प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   


बुद्धपूर्व जगाच्या इतिहासास आरंभ केला आहे तो विश्वोत्पत्तिविषयक विचारांपासून केला आहें. जडापासून जीवाची उत्पत्ति कशी झाली हें शास्त्रज्ञांस अजून मोठें गूढ आहे. स्पेन्सरनें आपल्या विकासवादाच्या मांडणींत तेवढाच भाग वगऴला आहे. विकासवादाच्या मांडणीचा तो भाग भरून काढावा म्हणून अनेक प्रयत्न झाले आहेत ते सर्वस्वी यशस्वीं झाले नाहींत तथापि ती मांडणी कशी करतां येते हें दाखविण्यासाठीं प्रो. सहस्रबुध्दे यांचा एक लेख दिला आहे. जीवोत्पत्तीपासून मनुष्य विकासापंर्यत ज्या अनेक पायर्‍या आहेत त्यांचें विवेचन येथें केलें नाहीं. तें शरीरखंडांत येईलच. मनुष्यप्राणी प्रथम कोंठें विकसित झाला, त्याचें प्राथमिक स्वरूप कसें होंतें हीं अजून गूढेंच आहेत. त्या विषयावर शेकडों ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत मनुष्यप्राण्याचा विकास आणि आज उपलब्ध असलेले अनेक मानववंश व अनेक भाषा यांचा वंशवृक्ष पद्धतशीर तयार करतां येईल इतकी शास्त्राची प्रगति झाली नाहीं. मनुष्यभ्रमणाचा इतिहास तयार झाला नाही, म्हणून हीं तयार करण्याचा प्रयत्न कसा चालू आहे हें दाखविण्यासाठीं या इतिहासक्षेत्रास उपयोगीं पडण्यासारखी शास्त्रीय पद्धति येथें मांडली आहे. भाषाशास्त्रविषयक अभ्यासामध्ये शब्दसंग्रह व भाषांचे व्याकरण यांच्या प्राचीन इतिहासाचें अवगमन करण्यासाठीं बलाबल किती आहे हेंहि मांडलें आहे. हें विवेचन सामान्य वाचकास एतव्दिषयक शास्त्रीय पद्धतीमध्ये प्रवेश करून देण्यात उपयोगीं पडेल अशी अशा आहे.

    ज्ञानकोशाच्या प्रस्तावनाखंडाचे पांचहि विभाग मिळून एक पूर्ण ग्रंथ होतो. तिसरा आणि चौथा विभाग मिऴून सामाजिक व राजकीय इतिहासाची संगति मांडली आहे, आणि पांचव्या विभागांत ज्ञानाच्या वाढीचा इतिहास आहे. पहिला विभाग जगाचें अवलोकन भारतीय दृष्टीनें करीत आहे, आणि आपले अत्यंत व्यापक हितसंबंध पहात आहे. दुसरा विभाग हा तिसर्‍या व पांचव्या विभागाचा सामान्य आरंभ होय. वेद हें साहित्य राजकीय व सामाजिक इतिहासांसाठीं तिसर्‍या विभागांत उपयोजिलें, तर वैज्ञानिक इतिहासासाठीं ते अवगाहन करून त्यापासून उत्पन्न होणारें ज्ञान पांचव्या विभागांत मांडलें वैज्ञानिक, सामाजिक आणि राजकीय इतिहासाचा प्रारंभ जे वेद त्यांच्याच अस्तित्वाचें स्पष्टीकरण अत्यंत व्यापकपणें करणें हे दुसर्‍या विभागाचें कार्य होय. वेदविषयक अभ्यासावर ज्ञानकोशाच्या प्रस्तावनाखंडांतील सुमारें एक हजार पृष्ठें खर्ची पडलीं आहेत, व त्यांत जे संशोधन मांडले आहे ते करण्यासाठीं तीस हजार रूपयांवर रक्कम खर्च झाली आहे.

 

    बुद्धपूर्व जगामध्ये जैन मताची संस्थापना धरतां येईल. जैन मत महावीरापूर्वीं होतें असें धरलें तर जैनांची प्राचीनता बुद्धाच्या पुष्कळच पूर्वीची होईल. बुद्धपूर्व जगाच्या इतिहासामध्यें जैन मत घ्यावयास हवें पण जैन वाडःमय मात्र अत्यंत जुन्या बौद्ध ग्रंथांनंतरचें आहे. या संप्रदायाची अशी स्थिति असल्यामुळें हें वाडःमय व संप्रदायाची हकीकत शेवटीं परिशिष्टांत दिली आहें. जैन वाडःमयाचा हा इतिहास डा. विंटरनिट्झ यांच्या ग्रंथाधारे लिहिला आहे.

हा भाग तयार करतांना राजश्री य. रा. दाते; स. वा. देशपांडे; चि. शं. दातार; सिद्धेश्वर शास्त्री चित्राव; ल. के. भावे; चिं. ग. कर्वे व मि. एच. कोडन यांची उल्लेख करण्याजोगी मदत झाली आहे.

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .