प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण ५ वें.
असुरकलीन आशियांतील राष्ट्रें व संस्कृती.

असुरराष्ट्र वैभवांत असतां त्याचा आशियामायनर मधील तत्कालीन अनेक राष्ट्रांशीं संबध आला. अशा राष्ट्रंपैकीं विशेष प्राचीन म्हणजे हिटाइट व मिटनी हीं राष्ट्रें होत. परंतु त्यासंबंधीं आज आपणांस विशेष माहिती नाहीं. कीलाकृति शिलालेखांचें वाचन व मेसापोटेमियांत चाललेलें संशोधन या राष्ट्रांविषयीं नवी नवी माहिती राजे उजेडांत आणीत आहे व कांही दिवसांनीं या राष्ट्रांचा सुसंगत इतिहास लिहितां येण्यासारखी साधनसामुग्री उपलब्ध होईल अशी आशा आहे. यानंतर दुसरें महत्त्वाचें राष्ट्र पॅलेस्टाइनमधील यहुद्यांचें होय. या राष्ट्रानें जुना करार नामक वाङ्मय उत्पन्न करून सेमेटिक संस्कृतीस चिरकालित्व आणले आहे. पुढें नवा करार व ख्रिस्ती संप्रदाय यांस जन्म देऊन जगाच्या बऱ्याच मोठ्या भागास  ॠणी करून ठेवलें आहे व वाङ्मयोत्पादनानें आपल्या विषयींचा इतिहास बराचसा सुसंघटित स्वरूपांत कायम ठेवला आहे. लिपीची उत्पत्ति इत्यादि अनेक सुधारणांचा उगमहि या संस्कृतींत झाला असें मानण्याची बऱ्याच पाश्चात्य पंडितांची प्रवृत्ति आहे. संप्रदाय स्थापनेच्या कामांत जसें यहुदी राष्ट्रांचें नांव ऐकूं येतें. तसें व्यापाराच्या कामांत फिनिशिअन राष्ट्राचें नांव ऐकूं येतें. या राष्ट्रानेंहि व्यापाराच्या कामांत बरीच प्रगति करून आपल्या वसाहती दूरदूरच्या अनेक ठिकाणीं स्थापन करून संस्कृतिप्रसारास मदत केली व अनेक धाडसी सफरी करून आफ्रिकेला वळसा घालून भौगोलिक ज्ञानांत बरीच भर घातली व एका काळीं रोमसारख्या बलाढय राष्ट्रांचें जीवितहि सांशकित केलें.

याखेरीज त्यावेळीं आशीयामायनरमध्यें कमी अधिक महत्त्वाचीं सिरिया, लिडिया, साबिअन, अरेमियन, मायसिनी, बिथ्रिअन वगैरे राष्ट्रें होतीं व आंशियामायनरबाहेर पूर्वेकडे मीडिया, इराण, मंगोल व चीन हीं राष्ट्रें होतीं. चीनशिवाय हीं सर्व राष्ट्रें त्यावेळीं बाल्यावस्थेत होती व त्यांनीं आपणांमागें स्वत:चें असें विशेष कांहीं ठेवलें नाहीं. आतां आपण क्रमाक्रमानें एका एका राष्ट्राच्या संस्कृतीचें विवेचन करूं. प्रथम सर्वांत प्राचीन हिराइट व मिटनी हीं राष्ट्रें घेऊं.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .