प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १५ वें.
ब्राह्मणोक्त व सूत्रोक्त यज्ञसंस्थेचें वर्णन.

त्रिरात्र.- अग्निष्टोम, उक्थ्य व अतिरात्र या भिन्न भिन्न तीन क्रतूंच्या एकत्र समवायानें हा क्रतु बनला आहे. अग्निष्टोमादि तिन्ही क्रतूंचें अंगभूत दिवस धरून प्रत्येकीं पांच पांच दिवस अनुष्ठान चालतें. प्रधानयाग म्हणजे सोमरसाच्या हवनाचा एकच दिवस असतो. अंगभूत दिवसांखेरीज या तिन्ही यज्ञांतील प्रधान यागाचेंच तेवढें अनुष्ठान क्रमानें तीन दिवस करावयाचें असल्यामुळें या तीन दिवसांच्या सांधिक यागास त्रिरात्र असें नांव मिळालें आहे. शिवाय त्रिरात्रयज्ञ गर्गऋषीनीं विशेषत: लोकप्रचारांत आणल्यामुळें याला 'गर्गत्रिरात्र' असेंहि म्हणतात. या यज्ञांत सामान्यत: सर्व अनुष्ठान अग्निष्टोमासारखेंच असतें. विशेष कांहीं गोष्टी करावयाच्या असतात त्यांचें ज्ञान होण्यासाठीं व त्रिरात्र क्रतूचें सामान्य स्वरूप नीट लक्षांत यावें म्हणून वेदांतील आख्यायिका देण्यांत येत आहे ती अशी:-  

अर्थवाद व अख्यायिका.- वसु, रुद्र आणि आदित्य असे देवांमध्यें तीन संघ आहेत. प्रजापतीनें या तिन्ही संघांची उत्पत्ति सृष्ट्यारंभीं केली आणि तिन्ही संघांना प्रत्येकीं एकएक अग्नि देऊन तुम्ही अग्नीची उपासना करीत जा असें सांगितलें. एक वर्षभर त्या तिन्ही संघांतील देवांनीं अविच्छिन्नपणें अग्नीची उपासना केल्यावर सर्वांनीं मिळून एक गाय उत्पन्न केली. देवांचें उपासनासामर्थ्य पाहून प्रजापति संतुष्ट झाला व सर्व देवांनीं मिळून उत्पन्न केलेल्या त्या गाईचें संरक्षण करण्याचें काम त्यानें वसूंच्याकडे सोंपविलें. लवकरच त्या गाईपासून ३३३ गाई उत्पन्न झाल्या. नंतर प्रजापतीनें वसूंनां दिलेली गाय त्याजकडून घेऊन रुद्रांच्या हवालीं केली व हिचें संरक्षण आतां तुम्ही करा असें सांगितलें. त्यांनीं त्या गाईला सांभाळल्यावर तिच्यापासून रुद्रांनांहि ३३३ गाईंचा लाभ झाला. प्रजापतीच्या इच्छेनें त्या गाईची जोपासना करण्याचें काम पुढें आदित्यांच्याकडे आलें. तेथेंहि त्या गाईला पुन्हां संतति होऊन आदित्यांनां ३३३ गाई प्राप्त झाल्या. म्हणजे तिन्ही संघांच्याकडे मिळून ९९९ गाई झाल्या व शिवाय सर्वांची आई ती हजारावी. हजार गाई जमतांच वस्वादि देवांच्या विनंतीवरून प्रजापतीनें वसू, रुद्र व आदित्यसंघांकडून त्रिरात्रनामक एक यज्ञ करविला. पहिल्या दिवशीं वसूंकडून अग्निष्टोमाचें, दुसऱ्या दिवशीं रुद्रांकडून उक्थ्याचें व तिसऱ्या दिवशीं आदित्यांकडून अतिरात्राचें अनुष्ठान करविलें. तीन दिवसांत संपविलेल्या या यज्ञाची दक्षणा म्हणून देवांकडून त्यांच्या जमलेल्या हजार गाई देवविल्या. या यज्ञाच्या योगानें वसूंनां इहलोकचें, रुद्रांनां अंतरिक्षलोकचें व आदित्यांनां द्युलोकचें आधिपत्य मिळालें. वस्वादि संघत्रयाकडून अग्निष्टोमादि ऋतुत्रयाचें अनुष्ठान क्रमानें तीन दिवस संघरूपानें झाल्यामुळें या यज्ञास त्रिरात्र असें नांव मिळालें व या त्रिरात्राक्रतूचा लोकप्रचार सुरू झाला. रुद्रांनां मिळालेला अंतरिक्षलोक डळमळून खालीं आला व रुद्रांनां स्थान नाहीसें झालें म्हणून यज्ञतत्त्ववेत्त्यांनीं त्रिरात्र क्रतूमध्यें दुसऱ्या दिवशीं करावयाचें उक्थ्यसंज्ञक अनुष्ठान रुद्रांच्या  अनुष्ठानांत थोडासा फरक करून करण्याची योजना निश्चित केली ती अशी:-

मधल्या म्हणजे उक्थ्य क्रतूच्या दिवशीं होत्यानें आज्यनामक शास्त्र म्हणतांना तें त्रिष्टुभछंदात्मक ऋचांनीं बनविलेलें असें म्हणावें. खेरीज दाशतयी (ऋग्वेद) संहितेंत असणारीं 'संयान' नामक सूक्तें आणि षोडशिसंज्ञक शस्त्रहि पठण करावें. तिन्ही दिवस रोज ३३३ गाई दक्षिणा म्हणून द्याव्या. गाई देण्यासाठीं त्या यज्ञमंडपांत नेत असतां दहा दहा गाईंची टोळी फोडून देऊन नेत. शेवटीं उरतात त्या तीन गाई शेवटच्या दशकांतच सामील करून द्याव्या. रोज ३३३ गाई याप्रमाणें तीन दिवस दिल्यावर शेवटीं एक (मूळची गाय) राहते ती होत्याला, उन्नेत्याला अगर सदांत असणाऱ्या सर्व सदस्यांस द्यावी. अथवा कोणालाच न देतां तिला मोकळी सोडावी. कोणाचें असें म्हणणें आहे कीं, ब्रह्मा व आग्नीध्र या दोघांनां मिळून ती गाय द्यावी अथवा ती न देतां तिच्या मोबदला नानावर्णांनीं युक्त व खूप दूध देणारी किंवा जिच्या दोन्ही बाजूंला पांढरे केंस आहेत अशी दुसरी एखादी गाय द्यावी.

या त्रिदिनात्मक त्रिरात्र क्रतूंमध्यें तिन्ही दिवस मिळून १००० स्तोत्रियासंज्ञक ऋचा गाइल्या जातात. १००० गाई दक्षिणा दिली जाते यामुळें हा यज्ञ करणारास १००० लोकांच्या सुखाच्या तुलनेला पुरणारें स्वर्गसुख मिळतें.

उपर्युक्त त्रिरात्र यज्ञामध्यें करावयाच्या आणखी कांहीं गोष्टी अशा:- तांबूस रंगाची, पिंगट डोळ्याची व एकवर्ष वयाची गाय देऊन सोमवल्ली विकत घ्यावी. तांबूस वर्ण असलेल्या आणि नीटनेटके अवयव असलेल्या चार वर्षें वयाच्या गाईचें दक्षिणारूपानें दान करावें. रागीट स्वभावाची व अतिशय कुरूप गाय असेल तिचें अनुस्तरणी म्हणून प्रसंग येईल तर हनन करावें. (कोणी पुरुष मेल्यास त्याच्या प्रेतावरच्या दरेक अवयवावर आस्तरण करण्याकरितां जिच्या शरीराचे अवयव उपयोगांत आणावयाचे अशी मृत पुरुषाच्या मागोमाग मारली जाणारी गाय ती अनुस्तरणी होय ).

अनुस्तरणीच्या पूर्वीं सांगितलेल्या दोन प्रकारांपैकीं दुसऱ्या प्रकारची गाय सहस्त्रतमी म्हणजे हजारावी म्हणून दक्षिणेच्या गाईंमध्यें योजावी.

वाग्देवता हीच एका अर्थानें हजारावी गाय आहे, अर्थात् पूर्वोंक्त लक्षणाची गाय सहस्त्रतमी म्हणून दिल्यास दुसऱ्या हजार गाई दिल्याप्रमाणें आहे. परंतु या दानानें यजमानाला सहस्त्रदानाचें फल मिळालें तरी प्रतिग्रह करणारा दोषी ठरतो. म्हणून या सहस्त्रतमी गाईचा प्रतिग्रह करतांनां 'ही गाय म्हणजे सहस्त्रात्मक वर' व 'दुसरी ही वराखेरीज असलेली गाय' असा दोन्ही गाईंच्याबद्दल निर्देश करून नंतर प्रतिग्रहकर्त्यानें त्या सहस्त्रतमी गाईचा स्वीकार करावा म्हणजे दोष लागत नाहीं. ही सहस्त्रतमीसंज्ञक गाय दोन्ही बाजूला अगर एक बाजूला अंगावर पांढरे पट्टे असलेली असावी. सहस्त्रतमीच्या ऐवजीं दुसरी गाय दक्षिणा म्हणून द्यावयाची असल्यास नीटनेटक्या सुंदर अवयवांची व पुष्कळ दूध देणारी अशी द्यावी. जी गाय सहस्त्रतमीच्या मोबदला द्यावयाची त्या गाईला आग्नीध्रीयेला उजवें घालून आहवनीयाजवळ आणावी व तिजकडून द्रोणकलशनामक सोमरसाच्या डोणींतील सोमरस हुंगवावा. नंतर त्या गाईला पुन्हां आग्नीध्रीयेजवळ परत घेऊन यावें आणि तिला आग्नीध्रीयेच्या पूर्वेस पश्चिमेकडे तोंड करून उभी करून आग्नीध्रीयेमध्यें 'उभाजिग्यथु:' या मंत्रानें एक आज्याहुति घालावी. नंतर 'रोहिण्यै स्वाहा' 'पिंगलायै स्वाहा' 'एकाहायन्यै स्वाहा' अशा रीतीनें त्या गाईच्या वर्णनानुरूप मंत्रांनीं होम करावा. नंतर तिच्याजवळ उभें राहून 'इडेरंते' ह्या मंत्राचा तिच्या कानांत जप करावा.

सहस्त्रतमी गाईचा प्रतिग्रह करणारानें 'एकासिनसहस्त्रं' या मंत्राचें अगोदर पठण करून नंतर प्रतिग्रह करावा. मग 'स्योनासिसुषदा' हा मंत्र म्हणावा. नंतर त्या गाईच्या किंमतीदाखल १०० मान सोनें यजमानाजवळून घ्यावें व ती गाय पश्चिमेकडे तोंड करून यजमानाच्या गोठ्याकडे वळवावी.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .