प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १५ वें.
ब्राह्मणोक्त व सूत्रोक्त यज्ञसंस्थेचें वर्णन.

षड्रात्र.- रथंतर सामयुक्त व त्रिवृत्स्तोमात्मक अग्निष्टोम, पंचदशस्तोम व बृहत्संज्ञक सामानें युक्त असा उक्थ्य, सप्तदशस्तोम व वैरूपसामयुक्त उक्थ्य, एकविंशस्तोम व वैराजसामयुक्त षोडशी, त्रिणवस्तोम व शाक्वरसामयुक्त उक्थ्य आणि त्रयस्त्रिंशत्स्तोम व सामयुक्त उक्थ्य अशा भिन्नभिन्न सहा क्रतूंच्या समवायानें होणाऱ्या यज्ञास 'षड्रात्र' अशी संज्ञा आहे. सहा दिवसपर्यंत ओळीनें एकेका दिवशीं पूर्वोक्त एकेका क्रतूचें अनुष्ठान व्हावयाचें असतें. सत्ररूप 'द्वादशाहा' मध्यें पृष्ठयसंज्ञक असा जो सहा दिवसांचा विभाग आहे त्या विभागांत दररोज जीं पृष्ठ्यसंज्ञक सामें गावयाचीं तींच सामें या षड्रात्र क्रतूंत सहा दिवस क्रमानें गाइलीं जात असल्यानें अंशत: सत्रसाम्य प्राप्त झालेल्या या षड्रात्र यज्ञास 'देवसत्र' अशी संज्ञा पडली आहे.

या षड्रात्र उर्फ देवसत्रनामक यज्ञाच्या प्रसंगानें 'सारस्वत' नामक सत्रांतील कांहीं विशिष्ट गोष्टी सांगितल्या आहेत त्या अशा:- हविर्धाननामक मंडप व आग्नीध्रीयसंज्ञक मंडप हे पिंपळाच्या लांकडांनीं निर्माण केलेले असावे व हे मंडप असे करावे कीं, प्रथम खालीं चाकें व कणा घालून त्यांना गाड्यांचा आकार द्यावा व त्यांच्यावर फळ्या टाकाव्या आणि त्यावर भूईवर घालावयाचे त्याच पद्धतीनें हविर्धान व आग्नीध्रीय हे मंडप पिंपळाच्या लांकडाचे बनवावे.

लांकडी उखळीचें बूड जसें विस्तृत व बसकें असतें तसें बूड यूपाला करावें म्हणजे अशी सोय होईल कीं, जेथें जेथें यूप पाहिजे असेल तेथें तेथें तो खळगा खणून पुरण्याचा त्रास न पडतां नीट उभा करतां येईल.

प्रथमच्या एक दिवसाचें अनुष्ठान संपलें म्हणजे त्या दिवशीं अध्यर्यूनें पूर्व दिशेस शम्या फेंकावा. तो जेथें पडेल तेथें गार्हपत्य अग्नीची स्थापना करून त्याच्यापुढें ३६ प्रक्रमावर आहवनीय स्थापन करावा. अशा रीतीनें प्रत्येक दिवशींचें अनुष्ठान आटपल्यावर शम्या फेंकण्याची वगैरे क्रिया करून दररोज अनुष्ठानाची जागा पूर्वबाजूस पुढें पुढें सरकत जाईल अशी योजना करावी. चाकें लावलेले पूर्वोक्त दोन्ही मंडप जागा बदलेल त्या मानानें पुढें पुढें न्यावे.

प्रत्येक दिवशीं सरस्वती नदीच्या तीरातीरानें स्वर्गलोक पूर्व दिशेस आहे हें लक्षांत घेऊन पुढें पुढें पूर्व दिशेस जावें सरस्वतीचें तीर म्हणजे देवांचा स्वर्गाला जाण्याचा मार्ग होय. पहिली जागा सोडून पुढच्या जागेंत गाड्यासहवर्तमान जाणाऱ्या सर्व ऋत्विजांनीं व यजमानपत्नींनीं उत्साहातिशयानें जयसूचक ध्वनी मोठमोठ्यानें करीत जावें.

दहा गाई व त्यांत एक अंडिल बैल आपल्या जवळ बाळगावा व त्या बैलापासून दसपट म्हणजे १०० गाईंची वाढ होईपर्यंत सारस्वत सत्राचें अनुष्ठान पुन: पुन: चालवावें. गाईंची संख्या १०० पर्यंत आल्यावर सत्राचें उत्थान म्हणजे समाप्ति करावी. या योगानें सत्रकर्त्यांनां शंभर वर्षें आयुष्य भोगावयास मिळतें.  

अथवा १०० गाई व एक बैल प्रथम बाळगावा व त्यापासून दसपट म्हणजे हजार गाईंची वाढ होईपर्यंत ह्या सारस्वतसत्राचें अनुष्ठान चालवावें. त्या योगानें हजारों भोग्यपदार्थांनीं भरलेला स्वर्ग मिळतो. याशिवाय सत्रसमाप्तीचा आणखी एक काल म्हणजे सत्र करणाऱ्या यजमानापैकीं कोणी मरेल तर त्या दिवशीं अथवा राष्ट्रक्षोभामुळें शत्रुसैन्याकडून सत्रकर्ते यजमान जिंकले जातील त्या दिवशीं सत्राचें उत्थान करावें. अशा रीतीनें करावें लागणारें उत्थान किंवा सत्रसमाप्ति ही पापापासून तारणारी आहे. यासाठीं पूर्वोक्त निमित्तांपैकीं एकादें निमित्ता घडेपर्यंत अनुक्रमानें षड्रात्रक्रतू करीत रहावें. अशा रीतीनें सातत्यानें होणाऱ्या षड्रात्र क्रतूंच्या आवृत्तीस सत्र ही संज्ञा आहे. सरस्वती नदीच्या तीरीं हें सत्र करण्यांत विशेष फल असल्यानें या सत्रास 'सारस्वत सत्र' ही संज्ञा मिळाली.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .