाव- लोकनाला येणारे 'प्रसर्पक' म्हणजे शिष्ट लोक यांनांहि दक्षिणा देण्याचा विधि होतो. सोळा ऋत्विजांमध्यें एकापेक्षां एक कमी असे चार वर्ग असतात. पहिल्या वर्गांतील ऋत्विजाला १२ गाई, दुसऱ्या वर्गांतील ऋत्विजाला ६ गाई, तिसऱ्या वर्गांतील ऋत्विजाला ४ गाई व चौथ्या वर्गांतील ऋत्विजाला ३ गाई दक्षिणा देण्यांत येते. सदस्याला पहिल्या वर्गाच्या बरोबरीची दक्षिणा मिळते. वैश्वकर्मणहोम- नंतर 'वैश्वकर्मण' संज्ञक होम केला जातो. मरुत्वतीययाग- मग अध्वर्यु व प्रतिप्रस्थाता हे उभयतां 'मरुत्वतीय' संज्ञक ग्रहांचें यजन करतात. नंतर अध्वर्यु 'इन्द्रमरुत्वान्' देवतेसाठीं सोमग्रह भरून घेतो. होता 'शस्त्र' पठण करतो. मग सोमरसाचें हवन व भक्षण केलें जातें. मग 'महेंद्र' देवतेसाठीं सोमग्रह भरून घेतल्यानंतर महेंद्राच्या स्तुतिपर सामगायन केलें जातें व होता शस्त्र म्हणतो. नंतर भरून घेतलेल्या सोमरसाचें यजन होतें. अतिग्राह्यप्रचार- त्याचवेळीं आग्नेय, ऐंद्र व सौर्य व तीन अतिग्राह्यसंज्ञक सोमग्रहांचें हवन अनुक्रमें प्रतिप्रस्थाता, नेष्टा व उन्नेता हे तिघे करतात. नंतर हवनशिष्ट सोमरसाचें भक्षण केलें जातें. अतिग्राह्य ग्रहांचें भक्षण प्रतिप्रस्थाता वगैरे तिघेजण करतात. उक्थ्यप्रचार- नंतर प्रात:- सवनाप्रमाणेंच तीनवेळ 'उक्थ्यप्रचार' म्हणजे उक्थ्यसंज्ञक सोमग्रहांचें हवन केलें जातें. प्रत्येक ग्रह 'इंद्र' देवतेसाठीं भरून घेतला जातो. सामक सामें गातात. मैत्रावरूण, ब्राह्मणाच्छंसी व  अच्छावाक हे तिघेजण प्रत्येक ग्रहाचे निमित्तानें इंद्राच्या स्तुतिपर शस्त्रें अनुक्रमें पठण करतात. ग्रहांचें हवन होतें व नंतर हुत- शेषाचें भक्षण केलें जातें. सवनप्रायश्चितें- नंतर सवनप्रायश्चित संज्ञक आहुती घातल्यानंतर माध्यंदिनसवनाचें अनुष्ठान समाप्त होतें.

तृतीयसवन.- प्रारंभीं हविर्धानद्वारें बंद करून आदित्य देवतेसाठीं एक सोमरसाची स्थाली भरून घेतली जाते. नंतर आदित्यग्रहाचा याग केला जातो. सोमाऽभिषव- पुढें प्रात:सवनाप्रमाणेंच सोम कुटण्याचा विधि अध्वर्युप्रमुख चार ऋत्विज करतात. ग्रहग्रहण- नंतर सोमरस गाळण्यांत येऊन माध्यंदिनसवनाप्रमाणेंच निरनिराळ्या देवतांच्या साठीं कांहीं सोमग्रह भरून ठेवण्यांत येतात. 'पूतभृत्' नामक सोम- रसानें भरलेल्या कलशांत यजमान व पत्नी 'आशिर' संज्ञक घुसळलेलें दहीं मिसळतात. विप्रुढ्ढोम- नंतर ग्रहोपस्थान झाल्यावर माध्यंदिनसवनाप्रमाणेंच अध्वर्युप्रभृति ऋत्विज व  यजमान हे 'विप्रुट्' संज्ञक होम करतात. यापुढें उद्गातृप्रभृति तिघेजण सामक आर्भव 'पवमान' संज्ञक सामगायन करतात. नंतर ग्रहोपस्थान व पात्रसंमर्शन केल्यानंतर प्रतिप्रस्थाता सवनीय निर्वाप करतो. पुरोडाशादि  हविर्द्रव्यें तयार झाल्यावर आग्नीध्र त्यांच्या ठिकाणीं अलंकरण करतो. पाशुकानुष्ठान- नंतर प्रति- प्रस्थात्यानें शमिता नामक पशूंचीं अंगें शिजविणाऱ्या माणसाला 'अंगें शिजून तयार झालीं किंवा नाहीं ?' असें विचारण्यापासून पाशुकाच्या अनुष्ठानास सुरवात होते. अंगयाग- अध्वर्यु पशूंच्या निरनिराळ्या अंगांचें हवन करतो. नंतर अध्वर्यु, होता, ब्रह्मा, मैत्रावरुण, आग्नीध्र व यजमान हुतशेष पश्वंगांचें भक्षण करतात. सवनीयपुरोडाशयाग- नंतर तृतीयसवनानिमित्त सवनीयपुरोडाशाचा याग केला जाऊन प्राशित्रावदानापर्यंत अनुष्ठान केलें जातें. पुढें तृतीयसवननिमित्तक सोमरसाचें यजन केलें जातें. अध्वर्यूबरोबर इतर चमसाध्वर्यूहि सोमरसाचें हवन करीत असतात. मग मैत्रावरुणादि हौत्रकांच्या चमसांचें यजन होतें. नंतर सवनीय इडेचें भक्षण होऊन कपालविमोचना- पर्यंत अनुष्ठान केलें जातें. सवनमुखभक्ष- मग सवनमुखसंज्ञक चमस भक्षणविधि केला जातो. पिंडदान- नंतर यजमानासह सर्व ऋत्विज आपआपल्या पिता, पितामह व प्रपितामहांच्या उद्देशानें पिंडदान करतात. नंतर सावित्र ग्रहाचें यजन झाल्यावर 'विश्वे- देव' देवतेसाठीं सोमरसाचा ग्रह भरून घेतला जातो. नंतर होता 'वैश्वदेव' संज्ञक शस्त्र पठण करतो. नंतर भरून घेतलेल्या सोमग्रहाचें हवन व नंतर भक्षण होतें. यापुढें सोमदेवतेला अर्पण करण्यासाठीं चरु (भात) शिजविला जातो. यास 'सौम्य- चरु' अशी संज्ञा आहे. सौम्यचरुयाग- चरु शिजून तयार झाला म्हणजे त्याचें यजन केलें जातें. हवनशेष अशा त्या सौम्यचरूच्या स्थालीमध्यें तूप ओतून त्यामध्यें आपलें मुख अध्वर्यु अवलोकन करतो व ती स्थाली उद्गातृप्रभृति तिघां सामकांना देतो. मग आग्नीध्र हा अध्वर्यूच्या आज्ञेवरून धिष्ण्यांचे ठिकाणीं अग्नीचें विहरण करतो. अध्वर्यु माध्यंदिनसवनाप्रमाणेंच धिष्ण्यांच्या ठिकाणीं घातलेल्या शलकाग्नीवर व्याघारण करतो. पात्नीवतप्रचार-नंतर 'प्रात्नीवत' नामक सोमग्रहाचें यजन होतें व नंतर भक्षण होतें. मग उद्गातृप्रभृति सामक हे 'अग्निष्टोम' नामक सामाचें गायन करतात. 'ध्रुव' नामक एका स्थालींतील सोमरस होतृचमसांत ओतला जातो. मग शस्त्र पठण झाल्यावर सोमचमसांचें हवन होतें व नंतर हुतशेष सोमाचें भक्षणहि होतें. अनूयाज व उपयाज- मग अनूयाज, उपयाज इत्यादि सवनीयपशूसंबंधाचें अनुष्ठान संस्त्रावहोमापर्यंत केलें जातें. हारियोजनप्रचार- मग द्रोणकलश नामक पात्रानें प्रतिप्रस्थाता 'हारियोजन' संज्ञक याग करतो. मग सर्व ऋत्विज आग्नीध्रीय मंडपांत जाऊन दह्याची साय खातात. सर्व चमसांमध्यें एकधनां- मधील पाणी व हिरव्यागार दूर्वा थोडथोड्या घालून ठेवण्यांत येतात. नंतर आहवनीयाचें उपस्थान करून सर्व ऋत्विज आहवनीयाच्या ठिकाणीं ७।७ समिधा देतात. सख्यविसर्जन- मग सर्व ऋत्विज एकमेकांचे हात धरून उभे राहतात व 'सख्य- विसर्जन' म्हणजे यज्ञासंबधानें आपआपसांत केलेल्या ऐक- मत्याच्या कराराचें जणों विसर्जन करितात.

पत्नीसंयाज.- यापुढें अध्वर्यु 'पत्नीसंयाज' नामक कर्म करतो. मग ऐष्टिकप्रायश्चित्तें घातल्यावर ध्रुवाज्याची समाप्ति केली जाते. मग समिष्टयजुसंज्ञक होम करण्यांत येतो. मग प्रणीताविमोक व उपवेषनिरसन केलें जातें. औदुंबरी उपटून चात्वालावर आणून टाकण्यांत येते व सूर्याचें उपस्थान केलें जातें. सवनप्रायश्चित्तें- मग सवनीय प्रायश्चित्तें घालण्यांत आल्यानंतर मैत्रावरुणानें 'सर्पत' असें म्हणतांच सर्व ऋत्विज सदोमंडपाच्या बाहेर पडतात व तृतीयसवनाचें अनुष्ठान समाप्त होतें. अवभृथ- नंतर अवभृतसंबंधीं अनुष्ठान सुरू होतें. अन्वाधानापासून हविर्द्रव्यनिर्वापापर्यंत अनुष्ठान आलें म्हणजे 'वरूण' देवतेसाठीं पुरोडाशाचा निर्वाप केला जातो.  पुरोडाश तयार झाल्यावर महावेदीच्या उत्तरांसासंनिध आणून ठेवण्यांत येतो. मग सर्व सोमलिप्तपात्रें व इतर यज्ञ- साहित्य चात्वालासन्निध आणून ठेवलें जातें. मग प्रस्तोत्याला तूं सामगायन कर म्हणून अध्वर्यु सांगतो. यजमानपत्नी व अध्वर्युप्रभृति सर्व ऋत्विज अवभृथास जाण्यासाठीं मंडपा- बाहेर पडतात. मधल्या एका टप्यावर सामगायन होतें व शेवटीं एखाद्या जलाशयाच्या अगर वाहत्या नदीच्या तीरा- वर सर्वजण येऊन पोंचतात. जलप्रवाह दृष्टीस पडतांच विशिष्ट मंत्रांचा जप केला जातो. नंतर पाण्याच्या ठिकाणीं दर्भभुष्टि टाकण्यांत येते व तेथेंच अग्नि आहे अशी कल्पना करून त्या ठिकाणीं अवभृथसंबंधीं तयार केलेल्या पुरोडाशाचा वरुणदेवतेप्रीत्यर्थ याग केला जातो. स्विष्टकृतापर्यंत अनुष्ठान झाल्यावर घडवंचीवर कातडें पसरलेलें असतांना त्यावर सोम- वल्लीचा चोथा ठेवण्यांत येतो. नंतर तो चोथा कांहीं विषम- संख्याक मंत्र म्हणून स्त्रुचीमध्यें भरला जाऊन पाण्यावर पालथा केला जातो. मग मार्जन झाल्यानंतर यजमान, पत्नी व ऋत्विज जलप्रवाहामध्यें स्नान करतात. यजमान कमरेस गुंडाळलेली मेखला सोडून टाकतो व पत्नी आपल्या कमरेचें योक्त्र सोडून टाकते. मग यजमान व पत्नी नवीं धुतलेलीं वस्त्रें परिधान करितात. नंतर अध्वर्यूच्या आज्ञेवरून 'उन्नेता' हा ऋत्विज सर्व ऋत्विजांनां जलप्रवाहाबाहेर काढतो. नंतर उन्नेत्याला पुढें करून जलप्रवाहाकडे पुन्हां अवलोकन न करतां सर्वजण उंबराच्या समिधा हातांत घेऊन यज्ञभूमीमध्यें परत येतात. आल्यानंतर सर्व ऋत्विज, यजमान व पत्नी आपआपल्या हातांत आणलेल्या उंबराच्या समिधा आहवनीयावर देतात व उपस्थान करतात व अवभृथाचें अनुष्ठान समाप्त होतें. उदयनीयेष्टी- नंतर प्रायणीयेष्टीप्रमाणें उदयनीयेष्टीचें अनुष्ठान केलें जातें. अनुबंध्ययाग- त्यानंतर 'मित्रावरूण' देवतेच्या उद्देशानें पशुतंत्राप्रमाणें एका वशेचा (म्हणजे वांझ गाईचा) याग करण्यांत येतो. या यागास 'अनुबंध्य' अशी संज्ञा आहे. हल्लीं कलिवर्ज्य मानल्यामुळें प्रत्यक्ष गाय मारून हा याग न करतां त्याऐवजीं मित्रावरुन देवतेसाठीं प्रतिनिधिभूत असा 'आमिक्षा' द्रव्याचा याग करण्याची पद्धति चालू आहे.मैत्रावरुणी अमिक्षायाग झाल्यावर 'देविका' संज्ञक देवतांचे याग केले जातात. मग यजमानाचें क्षौर (हजामत) होतें. यजमानानें स्नान केल्यावर वाजिनयाग करण्यांत येतो.

महावेदीच्या उत्तर बाजूस आहवनीयांतील अग्नि एका परळांत घेऊन जातात व त्या अग्नीवर वेदींत अंथरलेल्या दर्भांपैकीं कांहीं दर्भ जाळण्यांत येतात. त्या धुराचें अनुमंत्रण करण्यांत येतें. सक्तुहोम- नंतर त्याच अग्नीवर अध्वर्यु सातूच्या भाजक्या पिठाचा ओंजळीनें होम करतो. अग्निसमारोप- मग अरणींच्या ठिकाणीं अग्नींचा समारोप करून यजमान यज्ञ- स्थलाहून आपल्या घरीं प्रयाण करतो. नंतर यज्ञभूमीच्या उत्तरेस निराळ्या घातलेल्या विहारामध्यें अग्निमंथन करून अग्निस्थापन करतात व त्यांच्या ठिकाणीं अग्नि देवतेच्याच उद्देशानें 'उदवसानीया' - नामक इष्टि करण्यांत येते. पूर्णाहुति- इष्टि प्रत्यक्ष न केल्यास स्त्रुचीमध्यें १२ स्त्रुवे तूप घेऊन 'पूर्णाहुति' संज्ञक एक आहुति दिली जाते.

या प्रकारें 'अग्निष्टोम' नामक प्रकृतिभूत सोमयागाचें अनुष्ठान समाप्त होतें.

अग्निष्टोम समजून घेतला म्हणजे इतर सोमयाग समजतील. त्याचें इतर सोमसंस्थांशीं साद्दश्य व असाद्दश्य परि- शिष्टांत सप्त संस्थांचें विवेचन करतांना दिलेंच आहे. त्या संस्थांतील मुख्य दिवसाचें अनुष्ठान म्हणजे थोडक्या फरकानें अग्निष्टोमाचेंच अनुष्ठान आहे. इतर लांबलचक क्रतू अग्निष्टोमाच्या सवनदिनांत होणाऱ्या अनुष्ठानाच्या थोडक्याशा फरकाच्या पुनरुक्तीनें होत असतात. त्या दिवशीं जें थोडक्या फरकानें अनुष्ठान होतें तें उक्थ्य, षोडशी वगैरे मधलेंच असतें.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .