प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १५ वें.
ब्राह्मणोक्त व सूत्रोक्त यज्ञसंस्थेचें वर्णन.

सप्तरात्र.- त्रिवृत्स्तोमात्मक व 'रथंतर' सामयुक्त आग्निष्टोम, पंचदशस्तोम व 'बृहत्' सामयुक्त उक्थ्य, सप्तदश स्तोमात्मक वैरूपसामयुक्त उक्थ्य, एकविंशस्तोम व 'वैराज' सामयुक्त षोडशी, त्रिणवस्तोम व 'शाक्वर' सामयुक्त उक्थ्य, पंचविंश स्तोमयुक्त व महाव्रत धर्मवान् असा अग्निष्टोम आणि सर्वस्तोम व पृष्ठ्यसंज्ञक सर्व सामांनीं युक्त असा विश्वजित् नामक अतिरात्र अशा सात भिन्नभिन्न यज्ञांच्या प्रधान दिवसांचें अनुष्ठान ओळीनें सात दिवस व्हावयाचें असल्यामुळें ह्या यज्ञास सप्तरात्र हें नांव पडलें आहे.

सदाच्या पुढच्या बाजूस बसून श्लोकांनीं स्तवन करावें व सदाच्या पश्चिमेस बसून अनुश्लोकांनीं स्तवन करावें वगैरे जे महाव्रताचे धर्म आहेत त्या धर्मांनीं सहित असा पूर्वोक्त सहाव्या दिवशींचा अग्निष्टोम करावा.

प्रथम सांगितल्याप्रमाणें एकेका दिवशीं रथंतर, बृहत्, वैराज इत्यादि सामें क्रमानें गाइलीं जाणारे क्रतू करण्याऐवजीं असा एक पक्ष आहे कीं, सातव्या दिवसाच्या अलीकडे असलेल्या सहा दिवसांत जर पूर्वोक्त रथंतरादि पृष्ठस्तोत्रें गाइलीं तर सातव्या दिवशींच्या विश्वजित् क्रतूंत तींच सारीं पृष्ठे जशींच्या तशींच गाणें प्राप्त होणार अर्थात् त्या दिवशींच्या सामगायनांत नावीन्य कांहींच न होतां एकदां धार काढल्यानंतर एखादा विसराळू माणूस जसा पुन्हां धार काढण्याच्या इराद्यानें गाईजवळ जावा तशांतला प्रकार होणार; तर तसें न करतां पूर्वींच्या सहा दिवसांत एकेका दिवशीं क्रमानें रथंतर व बृहत् या पृष्ठस्तोत्राचें गायन करावें आणि शेवटल्या म्हणजे सातव्या दिवशीं रथंतरादि सर्व पृष्ठस्तोत्रांचें यथापूर्व गायन करावें म्हणजे दूध देण्याकरितां पान्हवलेल्या गाईची धार काढण्यास प्रवृत्त झालेल्या पुरुषाप्रमाणें त्या दिवशीं रथंतरादि पृष्ठस्तोत्रांचा लाभ होऊन अनुष्ठान समृद्ध होईल.

हा सप्तरात्र ऋतु करणाऱ्या यजमानाला गाय, बोकड, घोडा, मेंढी, माणूस, गाढव व उंट हे सात ग्राम्य पशू, दोन खुराचे सात आरण्यक पशू व गायत्र्यादि सात छंदांची प्राप्ती होते.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .