प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १५ वें.
ब्राह्मणोक्त व सूत्रोक्त यज्ञसंस्थेचें वर्णन.

सत्रांपेक्षा लहान पण अग्निष्टोमापेक्षां
मोठे असलेले यज्ञ.

अग्निष्टोमाचा विस्तार जरी पांच दिवसपर्यंत असतो तरी अग्निष्टोम हा एकरात्र ऋतु म्हणजे एकच दिवसाचा यज्ञ होय. यांतील मुख्य दिवस सवनदिन होय. अग्निष्टोमापेक्षां मोठे पण सत्राहून लहान असे कांहीं क्रतू म्हणजे यज्ञ आहेत. या यज्ञांचे दोन प्रकार. एक अहीन व दुसरा व्यूढ. या दोन प्रकारांपैकीं 'अहीन' प्रकारांतले यज्ञ पुढें लिहिल्याप्रमाणें.

द्विरात्र.- हा यज्ञ प्रथम आंगिरसांनीं केला व पुढें लोकांनीं प्रचारांत आणला अशी समजूत आहे. अग्निष्टोमांतील प्रधान याग ज्याप्रमाणें एक दिवस आहे त्याप्रमाणें या यज्ञांतील प्रधान याग दोन दिवस होत असतो. 'अभिप्लव' नामक एक सहा दिवस चालणारा ऋतु आहे. त्या यज्ञांतील पहिल्या दिवशीं संस्थारूप असणाऱ्या ज्योतिष्टोम किंवा अग्निष्टोमनामक क्रतूचें अनुष्ठान करावयाचें असतें. प्रस्तुतच्या द्विरात्र यज्ञामध्यें प्रधान यागाच्या पहिल्या दिवशीं पूर्वोक्त अभिप्लव क्रतूंतील प्रथम दिवशीं करावयाच्या अग्निष्टोमाचाच प्रयोग करावा लागतो. अभिप्लव क्रतूमधून 'निरूढ' म्हणजे निवडून घेतल्यामुळें या अग्निष्टोमासहि 'अभिप्लव' अशी संज्ञा मिळाली आहे. द्विरात्र यज्ञांतील प्रधान यागाच्या दुसऱ्या दिवशीं 'गति' अशी विशिष्ट संज्ञा असलेल्या 'अतिरात्र' नामक ऋतूचें अनुष्ठान करावयाचें असतें.

द्विरात्रांतील सामगायन.- त्याचप्रमाणें पूर्व दिवशीं म्हणजे अग्निष्टोमाच्या अनुष्ठानाच्या दिवशीं 'गायत्र' या नांवाच्या सामाचें व दुसऱ्या म्हणजे अतिरात्राच्या अनुष्ठानदिवशीं त्रिष्टुभछंदात्मक अशा एका सामाचें प्राधान्यानें गायन करावयाचें असतें. अथवा प्रथम दिवशीं 'रथंतर' व दुसऱ्या दिवशीं 'बृहत्' नामक सामाचें गायन करावें किंवा प्रथम दिवशीं बृहतीछंदात्मक ऋचेंत गाइलें जाणारें 'वैखानस' नामक साम गावें व दुसऱ्या दिवशीं पोडशी उर्फ 'गौरिवीत' नामक साम गावें असे दोन पक्ष आणखी सांगितले आहेत. सामगायनांतील शेवटच्या तुकड्यास 'निधन' अशी संज्ञा आहे. प्रथम दिवशीं गाइल्या जाणाऱ्या सामाच्या निधनसंज्ञक तुकड्यांत 'हविष्मत्' या शब्दाचा व दुसऱ्या दिवशींच्या सामाच्या निधनसंज्ञक भागांत 'हविष्कृत्' या शब्दाचा उपयोग करावा.

कृष्णपक्षाच्या शेवटच्या म्हणजे अमावास्येच्या दिवशीं या द्विरात्रयज्ञाच्या प्रधानयागाच्या दोन दिवसांपैकीं प्रथमचा दिवस व शुक्लपक्षाच्या प्रथम दिवशीं दुसरा दिवस येईल अशा बेतानें यज्ञानुष्ठानास प्रारंभ करावा.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .