प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १५ वें.
ब्राह्मणोक्त व सूत्रोक्त यज्ञसंस्थेचें वर्णन.

पंचरात्र.- पांच दिवसपर्यंत अग्निष्टोम, उक्थ्य, उक्थ्य, अग्निष्टोम व विश्वजित् या भिन्नभिन्न क्रतूंचें, अनुक्रमें अनुष्ठान केल्यानें पूर्ण होणारा यज्ञ तो पंचरात्र. या यज्ञांत पांच दिवसांत मिळून अग्निष्टोमाच्या २, उक्थ्याच्या २ व विश्वजिताची १ अशा आवृत्ती केल्या जातात. प्रकृतिभूत अग्निष्टोमाहून या यज्ञांत करावयाच्या अग्निष्टोमांत व इतर क्रतूंच्या अनुष्ठानांत थोडथोडा फरक करावयाचा असतो तो असा:-

पहिल्या दिवशींच्या अग्निष्टोमांतील सर्व सामें त्रिवृतस्तोमयुक्त म्हणजे एकेका ऋचेची तीन वेळ आवृत्ति करून गावयाचीं. दुसऱ्या दिवशींच्या उक्थ्यक्रतूंतील सर्व सामें पंचदशस्तोमांनीं युक्त अशीं गावीं.

याचप्रमाणें तिसरे दिवशींच्या उक्थ्यक्रतूंत सप्तदशस्तोमयुक्त सामगान करावें. चवथ्या दिवशीं जो अग्निष्टोम करावयाचा त्या दिवशीं 'गवामयन' नामक सत्रांत 'महाव्रत' नामक एक प्रधान दिवस आहे, त्या दिवशीं जीं स्तोत्रें गावयाचीं तींच स्तोत्रें गावयाचीं. 'विश्वजित्' नामक एक अग्निष्टोमाचा विकार आहे तोच विकार अतिरात्राचा विकार म्हणून पांचव्या दिवशीं करावयाचा असतो. या यज्ञांत 'पुष्ठ' संज्ञा असलेल्या रथंतरादि सर्व सामांचें गायन होत असल्यामुळें याला विश्वजित् सर्वपृष्ठातिरात्र असें नाव पडलें आहे.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .