प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास

सोमयागांच्या वृद्धीचा व संकोचाचा काल- मांत्रसंस्कृतीतील लोकांचा देश्यांशी संपर्क होऊन मोठमोठे याग करण्याचा परिपाठ सुरू होऊन तो प्रकार पुन्हां बंद पडला. या क्रियेस किती काळ लागला असावा बरें? आम्हांस अशी कल्पना होते की, ही सर्व चळवळ शेंदोनशें वर्षांतली असावी. दुस-या पारिक्षित्- जनमेयजाचा काळ म्हणजे श्रौत संस्थांचा शेवट असें धरलें तर एकंदर कालभाग येणेंप्रमाणें पडतील.
(१) दाशरथी रामचंद्राचा काळ - कुरुयुद्धापूर्वी सुमारें सहासातशें वर्षे. या काळीं ब्राह्मण नव्हतें. यज्ञसंस्था विकसित नव्हती व ॠग्वेदमंत्रांची रचना झाली नव्हती.

(२) दाशराज्ञयुद्धकाल - याकालांत श्रौतसंस्था तयार नव्हत्या. दैनिक अग्निहोत्रांत सोमाचा उपयोग होत असावा. आजच्या ॠग्मंत्रापैकी बहुतकरून कोणतेहि तयार नसावे; अर्की, गायत्री, ॠषी हे वर्ग असावेत; ब्राह्मण व ब्रह्मपुत्र या दोन्ही शब्दांचा उपयोग सुरू असावा; सामुच्चयिक अग्न्युपासना मंत्रपुष्पासारखी असावी. हा काल दाशरथी रामचंद्रानंतर शें दोनशें वर्षांनीं असावा. या कालाच्या अंतिम भागांत भरत हे कुरुक्षेत्रीं जाऊन पोचलें.

(३) दाशराज्ञ युद्धांताच्या कालापासून पुढील तीनशें वर्षे या कालामध्यें होते, अध्वर्यु व ब्रह्मे यांच्या स्वतंत्र हवनपरंपरा तयार झाल्या असाव्या, ॠषींचा लोप होत चालला असावा आणि हे तिन्ही वर्ग ब्रह्मन् वर्गांतून बहुधा निघाले असावेत.

(४) चवथा काल म्हणजे सोमसंस्था तयार होण्याचा काल, या कालांत निरनिराळया तीन संप्रदायाचें एकीकरण होऊं लागलें असावें आणि देश्यांच्या आठवणी, इतिहास व देवता यांस श्रौतसंस्थांत स्थान मिळूं लागलें असावें. उदाहरणार्थ प्रजापतीची कल्पना, ही देखील मूळची सूतसंस्कृतींतील असून ती पुढें यज्ञसंस्थेत शिरली या सुमारास ॠचा, सामें व यजुर्वाक्यें यांचें पृथक्करण होऊं लागलें असावें व तें पहिलें पृथक्करण होय.

(५) पांचवा काल म्हणजे सोमसंस्था विकासाचा काल. या कालांत ब्राह्मणें पद्धतशीर होऊन संहितीकरणहि जास्त पद्धतशीर झालें. मात्र या वेळेस ॠग्वेदसंहिता आजच्या स्थितींत नव्हतीं. कुरुयुद्धाचा काल हाच असावा व व्यासाचा व संहितीकरणाचा संबंध याच कालांतील असावा.

(६) यज्ञसंस्थेच्या अंतिम विकासाचा व शाखाभेदाचा व संकोचाचा काल. हा कुरुयुद्धानंतर शंभर दीडशें वर्षांतला असावा.

(७) सातवा काल म्हटला म्हणजे श्रौतभिक्षुकी संपुष्टांत आली असतां अथर्व्यांस हाकलून त्रैविद्यांनी ती आपली करून घेण्याचा काल म्हणजे सूत्रकाल. याच कालांत याज्ञिकीच्या धंद्याबाहेर ब्राह्मणवर्ग बराच असावा आणि त्याची वृत्ति आपल्याकडेच ओढण्याकरितां श्रौतजीवी  मंडळींत धडपड चालू असावी. गृह्यसूत्रें करणें हें त्यांतीलच एक अंग होय. व ब्राह्मणांचा इतरजनांशी आध्यात्मिक संबंध कमी कमी होत जाण्याचा काल हाच होय. या कालांत ब्राह्मणांमध्यें पंचवीसतीस पोटजाती-निदान पोटजातीचें स्वरूप ज्या पासून दूर नाहीं असें समुच्चय, तयार होण्याचा काल हाच हो. आजच्या सूत्रग्रंथापैकी मात्र त्यावेळेस कोणतेहि ग्रंथ अस्तित्वांत नसावे पण त्यांची पूर्वरूपें तयार असावीतं.

(८) मनुस्मृतीचा काल आपण घेतला तर त्यावेळेस असें दिसून येतें कीं पंचवीस तीस निषिद्ध धंद्यांत ब्राह्मण होतेच व ब्राह्मणांमध्यें स्थानिक भेदहि उत्पन्न होऊं लागले होतें; ते देखील इतकें की एखादा ब्राह्मण एका प्रदेशांतील असतांना अन्य प्रदेशांतील आहे असा त्याच्यावर कोणी आरोप केला असतां त्याची अब्रूनुकसानी होई. ब्राह्मण पुरूष व क्षत्रिय स्त्री यांच्या अपत्याचें पद समाजांत अनिश्चित होतें यासंबंधाचें मनूचें वाक्य लटपटीचे आहे (स्त्रीष्णनंतर जातासुद्धिजैरूत्पादितान् सुतान्। सदृशानेव तानाहुर्मातृदोषविगर्हितान्॥ मनु. १०६). मिश्रविवाहाचे मुलगे बापासारखे खरे परंतु आईमुळें त्यांस दोष दिला जातो.

(९) ब्राह्मणाचें इतरांपासून वियुक्तत्व व जातीत इतरांचा अप्रवेश हीं दोन्ही यज्ञसंस्था मोडल्याबरोबरच झाली. यज्ञसंस्था चालू असती तर त्या संस्थेमार्फत नवीनांस त्यांत शिरतां आलें असतें व ब्राह्मण हा धंदा राहिला असता. ब्राह्मण हा आपला धंदा टाकून इतर धंदा करूं लागला तरी देखील ब्राह्मण राहूं शकतो ही गोष्ट रमेशचंद्र दत्तासारख्यांनी जातिभेद दुर्बल होता यास प्रमाण म्हणून दिली आहे. पण तीच गोष्ट जातिभेद बलवत्तर झाला होता असें  दाखवितें. जेव्हां ब्राह्मण ब्राह्मणेतरास योग्य असा धंदा करूनहि तो ब्राह्मण राहूं शकतो तेव्हां ब्राह्मण हा धंदा नसून जात झाली असें समजावें. या प्रकारची स्थिति कुरुयुद्धाच्या अंतीच आली होती अशी गोष्ट द्रोणाचार्य व कृपाचार्य यांच्या उदाहरणावरून दिसते आणि त्यानंतर नवीन ब्राह्मण होण्याची क्रिया जरी चालू होती. बाप अनिश्चित  पण आई निश्चित असलेले म्हणजे क्षेत्रप्रधान असे आचार्य ज्यांत बरेच आहेत असा शुक्लयजुर्वेदी ब्राह्मणाचा संघ स्थापन झाला व त्यास ब्राह्मणपदवीही प्राप्त झाल्याचें दिसतें तरी त्या ब्राह्मणांचा विवाह दृष्टया प्रवेश जुन्या ब्राह्मणांत झाला नाहीं. जुने ब्राह्मण म्हणजे सर्व रक्ताने शुद्ध असावेत असें खात्रीनें म्हणतां येत नाहीं. ॠग्वेदाचा ब्राह्मणकार ऐतरेय हा देखील इतरा नामक स्त्रीचा मुलगा म्हणजे क्षेत्रप्रधान आचार्य होता असें म्हणतां येईल.

त्या वेळेस यज्ञसंस्था चालवून उपजीविका करण्यासाठी अनेकांस इकडे तिकडे हिंडावे लागत असे ही गोष्ट चरकाध्वर्यूवरून लक्षात येते. व चरकांस उभे जाळावे म्हणून त्या वेळेस शुक्लयजुर्वेद्यांस वाटत होतें याचें कारण अर्थात भटक्या भिक्षुक एखाद्या सध्याच्या तैलंगी भटजीप्रमाणें येऊन दक्षणा उपटून जातो हेंच असावें. म्हणजे जातीस  साधारणपणें इतरांपासून भिन्नता व त्यांच्यातील शाखांस एकमेकांपासून भिन्नता म्हणजे शाखावार पोटजातीच्या कुरुयुद्धकालीन आहेत. आणि त्याच वेळेस प्रादेशिक भावना देखील उत्पन्न होऊन ब्राह्मणांमध्ये प्रादेशिक जाती पडण्यास प्रारंभ झाला होता असें मानण्यास हरकत नाहीं. म्हणजे ब्राह्मणाचें आज जें जातिस्वरूप आहे त्यांतील मुख्य स्वरूपें कुरुयुद्धकालीन आहेत आणि नंतर ब्राह्मणांत जे अधिक भेद पडले ते कांही अंशी पूर्वीच्याच कारणांच्या अधिक वृद्धीनें व पुढें शिवविष्णुउपासनेच्या भेदामुळें व कांहीं भेद नवीन मतें उत्पन्न झाल्यामुळें उद्भूत झाले आहेत. (उदाहरणार्थ रामानुज, माघ्व इत्यादि) आणि कांही केवळ लौकिक कारणामुळें उत्पन्न झाले आहेत. ब्राह्मणांपैकी पुष्कळ लोक कारकुनी वगैरे धंद्यांत पडले आणि ते इतरांपासून वेगळे झाले अशी उदाहरणे तैलंगी लोकांतील नियोगी व गोवळकोंडा व्यापारी या जातींवरून देतां येतील.
(१०) सर्व हिंदुस्थानांतील ब्राह्मणांनी एकत्र होऊन आपल्या जातीला काहींतरी विशिष्ट शिस्त लागावी किंवा सर्वजनहिताकरितां आपली कांही तरी दृष्टि निश्चित ठेवावी अशा त-हेची सामुच्चयिक भावना यांच्यांत कुरुयुद्धापासून आजयपर्यंत कधी दृष्टींस पडली नाही. ज्याप्रमाणें बौद्धाच्या संघांच्या सभा वारंवार होत व त्यावेळेस धार्मिक गोष्टींतील अवश्यानवश्य भाग ठरविण्यांत येई त्याप्रमाणें तडफड ब्राह्मणांनी कधीच केली नाही. राष्ट्र उत्तम नैतिक स्थितीत राहावें याबद्दल ब्राह्मणांस सामुच्चयिक जबाबदारी कधींच वाटली नाहीं. बौद्धिक इतिहासांत ब्राह्मणजातीचें स्थान जरी मोठे आहे तरी पारमार्थिक व नैतिक इतिहासामध्यें ब्राह्मण जातीचे कार्य फारसें अभिमान बाळगण्याजोगें नाहीं. आपली उच्चता राहण्याकरितां देव बदलणें, आचार बदलणें, धार्मिक संस्था बदलणें, ऐतिहासिक ग्रंथ पूर्वीच्यापेक्षां अगदी निराळे करून टाकणें, ब्राह्मणाच्या उच्चत्वाच्या कथा प्रसृत करणें याच्या पलींकडे निश्चयात्मक कामगिरी फारच थोडी झाली असावी. समाजातील प्रगतीची साधना ब्राह्मणांनी फारशी केली नसावी. पण जेव्हां प्रगतीची दिशा निश्चित झालीं तेव्हा आपल्या पांडित्यासह त्या प्रवाहांत पडून त्यांनी आपलें तात्पुरतें लौकिक हित करू घेतलें. तथापि हेंहि लक्षात ठेवलें पाहिजे कीं, राष्ट्रास एकस्वरूप देण्याच्या बाबतीत त्यांची कामगिरी मोठी झाली. हिंदुस्थानांत आर्यन्, मंगोलियन, द्राविड वगैरे अनेक रक्तें आहेत. तथापि इतक्या सर्व प्रकारच्या भिन्न लोकांनां एका पंरपरेस चिकटविलें ही कामगिरी लहान सहान नाहीं. लोकांच्या वन्य देवतांचे शिवविष्णूशीं किंवा त्यांच्या कौटुंबिक देवतांशी ऐक्य स्थापन करणें, त्यांच्या वन्यत-हेच्या पूजनास थोडेसे पुराणोक्त स्वरूप देणें, ज्यांस वैदिक संस्कार मुळीच नाहीं, असा जो एकंदर सामान्यवर्ग त्यास आपण वैदिक संस्कारास अधिकारी आहों अशी समजूत करून देऊन वैदिक परंपरेस चिकटविणें,देशांतील अनेक भाग अपवित्र होते तेथें अनेक तीर्थे व पवित्र स्थानें निर्माण करून सर्व देश प्रवासास व वसाहतीस योग्य करणें, अनेक जातींनां आपली उत्पत्ति पुराणांत सांपडवून देऊन त्यांचा ब्राह्मणी ग्रंथांशी संबंध जोडणें इत्यादि क्रिया लक्षांत घेतल्या असतां त्याचें सामुच्चयिक कार्य वैयक्तिक प्रेरणेंने जरी झाले असलें तरी तें आकाराने फार मोठें होतें हेहि कबूल करावें लागेल.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .