प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास

सूक्तकर्तृत्वकालीन व उत्तरकालीन ब्राह्मण्य - सूक्तकर्तृत्वकालीन ब्राह्मण्याचा आजच्या ब्राह्मण्याशी संबंध जुळवावयाचा झाल्यास तो दोन तऱ्हांनी जुळवावा लागेल. सूक्तकर्त्यांची म्हणून जी कुलें नांवाजलीं गेलीं त्यांची वंशपरंपरा जुळवितां आल्यास जुळवावयाची, आणि त्या विद्येची किंवा विद्याविशिष्ट संप्रदायांची परंपरा आजपर्यंत आणून भिडवावयाची. सूक्तकर्त्याचें वंशसंबंध सर्वानुक्रमणीनें कांही दिले आहेत. पण ते सत्य आहेत किंवा नाहींत हें ठरविलें पाहिजे आणि सत्यासत्यसूचक जें साहित्य उपलब्ध असेल तें मांडलें पाहिजे. सर्वानुक्रमणीशिवाय  प्राचीन कुलांचा किंवा संप्रदायांचा विस्तार दाखविणारें आपलें दुसरें साहित्य म्हटलें म्हणजे गोत्रप्रवरावली होय.

आजची ब्राह्मण जात प्राचीन ॠषींशी व आचार्यांशीं जर आपला अन्वयसंबंध लावीत असेल तर तो गोत्रप्रवरावलीच्या जोरावर. तो अन्वय कोणत्या प्रकारचा होता, कुलान्वयसंबंध होता की संप्रदायसंबंध होता याचीहि तपासणी झाली पाहिजे.

मंत्रकालांतच वशंपरंपरेचें ब्राह्मण्य स्थापित झालें होतें यास पुराव पुष्कळच आहे. ब्रह्मपुत्र हा शब्द ब्राह्मण या अर्थानें अनेक वेळां ॠग्मंत्रांतच आलेला आहे. तर अनेक सूक्तकर्ते ब्राह्मण कुलसंस्थापक झाले असल्यास नवल नाहीं.

सूक्तकर्ते व मंत्रांत उल्लेखिलेले लोक हे कांही कुलांतील म्हणून दाखवितां येतील तर पहावयाचें. यासाठीं मंत्रांतील उल्लेख, व त्यांत दिसणारे कुलसंबंध वंशसंबंध, आणि सर्वानुक्रमणी व बृहद्देवता यांत दिलेले कुलसंबंध, आणि वंशसंबंध यांची तुलना केली पाहिजे.

ॠग्वेदसूक्तकार, त्यांची कुलें व त्यांचे परस्परसंबंध तपासूं लागलें म्हणजे असें आढळून येतें कीं (१) कांहीं सूक्तकारांची कुलें व त्यांचें आपसांतील वंशसंबंध सर्वानुक्रमणी व बृहद्देवता या ग्रंथांतून जसे आढळतात तसेच ते ॠग्मंत्रावरूनहि सिद्ध होतात; (२) कांही सूक्तकार असे आहेत कीं सर्वानुक्रमणी व बृहद्देवता यांनीं दिलेले त्यांचे आपसांतील संबंध ॠग्मंत्रावरूनहि सिद्ध होतात परंतु त्यांच्या कुलाबद्दल मात्र ॠग्मंत्रांत उल्लेख आढळत नाहीं. (३) व कांहीं सूक्तकारांची कुलें व वंशसंबंध सर्वानुक्रमणी व बृहद्देवता यांत दिले आहेत परंतु त्यांनां ॠग्मंत्रांत आधार सांपडत नाहीं. हे सूक्तकार कोणकोणते आहेत व त्यांचा परस्परसंबंध काय आहे हें एक एक कुल घेऊन त्यांत आधाराप्रमाणें तीन पोटभेद करून पुढें देऊं. प्रत्येक कुलाखालीं त्यांतील एका एका सूक्तकाराच्या नांवावर कोणकोणती सूक्तें आहेत, त्या सूक्तांमध्यें त्या सूक्तकाराचा उल्लेख आहे किंवा नाहीं, असल्यास कोणत्या सूक्तांत आहे आणि सूक्तकाराचा कुल किंवा वंशसंबंध ज्या ॠग्मंत्रावरून सिद्ध होतो त्याचे आंकडे इत्यादि माहिती दिली आहे.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .