प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास

सूक्तकर्तृत्व - प्राचीन ॠषींचा इतिहास देण्यासाठी आपणास जे कार्य करतां येईल ते एवढेंच कीं त्या ॠषींनी सूक्तरचना कशा प्रकारची केली, त्यांनी यज्ञ कोणते केले, त्यांचे यजमान कोण होते, हें सागणें, तसेंच त्या ॠषींमध्यें जुने कोणते व नवे कोणते हें पाहणें व त्यांच्या कुलांविषयीं, त्याच्या इतर संबंधीजनाविषयीं व प्राचीन विद्याविषयक आणि परमार्थविषयक सांप्रदायाविषयी माहिती मिळाल्यास ती देणें. याविषयीं मंत्रकालीन माहिती थोडीच असणार. हे ॠषी ज्या वेळी झालें त्यावेळीं  यज्ञसंस्था बरीच बाल्यावस्थेंत होती. ज्या अर्थी त्यावेळी बृहत सोमयाग होऊं लागले नव्हतें त्या अर्थी त्याचे यज्ञ म्हणजे जेव्हां एखादा राजा अश्वमेध वगैरे करील तेव्हां त्यांस मदत करणें, दैनिक किंवा नैमित्तिक हवन करणें आणि प्रसंगी अग्निसहाय्याची निरपेक्षता ठेवून यजन करणें यापलीकडे त्यांना कांही कर्तव्य नव्हतें. जेव्हा मोठमोठे यज्ञ सुरू झाले तेव्हां भिक्षुकी चळवळीस रंग आला. तथापि यज्ञसंसथा बाल्यकालासारख्या कालांतहि भिक्षुकास काहींच कार्य नव्हतें असें नाही. एखाद्या राजाचें पौरोहित्य मिळविणें, ते टिकविणे आणि दुस-याचे पौरोहित्य स्वतःस मिळविणें या प्रकारची खटपट त्यावेळीहि करावी लागे. एखाद्या राजसत्ताक संस्थानामध्ये मोठी जागा स्वतःस मिळविण्यासाठी कारकून  आणि मुत्सद्दी यांची  वरिष्ठाचे मन क्लुषित करण्यासाठी ज्या प्रकारची मुत्सद्दीगिरी चालते तशीच मुत्सद्देगिरी राजपौरोहित्य मिळविण्यास लागावयाची. वसिष्ठ विश्वामित्राचें भांडण या प्रकारची स्पर्धा दाखविते. राजसत्ता जाऊन प्रजासत्ता आली म्हणजे ज्या प्रमाणें आपला पक्ष प्रबल करावयाचा, दुस-या पक्षावर शिंतोडे  टाकावयाचे, असल्या प्रकारची मुत्सद्देगिरी चालते तशीच मुत्सद्देगिरी यजूंच्या म्हणजे बृहद्यज्ञांच्या वेळी चालत असे. मंत्रकालांत मोठाले याग नसल्यामुळे मंत्रकालीन भिक्षुकीचा इतिहास अधिक अल्प होतो. प्राचीन ॠषीच्या इतिहासातील महत्त्वाचा भाग म्हटला म्हणजे त्याचें सूक्तकर्तृत्व होय. याविषयी जी माहिती उपलब्ध होते तिची शक्य तेवढी तपासणी करून येथें देत आहो.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .