प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ५ वें.
वेदकालांतील शब्दसृष्टि.

ब्राह्मणवर्गाचा इतिहास देण्याच्यारीती:- दाशराज्ञ युद्ध ही मंत्रकाल सुरु होण्यापूर्वीची एक महत्वाची गोष्ट झाली हें पूर्वीच्या प्रकरणांत सविस्तरपणें स्पष्ट केलेंच आहे. ॠग्वेदांत ज्या व्यक्ती आणि जे उल्लेख सांपडतात त्यांचा दाशराज्ञ युध्दाशीं संबंध जोडतांना बराच परामर्श घेण्यांत आला आहे. इतकीं पुष्कळ नांवें आपणांस उपलब्ध झाली त्यावरुन युद्ध कोणांत झालें, युद्धस्वरुप कसें होतें, त्या काळाचीं निरनिराळीं राष्ट्रें कोणतीं होतीं आणि त्या राष्ट्रांच्या चलनवलनासंबंधानें आपणांस काय माहिती मिळतें इत्यादि हकीकत देण्यांत आली आहे. हा साधारणत: क्षत्रिय वर्गाचा इतिहास झाला असें म्हणण्यास हरकत नाहीं. ब्राह्मण वर्गाचा इतिहास द्यावयाचा म्हणजे दोन तऱ्हांनीं देतां येईल. प्राचीन धर्मांचा इतिहास देणें म्हणजे ब्राह्मण्याचा इतिहास देणें होय. तो बहुतेक दुस-या विभागांत येऊन गेलाच आहे. यज्ञसंस्थेबाहेरच्या पारमार्थिक खटपटी आणि विचार सामान्य हवनापासून सूत्रांत दृष्ट होणा-या श्रौतस्मार्त धर्माचा म्हणजे सप्तसंस्थांचा विकास हाहि दुस-या विभागांत सविस्तर वर्णन केलेला आहे. हा ब्राह्मण्याचा इतिहास झाला. तथापि ब्राह्मण म्हणजे केवळ माणसें धरुन त्यांचा इतिहास देणें म्हणजे कुलें, गोत्रें यांचा इतिहास देणें होय. पुढें आपणांस हें दाखवितां येईल की बराचसा इतिहास मंत्रकालीन नसून, फार तर ब्राह्मणकालीन पण बहुतकरुन सूत्रकालीन आहे. तिकडे वळण्यापूर्वी संहितावाङमयाचा निरोप घेतला पाहिजे. संहिता वाङमयाकडे मधूनमधून वकी अवलोकन करावें लागणारच. तथापि त्याचा इतिहासार्थ जितका उपयोग करतां येईल तितका स्थूलपणें करुन घ्यावा आणि विशिष्ट संस्थेचा अगर ज्ञानाचा इतिहास देतांना मधूनमधून संहितेकडे दृष्टि वळवावी. या प्रकारची मांडणीची पद्धति सोइस्कर पडतें म्हणून ती अमलांत आणीत आहों.

श ब्द सं ग्र हा चें म ह त्त्व.- प्राचीन कालच्या परिस्थितीचा इतिहास जितका साकल्यानें लिहितां येईल तितका लिहावा असें आपण मनांत आणलें आणि साहित्य शोधूं लागलों म्हणजे एक मोठें साहित्य पुढें दृष्टिस पडतें. तें साहित्य म्हटलें म्हणजे संहितांतर्गत शब्दसृष्टि होय. या साहित्याचा पराकाष्टेचा उपयोग करुन घेतल्याशिवाय पुढच्या कालाकडे वळणें म्हणजे प्रामाणिक पांडित्य नव्हे. तसें करणें म्हणजे कठिण अभ्यास टाकून देऊन सहजोपलब्ध आणि उपर्याप्त अशा साहित्याच्या साहाय्यानें गप्पा मारणें झालें. तसल्या प्रकारच्या मोहांत न पडतां जे शक्य झाले ते परिश्रम करुन त्यांचें फल वाचकांपुढें ठेवलें आहे. प्रत्येक वेदांतील शब्दांचें विषयानुसार वर्गीकरण केलें आहे. हे शब्द तत्कालीन किंवा तत्पूर्व संस्कृतीवर बराच प्रकाश पाडतात. निरनिराळया संहिता निरनिराळया काळीं झाल्या असल्या कारणानें प्रत्येक संहितेंतील शब्द निरनिराळे मांडलें आहेत. या शब्दांनीं जागा पुष्कळ अडविली आहे ही गोष्ट खरी, पण हे शब्द सर्व भावी भारतीय ऐतिहासिक संशोधनाचा पाया असल्यामुळें त्यास लागणारी जागा आम्ही निर्भयपणानें देत आहों.

शब्दसंग्रहाची यादी देण्यापूर्वी वर्गीकरण पद्धतीचें स्वरुप थोडक्यांत सांगितलें पाहिजे. प्रथम अनिाश्चितार्थी व अनेकार्थी शब्दांचीं विल्हेवाट लावून उरलेल्या शब्दांचें वर्गीकरण केलें आहे. प्रत्येक वेदांतले शब्द निरनिराळे मांडलें आहेत. प्रथम देवता सृष्टि घेतली आहे, मग अजीवसृष्टि, नंतर जीवसृष्टि आणि मग मानवी सृष्टि घेतली आहे.

दैवतसृष्टिमध्यें देवतानामें; देवताविशेषणें, देवयोनि, असुर व स्वर्गविषयक शब्दांचा अंतर्भाव केला आहे.

अजीवसृष्टीमध्यें पृथ्वी; ध्वनि; धातु; जमीन; उदक; उष्णता; गति; ग्रहनक्षत्रादि; संख्या, काल आणि स्थान इत्यादिवाचक शब्द घेतले आहेत.

पुढे वाचा:वेदकालांतील शब्दसृष्टि.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .